आज ओपींचा वाढदिवस. लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकार. `आय एम म्युझिक इल्लीटरेट' असं मनमोकळेपणानं कबूल करून, शास्त्रीय संगीताचं कोणतंही शिक्षण नसतांना केवळ स्वतःच्या स्वरसौंदर्याच्या आकलनावर, एकसोएक बंदिशी बांधणारा हा अवलीया रसिकांना कायम मोहवत आला आहे.
कोणत्याही चांगल्या स्वर रचनेचे केवळ तीन घटक असतात, क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी. क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी हे सारखेच वाटणारे घटक दोन प्रकारे व्यक्त होतात, एक म्हणजे, दोन स्वरांमधलं अंतर आणि दुसरं, त्या अंतरामुळे ऐकू येण्यातली सुस्पष्टता.