काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस.

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
2 Nov 2017 - 4:23 am

काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस.

आठवड्याच्या सात दिवसांची व्यवस्था आहे तशी का आहे ह्याचा विचार करायला कोणी कधी थांबतो काय? रविवारनंतर सोमवार, त्यानंतर मंगळवार इत्यादि सात दिवसांच्या परंपरेचे रहाटगाडगे आपल्या विचारांचा इतका अविभाज्य भाग झाले आहे की आहे ते तसे का आहे हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे हेहि आपणास सुचत नाही. आठवड्यात दिवस सात का, रविवारनंतर सोमवार यावा, सोमवारनंतर मंगळवार यावा ही व्यवस्था कोणी, कधी आणि कोठे निर्माण केली असे प्रश्न विचार केल्यास निर्माण होतात. ह्या प्रश्नांची उत्तरे, मला माहीत आहेत तशी, देण्याचा प्रयत्न ह्या लेखामध्ये केला आहे.

आठवड्याचे दिवस सात का हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा वाटतो ह्याचे अजूनहि एक कारण आहे. आकड्यांमध्ये ७, १३, १७ असे अंक थोडेसे आडमुठे आहेत. आसपासच्या नैसर्गिक गोष्टीत ते सहसा कोठे दिसत नाहीत. १०चा अंक संख्यापद्धतीचा पाया म्हणून निवडला जाऊ शकला कारण मनुष्याच्या हाताला दहा बोटे असतात आणि बोटे घालून दहापर्यंत आकडे मोजणे हे अगदी नैसर्गिक आहे. असे म्हटले गेले आहे की १० ऐवजी १२ चा आकडा पाया मानून अंकरचना निर्माण झाली असती तर अंकगणित खूपच सोपे झाले असते कारण १२ ला १,२,३,४,६ इतके विभाजक आहेत, १० ला केवळ २ आणि ५ असे दोनच विभाजक आहेत. १२ चा आकडा निसर्गत:च माणसाच्या समोर असतो कारण आंगठा वगळल्यावर एका हाताच्या उरलेल्या बोटांना १२ पेरे असतात आणि प्रत्येक पेरासमोर आंगठा आणून एका हातावर १२ आकडे मोजता येतात. पण जे झाले ते झाले, आता त्यावर माघार घेता येणार नाही. वर्षाचे दिवस ढोबळ मानाने ३६० हे आदिमानवाला अतिप्राचीन काळात जाणवले आणि त्यातून बाबिलोनियन संस्कृतीची ६०वर आधारलेली अंकपद्धति सुरू झाली असा तर्क करता येतो. असे काहीच वलय ७ ह्या संख्येमागे नाही तेव्हा हा उपटसुंभ ’आठवड्याचे दिवस सात’ ह्या महत्त्वाच्या संकल्पनेत कसा शिरला?

त्याचे उत्तर ज्यू-ख्रिश्चन (Judeo-Christan) परंपरेमध्ये आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या संबंधात जुन्या कराराच्या (Old Testament) २०व्या अध्यायात असे म्हटले आहे की

’ईश्वराने सहा दिवसांमध्ये स्वर्ग, पृथ्वी, महासागर आणि त्यातील सर्व सजीव-निर्जीव गोष्टी निर्माण केल्या आणि सातव्या दिवशी त्याने विश्रान्ति घेतली. त्या दिवसाला ईश्वराने ’सब्बाथ’ असे नाव दिले आणि तो दिवस पवित्र केला. (For in six days the Lord made heaven and earth, the sea, and all that is in them, and rested on the seventh day. Therefore the Lord blessed the Sabbath day and made it holy.'
Exodus 20.11)

ह्या आदेशानुसार ज्यू समाजामध्ये सहा दिवसांनंतरचा ’सब्बाथ’ हा पवित्र विश्रान्तीचा दिवस माण्याची प्रथा पडली. आठवड्याचे दिवस सात का ह्या प्रश्नाच्या उत्तराचे मूळ येथे दिसते.

ह्या पुढचा प्रश्न म्हणजे आठवड्याच्या सात दिवसांना आहेत ती नावे कशी मिळाली आणि ती कोणी दिली. ह्या प्रश्नाचे उत्तर समजण्यासाठी दिवसाचे तास चोवीस का हे जाणून घेणे आवश्यक आहे.

दिवसाचे तास चोवीस ह्याचा उगम बहुतकरून प्राचीन ईजिप्तमध्ये शोधायला हवा. इजिप्शियन संस्कृति उभ्या काठीच्या सावलीवरून दिवसाचे १२ भाग करण्यास शिकली होती, यद्यपि त्यांचे असे १२ ’तास’ सूर्याच्या स्थितीनुसार कमीअधिक लांबीचे असत. सावल्यांवरून रात्रीचे भाग करणे शक्य नाही म्हणून इजिप्शियनांनी पूर्व-पश्चिम वृत्तामध्ये एकमेकांपासून सर्वसाधारण १० अंशांवर ३६ तारे निवडले होते, ज्यांना Decans असे नाव पडले. वर्षाच्या कोणत्याहि रात्री ह्या ३६ तार्‍यांपैकी १८ तारे आकाशात एकामागून एक असे उगवतात. त्यांपैकी पहिले तीन तारे सायंकाळच्या संधिप्रकाशात आणि शेवटचे तीन तारे पहाटेच्या संधिप्रकाशात पडल्यामुळे स्पष्ट दिसण्याची खात्री नसते. उरलेल्या १२ तार्‍यांच्या उदयकालावरून रात्रीचे बारा भाग इजिप्शियन करत असत आणि त्यांना ते रात्रीचे तास म्हणात असत. पुढे जाऊन हीच पद्धत ग्रीकांनी उचलली. तोपर्यंत ग्रीकांनी अधिक सूक्ष्म विभाजनासाठी पाणी वाहून जाण्याचे मापन करणारी उपकरणे निर्माण केली होती, ज्यांना clepsidra असे म्हणत असत. त्यांचा वापर करून पूर्ण दिवसाचे तास २४, प्रत्येक तासात मिनिटे ६० आणि प्रत्येक मिनिटात सेकंद ६० ही गणना सुरू केली. भारतामध्येहि ’घटिकायन्त्र’ नावाचे clepsidra यन्त्र वापरात आले. भारताने कालगणनेचे clepsidra यन्त्र उचलले, मात्र तास-मिनिट-सेकंद ही परिमाणे न निवडता दिवसाच्या ६० घटिका, घटिकेचे ६० पल, पलाचे ६० विपल हा मार्ग निवडला. ह्याविषयी भास्कराचार्यांच्या गणिताध्यायामध्ये पुढील श्लोक आहे:

गुर्वक्षरै: खेन्दुमितैरसुस्तै: षड्भि: पलं तैर्घटिका खषड्भि:।
स्याद्वा घटी षष्टि:रह: खरामैर्मासो दिनैस्तैर्द्विकुभिश्च वर्षम् ॥ गणिताध्याय २०.
अर्थ: ’ख’ आणि ’इन्दु’ - अनुक्रमे ० आणि १ म्हणजे ’अङ्कानां वामतो गति:’ ह्या नियमानुसार १० - इतक्या गुरु अक्षरांचा एक ’प्राण; सहा प्राणांचा एक पल, त्या पलाच्या ’ख’ आणि सहापासून - म्हणजे ६० - होते एक घटिका, ६० घटिकांचा एक दिवस, ’ख’ आणि ’राम’ - अनुक्रमे ० आणि ३ - म्हणजे ३० दिवसांचा एक मास, ’द्वि’ आणि ’कु (पृथ्वी)’ - २ आणि १ - म्हणजे १२ मासांचे वर्ष. (’अङ्कानां वामतो गति:’ सूत्राने हे आकडे कसे निर्माण होतात ह्या विषयावर नंतर केव्हातरी.)

अशा रीतीने चोवीस तासांचा दिवस ग्रीसमध्ये - अथवा तत्पूर्वी बाबिलोनिया, ईजिप्त, खाल्डिया अशा कोठेतरी - सुरू झाला. भारताला तो सूर्यसिद्धान्तकालात इ.स. पहिल्या वा दुस‍र्‍या शतकामध्ये माहीत झाला, फरक इतकाच की त्यामध्ये चोवीस तासांऐवजी साठ घटिका होत्या. (शंकर बाळकृष्ण दीक्षित - भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास पृ. १३७.)

ह्या पुढचा विचारात घ्यायचा प्रश्न म्हणजे आठवड्याच्या सात दिवसांना ग्रहांची नावे का चिकटली. कोपर्निकसपूर्व काळात पृथ्वी केन्द्रस्थानी असून सर्व तारे, ग्रह हे तिच्याभोवती फिरतात हे सर्व संस्कृतींना मान्य होते. त्यांपैकी तारे हे आपल्या आपल्या स्थानांवर अचल आहेत, म्हणजे त्यांचे एक्मेकांतील अंतर कधीच बदलत नाही हे लक्षात आले होते. ह्या तार्‍यांच्या पार्श्वभूमीवरती काही आकाशस्थ गोल रोज आपले स्थान बदलतात हे माहीत झाले होते. त्यांना ’ग्रह’ असे नाव मिळाले. (ग्रीक भाषेमध्ये त्यांना πλανῆται "planētai" "wanderers" असे नाव मिळाले.) असे स्थान बदलत स्थिर तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर आकाशाचा पूर्ण प्रवास करावयास प्रत्येक ग्रहाला लागणारा काळ मोजण्यात आला होता. त्या काळाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास तो क्रम शनि, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध आणि चन्द्र असा लागतो. (सूर्य आणि चन्द्र ह्या दोनहि गोलांना प्राचीन काळात ’ग्रह’ असेच ओळखले जाई. त्यांच्या खर्‍या स्वरूपाचा शोध अजून काही शतके दूर होता,) इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पुढेमागे ह्या मांडणीमधून आठवड्याच्या सात दिवसांची नावे आणि त्यांचा क्रम निर्माण झाला.

दिओ कॅसिअस (इ.स.१५५-२३५ अदमासे) नावाच्या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या कालापर्यंत झालेला रोमन साम्राज्याचा इतिहास लिहून ठेवलेला आहे आणि तो ९ खंडांमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्या तिसर्‍या खंडामध्ये पुढील उतारा आहे:

The custom, however, of referring the days to the seven stars called planets was instituted by the Egyptians, but is now found among all mankind, though its adoption has been comparatively recent, at any rate the ancient Greeks never understood It, so far as I am aware. But since it is now quite the fashion with mankind generally and even with the Romans themselves, and is to them already in a way an ancestral tradition, I wish to write briefly of It, telling how and in what way it has been so arranged. I have heard two explanations...(येथे कॅसिअसचे पहिले स्पष्टीकरण सुरू होते पण आपल्या सध्याच्या चर्चेत त्याला स्थान नाही म्हणून ते वगळले आहे.) This is one of the explanations given.

The other is as follows. If you begin at the first hour to count the hours of the day and of the night, assigning the first to Saturn, the next to Jupiter, the third to Mars, the fourth to the Sun, the fifth to Venus, the Sixth to Mercury, and the seventh to the Moon, according to the order of the cycles which the Egyptians observe, and if you repeat the process, covering thus the whole twenty-four hours, you will find that the first hour of the following day comes to the Sun. And If you carry on the operation throughout the next twenty-four hours in the same manner as with the others, you will dedicate the first hour of the third day to the Moon, and if you proceed similarly through the rest, each day will receive its appropriate god. This, then, is the tradition.
(Dio’s Roman History Vol III p.131)

वारांची ही गणना रोमन साम्राज्यात इसवी सनाच्या पहिल्या शतकात अस्तित्वात होती ह्याचा स्पष्ट पुरावा म्हणजे वेसुविअस ज्वालामुखीच्या स्फोटामुळे गाडले गेलेले नगर पॉंपे (सन ७९) ह्याच्या उत्खननामध्ये एका भिंतीवर कोणीतरी लिहून ठेवलेली वारांची लॅटिन आणि ग्रीकमधली नावे मिळाली आहेत. (’Time and the Calendars' by O'Neil, W.M., Pg. 36.)

ही मांडणी कालान्तराने भारतातहि आली. ती येण्याचा निश्चित काल सांगता येत नाही पण हे इसवी सनाच्या पहिल्या एक-दोन शतकांच्या पुढेमागे झाले असावे. वेदांमध्ये वार नाहीत पण अथर्वज्योतिष आणि याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये ते सापडतात, ते सूर्यसिद्धान्तातहि आहेत, ज्याचा काल इसवी सनाची पहिली एक दोन शतके असावा, ह्यावरून वारांची संकल्पना भारतात इसवी सनाच्या पहिल्या एक-दोन शतकांच्या पुढेमागे आलेली असावी असा तर्क शंकर बाळकृष्ण दीक्षित करतात.

ह्या विधानाला काही पुरावाहि देता येतो. अपोलोनिअस ऑफ टायना नावाचा ग्रीक मनुष्य (मृ. इ.स. ९८) इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये भारताच्या प्रवासावर आला होता आणि त्याच्या प्रवासाचा वृत्तान्त फिलोस्ट्रेट्स नावाच्या संग्राहकाने प्रसिद्ध केला होता. त्या वृत्तान्तामध्ये एका ब्राह्मणाने अपोलोनिअसला सात अंगठ्या भेट दिल्याचा उल्लेख आहे. त्या अंगठ्या सात ग्रहांच्या नावाच्या होत्या आणि त्या त्या ग्रहाच्या दिवशी ती ती अंगठी बोटात घालण्याची पद्धत होती असे स्पष्टीकरण आहे.

वारांची नावे कशी निर्माण होतात ह्याचे कॅसिअसने दिलेले स्पष्टीकरण आपण वर पाहिले. हेच स्पष्टीकरण कालान्तराने भारतीय ज्योतिषाच्या ग्रन्थांमध्ये अन्तर्भूत झाले. भारतीयांकडे तास नव्हते, त्याऐवजी घटिका होत्या असे वर लिहिले आहे म्हणून भारतीयांनी ग्रीकांकडून Ωρα (Hour होरा) ही कल्पना उचलली. (’होरा’ला कालान्तराने ’भविष्यवाणी’ असाहि अर्थ चिकटला आणि विद्वान् ज्योतिषांना लोक ’होराभूषण’ म्हणून गौरवू लागले.) शनिवारचा पहिला तास - होरा - शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा अशी तीन आवर्तने २१ तासांमध्ये होतील, २४ व्या तासाचा होरेश मंगळ ठरेल आणि पुढच्या दिवसाच्या पहिला होराचा होरेश सूर्य ठरेल आणि तो दिवस रविवार असेल. अशा मार्गाने पुढचे वार ठरत जातील आणि वारांची सर्वपरिचित अशी रविवार, सोमवार, मंगळवार इत्यादि मांडणी बाहेर पडेल. ह्याबाबत जुन्या ग्रन्थांमध्ये असे म्हटले आहे:

मन्दादध: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:।
होरेशा: सूर्यतनयादधोध: क्रमशस्तथा ॥ (सूर्यसिद्धान्त भूगोलाध्याय ७८)
अर्थ - सूर्यतनय मन्द(ग्रह), शनि. ह्यापासून खालीखाली चौथे ग्रह क्रमाने होरेश होऊन दिवसाचे स्वामी ठरतात.

सप्तैते होरेशा: शनैश्चराद्या यथाक्रमं शीघ्रा:|
शीघ्रक्रमाच्चतुर्था भवन्ति सूर्योदयाद् दिनपा: ||
(आर्यभटीयाचा कालक्रियापाद, श्लोक १०)
अर्थ - शनीपासून प्रारम्भ करून आपापल्या गतींच्या क्रमाने हे सात होरेश चौथे चौथे पुढच्या सूर्योदयापासून ’दिनप’ (दिवसाचे स्वामी) असतील.

ह्या सर्वाचा सारांश म्हणजे वारांची कल्पना भारतात येण्याच्या घटनेची उत्तरसीमा (terminus ad quem) म्हणजे आर्यभटाचा काळ, इसवी सनाचे सहावे शतक आहे असे ठरते. पूर्वसीमेविषयी (terminus a quo) निश्चित काही म्हणता येत नाही पण ती इसवी सनाच्या पहिल्या शतकात असावी असे मानायला अडचण दिसत नाही.

ग्रहांच्या नावाने वार ओळखायची रीत भारतीयांनी आणि भारतीय परम्परेतील नेपाळ, श्रीलंका अशा देशांनी गेली २ हजार वर्षे अप्रतिहत चालवलेली आहे. पाश्चात्य देशांमध्ये मात्र ह्यांसाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. ही नावे अशी आहेत -
Latin - Dies Solis, Dies Lunae, Dies Martis, Dies Mercurii, Dies Iouis, Dies Veneris, Dies Saturni.
English - Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday.
Italian - Domenica, Lunedi, Martedi, Mercoledi, Giovedi, Venerdi, Sabato.
French - dimanche, lundi, mardi, mercredi, jeudi, vendredi, samedi.
Spanish - el domingo, el lunes, el martes, el merceles, el jeuves, el vierney, el sabado.
Portuguese - domingo, segunda-fiera, tercia-fiera, quarta-fiera, quinta-fiera, sexta-fiera, sabado.
Greek - Kyriakí, Deftéra, Tríti, Tetárti, Pémpti, Paraskeví, Sávvato(Κυριακή, Δευτέρα, Τρίτη, Τετάρτη, Πέμπτη, Παρασκευή, Σάββατο.)
German - Sonntag, Montag, Dienstag, Mittwoch, Donnerstag, Freitag, Samstag.
Russian - Воскресенье, понедельник, вторник, среда, четверг, пятница, суббота. (Voskresen'ye, ponedel'nik, vtornik, sreda, chetverg, pyatnitsa, subbota.)

वरील नावांवरून दिसते की इंग्लिश आणि जर्मन भाषांनी मंगळाऐवजी Tiw, बुधाऐवजी Woden, गुरुऐवजी Thor आणि शुक्राऐवजी Fria ह्या जुन्या ट्यूटन टोळ्यांच्या देवतांची नावे स्वीकारली आहेत. ग्रीक भाषेने ह्याच वारांना तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा अशी नावे दिली आहेत. रशियामध्ये ख्रिश्चन धर्म आणि संस्कृति बिझण्टाइन ग्रीकांकडून आले. ईश्वराने रविवारी विश्रान्ति घेतली ह्यावरून रशियन भाषेने सोमवारला ’विश्रान्तीनंतरचा दिवस’ असे नाव दिले. रविवारी क्रूसावरून उतरविलेल्या येशूचे पुनरुत्थान झाले ह्यावरून रविवारला ’उत्थान’ असे नाव दिले. ग्रील संस्कृतीपासून शिकून मंगळवारपासून शुक्रवारपर्यंतच्या वारांना अनुक्रमे ’दुसरा, मधला, चौथा, पाचवा’ अशी नावे दिली आणि शनिवारचे ’सब्बाथ’ हे नाव तसेच राहू दिले.

वरील लेखनास आधार:
१) 'भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास', लेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित.
२) 'History of Dharmashastra' Vol V.1, Ch XVIII by M.M. P.V.Kane.
३) 'The Week' by F.W.Colson.
४) ’Time and the Calendars' by O'Neil, W.M.,
५) Dio’s ’Roman History', Vol III

विचारसंस्कृती

प्रतिक्रिया

उत्तम लेख! खूप माहितीपूर्ण आणि छान संकलन केलं आहे. आणखी विस्तृत असता तरी चालला असता.

एक प्रश्नः लेखात "त्या काळाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास तो क्रम शनि, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध आणि चन्द्र असा लागतो. " असं लिहिलंय. मग वारांचा क्रम असा का नाही ते कळलं नाही.

बाकी, वारांप्रमाणे ठराविक रंगाचे कपडे घातल्याने चांगला प्रभाव होतो असेही काहीजण मानतात.. उदा. मंगळवारी लाल, बुधवारी हिरवा इ.इ... याचे एक उदाहरण म्हणजे सुषमा स्वराज. शिवाय काहीजण आहारातही तसा समावेश करतात (उदा. बुधवारी मूग).

अरविंद कोल्हटकर's picture

7 Nov 2017 - 3:36 am | अरविंद कोल्हटकर

एक प्रश्नः लेखात "त्या काळाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास तो क्रम शनि, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध आणि चन्द्र असा लागतो. " असं लिहिलंय. मग वारांचा क्रम असा का नाही ते कळलं नाही.

ह्या प्रश्नाचे उत्तर लेखामध्येच आहे. Cassius मधील उतारा आणि सूर्यसिद्धान्त, आर्यभटीयामधील श्लोक पहावेत.

अच्छा. आता समजले.. धन्यवाद.

अतिशय माहितीपूर्ण लेख. पाश्चात्य देशांत जशी रविवारी सुट्टी घ्यायची पद्धत होती, तशी भारतात साप्ताहिक सुट्टी असायची का?

sagarpdy's picture

2 Nov 2017 - 10:59 am | sagarpdy

+१ . हाच प्रश्न पडला

राही's picture

2 Nov 2017 - 3:54 pm | राही

आपल्याकडे पंधरवड्यात दोन वेळा सुट्टी असे . अष्टमी आणि अमावास्या. हे दोन्ही दिवस काम न करण्याचे. दक्षिणेत आजही अष्टमी ही तिथी अशुभ मानतात.
लेख अर्थात आवडला.
ता.क. मजजवळ हे पुस्तक कित्येक वर्षांपूर्वीपासून आहे.

प्रचेतस's picture

2 Nov 2017 - 8:28 am | प्रचेतस

माहितीपूर्ण लेखन.

जागु's picture

2 Nov 2017 - 10:31 am | जागु

छान लेख. वेगळाच विषय.

पाटीलभाऊ's picture

2 Nov 2017 - 3:48 pm | पाटीलभाऊ

माहितीपूर्वक लेख

पैलवान's picture

10 Nov 2017 - 7:56 am | पैलवान

माहितीचं संकलन खूप छान केलंय

बापू नारू's picture

10 Nov 2017 - 11:32 am | बापू नारू

छान माहिती , धन्यवाद!

चौकटराजा's picture

11 Nov 2017 - 6:48 pm | चौकटराजा

सात ही फिबोनक्की संख्या आहे. फिबोनक्की संख्या व निसर्ग याचे अतूट नाते आहे. फिबोनक्की या माणसाने ही संकल्पना प्रथम मांडली. एक आकडा + १ + तो आकडा = फिबोनक्की संख्या. ३+४ = सात . म्हणून सात वार आले काय? आपल्याला ५ बोटे असतात २+३ = ५ एका बोटाला तीन पेरं १+३ =३ जास्तीत जास्त फुलाना ५ पाकळ्या असतात. चार पाकळ्याचे फूल असते पण विरळा. अर्थात फिबोनाक्की हा एक वेगळा विषय आहे. जाता जाता --- २९ चन्द्राची प्रदक्शिणा १४+ १५ =२९ हा फिबोनक्की असून, ३६५ सूर्याची प्रदक्षिणा १८२+ १८३ = ३६५ हा देखील .........?

गामा पैलवान's picture

11 Nov 2017 - 7:00 pm | गामा पैलवान

चौरा,

७ ही फिबोनाखी संख्या नाही. तुम्ही सांगताय त्या 'एक आकडा + १ + तो आकडा' अशांना विषम संख्या म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

चौकटराजा's picture

11 Nov 2017 - 8:09 pm | चौकटराजा

मधे बरीच वर्षे गेल्याने आमची डिस्क करप्ट झाली सबब जरा घोळ झाला. पण त्यामुळे आता परत जरा विकिवर जाउन वाचतो. धन्यवाद गापै साहेब !

कंजूस's picture

12 Nov 2017 - 10:50 am | कंजूस

लेख आवडला.

पैसा's picture

15 Nov 2017 - 10:24 pm | पैसा

लेख आवडला.