पेरू : भाग ८ : अॅमेझॉन

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
31 Aug 2014 - 12:19 am

सर्वांगीण प्रवासानुभूतीचे अजून एक महत्वाचे अंग म्हणजे निसर्ग. जेथे जातो तेथील निसर्गविशेष शक्य तितक्या जवळून अनुभव करता आलं तर अजून मजा. एक उदाहरण, ग्रँड कॅन्यन बघायला हजारो लोक जातात, पण ते एक कोलोरॉडो नदीचे खननोत्पन्न शिल्प आहे हे लक्षात घेउन ती खोली उतरून त्या गंगेला स्पर्श करण्यास यातले किती जातात? तिथून नदीसह बघितलेली दरीची भव्यता हा त्या विस्मयानुभवाचा पूर्णविराम! या निसर्गानुभवामधे भूरूपे, प्राणि, पक्षी, वनस्पती, कीटक, फळे इत्यादि सर्वांचाच समावेश होतो. मानवी संस्कृती हे या अनुभवाचे एक सोपे माध्यममात्र... स्थानिक खाद्यपदार्थातून तेथील निसार्गाचीच चव अप्रत्यक्षपणे आपण चाखत असतो, त्यामुळे तिथल्या मातीत जन्मलेल्या पाककृतींचा आस्वाद घेता आला तर उत्तम (हे मलाही पूर्णत्वाने जमत नाही कारण मी शाकाहारी आहे). पण त्या प्रदेशातून माणूसच वजा केला तर... याचा विचार, एवढाच इथे मुद्दा.

अर्थात, प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्य़ा, वेळ-पैसा याचं गणितही प्रत्येकाचं वेगळं, त्यामुळेच शक्य तितकं सुटसुटीतपणे माझं मत मांडण्याचा प्रयत्न, (लादण्याचा नाही). आणि म्हणून शक्यतो कुठल्या ठिकाणी मी किती वेळ दिला, किती दिवस राहिलो हे फारसं नमूद केलेलं नाही, पैशाच्या बाबतीतही तसेच. हा भाग 'भटकंती' च्या दृष्टीने शेवटचा आहे, पुढे लेखमाला वेगळे वळण घेउन चालू राहील. येथे हे नमूद करू इच्छितो की ही लेखमाला वाचलेल्या हजारपैकी दोन मिपाकरांचे नंतर जर या देशात जाणे होणार असेल, तर मी आताच हे स्पष्ट करतो की ही लेखमाला उरलेल्या ९९८ जणांसाठी आहे त्यामुळे यात वर सांगितल्याप्रमाणे व्यवहाराची सखोल माहिती नाही केवळ अनुभवांची आहे. माझ्या पायांनी मी फिरून आलो, आता माझ्या डोळ्यांनी आणि बुद्धीनी (आणि कॅमे-यानी) साठवलेलं तुम्ही बघा... ('ते' दोन जण अधिक माहितीसाठी कधीही संपर्क करू शकतात... ;-) )

या भागातील भटकंती: पेरूची पूर्व सीमा अॅमेझॉनच्या जंगलात ब्राझील व बोलिव्हिया ला मिळते. अॅमेझॉनच्या उद्गमशाखा उंचावरून खळाळत येतात पण पूर्वेकडच्या मैदानात आल्यावर संथावतात. या घनदाट जंगलामध्ये आजही बाहेरच्या जगाशी संपर्क नसणा-या अनेक जमाती राहतात. ब्राझीलच्या जंगलात 'विकास' सुरु झालेला आहे, त्यामानाने पेरूची जंगलं अजून टिकून आहेत. रस्तेही फार नाहीत, जलमार्ग सगळ्यात वेगवान. पुएर्तो माल्दोनादो आणि इकितोस ही दोनच त्यातल्यात्यात गावं म्हणण्यासारखी. मी पाहिल्याची निवड केली. नद्या आणि दलदलीचं जाळं इथल्या वृक्षराजी व प्राणिजगताचा आधार. माद्रे दे दिओस (देवमाता) व तांबोपाटा या नद्यांचा संगम जवळच आहे. आपल्यासारखी इथली जंगलं सुरक्षित नाहीत, मोठ्या प्रामाणात इथले वनस्पती व कीटक विषारी आहेत. कुठल्याही ओहोळाचे पाणी आपण साहज पिउ शकत नाही, सूक्ष्मजीव सुद्धा धोकादायक, आणि कधीकधी ते दोन-पाच-दहा वर्षांनीसुद्धा प्रताप दाखवतात अशी उदाहरणे आहेत. सकाळी व रात्री पूर्णपणे वेगळ्याच प्रजाती इथे सत्ता गाजवतात. रंगांची तर मुक्त उधळण आहे. अापल्याला परिचित अनेक शोभेची झाडे इथे जंगलात वाढताना बघून आश्चर्य वाटते. निसर्गाचे निश्चितच हे सर्वात समृद्ध उद्यान आहे यात शंका नाही. शब्दांपेक्षाही चित्रच अधिक बोलतील...

नकाशा

प्रथम दर्शन - गर्द झाडी व गढूळ नद्या

स्थानिक वाहतूक

नवापूल ब्राझील कडे जाणारा

हिरवाई

कायमन् - सगळ्यात पहिले दिसलेला प्राणि, हे सकाळी फारसे दिसत नाहीत खरंतर, पण आमच्या स्वागतास तत्पर असलेला हा मकरवर्गीय प्राणि (अॅलिगेटर, मगर (क्रोकोडाइल), सुसर व कायमन् या चार जातींपैकी शेवटची)

दिवसभरात वरच्या खो-यात झालेल्या पावसाने नदीला चांगलाच पूर आला; असे फ्लॅश फ्लड् वारंवार येतात.

प्रवासात बरेच नवे दोस्त झाले, काही दोन पायांचे, काही चार, हा बिनपायाचा एक...

अवांतर: टीशर्ट वरील पूर्ण ओळ:
"जगणं आनंदी होण्यासाठी काय हवं असतं? सुंदर रम्य आठवणी..."
...त्यातल्याच या काही

फुलपाखरांच्या काही जाती

कीटकवर्ग: रंगीत किड्यापासून पुढे, १. शेतकरी मुंग्या - स्वत:च्या वजनापेक्षा कैक पटींनी वजन नेणा-या, २. एक विषारी कोळी, ३. टॅरेंटुलाचं घर त्याचा केसाळ पाय दिसतोय त्याची मुंगळ्याच्या आकाराची तुलना करून त्याच्या आकाराची कल्पना येउ शकते, ४. सर्वात मोठ्या मुंग्यांपैकी एक जात इंचाहूनही लांब, ५ व ६. बुरशीची शेती करणा-या मुंग्या शेतात कुजवण्यासाठी पाने नेताना

विविधरंगी फुले

मकॉव् - निळे

मकॉव् - लाल

मकॉव् - पिवळ्या डोळ्यांचे हिरवे

मकॉव् - पिवळ्या डोक्याचे हिरवे

मकॉव् - राखाडी डोक्याचे हिरवे-निळे

टुकान - अॅन अँग्री बर्ड

एक अतिशय अनोखा सोहळा, मकॉव् क्ले लिक्, रोज सूर्योदयाच्या वेळी खनिजांची कमी भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रजातींचे मकॉव् माती खाण्यासाठी एकत्र जमतात. अखंड कलकलाट चाललेला असतो. पूर येणा-या नद्यांचे खनिजसमृद्ध काठ यासाठी एकदम योग्य. दररोज ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी हे पक्षी येतात. विहंगम...

अळंबी

संकीर्ण: डावीकडील फोटोत अॅमेझॉनची शिंपीण, उजवीकडे महाकाय वृक्ष व सर्वात मोठा मूषकवर्गीय प्राणि कॅपिबारा

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

31 Aug 2014 - 12:46 am | संजय क्षीरसागर

मजा आली.

खटपट्या's picture

31 Aug 2014 - 1:25 am | खटपट्या

निव्वळ अप्रतिम, फोटो बरेच काही बोलून जातात. मकाव तर फक्त चित्रात आणी सर्कशीत बघितले होते. तुम्हाला एवढे प्रत्यक्ष बघायला मिळाले.
टी-शर्ट वरच्या ओळी सार्थ करत आहात.

प्यारे१'s picture

31 Aug 2014 - 3:30 am | प्यारे१

आयला, बापमाणूस आहेस बे तू....!
( ते 'एकेरी'वर येणं हे 'फक्त' छायाचित्र बघून केलेलं धाडस. अन्यथा फोटोग्राफी, लिखाणाची शैली आणि इन जनरल मांडतो आहेस ते विचार ह्यात खरंच 'मोठ्ठा' आहेस असं जाणवतंय. आम्ही नावालाच काका . ;) )

समर्पक's picture

31 Aug 2014 - 6:47 am | समर्पक

फार उपदेशपर अविर्भाव आलाय का? मी फिरायला सुरुवात करण्याआधी ज्या माहितीच्या शोधात होतो, ती सर्व लिहीण्याचा प्रयत्न आहे. स्थानविशेष तथा एकल प्रवास या दोन्हीवरील लेखनामागचा, त्यातून पाठच्यास हुरुप व झालंच तर मार्गदर्शन मिळावं हा हेतू.

मर्यादोल्लंघन घडले असल्यास क्षमस्व

चौकटराजा's picture

31 Aug 2014 - 8:29 am | चौकटराजा

काका, तुम्हीही टाका फटू तुमच्या तिथुलले ! आम्ही कवतिक कराया हाएच !
@ समर्पक , पोपटाचे झाड प्रथम पहातोय. बाकी लेखन शैली आपल्या मनाची संवेदनक्षमता दाखविते तर फोटो डोळयांची !
आता इस्पिक एक्कांचे ही काही धागे येणारेत. म्हणजे बिसमिल्ला व व्ही जी जोग यांची जुगलबंदी आम्हाला पहायला मिळणार !

प्यारे१'s picture

31 Aug 2014 - 4:00 pm | प्यारे१

कवतिक का?
बरं बरं... ;)

@ समर्पक,
ते क्षमस्व वगैरे जौ दे बारा गडगड्याच्या हिरीत.
असाच भारी भारी लिहीत जा आणि फोटो टाकत राहा. खरंच.

विलासराव's picture

31 Aug 2014 - 8:51 am | विलासराव

झक्कास आहे हे सगळं जग!!!!

मी ब्राझीलला जाउनही अ‍ॅमेझॉनकडे न डोकावल्याचं दु:क्ख होत आहे आज.

कौन्तेय's picture

31 Aug 2014 - 9:12 am | कौन्तेय

या असल्या फिरण्यातला एक छोटासा भाग नि या चित्रांमधलं एकतरी चित्र मला साधले तरी मी त्याला आयुक्षभराची कमाई समजेन! http://goo.gl/mn5tK7

टवाळ कार्टा's picture

31 Aug 2014 - 12:05 pm | टवाळ कार्टा

भारीच

इशा१२३'s picture

31 Aug 2014 - 12:56 pm | इशा१२३

अप्रतिम!!

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2014 - 1:25 pm | बिपिन कार्यकर्ते

बेष्ट बघा!

एस's picture

31 Aug 2014 - 2:03 pm | एस

मकॉव् क्ले लिक् फक्त डिस्कवरीवरच पाहिले होते. प्रचंड सुंदर लेख आणि छायाचित्रे...

कवितानागेश's picture

31 Aug 2014 - 2:16 pm | कवितानागेश

आता ती फुलपाखरं घट्ट बसलीयेत डोक्यात ... फारच सुंदर आहेत सगळे फोटो.

प्रचेतस's picture

31 Aug 2014 - 7:25 pm | प्रचेतस

अफाट सुंदर.
ही अ‍ॅमेझॉन नदी कायमच गढूळलेली असते काय?

माझीही शॅम्पेन's picture

31 Aug 2014 - 8:37 pm | माझीही शॅम्पेन

झकास लेखमला __/|\__
साधारण लॅटिन अमेरिकेत इतक्या प्रकारचे पक्षी खास करून पोपट आढळतात की देशाची नावे "पेरू" आणि "चिली" शोभून दिसतात :)

ही अ‍ॅमेझॉन नदी कायमच गढूळलेली असते काय?

आमेझोनच जंगल हे विषुववृत्तवर (आणि tropical forest) असल्याने वर्ष-भर आणि सततच्या पावसाने गढूळ असण्यची शक्यता जास्त आहे

विलासराव's picture

31 Aug 2014 - 8:43 pm | विलासराव

मला एक बहाद्दर भेटला होत पॅरीसचा. ह्या अ‍ॅमेझॉनच्या उगमापासुन ते समुद्राला मिळेपर्यंतचा प्रवास त्याने केला होता. तेही स्थानीक लोकांबरोबर रहात रहात. त्याला ९ महीने लागले होते. एकदोनदा कुठल्यातरी जमातीने त्याच्यावर हल्लाही केला होता.

समर्पक's picture

1 Sep 2014 - 12:04 pm | समर्पक

होय. प्रचंड प्रमाणात गाळ वाहून नेत असल्याने ही नदी नेहमीच गढूळ असते. हा नकाशा पहा, ब्राझील मधील तिच्या सगळ्यात मोठ्या उपनदीला मनाउस जवळ मिळते तेव्हाचा रंगातील फरक...

https://www.google.com/maps/@-3.0851907,-59.8354073,102620m/data=!3m1!1e3

मस्त रे! लेख एकदम माहितीपूर्ण आणि फोटो झकास :)

सुहास झेले's picture

1 Sep 2014 - 12:22 pm | सुहास झेले

अमेझिंग अॅमेझाॅन... फोटो नेहमीप्रमाणेच जबरी :)

डिस्कव्हरी च्यानल मिपावर अवतरलं आज _/\_

पायांची झेरोस पाठवून देणेचे करावे ही इणंती.

मधुरा देशपांडे's picture

1 Sep 2014 - 2:20 pm | मधुरा देशपांडे

हाही भाग आवडला.

प्रसाद१९७१'s picture

1 Sep 2014 - 2:27 pm | प्रसाद१९७१

मस्त च

प्रमोद देर्देकर's picture

1 Sep 2014 - 2:45 pm | प्रमोद देर्देकर

तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही फिरण्याला / इथे फटु टाकण्याला समर्पक कामगीरी करताय.

बाकी जंगलात अजुन आंत गेलात तर खुप काही खजिना हाती लागेल. अजुन येवुद्या.

आणि ते मकाऊ पोपटांची डॉकुमेंटरी आधी डिस्कवरी चॅनलला पाहिली होती तीची आठवण झाली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2014 - 3:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै खास ! फोटो एक नंबर आणि लिहीण्याची स्टाईलपण !!

शिद's picture

1 Sep 2014 - 3:15 pm | शिद

जबरदस्त.

स्पा's picture

1 Sep 2014 - 4:18 pm | स्पा

खल्लास फोटोस
मजा आली

सविता००१'s picture

2 Sep 2014 - 2:03 pm | सविता००१

प्रचंड आवडते आहे तुमची लेखमाला. सुंदर फोटो आणि लिखाण तेवढंच जबरी..

मदनबाण's picture

4 Sep 2014 - 1:44 pm | मदनबाण

जबदस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

नि३सोलपुरकर's picture

5 Sep 2014 - 4:50 pm | नि३सोलपुरकर

टी-शर्ट वरच्या ओळी खरच सार्थ करत आहात.
मिपा चे ही खुप खुप आभार ..(" वाचन खुणा " ही सोय उपलब्ध केल्याबद्दल )
त्या योगे ह्या सुंदर रम्य आठवणी(लेख)पुन्हा पुन्हा जागवु /वाचु.

झकास लेखमाला भो.. __/\__

केदार-मिसळपाव's picture

5 Sep 2014 - 7:25 pm | केदार-मिसळपाव

प्रचंड म्हणजे अतिप्रचंड उत्सुकता आहे, अगदी ब्रम्हपुत्र नदीबद्दल आहे तशीच.
त्यामानाने तुम्ही नदीचे फोटो कमी टाकलेत.

विवेकपटाईत's picture

8 Sep 2014 - 8:46 pm | विवेकपटाईत

निसर्ग आणि वन्य जीवनाचे अतिशय सुंदर फोटो.

अनिंद्य's picture

31 Jul 2017 - 1:51 pm | अनिंद्य

ऑस्सम !
ही मालिका वाचायची कशी राहिली काय माहीत. आज सर्व भाग वाचले !