काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
9 Nov 2017 - 11:31 pm

काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.

अतिप्राचीन कालामध्ये कालगणनेची नैसर्गिकपणे उद्भवलेली पहिली संकल्पना ’दिवस’ असे निश्चितीने म्हणता यावे. एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत लोटणारा काळ म्हणजे एक दिवस. तो प्रत्येक मानवाला सहजच जाणवतो. त्या नंतरची निर्माण झालेली संकल्पना म्हणजे मास किंवा महिना. अमावास्या म्हणजे सूर्य-चंद्र युती किंवा सूर्य आणि चन्द्र ह्यांचे रेखांश (Right Ascension) सारखे असणे. अशा एका अमावास्येपासून त्याच्या पुढच्या अमावास्येपर्यंतचा कालावधि म्हणजे एक चांद्रमास होय. मास हा शब्द ’मास्’ किंवा ’मास’ अशा चन्द्रदर्शक शब्दांतून बनलेला आहे. हा चांद्रमास वरवर पाहिल्यास ३० दिवसांचा असतो असे भासते. पौर्णमासी-पूर्णमासी-पूर्णिमा म्हणजे चन्द्र पूर्ण असण्याची तिथि. माहेमोहर्रम (मोहर्रमच्या महिन्यात) अशा मुस्लिम शब्दरचनेमध्ये असणारा ’माह’ हा शब्दहि अवेस्ताच्या प्राचीन भाषेमधून पर्शियन भाषेमध्ये आला आहे. अवेस्ताच्या भाषेचे आणि संस्कृतचे साम्य प्रसिद्धच आहे.

असे बारा चान्द्रमास गेले म्हणजे एक ऋतुचक्र पूर्ण होते ही सहज निरीक्षणामधून कळलेली तिसरी संकल्पना. अतिप्राचीन काळातील असे वर्ष ३६० दिवसांचे होते असे ऋग्वेदातील उल्लेखावरून समजते.

वेदकालानंतर कितीएक शतके लोटली आणि कालाचे अधिक सूक्ष्म मापन करता येणे शक्य झाले. त्यामुळे ऋतुचक्र पूर्ण होण्यास ३६० दिवस पुरे पडत नाहीत तर काही अधिक दिवस लागतात असे कळले असावे, यद्यपि त्या प्राचीन कालात बर्षाचे माप कितपत सूक्ष्म होते हे सांगणारे काहीच साधन उरलेले नाही. ह्या ऋतुचक्र काळामध्ये सूर्य एका संपातबिंदूपासून निघून रोज सुमारे १ अंश कक्षेमध्ये चालत पुन: त्या संपातबिंदूपाशी येतो. ह्याला सांपातिक सौर वर्ष अथवा सावन सौर वर्ष असे म्हणतात आणि ऋतुचक्र ह्या वर्षाशी बांधलेले असते. ऋतुचक्राला बांधलेल्या ह्या सांपातिक सौर वर्षाला ३६० दिवसांहून थोडा अधिक काळ जातो हे सहजी लक्षात येण्याजोगे नाही. १०००० वर्षांपूर्वी शेती करण्यास मानवाने प्रारंभ केला तेव्हा ३६० दिवस आणि बारा चान्द्रमासांवर बेतलेल्या गणनेनेच पेरणी आणि शेतीची अन्य कामे ठरत असणार. शेतीला ही गणनापद्धति चालत नाही, ठोकताळ्याने ठरविलेला पावसाळा प्रत्यक्षातल्या पावसाळ्याच्या मागे पडत आहे हे कोणाहि शेती करणार्‍याला एका आयुष्याच्या कालावधीत वैयक्तिक अनुभवामधून कळेल पण कैक पिढ्या आणि शतके लोटल्यानंतरच असे अनुभव सर्वमान्य झाले असणार. त्यावर उपाययोजना म्हणजे वेदकालातच निर्माण झालेली अधिकमासाची कल्पना. सूक्ष्म मापन अजून कैक शतके दूर होते पण अनुभवावरून हे लक्षात आले असणार की ३६० दिवसांच्या वर्षगणनेमध्ये आणि ऋतुचक्रामध्ये फरक आहे. तो फरक काढून टाकण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे अधिकमास हे वेदांतच दिसते. यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेमध्ये तिचा स्पष्ट उल्लेख आहे.

कालान्तराने सूक्ष्म मापन शक्य झाल्यावर पुढील गोष्टी समजून आल्या. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करीत असतांना पृथ्वीवरून सूर्याचे दिसणारे स्थान रोज बदलत असते. असे रोज स्थान बदलत सूर्याला परत पहिल्या स्थानी येण्यासाठी लागणारा काल, म्हणजेच एक ’सावन वर्ष’ अथवा tropical year, एक ऋतुचक्र पूर्ण होण्यासाठी लागणारा काल असे वर सांगितलेच आहे. ग्रीक विद्वान् हिप्पार्कसच्या मते ते वर्ष ३६५ दिवस ५ तास ५५ मिनिटे आणि १२ सेकंदांचे होते म्हणजेच ३६५.२४६६६ दिवसांचे होते. आर्यभटाच्या मते ते ३६५ दिवस १५ घटिका ३१ पळे १५ विपळे म्हणजेच ३६५.२५८६८ दिवस होते. सध्याच्या हिशेबानुसार ते ३६५ दिवस ५ तास ४९ मिनिटे आणि १९ सेकंदांचे आहे म्हणजेच ३६५.२४२५८ दिवस इतके आहे. चान्द्रमास (एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्यंतचा काल) हाहि तीस पूर्ण दिवस नसून २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे आणि ३ सेकंद म्हणजेच २९.५३०५८९ दिवस इतका आहे. ह्यावरून १२ चान्द्रमास म्हणजे ३५४.३६७०६८ इतके दिवस. साहजिकच एका सावन वर्षात १२ चान्द्रमास पूर्ण होऊन १३ व्या चान्द्रमासाचाहि काही काल - १०.८७५५१२ इतके दिवस - बसतो. चन्द्राचे भ्रमण अधिक सहजपणे लक्षात येणारे आणि मोजण्यास अधिक सुलभ असल्याने बहुसंख्य मानवी समूहांचे धर्मांशी निगडित आचार, सण इत्यादि चान्द्रवर्षाशी जोडलेल्या आहेत. आता चान्द्रवर्ष आणि सौरवर्षांची एकमेकात काही मार्गाने सांगड न घातल्यास धार्मिक बाबी, सणवार आदींचे सौरवर्षावरून ठरणार्‍या ऋतूंशी काही नाते उरणार नाही. असे नाते टिकविण्यासाठी बहुसंख्य जुन्या कालगणनांमधून वेगवेगळ्या मार्गांनी चान्द्रवर्षामध्ये दिवस वाढवण्याचे मार्ग शोधले गेले आहेत. ह्याचा भारतीय प्रकार म्हणजे अधिकमास आणि क्षयमासांची योजना.

वेदकालापासून अधिकमास आणि क्षयमासाच्या संकल्पना होत्या असे आपण वर पाहिले पण ते मास केव्हा घालायचे ह्याचे जे काय गणित वेदकालामध्ये असेल ते लुप्त झालेले आहे. आपले सध्याचे गणित ह्या पुढे वर्णिल्यानुसार आहे.

सर्व ग्रह, चन्द्र आणि सूर्य हे आकाशामध्ये भ्रमण करीत असतांना पूर्वपश्चिम वृत्ताच्या दोन बाजूस ८+८=१६ अंश अशा पट्टयामध्ये असतात. त्या भागात दिसणार्‍या तारकापुंजामधून आकृतींची कल्पना करून बनविली गेलेली अश्विनी-भरणी-कृत्तिका-रोहिणी इत्यादि २७ नक्षत्रे आणि ३०-३० रेखांशांचे विभाग कल्पून ठरवलेल्या मेषादि १२ राशि इ.स. पूर्व कालापासून भारतीयांना तसेच चीन आणि पाश्चात्य विद्वानांना ज्ञात आहेत. ह्यापैकी नक्षत्रांचे उल्लेख वेदांमधून मिळत असल्याने नक्षत्रे भारतीय आणि वेदकालीन असावीत असे मत शं.बा. दीक्षित ’भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास’ ह्या ग्रंथात मांडतात. मात्र राशि आणि त्यांचे नावे पश्चिमेकडून आपल्याकडे इ.स.पूर्व २०० च्या पुढेमागे आली असेहि ते म्हणतात.

आकाशात भ्रमण करतांना सूर्य प्रतिदिनी सुमारे १ अंश चालतो आणि एक राशि ३० दिवसात पूर्ण करतो. सूर्याने मेष राशीमध्ये प्रवेश केला की तो चैत्र मास, वृषभ राशीत प्रवेश केला की तो वैशाख मास अशा मार्गाने १२ राशिप्रवेशांवरून - १२ राशिसंक्रमणांवरून - चैत्रवैशाखादि १२ मासनामे निश्चित होतात. अशा रीतीने बहुतेक वर्षांमध्ये सूर्याचे एक राशिसंक्रमण आणि त्याच्या बरोबर एक चान्द्रमास असे बरोबरीने चालत राहतात.

एक सावन वर्ष आणि एक चान्द्रमास ह्यांची सूक्ष्म मापने वर उल्लेखिलेली आहेत. ह्यावरून दिसेल की साहजिकच एका सावन वर्षात १२ चान्द्रमास पूर्ण होऊन १३ व्या चान्द्रमासाचाहि काही काल बसतो. तीन ते साडेतीन वर्षांमध्ये तो जवळजवळ एका महिन्याइतका वाढून बसतो आणि कोठेतरी एक अधिकमास वाढविण्याची आवश्यकता पडते. पृथ्वी आणि चन्द्र ह्यांच्या भ्रमणकक्षा पूर्ण गोलाकृति नसतात. त्या लंबगोलाकृति असतात आणि त्यामुळे त्यांचा चलनाचा वेग हा स्थिरांक (constant) नसतो, तो बदलत असतो कारण कोपर्निकसचे ग्रहभ्रमणाविषयीचे नियम. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून बारा संक्रान्ति आणि बारा चान्द्रमास ह्यांचे जुळून राहणे मधूनमधून तुटत राहते. त्यासाठीची योजना अशी. ज्या चान्द्रमासात सूर्याचे मेषसंक्रमण होते (सूर्य मेषराशीत प्रवेश करतो) तो चैत्र, ज्यात वृषभसंक्रमण होते तो वैशाख इत्यादि ह्याचा उल्लेख आलाच आहे. ज्या चान्द्रमासात कोठलेच संक्रमण होत नाही तो अधिकमास आणि त्याचे नाव पुढच्या मासावरून. त्यानंतरच्या पुढच्या संक्रमणाचा जो मास असेल तो निज (आणि तत्पूर्वीचा अधिक). ज्या चान्द्रमासात दोन संक्रमणे होतील त्यात दुसर्‍या संक्रमणाशी संबंधित जो मास असेल तो क्षयमास. ज्या वर्षी क्षयमास येतो त्याच वर्षी त्याच्या पुढेमागे दोन अधिकमास येऊन वर्ष १३ महिन्यांचेच राहते.

अधिक आणि क्षय महिना येणे हे सूर्यचन्द्रांच्या आकाशातील विशिष्ट स्थानांशी आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या त्यांच्या गतींशी - ज्या गती केपलरच्या नियमांनुसार ठरतात - संबंधित असल्याने काही महिनेच अधिक किंवा क्षय येऊ शकतात. फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हेच महिने अधिक येऊ शकतात आणि कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष ह्यांच्यातीलच एखाद्या महिन्याचा क्षय होऊ शकतो. माघ महिना कधी अधिकही येत नाही आणि त्याचा कधी क्षयही होत नाही.

आणखी एका विचाराने हा प्रश्न समजून घेता येतो. इ.स.पूर्व ४३२ सालापासून ग्रीक विद्वान मेटन ह्याला हा एक नैसर्गिक योगायोग माहीत होता की १९ सौर वर्षांत २३५ चान्द्रमास जवळजवळ पूर्णत: बसतात. त्याला माहीत असलेली दोन्हीची मूल्ये आजच्या अधिक सूक्ष्म मापनाहून थोडी कमी सूक्ष्म होती तरीहि आज आपण १९ सौर वर्षे = ६९३९.६०९०२ सावन दिवस आणि २३५ चान्द्रमास = ६९३९.६८८६५ सावन दिवस ह्या गणितावरून मेटनला दिसलेले जवळजवळ योग्यच होते हे ताळून पाहू शकतो. १९ वर्षांमध्ये पडणारा हा फरक ०.०७९६३ दिवस किंवा १.९१११२ तास इतका किरकोळ आहे.
मेटनच्या - किंवा ज्याने कोणी हा योगायोग पहिल्यांदा हेरला - त्याच्या ह्या शोधाचा उपयोग असा की १९ सावन वर्षांमध्ये चंद्राच्या सर्व तिथि एकदा मोजल्या की त्या पुढच्या १९ वर्षांसाठी त्या तिथि पुन: त्याच सौर दिवसांवर पडणार, तो हिशेब पुन: करण्याचे कारण नाही. १९ सौर वर्षांमध्ये २२८ चान्द्रमास नैसर्गिकत: पडतात आणि ७ चान्द्रमास अधिक पडतात. त्या ७ अधिक मासांना त्या १९ सौर वर्षांमध्ये एकदा सोयीनुसार बसवले की तेच चक्र पुढच्या, त्याच्या पुढच्या अशा अनेक १९ वर्षांच्या चक्रांना लावता येते.

भारतीय पद्धतीत ही सोय राशिसंक्रमण आणि चान्द्रमास ह्यांची सांगड घालून करण्यात आले आहे आणि ३६० दिवसांचे, ३० तिथींचे आणि १२ महिन्यांचे हे आदिमकालीन चान्द्र वर्ष अजूनहि मधूनमधून अधिक मास, क्षयमास, तिथींचा क्षय आणि वृद्धि घालून आपण चालवत आहोत. तिथीचा क्षय आणि वृद्धि ह्या कशामुळे होतात ते पुढील लेखामध्ये पाहू.

१. अमावास्येच्या दिवशी पृथ्वीवरून पाहिल्यास चन्द्र आणि सूर्य एकाच स्थानावर असतात. ते जणू ’एकाच जागी’ राहतात. ’अमावास्या’ हा शब्द ’अमा’ म्हणजे ’एकाच जागी, एकत्र’ आणि ’वास्य’ म्हणजे ’वसति’ ह्यापासून निर्माण झाला आहे. ’अमावास्या’ म्हणजे dwelling together.)
२. द्वादशारं नहि तज्जराय वर्वर्ति चक्रं परि द्यामृतस्य।
आ पुत्रा अग्ने मिथुनासो अत्र सप्त शतानि विंशतिश्च तस्थु:॥ ऋग्वेद १.१६४.११
सत्य भूत आदित्याचे बारा आरे असलेले चक्र द्युलोकाभोवती सदैव भ्रमण करीत असते तरी नाश पावत नाही. हे अग्ने, ह्या चक्रावर पुत्रांची ७२० जोडपी आरूढ झालेली असतात. - शंकर बाळकृष्ण दीक्षित पृ. २८.
Formed with twelve spokes, by length of time, unweakened, rolls round the heaven this wheel of enduring Order. Herein established, joined in pairs together, seven hundred Sons and twenty stand, O Agni. - Ralf TH Griffith.)
३, मधुश्च माधवश्च शुक्रश्च शुचिश्च नभश्च नभस्यश्चेषश्चोर्जश्च सहश्च सहस्यश्च तपश्च तपस्यश्च। उपयाम गृहीतोऽसि संसर्पोऽसि।अंहस्पत्याय त्वा॥ तैत्तिरीय संहिता १.४.१४
(हे सोमा) तू मधु, माधव, शुक्र, शुचि, नभस्, नभस्य, इष, ऊर्ज, सहस्, सहस्य, तपस्, तपस्य आहेस. तू उपयामाने (स्थालीने) घेतलेला आहेस. तू संसर्प, तू अंहस्पति आहेस. (शंकर बाळकृष्ण दीक्षित) पृ. २९, (संसर्प आणि अंहस्पति म्हणजे अनुक्रमे अधिक आणि क्षयमास.)
Thou art Madhu and Madhava; thou art Shukra and Shuchi; thou art Nabhas and Nabhasya; thou art Isha and Urja; thou art Saha and Sahasya; thou art Tapa and Tapasya. Thou art taken with a support.
Thou art Samsarpa. To Anhaspatya thee! (AB Keith translation)
वरील उतार्‍यांमध्ये मधु ते तपस्य ही बारा महिन्यांची नावे आहेत आणि संसर्प आणि अंहस्पति हे अनुक्रमे अधिकमास आणि क्षयमास आहेत. पुढे राशिकल्पना आणि तत्संबंधी नक्षत्रकल्पना भारतीय ज्योतिषात प्रविष्ट झाल्यावर मासांची ही वेदकालीन नावे जाऊन त्यांच्या जागी सध्याची प्रचलित चैत्र-वैशाखादि नावे आली. तरीहि कालिदासाच्या काळापर्यंत जुन्या नावांची स्मृति जिवंत होती. कालिदासाने ’प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी’ - ’श्रावण मास जवळ आल्यावर विरहव्याकुल प्रियेचे आयुष्य लांबावे अशी इच्छा करणार्‍या’ अशा शब्दांनी यक्षाचे वर्णन केले आहे. येथे ’श्रावण मास’ ह्यासाठी त्याने ’नभस्’ हे वेदकालीन नाव वापरले आहे.
४. १ दिवस = ६० घटिका = ६०*६० पळे = ६०*६०*६० विपळे
५. चैत्र-वैशाखादि नावे कशी ठरतात आणि अधिकमास कसा ठरतो ह्याविषयीचा नियम विद्यारण्यकृत ’कालमाधव’ नावाच्या ग्रंथामध्ये आहे तो असा:
मेषादिस्थे सवितरि यो यो मास: प्रपूर्यते चान्द्र:।
चैत्राद्य: स ज्ञेय: पूर्तिद्वित्वेऽधिमासोऽन्त्य:॥
मेषेत सूर्य असतांना ज्या चान्द्रमासाची पौर्णिमा होते तो चैत्र आणि असेच पुढे. एका राशीत दोन मास पूर्ण झाले तर दुसरा अधिक. (दुसर्‍यामध्ये संक्रान्ति नाही.)
६. ही अधिकमास आणि क्षयमास घालण्याची पद्धति निश्चित केव्हा सुरू झाली ह्याचा काही पुरावा उरलेला नाही. भास्कराचार्यांच्या ’सिद्धान्तशिरोमणि’ ह्या ग्रन्थाचा एक भाग ’गणिताध्याय’. त्याच्या ’अधिकमासादिनिर्णय’ ह्या प्रकरणामध्ये पुढील श्लोक आहेत जे वर वर्णिलेली सध्याची पद्धति दर्शवितात. म्हणजे गेली सुमारे १००० वर्षे तरी ही प्रथा चालत आली आहे.
असंक्रान्तिमासोऽधिमास: स्फुट: स्यात्
द्विसंक्रान्तिमास: क्षयाख्य: कदाचित्।
क्षय: कार्तिकादित्रये नान्यत: स्यात्
तदा वर्षमध्येऽधिमासद्वयं च॥
ज्या चान्द्रमासामध्ये सूर्यसंक्रान्ति मुळीच होत नाही त्यास अधिमास असे म्हणतात. ज्या चान्द्रमासामध्ये दोन सूर्यसंक्रान्ति होतात त्यास क्षयमास म्हणतात. हा क्षयमास क्वचित् येतो आणि तो कार्तिक-मार्गशीर्ष-पौष ह्या तीन महिन्यांमध्येच येतो, अन्य महिन्यांमध्ये येत नाही. त्या वर्षामध्ये दोन अधिमास येतात.
गतोब्ध्यद्रिनन्दैर्मिते शाककाले
तिथीशैर्भविष्यत्यथाङ्गाक्षसूर्यै:।
गजाद्र्यग्निभूमिस्तथा प्रायशोऽयम्
कुवेदेन्दुवर्षै: क्वचिद् गोकुभिश्च॥
असा क्षयमास ९७४ ह्या शकामध्ये आला होता आणि १११५, १२५६, १३७८ ह्या शकांमध्ये येईल. हा बहुतकरून १४१व्या किंवा क्वचित् १९व्या वर्षी येतो.

(हा लेख शंकर बाळकृष्ण दीक्षितलिखित 'भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास' तसेच 'Encyclopedia of Religion and Ethics, Vol. III,' ed. James Hastings ह्या ग्रन्थांमधील माहितीवर आधारलेला आहे.)

विचारसंस्कृती

प्रतिक्रिया

समर्पक's picture

10 Nov 2017 - 2:44 am | समर्पक

यस्मिन्मासे पौर्णमासी येन धिष्ण्येन संयुता ।
तन्नक्षत्राहयो मासः पौर्णमासी तदाह्यया ॥४०॥ - ज्योतिर्मयुख

मासनामें : प्रत्येक महिन्यांत ज्या नक्षत्राजवळ चंद्र पूर्ण होतो त्या नक्षत्रावरुन त्या महिन्याचें नांव पडलें. किंवा पौर्णिमेस रात्रभर आकाशात असलेल्या नक्षत्रावरून त्या महिन्यास नाव देण्यात आले. चैत्र..चित्रा. वैशाख...विशाखा. ज्येष्ठ...ज्येष्ठा. आषाढ...उत्तराषाढा. श्रावण...श्रवण. भाद्रपद....पूर्वाभाद्रपदा. आश्र्विन..अश्विनी. कार्तिक....कृत्तिका. मार्गशीर्ष...मृगशीर्ष. पौष..पुष्य. माघ...मघा. फाल्गुन...उत्तराफाल्गुनी. यात काही नक्षत्रे मागे-पुढे होत असल्याने फाल्गुनी, भाद्रपदा व षाढा या प्रत्येकी पूर्वा-उत्तरा अशा दोन आहेत असे वाचनात आले. त्यामुळे मास-नक्षत्र हा परस्परसंबंध प्रस्थापित होण्याआधी तीन वेगळी नावे यादीत असण्याची शक्यता आहे का?

तसेच मधु-माधव इत्यादी सौर मास असून चैत्र-वैशाख इत्यादींना (अनुक्रमे) समानार्थी नाहीत असेही वाचनात आले.

मेषादि सौरमासास्ते भवंति रविसंक्रमात् ।
मधुश्च माधवश्चैव शुक्रः शुचिरथो नभः ॥४४॥
नभस्यश्चेष ऊर्जश्च सहश्चाथ सहस्यकः ।
तपस्तपस्यः क्रमतः सौरमायाह प्रकीर्तिताः ॥४५॥ - ज्योतिर्मयुख

अरविंद कोल्हटकर's picture

10 Nov 2017 - 9:43 am | अरविंद कोल्हटकर

तुम्ही संदर्भ दाखविलेले 'ज्योतिर्मयूख' हे पुस्तक मला http://www.transliteral.org/ ह्या संस्थळावर सापडले. (मला असे वाटते की तुम्हीहि त्यातील उतारे तेथूनच घेतले असावेत.) पुस्तक अगदी अलीकडचे (१९८४) सालचे असून मुळात फार अभ्यास नसलेले ज्योतिषी, पूजा सांगणारे ब्राह्मण अशांच्या उपयोगाचे guide किंवा manual असावे. त्यात घेतलेले श्लोक मुळात कोठून घेतले आहेत हा उल्लेख कोठेच नसल्यामुळे श्लोकांचा जो ढोबळ अर्थ पुस्तकामध्ये दिला आहे त्यापलीकडे जाऊन त्या श्लोकांची छाननी करता येत नाही. Transliteral च्या वेबसाइटवरील संस्कृतहि खूप अशुद्ध आहे आणि हा अशुद्धपणा Transliteral चा आहे की मुळातलाच आहे हेहि कळत नाही. उदाहरणार्थ तुम्ही दाखविलेला श्लोक ४० असा आहे:
यस्मिन्मासे पौर्णमासी येन धिष्ण्येन संयुता ।
तन्नक्षत्राहयो मासः पौर्णमासी तदाह्यया ॥४०॥
ह्याची दुसरी ओळ चुकीची आहे. श्लोक असा हवा:
यस्मिन्मासे पौर्णमासी येन धिष्ण्येन संयुता ।
तन्नक्षत्राह्वयो मासः पौर्णमासी तदाह्वया ॥४०॥

ह्या मर्यादांच्या आत राहून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

तुम्ही लिहिता:
मासनामें : प्रत्येक महिन्यांत ज्या नक्षत्राजवळ चंद्र पूर्ण होतो त्या नक्षत्रावरुन त्या महिन्याचें नांव पडलें. किंवा पौर्णिमेस रात्रभर आकाशात असलेल्या नक्षत्रावरून त्या महिन्यास नाव देण्यात आले......त्यामुळे मास-नक्षत्र हा परस्परसंबंध प्रस्थापित होण्याआधी तीन वेगळी नावे यादीत असण्याची शक्यता आहे का?

ह्यापैकी पहिला भाग माझ्या लेखातच आहे. ह्यासाठी माझी टीप ५ पहावी. दुसरा भाग - तीन वेगळी नावे यादीत असण्याची शक्यता माझ्या वाचनात आलेली नाही.

पुढे ज्योतिर्मयूख असे म्हणतो:
मेषादि सौरमासास्ते भवन्ति रविसङ्क्रमात् ।
मधुश्च माधवश्चैव शुक्रः शुचिरथो नभः ॥४४॥
नभस्यश्चैष ऊर्जश्च सहश्चाथ सहस्यकः ।
तपस्तपस्यः क्रमतः सौरमासा: प्रकीर्तिताः ॥४५॥

म्हणजे ज्योतिर्मयूखाच्या मताने मधुमाधव इत्यादी मासनामे ही सौरमासनामे आहेत. असे का ह्याचे उत्तर तेथे नाही.

सूर्याच्या दैनंदिन चलनाकडे पाहून कसलेच महिने ठरवता येणार नाहीत हे उघड आहे. राशिसंक्रमणाची कुबडी आधाराला घेतल्यानंतरच सौरमास निर्माण होतात. मधुमाधव इत्यादि नावे वेदकालीन परंपरेतील आहेत. वेदांमध्ये राशींचा उल्लेख नाही कारण राशी आपल्याकडे ग्रीकांकडून आल्या आणि त्याहि पहिल्या दुसर्‍या शतकात. ह्या दोन गोष्टी पाहता असे वाटते की मधुमाधव इत्यादि मासनामे चान्द्रच असावी कारण चन्द्रापासून होणारे महिने सामान्य माणूसहि आपल्या डोळ्याने पाहून ठरवू शकतो.

समर्पक's picture

10 Nov 2017 - 10:40 pm | समर्पक

वेदकालीन कलामापनात केवळ चांद्रमान पद्धती असावी असे वाटत नाही, नाहीतर त्यात हिजरी चक्राप्रमाणे महिने काही काळाने वेगळ्या ऋतूत येण्याची त्रुटी निर्माण होईल. त्यामुळे सौरमानाची सांगड ही असावी असा माझा समज. राशींची सद्य रूढ संकल्पना ग्रीक आहे अशी मान्यता असली तरी त्याचे वेगळे समांतर रूप इथे प्रचलित असू शकते का? वेदांत काही ठळक गोष्टीही स्पष्टोल्लेखित नाहीत, जसे वाघ, तांदूळ इत्यादी. तसेच हेही असावे का?

ज्योतिर्मयुख - होय माझाही संदर्भ तिथलाच. शुद्धलेखनाच्या असंख्य चुका आहेत तिथे, पण ज्या मात्रेत त्यांनी साहित्य उपलब्ध करून दिले आहे ते पाहता हे माझ्या मते क्षम्य आहे... संशोधन करून शुद्धी, मर्यादित संस्कृत ज्ञानामुळे प्रत्येक वेळी जमत नाही हे खरे... पण जाणकारांना शक्य.

गंम्बा's picture

10 Nov 2017 - 11:45 am | गंम्बा

ज्या चान्द्रमासात दोन संक्रमणे होतील त्यात दुसर्‍या संक्रमणाशी संबंधित जो मास असेल तो क्षयमास.

एक प्रश्न, सुर्याची संक्रमण ३० दिवस आणि काही तासांनी होत असणार, चांद्रमास तर २९.५३ दिवसांचा असतो. तर एका चांद्रमासात सुर्याची दोन राशी संक्रमणे कशी आणि कधी होतात?

आनन्दा's picture

10 Nov 2017 - 2:38 pm | आनन्दा

हे संक्रमण प्रतिपदेच्या पहिल्या चरणात एक, आणि अमावस्येच्या शेवटच्या चरणात होत असणार..
Overlap सहज होऊ शकतो

कळत नाहीये. सूर्याचे आवर्तन ३० दिवसांचे आणि चांद्रमास २९.५३ दिवसाचे. गणितानी तरी होणे बरोबर वाटत नाही,

गामा पैलवान's picture

10 Nov 2017 - 7:35 pm | गामा पैलवान

गंम्बा, हे सरासरी आकडे आहेत. प्रत्यक्ष आवर्तनं कमीजास्त असू शकतात.
आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2017 - 2:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले.

-दिलीप बिरुटे

एस's picture

10 Nov 2017 - 3:46 pm | एस

उत्तम लेख.

अरविंद कोल्हटकर's picture

11 Nov 2017 - 4:02 am | अरविंद कोल्हटकर

दोन वेगवेगळ्या प्रश्नांना येथे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

@समर्पक - मधुमाधव इत्यादि मासनामे सौरहि असू शकतील अशी शंका शं.बा.दीक्षितांनाहि सुचलेली होती. ह्याबाबत त्यांनी काय म्हटले आहे हे त्यांच्याच शब्दांमध्ये दाखवितो. (पृ.४१ पहा)

Dixit Text


@गंम्बा -

सूर्याचे संक्रमण ३० दिवस आणि काही तासांनी होते हे केवळ मध्यममान (सरासरी) आहे. सूर्याला संपातापासून त्याच संपातापर्यंत यायला म्हणजे ३६० अंश चालायला ३६५.२४२५८ दिवस लागतात हे वर म्हटलेले आहेच. म्हणजे दिवसाला सूर्य १ अंशाहून किंचित कमी चालतो. पण ही गति सर्वकाळ स्थिर (constant) असते असे बिलकुल नाही.

सूर्याचे हे चालणे म्हणजे पृथ्वीच्या स्वतःच्या कक्षेतील दैनंदिन चालण्यामुळे सूर्याचे स्थान तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर बदलते दिसणे. आता पृथ्वीचे हे दैनंदिन चालणे एका स्थिर (constant) गतीने होत नसते. केपलरच्या दुसर्‍या नियमानुसार (equal areas are swept out in equal time) पृथ्वी आपल्या लंबवर्तुळाच्या कक्षेत जेव्हा सूर्याच्या सर्वात निकट असते (म्हणजेच ती perihelion वर असते) तेव्हा तिची दैनंदिन गति सर्वात अधिक असते आणि उलट बाजूस सूर्याचे चालणे मंदावलेले दिसते. पुढील आकृति हे स्पष्ट करत आहे.

Earth's orbit

ह्याचाच अर्थ असा की सूर्याचे एका राशीत राहणे ह्याचा काल स्थिर (constant) असतो असे नाही. पृथ्वी आपल्या कक्षेत कोठे आहे त्यानुसार तो कमीअधिक होत असतो आणि त्याचे मध्यममान ३० दिवसांहून थोडे अधिक असते.

सूर्याचा एका राशीत राहण्याचा काल स्थिर (constant) नसल्याने एका चान्द्रमासात दोन संक्रमणे होणे किंवा एकहि संक्रमण न होणे शक्य होते.

धन्यवाद. हे नव्यानीच कळले.

चौकटराजा's picture

11 Nov 2017 - 6:23 pm | चौकटराजा

उत्तम व माहितीपूर्ण लेख. कालमापन ही अभ्यासास एक रंजक व विस्मयकारी गोष्ट आहे. विशेष म्हणजे जर आप्ल्या ग्रहावर ऋतू नसते तर कालमापनातील माणसाची जिज्ञासा फार वाढली नसती असे म्हणावेसे वाटते.

मित्र आहे शेतकऱ्यांचा, चंद्र दर्यावर्दी लोकांचा.

३३ सौर महिन्यांत ३४ चांद्र महिने होतात हा ढोबळ नियम लावूनही सरसकट अधिक घेण्याऐवजी राशिसंक्रमणाचा नियम घेतला गेला.

तिथिचा क्षय मोजणे यासाठीही सूर्योदयाची तिथि हीच दिवसभराची तिथि धरल्याने होतो. पंचांगकर्ते यामुळे गोंधळात पडू लागले. आता आगामी संवत्सरात कोणत्या तिथि - सणाचा वाद होऊ शकतो यावर अगोदरच तोडगा/निर्णय सर्व मिळून घेतात. उदाहरणार्थ अश्विन कृष्ण १५ म्हणजे लक्ष्मिपूजन तिथि ४नोव्हेंबर सूरयोदयानंतर सुरू झाली व ५नोव्हेंबर सुर्योदयापूर्वीच संपली तर ४ तारखेलाच धरावी असे ठरते. कारण लक्ष्मी पूजन संध्याकाळी असते तेव्हा ती तिथि असतेच.

लेखमालिका आवडली. संदर्भ फारच उपयुक्त.

परिंदा's picture

15 Nov 2017 - 3:23 pm | परिंदा

छान माहिती.
जर एखादा महिना क्षय झाला तर त्यामहिन्यातले सण कधी साजरे करतात? की साजरे करतच नाहीत का?
जर मार्गशीर्ष महिना क्षय झाला तर दत्तजयंती, मार्गशीर्ष गुरुवार वगैरे साजरे होणारच नाहीत का?
याआधी कुठला महिना कोणत्या साली क्षय झाला होता? पुढे कोणता महिना क्षय होणार आहे? हे वाचायला आवडेल.

पैसा's picture

15 Nov 2017 - 10:18 pm | पैसा

अतिशय माहितीपूर्ण लेख आणि प्रतिक्रिया.