काल: क्रीडति (भाग ४) - ग्रेगोरिअन कॅलेंडर आणि Leap Years.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
25 Nov 2017 - 2:49 am

भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
भाग २ - अधिकमास आणि क्षयमास.
भाग ३ - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.

आकाशातील गोलांची दैनन्दिन गति हे एक कालगणनेचे निसर्गनिर्मित साधन आहे. त्यांपैकी चन्द्राची दैनंदिन गति ही अन्य कोठल्याहि गोलापेक्षा मोजायला सोपी असल्याने रोमन संस्कृतीच्या शेतीप्रधान काळातील कालगणना चान्द्रमासांच्या होत्या. त्यांमध्ये मार्च ते डिसेंबर असे दहा महिने होते. त्या महिन्यांपैकी मार्च, मे, जुलै आणि ऑक्टोबर ह्यांना प्रत्येकी ३१ दिवस आणि अन्य सहा महिन्यांना प्रत्येकी ३० दिवस असे एकूण ३०४ दिवस होते. त्या महिन्यांची नावे Martius, Aprilis, Maius, Iunius, Quintilis, Sextilis, Septembris, Octobris, Novembris, Decembris अशी होती (१० महिन्यांच्या ह्या कालगणनेची खूण आजहि टिकून आहे. Septembris पासून Decembris पर्यंतची नावे सातवा ते दहावा महिना ह्यांची निर्देशक आहेत आणि तो निर्देश सध्याच्या चालू नावांमध्येहि आपणास दिसतो, जरी सप्टेंबर ते डिसेंबर हे आता ७वा ते १०वा असे महिने नसून ९वा ते १२वा झाले आहेत. Martius ते Iunius ही चार नावे मार्स, जूनो ह्या देवतांशी वा शेतीकामाशी संबंधित आहेत.) उत्तर गोलार्धातील वसंतऋतूपासून हे दहा महिन्यांचे शेतीवर्ष सुरू होऊन हिवाळा सुरू होईपर्यंत चालत असे. हिवाळ्याच्या अशा उर्वरित सुमारे ६० दिवसांची गणति ह्या वर्षामध्ये केली जात नसे.

ह्यामध्ये पहिला बदल रोमचा दुसरा राजा नुमा पॉंपिलिअस (इ.पू. ७१५-६७३) ह्याच्या काळात झाला. ३०४ दिवसांच्या ह्या गणनेमध्ये ५० दिवस वाढवून आणि ३० दिवसांच्या सहा महिन्यांमधून प्रत्येकी एक दिवस कापून २८ दिवसांचे दोन नवे महिने निर्माण करण्यात आले आणि त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी - Januarius, Februarius - अशी नावे देण्यात आली आणि ते दोन महिने डिसेंबरच्या नंतर जोडण्यात आले. रोमन संस्कृतीमध्ये सम संख्या अशुभ आणि विषम संख्या शुभ मानीत असत तदनुसार जानेवारीचे २८ दिवस बदलून त्यालाहि २९ दिवसांचा महिना केले गेले. अशा रीतीने ३१ दिवसांचे ४ महिने, २९ दिवसांचे ७ महिने आणि २८ दिवसांचा एक महिना - फेब्रुवारी - असे ३५५ दिवसांचे वर्ष निर्माण करण्यात आले. हे वर्ष चन्द्राच्या पृथ्वीभोवतीच्या १२ महिन्यांच्या प्रदक्षिणाकालाशी - Synodic months - जवळजवळ सारखे आहे. तदनंतर केव्हातरी ह्याच प्राचीन काळात जानेवारी आणि फेब्रुवारी ह्यांना वर्षाच्या शेवटापासून काढून वर्षाच्या प्रारंभास जोडले गेले आणि वर्ष जानेवारीपासून सुरू होऊ लागले. (Janus ही रोमन देवता दोन मुखे असलेली असते. त्यापैकी एक मागच्या संपलेल्या वर्षाकडे पाहते आणि दुसरे येणार्‍या पुढच्याकडे अशी समजूत होती.)

चान्द्रवर्षांची अशी गणना सूर्याच्या ३६५.२५ दिवसांच्या सौरवर्षाच्या गणतीशी जुळती नसल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. शेतीची कामे सुरू करण्याचा पारंपारिक मार्च महिना पेरणीला आवश्यक अशा हवामानात पडण्याची खात्री राहिली नाही आणि ह्या दोन्ही गणना एकमेकींच्या बरोबर राहाण्यासाठी चान्द्रगणनेमध्ये काही अधिक दिवस वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली.

इ.स.पूर्व ४५० पासून असे महिने मधूनमधून घालण्याची प्रथा सुरू झाली, यद्यपि त्यासाठी सार्वकालीन नियम असा कोणताच निर्माण करण्यात आला नाही. वर्षगणनेचा प्रारंभिक हेतु वेगवेगळी धार्मिक कृत्ये, उत्सव वगैरे वेळच्यावेळी पार पाडली जावी असा असतो. सर्व इतिहासात जागोजागी हेच तत्त्व दिसून येते. तदनुसार अधिक मास केव्हा टाकायचा हा निर्णय धर्माधिकार्‍यांच्या अधिकारात होता. (अशा व्यक्तींना Pontifex म्हणत असत आणि त्यांच्या प्रमुखाला Pontifex Maximus - सर्वोच्च धर्माधिकारी - असे म्हणत असत. नंतरच्या काळात कॉन्सल वा सम्राट् हाच Pontifex Maximus असे आणि ख्रिश्चन पोपहि स्वत:ला Pontifex Maximus असे बिरुद घेतात.)

ह्या अधिक महिन्याला Mercedonius असे नाव होते. फ़ेब्रुवारी, जो सर्वसाधारणपणे २८ दिवसांचा महिना असे, त्यातील शेवटचे ५ दिवस वेगळे काढून त्यांना आणखी २२ दिवस जोडून हा महिना तयार होत असे. अशा रीतीने धर्माधिकार्‍यांच्या निर्णयानुसार मधूनमधून काही वर्षे ३५५+२२=३७७ दिवसांची असत. फेब्रुवारी (Februarius) हा शब्द februa - religious purification ह्यापासून निर्माण झाला असून त्या महिन्यात सर्व प्रकारचे शुद्धिविधि केले जात, Mercedonius चा तोच उपयोग होता.

आर्थिक व्यवहारांवर अशा अधिक महिन्याचा परिणाम होत असल्याने धर्माधिकारी असा महिना आपल्या सोयीने जोडत. त्या कारणाने अधिक महिन्यामुळे प्रश्न न सुटता अधिकच जटिल होऊन बसला. सुमारे ४०० वर्षे ही अंदाधुंदी चालू राहिल्यानंतर इ.स.पूर्व ४६ साली तेव्हाचा Pontifex Maximus ज्यूलिअस सीझरने अधिक शास्त्रीय पद्धतीने हा गुंता सोडवायचे ठरवले. (स्वत: Pontifex Maximus झाल्यावरहि प्रथम तो गॉल प्रदेशाच्या - आजचा फ्रान्स - मोहिमेवर असल्याने आणि नंतर रोममधील बंडाळ्य़ांमध्ये अडकून पडल्याने कित्येक वर्षे अधिक महिना घोषितच झाला नव्हता.) त्याच्या ह्या सुधारित पद्धतीस ’ज्यूलिअन कालगणना - Julian Calendar' असे म्हणतात आणि थोडया फरकाने तीच गणना आपण आज वापरत आहोत. (ही सुधारित पद्धत Sosigenes of Alexandria ह्या खगोलवेत्त्याच्या सल्ल्यानुसार बनविण्यात आली असे प्लिनीने नोंदवून ठेवले आहे.)

ह्या वेळेपर्यंत नैसर्गिक ऋतु आणि त्यांच्याशी संबंधित उत्सवांचे दिनदर्शिकेत दर्शविलेले दिवस ह्यांच्यामध्ये सुमारे तीन महिन्यांचे अंतर पडले होते. ज्यूलिअस सीझरच्या सुधारणेनुसार इ.स. पूर्व ४६ ह्या वर्षात फेब्रुवारीचे शेवटचे ४ दिवस कमी करून त्याला २७ दिवसांचा एक अधिक मास जोडण्यात आला, तसेच नोवेंबर आणि डिसेंबरच्या मध्ये ३३ आणि ३४ दिवसांचे दोन अधिक मास टाकण्यात आले. इ.स.पूर्व ४६ हे वर्ष अशा मार्गाने ३५५-४+२७+३३+३४=४४५ दिवसांचे झाले. तदनंतर जानेवारी १ ला इ.स.पूर्व ४५ हे वर्ष सुरू झाले. त्या वर्षापासून पुढे जानेवारी ३१ दिवस, फेब्रुवारी २८ दिवस, मार्च ३१ दिवस इत्यादि आपल्याला परिचित महिने ठरवून देण्यात आले आणि सर्वसाधारण वर्ष ३६५ दिवसांचे झाले. सांपातिक वर्षाचे प्रत्यक्ष मान सध्याच्या सूक्ष्म मापनानुसार ३६५.२४२५८ दिवस इतके आहे, म्हणजेच ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण सांपातिक वर्षाच्या तुलनेत सुमारे १/४ दिवसाने लहान आहे आणि तेच चालू राहिले तर त्याच्या तारखा ऋतूंच्या तुलनेने ४ वर्षांमध्ये १ दिवस, १०० वर्षांमध्ये २५ दिवस इतक्या आधी पडतील. असे होऊ नये म्हणून असेहि ठरले की इ.स.पूर्व ४५ पासून ४ ने भाग जाणारे प्रत्येक वर्ष ३६६ दिवसांचे असेल आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्यात २४ हा दिनांक दोनदा पडेल. दिनांक दर्शविण्याच्या रोमन पद्धतीनुसार हा दिवस VI Kal. Mar. - मार्च कॅलेंड्स् पूर्वीचा सहावा दिवस - असा ओळखला जात असे. तो दोनदा पडल्यामुळे अशा वर्षांना bissextile - सहावा दिवस दोनदा येणारे वर्ष - असे म्हणत असत. कालान्तराने हीहि पद्धति जाऊन अधिक दिवस फेब्रुअरी महिन्याच्या शेवटाला ’२९’ ह्या दिनांकाने जोडला जाऊ लागला. आपण इंग्लिशमध्ये त्या दिवसाला Leap Day आणि त्या वर्षाला Leap year म्हणतो. (Leap year ह्या वर्णनाचे मूळहि मनोरंजक आहे. सर्वसाधारण ३६५ दिवसांच्या वर्षात ५२ पूर्ण आठवडे आणि १ दिवस असतो. एका वर्षाच्या १ मार्चला सोमवार पडला तर पुढच्या साधारण वर्षाच्या १ मार्चला मंगळवार पडतो. पण ते पुढचे वर्ष ’लीप’ असेल तर १ मार्चला बुधवार पडतो, म्हणजेच एका वारावरून ’उडी’ मारली जाते म्हणून ते ’लीप’ वर्ष.)

ह्या ज्यूलियन गणनेनुसार १०० वर्षांत ३६५२५ दिनांक होतात. त्याच कालात ३६५२४.२५८ इतके सावन दिवस पडतात. ह्या दोनातील फरक १०० वर्षांमध्ये अदमासे ३/४ दिवस इतका छोटा असल्याने त्या काळात त्याच्यासाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही. तितक्या प्रमाणामध्ये ज्यूलियन गणना सावन गणनेच्या पुढे जाते ही गोष्ट तशीच सोडून देण्यात आली.

ह्यानंतरचा महत्वाचा बदल म्हणजे दोन महिन्यांच्या नावांमध्ये बदल. ज्यूलिअस सीझरच्या सेनेटमधील प्राणघातक हल्ल्यानंतर सेनेटने Quintilis ह्या सातव्या महिन्याचे नाव बदलून ते ’जुलै’ असे केले. तदनंतर त्याचा वारस ऑगस्टस - पहिला रोमन सम्राट् - ह्याचा सन्मान म्हणून सेनेटने इ.स.पूर्व ८ साली Sextilis ह्या आठव्या महिन्याचे नाव बदलून त्याला ’ऑगस्ट’ असे नाव दिले.

१०० सांपातिक वर्षे १०० ज्यूलिअन वर्षांहून ३/४ दिवस ( सुमारे १८ तासांनी) छोटी असण्याचा परिणाम साठत जाऊन १५८२ इसवीपर्यंत जवळजवळ १६ शतके गेल्याने ज्यूलिअन कालगणनेच्या तारखा सांपातिक वर्षामध्ये पडायला हव्या त्याच्यानंतर सुमारे ११ दिवसांनी पडू लागल्या होत्या.

ईस्टरचा दिवस कोणता मानायचा हा प्रारंभापासून एक गहन प्रश्न झाला होता आणि त्याबाबत अनेक मतमतान्तरे होती. सम्राट् कॉन्स्टंटाइनने सन ३२५ मध्ये बोलविलेल्या Council of Nicaea ची शिफारस अशी होती की वसंतसंपाताच्यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेनंतरच्या रविवारी ईस्टर पडावा. वसंतसंपाताचा दिवस २१ मार्च असा ठरला होता. ह्या दिवसानुसार ईस्टर ठरविला तर तो खर्‍या (वेधावरून ठरविलेल्या) वसंतसंपाताच्या बराच नंतर पार पडला जाण्याची शक्यता होती. (ह्या काळापर्यंत खरा वसंतसंपात ११ मार्चपर्यंत मागे आलेला होता.) ही शक्यता दूर करण्यासाठी तेव्हाचा पोप १३वा ग्रेगरी ह्याने १५८२ साली कालगणनेमध्ये पुन: मोठी सुधारणा घडवून आणली. तिच्यानुसार १५८२ सालातील गुरुवार ४ ऑक्टोबर ह्या दिवसानंतरचे १० दिवस मोजण्यात आले नाहीत आणि शुक्रवार १५ ऑक्टोबरला गणना पुन: सुरू झाली. लीप वर्ष मानण्याचा नियमहि बदलण्यात आला आणि ’दर चौथे वर्ष लीप, पण ते वर्ष १०० ने भागले जात असल्यास ते लीप नाही, पण ते वर्ष ४०० ने भागले जात असल्यास ते लीप आहे’ असा नियम करण्यात आला. हे सध्याचे ग्रेगोरिअन कॅलेंडर. ह्यामध्ये ४०० वर्षात ९७ लीप दिवस आणि १४६०९७ दिनांक पडतात. त्याच काळात ४०० सांपातिक वर्षांचे १४६०९७.०३२ इतके सावन दिवस होतात. आता सांपातिक वर्ष ग्रेगोरियन वर्षापेक्षा मोठे आहे पण दोनांतील फरक ४०० वर्षांमागे ०.०३२ दिवस इतका आहे. सांपातिक वर्षाला ग्रेगोरियन वर्षाहून पूर्ण एक दिवसाने मोठे होण्यासाठी सुमारे १२५०० वर्षे लागतील म्हणून सध्यापुरते ह्या प्रश्नाला येथेच सोडलेले आहे. (पृथ्वीचीच दैनंदिन आणि वार्षिक गती कमी होणे इत्यादि बाबी येथे विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत.)

ह्या सुधारणा कॅथलिक पोपकडून आलेल्या असल्याने ख्रिश्चन धर्माच्या अन्य वेगवेगळ्या शाखांमध्ये त्यांना मान्यता मिळायला वेळ लागला. कॅथॉलिक भागांनी - इटलीतील राज्ये, पोर्तुगाल, स्पेन इत्यादींनी - ती लगेच मान्य केली पण प्रॉटेस्टन्ट ब्रिटनमध्ये ती मान्य व्हायला १७५२ साल उजाडले. तोपर्यंत फरक ११ दिवसांचा झाला होता आणि तेथे १७५२ साली बुधवार २ सप्टेंबर नंतर गुरुवार १४ सप्टेंबर हा दिवस घालण्यात येऊन मधले ११ दिवस गायब करण्यात आले. ऑर्थोडॉक्स चर्च मानणार्‍या रशियामध्ये ही सुधारणा पोहोचायला राज्यक्रान्ति व्हावी लागली. कम्युनिस्टांनी सत्ता प्राप्त केल्यावर १९१८ मध्ये ३१ जानेवारी नंतर १४ फेब्रुवारी हा दिवस आणून मधले १३ दिवस गायब करण्यात आले. ह्यातून एक मौज अशी झाली की २४ ऑक्टोबर १९१७ च्या ’महान् ऑक्टोबर क्रान्ती’चा ( The Great October Revolution) वार्षिक वाढदिवस सोवियट संघ अस्तित्वात असेतोपर्यंत नोवेंबरमध्ये साजरा होत असे. अशा सर्व देशांच्या त्या त्या दिवसातील ऐतिहासिक तारखा O.S./N.S. (Old Style/New Style) अशा दाखविण्याची प्रथा आहे.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

25 Nov 2017 - 10:16 am | तुषार काळभोर

खूप रोचक, सुलभ, ओघवत्या पद्धतीने लिहिल्याबद्दल आभार, अभिनंदन व कौतुक!

रशियन राज्यक्रांतीच आठवली होती. फारच छान, सोप्या भाषेत समजावत आहात. पुभाप्र.

कंजूस's picture

26 Nov 2017 - 4:46 am | कंजूस

छान!

विद्याधर३१'s picture

26 Nov 2017 - 9:09 am | विद्याधर३१

छान माहिती...
ग्रेगरियन दिनदर्शिका महित होती. पण काहि गोष्ट नव्याने कळल्या.

OBAMA80's picture

27 Nov 2017 - 8:29 am | OBAMA80

खूपच रोचक व माहितीपूर्ण लेख. लीप वर्षाबद्दल माझ्या मुलीने मलाुप्रश्न विचारला होता, तेव्हानाीट सांगू शकलो नव्हतो कारण मुळात मलाच माहिती नव्हते. आजच तुमचा लेख तिला वाचून तिच्या बर्याच प्रश्नांची उत्तरे देईन.
भारतीय कालगणनेमध्ये कशा सुधारणा होत गेल्या व युरोपियन कालगणनेचा त्यावरील प्रभाव याबद्दल माहिती दिल्यास वाचावयास नक्कीच आवडेल.

भारतीय कालगणना बहुधा मागच्या तीन भागात त्यांनी हाताळलीय.. आता मला हिजरीबद्दल वाचायला आवडेल..