मराठी नव्या वळणाची

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
4 Dec 2017 - 12:36 pm

आजकाल विरोधाभासात्मक उपमा देणे फारसे प्रचलित नाही. कोणे एके काळी हा प्रवादच होता. परंतु त्याचे दुष्परिणामच जास्त व्हावयाचे. एखाद्यास त्या वाक्याचे मर्म समजणे कष्टप्रद झाल्याने तो मार्मिकटोला न राहता भीमटोला समजून उगाच कुस्त्यांचे फड रंगत, अगदीच उदाहरणादाखल एखाद्या सुंदरीच्या सौंदर्याचे वर्णन जर निरलसपणे "भयंकर सुंदर" असे केले तर त्यातील सौंदर्याचे पान करण्या ऐवजी अपमानाचे पान खिलवल्याचा गैर समज होण्याची शक्यता वाटते. परिणामी..... असो!

तर एकूणच काय, आजकाल इंग्रजाळलेल्या शब्दांस देशी स्वरूपांत एकत्रीकरण करून पाल्हाळ वेडेपणा दर्शनास पडतो आहे. याच्या उदाहरणादाखल अनेक रसरशीत सोदाहरने आहेत. येथे भाषा विषयान्वये रसपानादाखल रस शब्दाची पुनरुक्ती योजिली आहे, रसभरीत हा शब्द खरे तर अतीव संयुक्तिक राहिला असता परंतु पुन: कोण्या भाषा रसिकाने "भरीत" शब्दावर आक्षेप घेतल्याने रसभंग व्हावयाचा धोका आम्ही पत्करू इच्छित नाही. टीप:- भरीत हा शब्द केवळ वऱ्हाडी किंवा खान्देशी लोकांची खाजगी मालमत्ता नाहीय तसेच त्यांना घाबरून(च) येथे त्या शब्दाची योजना केलेली नाहीय असेही वाचकांनी समजू नये. असो....!

मराठी शाळांची घटती पटसंख्या हा मुद्दा आम्हास बिलकुलही विचारांत घ्यावासा वाटत नाही. का? याचे स्पष्टीकरण पुढे कधीतरी पाहू. तूर्तास मराठीवर होणारे इंग्रजी भाषेचे आक्रमण हे महत्वाचे असे अनेक भाषा श्रेष्ठींस वाटत असेल परंतु आमच्या लेखी तेही महत्वाचे नाही. आम्हास भाषा वेल्हाळ पणाचे जास्त मोठे आस्मानी संकट डोईवर उभे असल्याचे जाणविते आहे. ते का आणि कसे? चे उत्तर असे. आम्ही सांगू शकतो.
मावशीचे शब्द (विनाकारण) वापरून त्यास देशी प्रारूप देण्याच्या प्रयत्नात मायबोलीचे हसे होते आहे याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येते आहे यामुळे भाषेचा विकनेसपणा वाढतोय. आता येथे योजिलेल्या पणा मूळे आमच्या स्पष्टीकरणात अवघडपणा आलाय.
अर्थाअर्थी weakness म्हणजे कमकुवतपणा परंतु दोन वेळेस पणा लावल्याने काय अनर्थ होऊ शकेल हे सामान्य जनांस समजत नाहीय हेच आमचे रडगाणे आहे.
नुकतेच ऐकलेले एक गैरदेशी प्रारूप (इंडो इंग्लिश version) म्हणजे कंबरेचा lumbar belt. हे ऐकल्यावर आमची कर्णरंध्रे म्हणजे अगदीच काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत राहिली नाही. मला आपली भाषा अगदीच आजारी पेशंट झाली असल्याची जाणीव होऊन हृदयाची शकले झालीत.
नुकताच एका सदगृहस्थाने सकाळचा मॉर्निंग वॉक सुरू केल्याने त्याच्या गुडघ्याचे knee pain कमी झाले हे ऐकून माझ्या डोक्याचा hedache वाढला.
गावाकडच्या लग्नात लेडीज बायकांची वेगळी पंगत, वेगळी गाडी असते असेही सापडतेच ना. कोणाच्या तरी शिंप्याचे टेलरिंगचे दुकान ऐकविते, तर एखाद्याचा सुतार कारपेंटरी करत असतो. इथे तर कारपेंटरी न म्हणता कारपेंटरगिरी अशा योजनेने भाषा कौशल्याचे गिरी पाहून चक्कर आल्या शिवाय रहात नाही.
सांप्रत काळी एखादी गोष्ट उगाच लांबविण्यास पाल्हाळ म्हटले जाई, त्याचप्रमाणे या गैरदेशी शब्दांच्या वापराने आपण मूळ भाषेचा ढाचा बदलवीत आहोत, किंबहुना ढाचा बदलविण्यापेक्षा आपल्या अर्धवट ज्ञानाचे प्रदर्शन करीत आहोत असे वाटतेय.
मातृभाषेचे ज्ञान हे कमी आहे याबद्दल विचार करणे तर राहू द्या पण आम्ही परकीय भाषेच्या अर्धवट अभ्यासाचे दाखले दैनंदिन जीवनात वापरतोय जे जास्त घातक आहे.
असली अर्धवट ज्ञानाची धोंड गळ्यात देऊन आपली पुढची पिढी ज्ञानसागरात पोहून जाऊच शकत नाही,
याची जाणीवच कोणास नाहीय याचे वाईट वाटतेय आणि याची जाणीव करून देणाऱ्या माधुरी पुरंदरे सारख्या व्यक्तीचे मोल न समजणारे आपण लवकरच मातीमोल होणार यात काही शंका नाही.
महिन्याच्या अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात पगाराची payslip घेऊन म्याकडी च्या पावाचा बर्गर खाऊन सोडावाला कोक पिऊन ढेकर देत नाईटला रात्रीचा गुडनाईट पोस्ट करीत झोपण्यापालिकडे आपण काहीच करीत नाही आहोत.
हे असेच चालू राहिले तर आपली मराठी उलट्या आणि ओमीट करत लवकरच शेवटचे आचके देणार हे नक्की..

आमेन......!

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

4 Dec 2017 - 2:13 pm | श्रीगुरुजी

मस्त! कोणत्या तरी जुन्या मराठी लेखकाची शैली वाटते.

ss_sameer's picture

4 Dec 2017 - 9:34 pm | ss_sameer

धन्यवाद गुरूजी...!

कोणत्या तरी जुन्या मराठी लेखकाची शैली वाटते. +१

मंडळ आभारी आहे जागू...!

समयांत's picture

5 Dec 2017 - 10:55 pm | समयांत

एवढी चिंता अनाठायी वाटते, अमृतालाही पैजेत जिंकेन अशी आपली मराठी भाषा आहे. किती शब्द आलेत आणि किती गेलेत पण तिचे अस्तित्व आहे आणि असणारच. मराठीचे इतर भाषेहून वेगळेपण याच्यात आहे की, तिला पुरुष-स्त्री-नपुंसकलिंगी भान क्रियापदाच्या अंती नेहमी असते. असो.

यावरती लिखाण चालू आहे
सायंकाल पर्यंत होईल
करेल लवकरच प्रकाशित

समयांत's picture

6 Dec 2017 - 11:05 am | समयांत

वाट पहातोय समीर..

ss_sameer's picture

6 Dec 2017 - 12:03 pm | ss_sameer

अगदी नक्की,
तुमचे अगदी प्रामाणिक मत वाचून आनंद झाला, धन्यवाद,
प्रतिक्रिया कळवत रहा, हुरूप येतो मनाला....