रेशीममार्गावरील भटकंती : उझ्बेक-ताजिक-अफगाणिस्तान-अझर्बैजान लाईव्ह ब्लॉग

Primary tabs

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
13 May 2018 - 8:00 pm

मे २०१८ मधील माझ्या मध्य व पश्चिम आशियातील काही देशातील भटकंतीचा त्या वेळी लाईव्ह प्रकाशित केलेला वृत्तांत

1
रविवार, १३ मे २०१८. इस्तंबूल, तुर्कस्थान.

‘तयारी झाली’असं दरवेळी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही म्हणता येत नाही... यावेळीही तसंच काहीसे... पण इतरवेळेपेक्षा प्रवासाच्या गरजा जरा वेगळ्या असल्याने थोडे अधिक कष्ट... त्यापैकीच एक, हे (अॉलमोस्ट) लाईव्ह ब्लॉगिंग... कसं जमतंय ते पाहू, रोजचे वृत्त थोडक्यात का होईना पण इथे टाकण्याचा प्रयत्न असेल... कधी एखाददिवस नाही जमले तर वाचकवर्ग सांभाळून घेईल ही खात्री आहेच... आत्ता सध्या इस्तंबूल अतातुर्क विमानतळावरून हे पहिले वृत्त. अगदी धावतपळत जेमतेम दोन तास विमानतळावर आहे, पण आवडलेला आहे. टर्किश एअरलाईन्सचीही पहिलाच अनुभव... नेहमीप्रमाणेच रुळलेल्या वाटेपलीकडली, जरा हटके भटकंती... रोज भेटूच तसे, पण पहिलाच ‘लाईव्ह’प्रयत्न आहे, काही सूचना/सुधारणा असतील तर व्यनि करा. आज इतकेच, पुढल्या उड्डाणाची वेळ झाली...


1सोमवार १४ मे २०१८. ताश्कंद, उझबेकीस्तान.

आत्ताच पहाटे ‘तॉष्केंट’ मधे उतरलोय. प्रवास शुभेच्छांसाठी आभार! अजूनही प्रथम गंतव्य तसे दूरच आहे, पण देशात दाखल झालो. इथले कस्टमवाले भयंकर तऱ्हेवाईकपणासाठी प्रसिद्ध आहेत! पण आज सुरळीत पार पडलंय. व्हिजा म्हणजे तर निव्वळ भ्रष्ट धंदा... सरकारने नियुक्त केलेल्या एका कंपनीचे ‘आमंत्रणपत्र’ ही पहिली पायरी, अर्थात, त्याची ‘किंमत’ व्हिजाहून वेगळी... ते मग सरकारदरबारी सहीशिक्क्यासाठी जाणार, तिथून परवाना आला की मग व्हिजासाठी अर्ज. व्हिजासुद्धा अगदी दिवस मोजून तितकाच दिला जातो, साताचे आठ दिवस झाले तर पैसे अधिक... ई-व्हिजा वगैरेपासून तर अनेक वर्षे दूर. सगळे सोपस्कार आटोपायला साधारण दीड महिना गेला... असो, आता त्यावर प्रवेशाचा शिक्का बसला व यत्नांचे सार्थक.
ताश्कंद फरगणा खोऱ्याच्या किंचित उत्तरेस कझाकस्तान सीमेवर हे शहर आहे. बंगालीत संस्कृत शब्दांवर जसा ‘अॉ’कारी संस्कार होतो, तसाच उझ्बेक भाषेत फारसी शब्दांवर होतो. ताश्कंद हे प्लेन नाव, तॉष्केंट हा स्थानिक उच्चार... विमानतळावर एका आई-मुलगा अशा कुटुंबाची ओळख झाली. सुटे पैसे संभाषणाचे निमित्त... बरीच भाषेची अडचण असूनही चांगली मैत्री जुळली. पुढे समरकंद मुक्कामी घरी आमंत्रण आहे, बघू जमतंय का ते...
असो... शहर तसे नवे आहे, माझ्या आराखड्यात काही फारसा वेळ त्यासाठी नाही. भारताचे सौम्य सुशील व कष्टाळू माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या दुःखद अंताशी हे शहर निगडीत आहे, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रवास पुढे...
.

1सोमवार १४ मे २०१८. खीवा, उझबेकीस्तान.

सगळं सोडून उझबेकीस्तान का बरं भटकंतीसाठी निवडला असा प्रश्न काही जणांना पडला असेल, तर त्यासाठी ही एक झलक... खीवा ची प्राचीन नगरी. आज टंकाळा आला असला तरी पटकन भौगोलिक स्थान व चित्रे... तुर्कमेनिस्तान सीमेवर लहानसे गाव. रेशीममार्गावरील एक लहानसे राज्य. मध्ययुगीन काळातील इमारती डागडुजी करून बऱ्याच अंशी जसेच्या तसे जपलेले हे गाव जागतिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे. आज मुक्काम इथेच एका हॉस्टेल वर आहे. देशातील पहिलाच दिवस असल्याने अतिशय महत्वाचे काम, सिम कार्ड, ते आधी करून घेतले. देशातील पद्धतींचा पहिलाच अनुभव असल्याने आजचा दिवस शिकण्यासाठी खास. हॉस्टेल वर मस्त ग्रुप झाला आहे, रशिया-इटली-जपान-भारत असे पलंग लागलेले आहेत... आत्ताच गप्पा संपल्या, आणि हे पटकन टंकायला बसलो. उद्याही एक जुन्या खिवात फेरफटका व पुढे अशाच एका जुन्या पण सुंदर व नेटक्या शहराकडे वाटचाल...


1
.खीवा नगरी
1
खीवा नगरी
1
खीवा नगरीमंगळवार १५ मे २०१८, बुखारा

खीवा मध्ये सकाळी अजून एक फेरफटका मारला आणि पुढल्या प्रवासाचे प्लॅनिंग सुरु केले. ब्रेकफास्ट गप्पांमध्ये मासी आणि युका या दोघांनाही बुखाराला जायचे आहे हे समजले. साधारण ५०० किलोमीटर अंतर असून इथे शेअर टॅक्सी चालतात. आता चार पैकी आम्हीच ३ झाल्यामुळे अगदी डोअर टू डोअर व्यवस्था झाली. दुपारी निघालो तेव्हाच पटकन पोस्ट टाकायचे होते पण इंटरनेट चालेना. असो, प्रवास बरा म्हणायचा... रस्ते दिव्य आहेत, आणि सर्वदूर भकास वाळवंट... वाटेत अमु-दर्या नदी दोनदा सामोरी येते ती तेवढीच हिरवाई. हि अमु दर्या म्हणजे पूर्वीची ऑक्सस (ग्रीक) त्याही पूर्वीची यक्षा (फारसी), हे नाव येते यक्षु या संस्कृत नावावरून (यक्ष धातू, वेगाने जाणे) त्याही पूर्वीचे नाव चक्षु, ते वायू-ब्रह्माण्ड-मत्स्य आदी पुराणात स्पष्ट आहे, रामायणातही संदर्भ पुराणाप्रमाणेच असून सुचक्षु असे विशेषणासहित नाव आहे. त्याची कथा पुन्हा केव्हा...
असो, तासाभरापूर्वी पोहोचलो आत्ता संध्याकाळचे ८ वाजत आले आहेत. आता आराम आणि उद्या बुखारा ची भटकंती!


1
ब्रेकफास्ट - उझबेक सिरॅमिक
1
प्रवासी मित्र
1
चक्षु नदी, पलीकडे तुर्कमेनिस्तान
1
उझबेक वाळवंट


बुधवार १६ मे, २०१८. बुखारा उझबेकिस्तान

आज दिवसभर बुखारा शहर बघण्यासाठी होता. भक्कम न्याहारीने सुरुवात. काही पुढच्या प्रवासाची तयारी करायची होती ती सकाळी उरकली आणि मग भटकंती. बुखारा हे खूप प्राचीन शहर, मूळ नाव 'विहार' शब्दावरून उद्भवले असले तरी 'भू:खार' असेहि संस्कृत साहित्यात संबोधलेले आढळते. बुखाराविषयी : 'आलू बुखारा' फळाचा थेट संबंध या भागाशी. उत्तम प्रतीचे जर्दाळू प्रसिद्ध (जर्द - पिवळा (फारसी) आलू - प्लम). बुखारी मदरसा/घराण्याचे मौलवी... सोहणी महीवाल मधला महिवाल मूळ बुखाराचा... असो. तर आज खूप उशीर झाल्याने थोडक्यात, विस्कळीत असेल तर नंतर दुरुस्त करेन. एका आजी आजोबांबरोबर मुक्काम, तीन काऊचसर्फिंग मीट अप, दोन विदेशी पर्यटक म्हणून इंटरव्ह्यू अशा आजच्या ठळक घटना :-) उद्या पहाटे इथून प्रस्थान

1
बुखारा : हलकी झलक
1
बुखारा : हलकी झलक
1
बुखारा : हलकी झलक
1
चॉर मिनॉर
1
आजी आजोबा
1
काऊचसर्फिंग मीट अपशुक्रवार १८ मे २०१८ : पंजीकेंट ताजिकिस्तान

समरकंद मधून बस ८ सीटर असा प्रवास साधारण तास दीड तासात ताजिकिस्तान सीमेवर पोहोचवतो. ही सीमा आठ वर्षांनंतर आता मार्च मध्ये पुन्हा उघडण्यात आली. सीमा पार फारच सोपे होते. ताजिकिस्तान इ-व्हिजा देत असल्याने आधीचे सोपस्कारही सहज. मुख्य आकर्षणे तीन, जुने पंजीकेन्ट नगर, सुदूर वायव्येकडील शैव उपासनेचे सर्वात दूरचे ज्ञात स्थान. उत्तम दर्जाची भित्तिचित्रे येथील उत्खननात सापडली आहेत. शिव पार्वतीच्या प्रतिमा व चित्रे संग्रहालयात आहेत. दुसरे ठिकाण म्हणजे साराझम, ५ ते ६ हजार वर्षांपूर्वीच्या नागरी संस्कृतीचे अवशेष, जागतिक वारसा म्हणून घोषित. व तिसरे म्हणजे नवव्या शतकातील ज्येष्ठ फारसी कवी रुदकी यांचे स्मारक. इथे कोणी फारसी काव्याचे प्रेमी असतील तर नाव ऐकले असेल. हे तीनही पाहताना सभोवती असलेल्या रम्य निसर्गात हरवून जायला व्हावे इतका ताजिकिस्तान विशेष सुंदर आहे. पंजीकेन्ट चा विशेष अनुभव म्हणजे पत्ता विचारायला एका दुकानात गेलो असता तिथला मुलगा व त्याचे दोन दोस्त स्वतः गाडी घेऊन मला शहर दाखवायला आले. भाषा अगदी तुटक दुवा मला तुटक फारसी येते व ताजिक फारसीची बोली असल्याचे म्हणत असले तरी दोघीत बराच फरक आहे. शब्दांच्या थोड्या वेगळ्या अर्थांमुळे आमचे मजेदार संभाषण व अगदी निरपेक्ष केलेली मदत यामुळे त्या तिघा मुलांबरोबर ताजिकिस्तान चा हा फार छान अनुभव...


1
ताजिकिस्तान – निसर्गसौंदर्य
1
ताजिकिस्तान – निसर्गसौंदर्य
1
ताजिकिस्तान – निसर्गसौंदर्य
1
रुदकी समाधी
1
प्राचीन पंजीकेन्ट


शनिवार १९ मे २०१८. समरकंद उझबेकिस्तान.

ताजिकिस्तानची लहानशी सहल आटोपून पुन्हा समरकंद. आजचा अक्खा दिवस फोटोसाठी. वेगवेगळ्या वेळचे रेगिस्तान व अन्य स्मारके यांचे फोटो आणि थोडा बाजारात फेरफटका. पर्शिअन कार्पेटची कला इथेही चांगलीच रुजलेली आहे. बुखारा व समरकंद डिझाईन येथील खासियत. एका गालिच्यांच्या कार्यशाळेसही भेट दिली. दिवसातील विशेष उल्लेख म्हणजे आज पहिल्यांदा येथील राष्ट्रीय खाद्यपदार्थ 'प्लॉव्ह' शाकाहारी स्वरूपात मिळाला. पुलाव प्रमाणेच पण यांचा तांदूळ बराच वेगळा असतो आणि मसालेही. संध्याकाळी एक मैत्रीण भेटणार होती, तिला संस्कृत योग व ज्योतिष यामध्ये फार रस, त्याविषयी अत्यंत उत्कंठा असली तरी या देशात मार्गदर्शन मिळणे फार कठीण. माझ्या प्रोफाइल वर तिने यासंबंधी काही उल्लेख वाचले आणि भेटण्यासाठी आली. भरपूर गप्पा रंगल्या. पुढे लेझर शो पाहून दिवसाची सांगता. रात्री लांब पल्ल्याच्या रेल्वेने तरमीझ कडे प्रस्थान.


1
तैमूरच्या बायकोने तैमूरसाठी 'सरप्राईज गिफ्ट' म्हणून बांधलेली 'बीबी खानम' मशीद
1
स्ट्रीट व्ह्यू
1
एका मशिदीचा अंतर्गत भाग
1
सूर्यास्त - रेगिस्तान
1
रेगिस्तान रात्रीरविवार २० मे २०१८. तरमीझ उझबेकिस्तान.

काल रात्री समरकंदहून रेल्वेनी साधारण दहा तासांचा प्रवास करून आज दक्षिणेत तरमीझला उतरलो. हा उझबेकिस्तानचा सर्वात दक्षिणेकडील भाग. इथे माझा अलीकडे फेसबुक वर भेटलेला एक मित्र राहत असल्याने सगळी सोय आधीच झाली होती. त्याच्या घरीच उतरलो आहे. तो आणि मी दिवसभर भटकून आलो. त्याच्या आईला आराम देत आज माझ्या हातचा कांदा-बटाटा रस्सा असा त्यांच्या घरातला प्रथमच शाकाहारी मेनू. हाश हूश करत चाटून माटुन सगळं साफ! तिखट मसाल्यांची याना अजिबातच सवय नाहीये पण तरी मजा आली. हे शहर चक्षु/अमुदर्या नदीवर वसलेलं असून प्राचीन बौद्ध स्थान आहे. तिबेटी व संस्कृत ग्रंथांत 'तारमिता' नावाने याचा उल्लेख आढळतो. येथील अफगाण सीमेवरील फयॉज तेपे व कारा तेपे या ऐतिहासिक बौद्ध स्थानांना भेट हे आजचे ठळक विशेष. शिवाय स्थानिक संग्रहालय, बाजार इत्यादी भटकंतीही झालीच. असो, पटकन एक फोटो झलक ...


1
रेल्वे प्रवासातील फोटोग्राफी
1
रेल्वे प्रवासातील फोटोग्राफी
1
रेल्वे प्रवासातील फोटोग्राफी
1
फयॉज तेपे चा स्तूप
1
फयॉज तेपे चा स्तूप
1
कारा तेपे केव्ह एक्सप्लोरेशनसोमवार २१ मे २०१८. तरमीझ, उझबेकिस्तान.

आजचा दिवस जरा आराम व पुढली तयारी... आजचे वृत्त फोनवरून टाकत असल्याने जरा थोडक्यात. गावात सकाळी २-३ ठिकाणी भटकंती, पोस्ट अॉफिस भेट व बँक या सगळ्या कामात अर्धा दिवस गेला. नंतर दुपारी सगळे फोटो डाउनलोड करून तपासून दडवण्याच्या कामात काही तास. इथले सीमासुरक्षा दल फार त्रासदायक. फोटोत काय चालतं काय नाही यांचे कडक नियम. त्यासाठी खटाटोप. संध्याकाळी जिथे राहिलेलो त्यांनी छान त्यांच्या पद्धतीचे जेवण बनविले व भरपूर गप्पा रंगल्या... उद्या पहाटेच प्रस्थान...!
1


1


उझबेकिस्तान सफरीची सांगता, देशाविषयी फेसबुक वर मी टाकलेला एक लहानसा व्हिडीओ


पुढील थांबा अफगाणिस्थान!
1

मंगळवार २२ मे २०१८. बल्ख, अफगाणिस्तान .

सकाळी खूप लवकर खरे तर पहाटे उझबेकिस्तानहून निघालोय. बॉर्डर क्रॉस करताना खूप त्रास होतो असे बर्याच ठिकाणी वाचले होते. पण काही त्रास न होता अगदी १० मिनिटात सुरळीत काम झाले. उझबेकिस्तानातून अफगाणिस्तानात येताना अमु दरिया अर्थात चक्षु नदीचा पूल पार करावी लागतो हा चालत साधारण २० मिनिटाचा रस्ता आहे. अफगाणिस्तान च्या बाजूला ऑफिसर्स पण खरे तर नव्हते. 'हिंदीस्तानी' म्हणताच त्याचे आकर्षण लोकांना आहे. नेहमीचे प्रश्न हिंदी, बॉलीवुड वगैरे होतेच!या भागात भारतीय फारसे येत नाहीत. उझबेकिस्तानात कझाकिस्तान व अफगाणिस्तान दोन्ही बॉर्डरवर भारतीय पासपोर्ट बरेच दिवसानी पास केला असे ते म्हणाले.
माझा नूर नावाचा मित्र मला घ्यायला येणार होता. पण तो आलेला नव्हता. नशीबाने नदीच्या पलिकडेही उझबेकिस्तानचे नेटवर्क मिळत होते. त्याच्या आधारे नूरला संदेश पाठवला आणि काही वेळात तो आला. तिथून आम्ही सरळ मजार ए शरीफ च्या बाजारात गेलो. साधारण दीड तासाचा पूर्ण वाळवंटातून रस्ता आहे. तिथे चलन बदलून घेतले. काही आवश्यक खरेदी जसे की स्थानिक सिमकार्ड, काही कपडे घेतले. इथे अफगाणिस्तानात नेहमीचे टुरिस्ट म्हणून ओळख होईल असे, नजरेत भरणारे कपडे वापरून चालणार नाही. त्यामुळे स्थानिक पद्धतीचे साधे कपडे घेतले. थोडे खायचे प्यायचे सामान घेतले आणि जुन्या बल्ख शहराचा दौरा सुरू केला.
'बल्ख' म्हणजे पुरातन बाल्हिक नगरी. इथे पुरातन तटबंदीचे केवळ ढिगारे राहिलेले विटामातीच्या बांधकामाचे अवशेष आहेत. पण त्यावरून नगरीच्या रचनेची नीट कल्पना येते. वाटेत अफूच्या बागा पाहिल्या. फोटो काढणं योग्य नाही. पण अंमली पदार्थ हे आताचे वास्तव आहे. इथे त्याचे उत्पादन होते आणि सरकारी अधिकारी सैन्य सगळे त्यात सामील आहेत. वाटेत एक जुनी मशीद पाहिली. इथली सुरुवातीच्या काळातील स्त्री कवयित्री राबिया बल्खी हिची समाधी पाहिली. स्त्री कवयित्री म्हणून तिला महत्त्व आहे तसेच कवी रूमी हा बल्खमधला. त्याच्याशी संबंधित मशीद पाहिली. त्यानंतर पारशी धर्माचा प्रणेता झरतुष्ट्र हाही बल्खचा. त्याच्य जन्मस्थळी संबंधित असलेल्या पारशी मंदिराचे रूपांतर 'हाजी पियादा' मशिदीत केलेले आहे. ते पारशी मंदिर म्हणून लक्षात येते. थोडक्यात म्हणजे ही पारशी लोकांची बाबरी मशीद म्हणायला हरकत नाही.
मझार शहराच्या दक्षिणेकडे एक ऐतिहासिक महत्त्वाची खिंड आहे. मझार शहरात उत्तरेकडून येणार्या सोव्हिएत लोकाना तसेच दक्षिणेकडून येणार्या तालिबानीना या खिंडीतून यावे लागले आणि तिथे त्याना रोखण्यात आले. या खिंडीचाही एक फोटो घेतला आहे. त्यानंतर मझार ए शरीफमधील बघण्यासारखे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे निळी मशीद. पैगंबराचा जावई अली याचे हे स्मारक आहे असे इथले लोक सांगतात. या मझारवरूनच गावाचे मझार ए शरीफ हे नाव पडले आहे असे मानतात. या मशिदीवर अतिशय सुंदर असे निळ्या सिरॅमिक टाईल्सचे काम केलेले आहे. सुमारे २५० डिझाईन्स वापरून हे काम केले आहे. नंतरच्या काळात बांधकामात अधिक भर घातली तरी मूळ रंगसंगती आणि सौंदर्य टिकून राहिले आहे. या मशिदीचे एक चित्र पुढे तुम्ही पाहू शकता.
इथे सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी रहाण्याची व्यवस्था. गेल्या आठवड्यात माझी इथल्या एका मुलाशी ओळख झाली. त्याने त्याच्या होस्टेलवर त्याच्यासोबत माझी रहाण्याची व्यवस्था केली आहे. पोस्ट ग्रॅजुएशन करणार्या मुलांचे हे होस्टेल आहे. एका छोट्या खोलीत तीन मुले रहात आहेत. त्यांच्यासोबत मी अनोळखी चौथा. त्यांनाही थोडी अडचण आहे पण साधीच तरी नीट अशी जेवण, रहाणे याची व्यवस्था झाली आहे. सध्या त्यांचा रमझान चालू आहे. या मुलांचा उपवास रोझे यावर विश्वास नाही तरी इफ्तार, सगळ्यानी मिळून जेवण वगैरे आहे. माझ्यासाठी त्यांनी आज खास शाकाहारी जेवण बनवले होते. बाहेर जाऊन चक्का आणून रायते बनवले. अल्प परिचित माणसाला एवढे अगत्याने सामावून घेणे हा फारच सुंदर अनुभव आहे. उद्या पहाटे इथून काबूलला प्रस्थान. पुढचे अपडेट आता काबूलहून.
जुनी ओळख नसली तरी विश्वास टाकला की विश्वास मिळतो या माझ्या प्रवासातल्या अनुभवाला इथे पुष्टी मिळाली. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडले की सगळे योग जुळून येतात. चांगले लोक भेट्तात. अनुभव येतात. लाईव्ह ब्लॉगिंग करण्यामागे हे अनुभव लोकांपर्यत पोचवावेत हा माझा हेतू आहे. मी आता कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून इथे आपला नेहमीचा पोशाख वापरत नाहीये. पण बोलताना भारतीय म्हणून ओळख देतो. तेव्हा लोक फार अगत्याने, आस्थेने, प्रेमाने वागतात बोलतात. फारच सुंदर अनुभव आहे. अफगाणिस्तानच्या कानाकोपर्यात भारताबद्दल प्रेम अनुभवाला येते आहे.

1


1


1


1


1बुधवार २३ मे २०१८. काबूल, अफगाणिस्तान .

आज सांगण्याजोगा काही अपडेट नाहीये कारण कालचा दिवस संपूर्ण गोंधळात गेला. मी सकाळी सातची फ्लाईट पकडायला लवकर बाहेर पडलो पण विमानतळावर पोचण्यापूर्वी बाहेर काही अंतरावर त्यांनी मला थांबवले आणि परत जा म्हणाले. का ते सांगत नव्हते. आणि मला कळत नव्हते की ते का थांबवून परत पाठवत आहेत. शेवट आरियान च्या साईटवर माहिती मिळाली की फ्लाईट दुपारी तीन वाजता जाणार आहे. सगळा सावळा गोंधळ वेळेच्या बाबतीत. नशिबाने एक दिवस बफर ठेवल्याने शेड्युल बिघडले नाही. पण मग मझारमधल्या मित्रांकडे परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. होस्टेलवर पोचलो तर ते सगळे झोपेत होते. लोकांचे रोझे असल्याने सकाळी लवकर खाऊन लोक पुन्हा झोपतात. सूर्योदय इकडे खूप लवकर म्हणजे साडेचार पाच वाजताच होतो आहे.

त्यांना उठवून गप्पा झाल्या पुन्हा. आणि मग दुपारी एक वाजता मी जेवून विमानतळाकडे गेलो. विमानतळावर अतिशय कडक तपासणी असते ड्रग्ज आणि इतर गोष्टींसाठी तीन तीन वेळा तपासतात. माझ्या सामानातली एक लहान स्प्रे ची बाटली त्यांनी काढून घेतली. बाकी सामान पास झाले. एका तासात काबूलला पोचलो. अंतर फक्त २०० मैल आहे. पण टुरिस्टांना रस्त्याने प्रवासाची अजिबात परवानगी मिळत नाही त्यामुळे विमानाने जावे लागते.

काबूलमधे माझी रहाण्याची व्यवस्था पुन्हा एका कुटुंबासोबत आहे. काबूल वोमानतळावरून साधारण अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवर ते रहातात. त्यांच्यासोबत बोलून आता मी उत्तर पूर्व अफगाणिस्तानमधील पंजशिर भागाकडे निघालो आहे. हा प्रदेश हिंदुकुश पर्वतरांगामधे आहे आणि रस्त्याने प्रवासाचा एक अतिशय पुरातन मार्ग तिथून जातो. यापुढचे अपडेट्स आता उद्या.
---------------------
इथले लोक माझ्याशी फार अगत्याने, आस्थेने वागत आहेत. खाली दिलेल्या फोटोतले माझे मित्र सगळे पोस्ट ग्रॅजुएशन करत आहेत. नवीन सरकारने शिक्षकाना पोस्ट ग्रॅजुएशन सक्तीचे केल्यामुळे काही लोक पुन्हा विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरले आहेत. उजवीकडून दुसरा जो आहे तो भाषाशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करत आहे. मला भाषा शिकून घ्यायला आवडते. ६ भारतीय आणि २ युरोपियन भाषा मला येतात. कामचलाऊ फार्सी समजते. त्यामुळे भाषांबद्दल त्याच्याशी बोलणे आनंददायी होते. अजून एक जण आर्किओलॉजिस्ट आहे. सगळेच त्यांच्या अभ्यासाच्या विषयात तज्ञ आहेत त्यामुळे बोलायला मजा आली. त्याना इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करायला मिळत नाही कारण सर्व व्यवहार स्थानिक भाषेत होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी इंग्रजीत बोलणे हे एक आकर्षण होते. पुढेही फोनवरून आमचा संवाद सुरू राहील.

या सर्वांशी बोलताना एक विषय वारंवार निघत होता की आपला शत्रु कॉमन आहे. त्याच्याबद्दल तिथे किंचितही सकारात्मक भावना नाही. तेव्हा आपल्यात मैत्री, सहकार्य टिकून राहिले पाहिजे. त्यासाठी लोकांचे येणे जाणे चालू राहिले पाहिजे हे सगळ्यांचेच मत दिसले. हे खरं आहे की आपल्याकडे त्यांच्यबद्दल काहीशी निगेटिव्ह प्रतिमा आहे. पण माझ्यासारखे अजून कोणी इकडे येत जात राहतील आणि आपल्या देशाची अफगाणिस्तानसोबत मैत्री टिकून राहील.

1


गुरुवार २४ मे २०१८. काबूल, अफगाणिस्तान.

आजचा दिवस पूर्ण प्रवासातील सगळ्यात महत्वाचा आणि काळजीचा. रस्त्याचा प्रवास हा अफगाणिस्तानात सर्वात धोक्याचा. इथे येण्याआधी हेरात, मझार व काबुल या भारताच्या तीनही वकिलातींना मी ई-मेल ने कळविले तेव्हा सर्वप्रथम मझार वकिलातीचे ताबडतोब उत्तर आले, 'उझबेक मार्गाने येऊ नये, कुंडूज सध्या तालिबान्यांच्या हाती पडलेले असून या मार्गावरही हालचाली वाढलेल्या आहेत'. त्यानंतर काबुल मधून प्रथम पीए चे अशाच प्रकारचे उत्तर आले. भारताचे राजदूत इथे नवे असून अलीकडेच त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. पीए च्या ई-मेल नंतर त्यांनी स्वतः सुद्धा दखल घेतली व रस्त्याने प्रवासास पूर्ण मनाई केली (बागलाण प्रांतातला ७ भारतीयांच्या अपहरणाचा प्रसंग अजूनही नाजूक परिस्थितीत असून सुटलेला नाही, त्यामुळे त्यांचा सल्ला योग्यच होता). ताबडतोब ती माहिती वेबसाईट वर देखील माझ्यासारख्या इतर आगाऊ उत्साही लोकांसाठी अपडेटकेली (या आधीची अडवायझरी मे २०१७ ची असल्याचे मी त्यांना उत्तरात निदर्शनास आणून दिले होते). आता या पार्श्वभूमीवर या प्रवासाच्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर. ज्या कुटुंबासोबत काबूलमध्ये आहे त्यांनीही काही सूचना दिल्या. उगाच लोकांमध्ये जाऊ नको, रमझान व त्यात अजून उन्हाळा, लोकांची डोकी तापलेली असतात कुठेही थोडीही ठिणगी फार त्रासदायक आग लावू शकते. असो. एकंदर सर्व विचारात घेत पहाटे निघायचा निर्णय केला. काबुल परवान कपिशा व पंजशीर अशा चार राज्यातून प्रवास. निसर्ग व युद्धभूमी हे दोन्ही अनुभवाचे विषय. फार खोलात जात नाही, काही चित्रे खाली आहेतच. हा लाईव्ह ब्लॉग जाहिरात/शो-ऑफ काहीही कोणाला वाटले असेल तरी हि प्रवासाच्या काही आवश्यक गरजांपैकी एक होती. त्याचे प्रयोजन आज बऱ्याच अंशी सफल झाले. असो. रात्री माघारी काबुल मुक्कामी आहे.


1
हिंदूकुशचे सौंदर्य


1
हिंदूकुशचे सौंदर्य


1
हिंदूकुशचे सौंदर्य


1


1अफगाणिस्तान सफरीची सांगता, देशाविषयी फेसबुक वर मी टाकलेला एक लहानसा व्हिडीओशुक्रवार २५ मे : पुन्हा इस्तंबूल, तुर्कस्थान

काल खूप धावपळ झाली. आता इस्तंबुलमधे आलोय. काल अफगाणिस्तानातून निघताना एक्झिटला जरा प्रॉब्लेम झाला. कारण उझबेकिस्तानमधून येताना बोटाचे ठसे घ्यायची यंत्रणा तिथे नसल्याने घेतले नव्हते. कदाचित या कारणानेच बरेच जण त्या बाजूने यायचे टाळतात. पण बरीच चर्चा होऊन, कारण भाषेचा प्रॉब्लेम होताच आणि मग बराच वेळ गेल्यानंतर एक्झिट स्टँप मिळाला. काबूल विमानतळावर चेक इन करताना तीन तास तरी हाताशी ठेवावेत असे बर्याच ठिकाणी वाचले होते. त्याचा प्रत्यय आला. काबूल विमानतळावर एकूण सात चेकिंग आहेत. त्या सगळ्यातून पार पडायला वेळ लागतोच.
-----------------------
पुढे इस्तंबुलमधे इ व्हिसा असल्याने कही प्रॉब्लेम नाही. मात्र हे फक्त अल्प थांब्याचे ठिकाण असल्याने माझ्याकडे जेमतेम अर्धा दिवस होता. तेवढ्यात इस्तंबूल जुन्या शहरात असलेला हाजिया सोफिया, निळी मशीद आणि टोपकापी राजवाडा पळत पाहून घेतला. थोडा वेळ बाजारात फेरफटका मारला.
आता धोक्यचा भाग संपला आहे. आणि टर्की बरेच जणांनी पाहिलेले आहे. आज टर्कीमधील डेंनिझली आणि त्याच्या शेजारी असलेले पामुक्कले, म्हणजे ज्या क्षारांनी लवण स्तंभ बनतात त्यांच्यामुळे बनलेली पायर्यांची रचना हे पाहणार आहे. त्याचे फोटो नंतर.
उद्या अझरबैजान हा छोटा देश.

1
.
1


शनिवार २६ मे, पामुक्कले तुर्कस्थान.

आज तसा माझा सुट्टीमधल्या सुट्टीचा दिवस बरीच धावपळ, तणावपूर्ण प्रवास झाल्यानंतर एक दिवस आरामाचा. म्हणजे फोटोग्राफी वा फिरायला सुट्टी नाही, पण फार प्लॅनिंग वगैरे ना लागणारा दिवस. शिवाय गरम पाण्याचे झरे या जागी असल्याने थोडा श्रमपरिहार. तसा तुर्कस्थान हा देश स्वतंत्र भेटीचा विषय, परंतु या वेळी ट्रान्सीट बेस असल्याने जरा एखाद फेरफटका. तर, आजचे वृत्त देखील थोडक्यात. एक झलक इथल्या सॉल्ट टेरेसेस ची. पुढील प्रवास बाकु, अझरबैजान.


1
हेरापोलीस भग्नावशेष
1
स्पा सिटी पामुक्कले
1


1


1रविवार २७ मे, बाकु अझरबैजान

आज फक्त एकच ठिकाण अझरबैजानमधले बाकु. इथे ज्वाला देवीचे हिंदू मंदिर आहे. आणि दुसरे चिखलाचे ज्वालामुखी (मड व्होल्कॅनो).
सकाळी बाकुच्या दक्षिणेला असलेल्या कोबुस्तान या ठिकाणचे मड व्होल्कॅनो पहायल गेलो होतो. तिथे जमिनीतून ज्वालामुखीसारखे चिखलाचे बुडबुडे वर येत असतात. याला कारण म्हणजे इथे प्रचंड प्रमाणात असलेले तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे. इथे इतकं तेल आहे की आपल्याकडे पाण्याच्या विहिरी असतात तशा इथे तेलाच्या विहिरी असतात.

इथून जवळच एक प्रागैतिहासिक शिल्पे आणि चित्रे असलेले स्थान आहे. तेही सकाळी पाहिले. नंतर बाकु शहरात असलेला आधुनिक फ्लेम टॉवर पाहिला. याची रचना ज्वालांप्रमाणे केली आहे. नंतर गालिचांचे संग्रहालय पाहिले. जगात गालिच्यांच्या जेवढ्या शैली आहेत. म्हणजे समरकंद, बुझारा, अझरबैजानची स्वतःची खास शैली आहे, पर्शियन गालिचे जगप्रसिद्धच. तर अशा सर्व प्रकारचे प्राचीन काळापासूनचे गालिचे इथे पहायला मिळतात. खूपच सुंदर संग्रहालय आहे. पर्शियन शैलीतल्या खांबांचा एक फोटो पुढे दिला आहे. इथे पर्शियन वास्तु कलेचा बराच प्रभाव जाणवतो.

इथले ज्वालादेवीचे मंदिर खूप इंटरेस्टिंग आहे. कारण इथे सतत जळत असलेली ज्योत आहे आणि हे ठिकाण पारशी, शिख आणि हिंदू धर्मीय सर्वजण पवित्र समजतात. कांग्रा खोर्यात एक ज्वाला देवीचे मंदिर आहे तिला छोटी ज्वालाजी तर बाकु मधील बडी ज्वालाजी असे म्हणतात. येथे असलेली ज्योत नैसर्गिक वायुच्या मुळे अखंड जळत होती. पण प्रचंड प्रमाणात नैसर्गिक तेल आणि वायुअचे उत्पादन नजीकच्या परिसरातून झाल्यामुळे मूळची ऐतिहासिक काळापासून जळत असलेली ज्योत १९६९ साली विझली. त्यानंतर पाईपलाईनने नैसर्गिक वायूचा पुरवठा करून ती पुन्हा चेतवण्यात आली. या मंदिरात कित्येक संस्कृत तसेच दोन गुरुमुखी आणि एक पर्शियन शिलालेख आहे. एका संस्कृत शिलालेखात हे मंदिर संवत १८०२ मध्ये बांधले असा उल्लेख आहे. एका खोलीत काही हिंदू पूजा अर्चेच्या वस्तू ठेवल्या आहेत. त्यातील नटराजाच्या मूर्तीचा फोटो पुढे दिला आहे. बाकु हे ठिकाण जुन्या सिल्क रूटवरील महत्त्वाचा थांबा असल्याने प्राचीन काळापासून इथे हिंदू व्यापार्यांची येजा होती. ते पूजेसाठी या मंदिरात येत असत.

इथे एंट्री आणि एक्झिटला मात्र खूप त्रास झाला. एक दिवस हाताशी असल्याने इथे यावे असे ठरवले होते. आणि पहाण्यासारखे असे एक दिवस पुरेसा आहे. मात्र चेकिंगला व्हिसा पासपोर्ट सर्व बारकाईने तपासले गेले. एकच दिवस का आलात, इतर ठिकाणचे स्टँप पाहून तिथे कशासाठी गेला होता इत्यादी खूप प्रश्न विचारले आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यावरच ठप्पा मिळाला! हे जराआश्चर्य कारक आहे कारण सरकार टूरिझमला चालना द्यायला बघत आहे तर पोलीस असे खडूस वागत आहेत!

आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. इस्तंबूल ते इस्तंबूल असा प्रवास आता संपला. नंतर सावकाश वेळ मिळेल तेव्हा व्यवस्थित आणि तपशीलवार प्रवासवर्णन लिहून काढेन. धन्यवाद!

1
.
1
.
1
.
1
.
1
.
1
.
1


सोमवार २८ मे, इस्तंबूल तुर्कस्थान.

आज इस्तंबूल एअरपोर्ट वर या लाईव्ह ब्लॉग ची सांगता... इस्तंबूल हा खऱ्या अर्थाने ट्रान्झिट बेस कारण एकूण ५ वेळा इथून येणे जाणे झाले. आज हे या प्रवासातील शेवटचे. एकूण ५ देश, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, अझरबैजान व तुर्कस्तान. वीस हजाराहूनही अधिक मैलांचा एकूण प्रवास. विमान, रेल्वे, बस, लोकल ट्रान्सपोर्ट, पायी... शेकड्याने नवे मित्र मैत्रिणी, हजारो फोटो आणि अनंत अनुभव व आठवणी असा ठेवा घेऊन आता परतीचा प्रवास. प्राचीन रेशीम मार्गावरील हि थोडीशी जमवलेली वाटचाल... लाईव्ह लिहिण्यामागची कारणे अनेक होती, सुरक्षा आणि एक ट्रेल ठेवणे हे मुख्य, दोन वकिलातीतील मराठी कर्मचारी वाचक वर्गात आहेत. आणि प्रयत्न सफल झाला. प्रसंगी मदतही लागली, त्यात महत्वाचा मदतीचा हात पैसा ताईंचा. त्यांचे विशेष आभार! सर्वांचे वाचन-सूचना-प्रतिसाद-प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक आभार! धन्यवाद!


समाप्त


अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया

प्रतिक्रिया

अरे वा! लवकर टाका पुढील अपडेट.

गवि's picture

13 May 2018 - 9:59 pm | गवि

कुठे चाललायत?

तुमचा इतिहास पाहता नेहमीचं घिसंपिट लोकेशन नसणारच.

सस्पेन्स झालाय...

पुभाप्र.

पिलीयन रायडर's picture

13 May 2018 - 11:12 pm | पिलीयन रायडर

अरे वा! शेवटी जमवलंच की तुम्ही लाईव्ह चं!
सासंची मदत घ्या पण फार वेळ ह्यावर घालवू नका हे पुन्हा आवर्जून सांगेन. मुख्य प्रतीक्षा डी ट्टे ल वृतांताचीच आहे!

ह्याप्पी जर्णी!

पैसा's picture

14 May 2018 - 12:15 am | पैसा

आम्ही पण तुमच्याबरोबर तयार आहोत!

निशाचर's picture

14 May 2018 - 3:55 am | निशाचर

प्रवासासाठी शुभेच्छा!

हटके जागा, इस्तंबुल मार्गे... हम्म, बघू या माझा तर्क बरोबर ठरतो का :)

समर्पक's picture

14 May 2018 - 9:39 am | समर्पक

... पण बघा त्याच्या कुठे जवळ आहे का आत्ताचे शीर्षक... मोअर टू फॉलो...

निशाचर's picture

14 May 2018 - 8:59 pm | निशाचर

उझबेकिस्तान... बिंगो!

उझबेकिस्तान किंवा इराण असेल असं वाटलं होतं. पण इस्तंबुल मार्गे प्रवास असल्याने इराणची शक्यता कमी होती. अर्थात यात विशफुल थिंकिंगही आहे :) या दोन्ही देशांना कधीतरी भेट द्यायची आहे. पण विजा आणि इतर नियोजन सहज शक्य नसल्याने सध्या कठिण आहे. तुमच्या नजरेतून उझबेकिस्तान बघायला नक्कीच आवडेल. प्रवासाची योजना (उझबेकिस्तान कि आणखी एखादा मध्य आशियाई देश), निवडलेली स्थळं, रशियाचा प्रभाव अश्या अनेक गोष्टींबद्दल उत्सुकता आहे.

उझबेकिस्तान आता थोडा खुला व्हायला लागल्याने कस्टम्सचा त्रास कमी झाला असावा. फेब्रुवारीपासून विजाच्या प्रक्रियेतही बदल झाला आहे, असं वाचलं होतं. आता अनेक पाश्चिमात्य देशांसहित भारताच्या नागरिकांना विजासाठी आमंत्रणपत्राची गरज नाही आणि २ ते ५ दिवसांत विजा मिळेल. अर्थात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीही असेल. असो.

पुढील अपडेटच्या प्रतीक्षेत...

पिलीयन रायडर's picture

14 May 2018 - 3:00 pm | पिलीयन रायडर

भारीच! पुभाप्र!

शीर्षकामध्ये दिवस 1/2/3 किंवा 14 मे, 15 मे असं काही टाकता येईल का? म्हणजे भाग अपडेट झालाय हे कळेल.

मोदकाच्या धाग्यात मी डायरेकट त्या दिवसाला जायचा जम्प कोड टाकला होता. धागा पुढे जाईल तसा तो इथे टाकाल का? नंतर नंतर स्क्रोल करावं लागतं बरंच..

विजुभाऊ's picture

14 May 2018 - 5:03 pm | विजुभाऊ

तो "आटून "सुक्का पडलेला उरल समुद्र यावर लिहा हो. तिथे नक्की जाऊन या.
खूप इच्छा आहे तेथे जायची कधितरी.

अनिंद्य's picture

14 May 2018 - 5:15 pm | अनिंद्य

वा !
पुढील लेखांची प्रतिक्षा आहे

माहितगार's picture

14 May 2018 - 5:47 pm | माहितगार

रोचक, पुभाप्र.

कपिलमुनी's picture

14 May 2018 - 6:11 pm | कपिलमुनी

प्रवासाच्या शुभेच्छा !
पुभाप्र

वरुण मोहिते's picture

14 May 2018 - 6:39 pm | वरुण मोहिते

भर टाकतो तुर्कीस्थान ला गेलेत का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2018 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! मस्तं. रुळलेली वाट सोडून अशी सफर दिसली की खुर्चीत बसल्या बसल्या स्फुरण चढते !

पुढच्या प्रवासाच्या फोटोंसकट सविस्तर वर्णनाची सतत प्रतिक्षा राहील.

चौकटराजा's picture

15 May 2018 - 8:01 am | चौकटराजा

खीवा नगरीच्या पैल्या फटूतच गारद झालो . काही तरी नक्की हटके पहायला मिळणार ! इस्तंबुल गेलात तर क्याप्पाडोकीया करणार का ? ते अद्वितीय ठिकाण आहे .

तुमचा फार म्हणजे फार म्हणजे अतिशयच हेवा वाटतोय!

पैसा's picture

15 May 2018 - 8:35 am | पैसा

जबरदस्त चालू आहे!

मला वाटते की जे सर्वात नवीन अपडेट आहे ते सर्वात वर असावे. जर लेखातील भटकंतीच्या वर्णनांचा क्रम वरून खाली असा ठेवण्यापेक्षा खालून वर असा ठेवल्यास वाचकांना नवीन अपडेट शोधावे लागणार नाही.

निशाचर's picture

16 May 2018 - 2:18 am | निशाचर

नवीन अपडेट वर असल्यास बरे पडेल.

समर्पक's picture

30 May 2018 - 1:20 am | समर्पक

सध्यापुरता तसा बदल केलेला आहे. भटकंती संपली कि पुन्हा मूळ मांडणीत लेख पुनर्प्रकाशित करेन

नंदन's picture

15 May 2018 - 11:49 am | नंदन

फारच छान, उत्कंठेने पुढील भागांची वाट पाहतो आहे.

कपिलमुनी's picture

15 May 2018 - 12:19 pm | कपिलमुनी

प्रत्येक भाग आणि फोटो इथेच अपडेट करणार असाल तर धागा लोड व्हायला वेळ लागेल आणि लांबी खूप होइल , याचा विचार करावा.

पुढील प्रवास वर्णनाच्या प्रतीक्षेत

पिलीयन रायडर's picture

15 May 2018 - 12:33 pm | पिलीयन रायडर

खीवा काय सुंदर आहे! फोटोतला निळा रंग किती देखणा आहे, वा!! हेवाच वाटला तुमचा.

खूप फोटो काढा. :)

जेम्स वांड's picture

23 May 2018 - 12:04 am | जेम्स वांड

तर पर्शियन ब्ल्यू ताई पर्शियन ब्ल्यू , कलर ऑफ द शाह'ज अँड पर्शियन रॉयल्टी. कलर ऑफ द पर्शियन कल्चर. पर्शियन नजाकतीचा संस्कृतीचा अन आकाशा एवढ्या मनाचा सार्थ यथार्थ रंग. पर्शियन ब्ल्यू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2018 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

खीवाचे फोटो म्हणजे केवळ खवा आहेत !

टंकाळा आला तरी शक्य तेव्हा जरासे तरी टंका... आणि नंतर सफर पूर्ण झाल्यावर मोकळा वेळ मिळेल तेव्हा धाग्यात योग्य तेथे मजकूर व फोटोंची भर टाका. तुमचे "(अॉलमोस्ट) लाईव्ह ब्लॉगिंग" हा भन्नाट कन्सेप्ट आहे.

व्वाह.. आणखी एक लाईव्ह भटकंती..!!!

लाईव्ह भटकंतीचे धागे टाकायला किती कष्ट पडतात याची पूर्णपणे जाणीव असल्याने तुमचे विशेष कौतुक.

माझ्या कन्याकुमारी लाईव्ह भटकंतीच्या वेळी पिराचा भक्कम सपोर्ट असल्याने मी धागा व लिखाणाबद्दल निवांत होतो. इथे लिखाण वगैरे सगळे तुम्हीच करत आहात हे बघून आदर दुणावला आहे!!

पिलीयन रायडर's picture

15 May 2018 - 9:46 pm | पिलीयन रायडर

शिक जरा!

मोदक's picture

15 May 2018 - 11:24 pm | मोदक

:D

'खीवा नगरी' काय सुंदर दिसतेय. अगदी परिकथेतल्या सारखी. काल लेख वाचला. आज परत वाचावा वाटला. मस्तच हो. पुढचा लेख येवूद्या लवकर.

बुखारा भटकंतीच्या फोटोंच्या प्रतीक्षेत!

खिवातील जतन केलेल्या जुन्या इमारती मस्तच दिसत आहेत. आता बुखाराच्या प्रतीक्षेत!

पुंबा's picture

16 May 2018 - 12:22 pm | पुंबा

जंक्शन काम झालेलं ह्ये..
प्रचंड उत्कंठा आहे. तुमची लिहिण्याची शैलीच अतिशय संवादी आहे.

प्रचेतस's picture

16 May 2018 - 1:57 pm | प्रचेतस

भारीच..

पद्मावति's picture

16 May 2018 - 1:59 pm | पद्मावति

फार म्हणजे फारच जबरदस्त!

यशोधरा's picture

16 May 2018 - 6:13 pm | यशोधरा

झकास!

प्राची अश्विनी's picture

16 May 2018 - 6:56 pm | प्राची अश्विनी

मस्त लिहिलंय. प्रवासासाठी शुभेच्छा!

राघवेंद्र's picture

17 May 2018 - 12:21 am | राघवेंद्र

मस्त हो समर्पक भाऊ !!!!

रिटर्न EWR मार्गे असेल तर सांगा कट्टा करू

पिलीयन रायडर's picture

17 May 2018 - 12:36 am | पिलीयन रायडर

आजचेही फोटो आवडले!

अरे वा! बुखाराची झलक अप्रतिम आहे. महिवालबद्दल माहित नव्हतं. पण गोष्टींमधला ख्वाजा नसिरुद्दिन बुखाराचा, त्याचा तिथे पुतळाही आहे म्हणे. शिवाय अल बेरुनी खिवाचा. एकंदर ऐतिहासिक जवळिकीच्या कितीतरी खुणा असतील.

बुखारासाठी एक दिवस पुरला का? परतल्यावर आणखी फोटोंसह सविस्तर वृत्तांत मात्र नक्की लिहा.

समर्पक's picture

30 May 2018 - 1:23 am | समर्पक

बुखारासाठी एक दिवस जर पूर्ण प्लॅन तयार असेल तर पुरण्यासारखा आहे. काही जागा लांब आहेत पण शहर फार मोठे नाही

विजुभाऊ's picture

17 May 2018 - 5:13 pm | विजुभाऊ

अमु दर्या आणि सिर दर्या या दोन्ही नद्यंवर बांध बांधून ते पाणी सिंचनासाठी वापरुन कापूस पिकवला.
मात्र या नद्या ज्या उरल समुद्राला मिळायच्या त्याला पाणी मिळणे बंद झाले आणि त्यामुळे उरल समुद्र चक्क आटून गेला.

विजुभाऊ's picture

17 May 2018 - 5:14 pm | विजुभाऊ

या आटलेल्या समुद्राला भेट द्या.
आणि वृत्तान्त टाका ही इषेष इनंती

समर्पक's picture

30 May 2018 - 1:24 am | समर्पक

हा समुद्र अगदीच एका टोकाला असल्याने, व प्रायॉरीटी मध्ये वेळेअभावी मागे पडल्याने आराखड्यातून वगळण्यात आला. :-(

दुर्गविहारी's picture

19 May 2018 - 10:02 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीताय. लाईव्ह ब्लॉगिंग हि कल्पना आवडली. लवकर अपडेट टाका. उत्सुकता वाढली आहे.

मध्य आशियाची झलक अप्रतिम आहे. आणखी भागान्च्या प्रतिक्षेत. Samovar ला देखील बुखारा म्हणतात ना?

विनंतीला मान दिल्याबद्दल आभार! आत्ता नुसतीच झलक मिळत असली तरी नंतर एकेका दिवसावर आणि शहरावर अगदी सविस्तर लेखमाला येईलच अशी खातरी आणि अपेक्षा आहे. :-)

पिलीयन रायडर's picture

20 May 2018 - 8:27 am | पिलीयन रायडर

सुरेख! मस्त चालू आहे प्रवास!

मदनबाण's picture

20 May 2018 - 8:34 am | मदनबाण

लाईव्ह लेखन आवडले ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ओ मेरी मम्मी नु पसंद नहियो तू... ;) :- SUNANDA SHARMA | SuKh E | JAANI |

विचित्रा's picture

20 May 2018 - 2:18 pm | विचित्रा

Live blogging आवडलंच, पण नंतर विस्तृत वर्णन येऊ द्या.

विचित्रा's picture

20 May 2018 - 2:18 pm | विचित्रा

Live blogging आवडलंच, पण नंतर विस्तृत वर्णन येऊ द्या.

प्रवास मस्त चाललाय. समरकंदचे फोटो विशेष आवडले.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2018 - 7:38 pm | बिपिन कार्यकर्ते

फारच सुंदर चालू आहे... माझा कझाकस्तानाचा धावता दौरा आठवला! :)

पिलीयन रायडर's picture

20 May 2018 - 8:09 pm | पिलीयन रायडर

आजचे फोटो काय अप्रतिम आहेत!!!

पद्मावति's picture

20 May 2018 - 8:11 pm | पद्मावति

जबरदस्त! फोटो सुरेख आहेत सगळेच.

पैसा's picture

21 May 2018 - 12:18 am | पैसा

खूप छान प्रवास आणि त्याचे वर्णन सुरू आहे. अद्भुत जगाची सफर आमच्यासाठी!

निशाचर's picture

22 May 2018 - 5:35 am | निशाचर

रेल्वे प्रवासातील फोटो अप्रतिम आहेत.

उझबेक-अफगाण सीमेवरील फ्रेंड्शिप ब्रिजबद्दल विचारायचं होतं, पण तरमीझहून पुढे अफगाणिस्तानात जाल असं वाटलं नव्हतं. अफगाणिस्तानविषयी प्रचंड उत्सुकता आहे. पुढील अपडेटच्या प्रतिक्षेत!

अभ्या..'s picture

22 May 2018 - 8:44 am | अभ्या..

जब्बरदस्त,
स्वर्गीय सिरॅमिक पाहून डोळ्याचे पारणे फिटले.
काय कलाकारी, काय कलर्स, किती नजाकत. आहाहा

अनिंद्य's picture

22 May 2018 - 2:25 pm | अनिंद्य

सुहाना सफर !
फयॉज तेपे / कारा तेपेच्या वृत्तांताची प्रतीक्षा आहे.

शेअर टॅक्सीत समोर घोड्याचा नाल, मिरच्या टांगलेल्या असल्याने एकदम देशी फील आला असेल नै? ;)

जेम्स वांड's picture

23 May 2018 - 12:12 am | जेम्स वांड

काय एरिया निवडलात सर, क्रेडल ऑफ कल्चर अँड ह्युमॅनिटी असणाऱ्या काही अतिप्राचीन संस्कृतींपैकी एकीचा भाग, हिंदुकुशाच्या पलीकडून दक्षिणेतून आलेलं भारतीय दर्शन, पूर्वेला चीनकडून आलेलं तंत्रज्ञान, उत्तरेला उरल्स मधून उतरलेलं मानवी सौंदर्य अन पश्चिमेला पर्शिया मधून आलेला व्यापारी सांस्कृतिक ठेवा. सिल्क रूट आजच इतका मोहक तर तेव्हा किती असेल? किती भव्य असतील ती ताशकंद अन समरकंदची शहरे, कितीसाऱ्या संस्कृती तिथे एकत्र येत असतील, किती किती प्रवासी एखाद्या सराईत आपल्या रोमहर्षक कहाण्या ऐकवत असतील, एकंदरीत सीआयेस, अनातोलिया, किंवा जिथून कितीतरी आधुनिक संस्कृती प्रसवत गेल्या तो एरिया तुमच्या नजरेतून पाहणे जबरी अनुभव आहे, भरपूर फिरा, आम्ही अभ्यासाच्या आस्थेने जे पुस्तकात पाहिलं आहे ते स्वतः पहा अन अश्या लाईव्ह ब्लॉगिंगच्या रूपाने आम्हालाही दाखवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा :)

राही's picture

25 May 2018 - 6:20 am | राही

ळेख तर आवडतच आहे पण प्रतिसादही आवडला. माझ्याही मनात अशाच भावना उफाळून आल्या. अनेक संस्कृतींचे पाळणाघर असलेला हा प्रदेश. अनेक धर्म आणि संस्कृतींचा उदय, प्रसार आणि अंत इथे झाला. या सगळ्याच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत फिरणे हे स्वत:ला समृद्ध करणारेच असेल.

अनिंद्य's picture

25 May 2018 - 11:10 am | अनिंद्य

+१

पिलीयन रायडर's picture

23 May 2018 - 7:32 am | पिलीयन रायडर

आजचा भाग का कोण जाणे जास्त आवडला. कधी एकदा ह्या प्रवासाचे सविस्तर वर्णन येते असे झाले आहे.

तुमच्या मुळे पुष्कळ जग फिरतोय आम्ही :)

प्रचेतस's picture

23 May 2018 - 8:37 am | प्रचेतस

जबरदस्त आहे हे.

उपेक्षित's picture

23 May 2018 - 11:20 am | उपेक्षित

जबरदस्त,

अफगाणिस्तानात जरा काळजी घ्या असे म्हटले तर वावगे होणार नाही. आतिवासताईंच्या पुस्तकात त्या निळ्या मशिदीत जाण्याचा प्रसंग आहे. गैरमुस्लिमांना तेथे प्रवेश नाहीये.

मझार-ए-शरीफ नंतर आता काबूल, कंदाहार की आणखी कुठे याची उत्सुकता लागली आहे. अफगाणिस्तानात भारत आणि भारतीयांबद्दल खूप प्रेम जाणवतं, पण काही भारतविरोधी घटकही तिथे सक्रीय आहेतच. म्हणून म्हटलं.

पुभाप्र.

होय पण माझ्या दोस्तांबरोबर जाउन आलो... एकंदर वेशांतर फायद्याचे ठरले... :-)

भारतविरोधी घटक आहेतच, त्यामुळेच वकिलातीने न येण्याचा सल्ला दिलेला... बाघलाण मधील ७ अपह्रुत भारतीयांची लवकर सुटका होऊ दे ही प्रार्थना...

II श्रीमंत पेशवे II's picture

23 May 2018 - 1:03 pm | II श्रीमंत पेशवे II

अतिशय छान वर्णन , खूप नवीन माहिती

अजून पुढे वाचायची उत्सुकता आहे ...

पठाणी ड्रेसमध्ये एकदमच भारी दिसताय राव.
एखांदा शिवायला पाहिजे अशाच ग्रे कलरमध्ये.

हा लाईव्ह ब्लॉग जाहिरात/शो-ऑफ काहीही कोणाला वाटले असेल तरी हि प्रवासाच्या काही आवश्यक गरजांपैकी एक होती.

सहमत आहे. अफगाणिस्तानासारख्या असुरक्षित देशात फिरताना असे अपडेट देत राहणं नक्कीच गरजेचं आहे. तिकडे फिरण्याचा धोका हेतुपूर्वक पत्करला असला तरी शक्य ती काळजी अवश्य घ्या.

अफगाणींच्या आदरातिथ्याचा थोडाफार अनुभव घेतला आहे. एकंदरच भारताबाहेर कुठेही भारत आणि भारतीयांविषयी आपुलकी अनुभवायला मिळाली की खास वाटतं.

मझारचे, विशेषतः निळ्या मशिदीचे फोटो मस्त आहेत. हिंदुकुशचे फोटो मात्र पब्लिक केलेले नसावेत, तसेच नकाशाही आता दिसत नाही.

खूप सुंदर चालले आहे सगळे. वर्णन अपरिहार्यपणे त्रोटक आहे पण त्याची कसर फोटो भरून काढताहेत. निळ्या नवलाईने तर वेडे केले. अप्रतिम!

योगेश पुराणिक's picture

25 May 2018 - 5:33 pm | योगेश पुराणिक

अप्रतिम लिहिले ahe. पण मला फोटो दिसत nahiyet.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2018 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सफर. विंडोमध्ये गडबड झाल्यामुळे तीन दिवस आणि पाहुणे आल्यामुळे अजून तीनचार दिवस वाचणे जमले नव्हते. आज सर्व भाग परत वाचले. न मळलेल्या मार्गावरची सफर नेहमीच अत्यंत आकर्षक वाटते !

बहुतेक फोटो दिसत नाहीत. त्यांची मूळ जागा बदलली असावी किंवा त्यांचा पब्लिक अक्सेस काढला गेला असावा. जमेल तसे हे दुरुस्त करावे... फोटो पाहण्याची उत्सुकता आहे.

आजचा अपडेट आला नाही अजून. कृपया लवकरच जमेल तसा टाकावा.

यशोधरा's picture

25 May 2018 - 11:12 pm | यशोधरा

तुमचा हेवा वाटतो!! नियमित वाचते आहे..

अभिजीत अवलिया's picture

26 May 2018 - 11:01 am | अभिजीत अवलिया

अफगाणिस्तानचा व्हिसा कसा मिळवलात?

समर्पक's picture

30 May 2018 - 9:33 pm | समर्पक

अफगाणिस्तानचा व्हिसा भारतीयांसाठी विनामुल्य आहे. तिथल्या टूर कंपनीचे लेटर अपेक्षीत असते, पण माझा बेत मीच ठरविल्याने माझ्याकडे ते नव्हते. पण मी त्यांच्या वकिलातीस संपर्क केला, सर्व माहिती दिली व बरोबर तिथल्या प्रवासाचा बारीक सारीक महितीसकट संपूर्ण आराखडा जोडला. त्यानंतर फार वेळ लागला नाही.

समर्पक's picture

27 May 2018 - 11:13 am | समर्पक

प्रवासात प्रतिसाद देणे शक्य होत नाहीये, क्षमस्व. नंतर सर्व उत्तरे लिहीन...

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2018 - 1:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

आज सगळे फोटो दिसले आणि मन गारगाsssर झाले !!! काय मस्त जागा पाहत फिरत आहात ! तुमचे नंतर येणारे सविस्तर सचित्र प्रवासवर्णन काय भन्नाट असेल याची उत्सुकता वरच्या दर भागामागे दुप्पट वेगाने वाढत आहे !

पद्मावति's picture

27 May 2018 - 2:08 pm | पद्मावति

पामुक्कले चे फोटो केवळ अप्रतिम. ही सफर खूप खूप आवडतेय. सफरीवरून परत आलात की प्लिज लेखमालिका येऊ द्या.

हिंदुकुश आणि पामुक्कलेचे फोटो सुंदर आलेत. दोन्ही व्हिडिओही मस्त. भन्नाट झाली ही भटकंती! ज्वालाजी, गोबुस्तान, इएरापोलिस ते बुखारा अश्या बर्‍याच ठिकाणांबद्दल उत्सुकता आहे. प्रवासवर्णनाच्या प्रतीक्षेत...

नटराज मूर्तीचा फोटो खूप आवडला.
भन्नाट भटकंती!!

पैसा's picture

29 May 2018 - 9:12 pm | पैसा

_/\_ जबरदस्त प्रवास झाला. अतिशय वेगळ्या प्रदेशाची निवड होती. यापूर्वीचे तुमचे लिखाण आवडले होतेच. हेही कायम लक्षात राहील असे. इन्शाल्ला, पुन्हा कधीतरी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानची सफर घडू दे आणि खैबर बोलन खिंडी आणि मोहेंजोदारो चा प्रवास आम्हालाही असाच बसल्या जागी घडू देत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2018 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट भटकंती झाली ! आता सविस्तर आणि अधिक चित्रांसह वर्णनाची प्रतिक्षा आहे !

सुहाना सफर और ये ब्लॉगिंग हसीं
हमें ड़र हैं हम ब्लॉग मिस ना करे कोइ

सुरेख प्रवास वर्णन आणि जबरदस्त प्रकाशचित्रे म्हणजे तर आयसिंग ऑन द केक.

सुधीर कांदळकर's picture

30 May 2018 - 9:37 am | सुधीर कांदळकर

वगिरे वगैरे. बाल्हिक देश आणि चक्षु नदी यांचा उल्लेख सावरकरांच्या पुस्तकात वाचलेला आठवतो. देशसीमा नसलेल्या त्या नकाशात या ठिकाणांच्या नक्की स्थानांचा बोध होत नव्हता तो आता होत आहे.

खिवा आणि निळी मशीद अप्रतिम. हिंदुकुश छान.

मला वाटले होते की ज्वाला मंदीर आर्मेनियात आहे.

हटके स्थळांच्या परिचयाबद्दल अनेक धन्यवाद.

अनिंद्य's picture

30 May 2018 - 11:24 am | अनिंद्य

प्रवासाची धावती झलक आवडली, आता खास 'समर्पक' स्टाईल सांगोपांग माहिती देणाऱ्या लेखमालेची प्रतीक्षा आहे.
शुभेच्छा,

अनिंद्य

रामदास२९'s picture

30 May 2018 - 3:20 pm | रामदास२९

फारच सुन्दर .. पण त्रोटक.. त्यामुळे सविस्तर लिहा.. त्याच्या प्रतिक्षेत .. आणि भरपूर फोटो टाका ..

चौकटराजा's picture

30 May 2018 - 7:43 pm | चौकटराजा

इस्तम्बूल ते पामुक्कले कसे गेलात ? किती वेळ लागला ?

समर्पक's picture

30 May 2018 - 9:36 pm | समर्पक

विमानाने डेनिझ्ली पर्यन्त, १ तास, नन्तर १ तास शटल बस. पुर्ण बस ने ७-८ तास लागतात वाटते..