तव नयनांचे दल
माणूस असण्याचे तापत्रय भोग-उपभोगल्यावर,
दुनियादारीचा तिरका खेकडा सर्वांगावर नाचवल्यावर,
प्रवासाची मोठीच मजल मारून,
थकून येतो तुझ्या घरी.
तुझ्या मंद हालचाली डोळे भरून पाहीन,
तुझ्या खांद्यावर शांत झोपून जाईन.
बोल बोल बोलण्याचे खापर फुटून गेलेलं असेल.
तुझ्या ओठांवरचं लालभडक हसू आणि खोल काही शोधत जाणारी नजर, दोन्हीत हरवून जायचंय.
डोळ्यात समाधान असेल तू जवळ असल्याचे,
असेल स्पर्शात निरामय ओलावा,
तेव्हा सैल झालेलं अंग आवडता कंटाळा मागेल.
तुझ्या उबेची आस लागेल कसलीच घाई नसलेली.