काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
15 Nov 2017 - 6:28 am

काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
भाग २ - अधिकमास आणि क्षयमास.

एक चान्द्रमास (एक अमावास्या ते पुढची अमावास्या) २९.५३०५८९ दिवसांचा (प्रत्येकी २४ तासांचा मध्यम मानाचा दिवस) असतो असे पूर्वी लिहिलेले आहे. म्हणजे चान्द्रमास तीस दिवसांहून सुमारे अर्धा दिवस कमी आहे. अमावास्येला चन्द्र आणि सूर्य एकाच रेखांशावर असतात आणि एकाच वेळेस मावळतात. ह्यानंतरच्या सूर्यास्तानंतर चन्द्राची बारीक कोर सूर्याच्या पूर्वेस काही अंतरावर असते आणि तदनंतर प्रतिसायंकाळी चन्द्राची कोर थोडी मोठी होत जाते. अशा पद्धतीने आठव्या सायंकाळी सूर्य मावळतांना चन्द्र अर्धा झालेला असतो आणि माथ्यावर आलेला दिसतो. १५व्या दिवशी सूर्य मावळतांना तो सूर्याच्या बरोबर विरुद्ध पूर्व क्षितिजावर असतो आणि पूर्ण गोलाकार दिसतो. ह्याला शुक्लपक्ष म्हणतात. ह्यानंतरच्या कृष्णपक्षामध्ये चन्द्रोदय अधिकाधिक विलंबाने होऊ लागतो. पुढच्या अमावास्येला चन्द्रोदय आणि सूर्योदय पुन: एकाच वेळेस पडतात. अशा रीतीने चन्द्र आणि सूर्य ह्यांच्यामधील अंतर प्रतिदिन सुमारे १२ अंशांनी वाढत जाते.

असे १२ रेखांश चालण्यासाठी चन्द्राला लागणारा काल म्हणजे एक तिथि आणि प्रत्येक चान्द्रमासामध्ये अशा ३० तिथि पडतात. ह्याचा अर्थ म्हणजे प्रत्येक तिथि मध्यममानाने २९.५३०५८९/३० = ०.९८४४ दिवसांइतकी असते. चन्द्र पृथ्वीभोवती फिरतो तो लंबवर्तुळामध्ये (ellipse). त्यामुळे केपलरच्या दुसर्‍या नियमानुसारे १२ अंश चालण्यासाठी त्याला लागणारा काळ प्रत्यक्षामध्ये ५० ते ६८ घटिका (२० ते २७ तास) इतक्या कालाच्या असू शकतात.

तिथिनामाचा असा नियम आहे की आकाशात चन्द्राने १२ अंश पार केले की त्या क्षणाला तिथि बदलायला पाहिजे पण प्रत्यक्षात तसे होत नाही. सूर्योदयाच्या वेळेस जी तिथि चालू असेल त्या नावाने तिथि पुढच्या सूर्योदयापर्यंत चालत राहते. आता एका सूर्योदयानंतर काही थोडयाच काळात आकाशात पुढची तिथि सुरू झाली आणि ५० घटिका ते ६८ घटिका ह्या मर्यादांमधील खालच्या मर्यादेच्या जवळ असली तर पुढच्या सूर्योदयापूर्वीच ती तिथि संपेल आणि त्या तिथीचे नाव कोठल्याच दिवसाला लागणार नाही, तिच्यामध्ये कोठलाच सूर्योदय न पडल्याने तिचा ’क्षय’ होईल. ह्याउलट वरच्या मर्यादेच्या जवळपासची एक तिथि चालू झाली, तदनंतर सूर्योदय झाल्यामुळे त्या तिथीचे नाव त्या दिवसाला लागले आणि ती तिथि संपण्यापूर्वीच दुसरा सूर्योदय झाला तर तीच तिथि दोन दिवशी मोजली जाईल किंवा तिची वृद्धि होईल.

पुढील भाग ४ मध्ये ख्रिश्चन कालगणना आणि Leap Year कडे दृष्टि टाकू.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

15 Nov 2017 - 7:49 am | तुषार काळभोर

हे सर्व कालगणनाविषयक प्रश्न बऱ्याचदा पडतात, पण योग्य माहिती मराठीत आणि इंग्रजीतही इतक्या सोप्या पद्धतीने याच्याआधी कधी मिळाली नव्हती.

पैसा's picture

15 Nov 2017 - 10:26 pm | पैसा

सहमत आहे. लेखमाला आवडते आहे.

सूड's picture

16 Nov 2017 - 4:06 pm | सूड

वाचतोय.

लेखमाला फार आवडते आहे. पुभाप्र.

गंम्बा's picture

17 Nov 2017 - 11:16 am | गंम्बा

उत्तम लेखमाला आहे.

तुमच्या आधीच्या लेखावर परिंदा ह्यांनि एक प्रश्न विचारला, त्याचे उत्तर वाचायला आवडेल. तोच प्रश्न क्षय तिथिलाही लागु होतो.

जर एखादा महिना क्षय झाला तर त्यामहिन्यातले सण कधी साजरे करतात? की साजरे करतच नाहीत का?
जर मार्गशीर्ष महिना क्षय झाला तर दत्तजयंती, मार्गशीर्ष गुरुवार वगैरे साजरे होणारच नाहीत का?
याआधी कुठला महिना कोणत्या साली क्षय झाला होता? पुढे कोणता महिना क्षय होणार आहे? हे वाचायला आवडेल.

गंम्बा's picture

17 Nov 2017 - 11:21 am | गंम्बा

अजुन एक प्रश्न आहे.

टिळकांनी आधीच्या पंचांगात काय नक्की सुधारणा केली?