गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा
कलत्या उन्हात, कोण अंगणात?
तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण आकाशात?
फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण झाडात?
झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण घरात?
चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण उरात?
एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही!
कलत्या उन्हात, कोण गॅलरीत?
असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!