एन्टरप्रेन्युअर
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता.