फसता फसता जमलेली गोष्ट-२
प्रवासाचा ऊद्देश फक्त खादाडी असल्याने ताम्हीणी घाटाला टांग मारुन सरळ एक्सप्रेस-वेने पेण-वडखळ करीत अलीबाग गाठायचे ठरले. माझ्याकडे फरसाण-फळे होतीच. स्वातीनेही दशम्या, चटणी, लोणचे आणि फोडणी घातलेला दहीभात घेतला होता. त्यामुळे नाष्ट्यासाठी हॉटेल शोधायचा वैताग नव्हता. हवाही छान होती. कुमारांचे ‘अवधुता, गगन घटा गहरानी रे’ लावले आणि निघालो. चार तासाचा तर प्रवास होता. त्यामुळे रमत गमत निघालो. एक्सप्रेसवेवर यायच्या अगोदर ईंद्रायणी नर्सरी जवळ गाडी बाजूला घेतली. शेतात मस्त चटई टाकली आणि सकाळचा नाष्टा ऊरकला. कुणाच्या हातात काय जादू असते कळत नाही. आता दही-भातात काय करायचे असते?