जडण घडण - २६

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
5 Aug 2015 - 1:00 pm

संपर्क कायम आहे आमचा पण अर्थात विलंबित लयीत. आता भेटायची इच्छा अजिबातच नाही. ते दु:खं तसंच, तिथेच गोठलंय. समोर उभ्या समस्येला पाठ दाखवणं मान्य नव्हतंच कधी. मग जे घडलं, ते स्वीकारलं गेलं.
संसाराची गाडीही रमतगमत चालली होती. कधी हसत, कधी रडत, चिडवत,रूसत असं चारचौघांसारखं सुरू होतं. भूतकाळ प्रत्येकाला असतो, असं सांगणाऱ्या नवऱ्याने लग्नानंतर आवर्जून सांगितलं होतं, मला खूप बहिणी, वहिनी, मित्रमंडळी आहेत आणि मी त्यांची वाट्टेल तशी मस्करी करत आलोय आजवर. खूप जणांचं लक्ष असेल आपल्याकडे. माझं नाव काहींशी जोडलं जाईल किंवा आणखी वेगळ्या प्रकारे तुझी मस्करी केली जाईल. हे लक्षात ठेव, कारण आपल्यात त्यामुळे गैरसमज व्हायला नकोत. मस्करी, चिडवाचिडवी वगैरे गोष्टी व्हायच्याच. त्याचं काही सोयर सुतक नव्हतं. पण म्हटलं, तुमच्या बाबतीत खरोखर काही घडलेलं असेल आणि ते चुकीच्या पद्धतीने माझ्यासमोर येऊ शकतं, असं वाटत असेल, तर तुम्हीच मला सांगा. थोडं वाईट वाटेल, पण इतर कोणाकडून कळण्यापेक्षा तुम्हाला सांगता आलं, याचं बरं वाटेल. ते बोलणं हसण्यावारी गेलं. मस्करी, चिडवाचिडवी होत राहिली आणि एक दिवस नवऱ्याबद्दल काही समोर आलं. अत्यंत चुकीच्या पद्धतीने. लहान बाळ, घराबाबतची अस्थिरता, सासरच्या आप्तांकडून होणारी फसवणूक या सगळ्यामुळे काहिशी त्रासले होतेच मी. आणि त्यात हे काही समोर आलेलं. विश्वासाला तडा जाणं, हा माझ्या लेखी अक्षम्य अपराध. भूतकाळ प्रत्येकाला असतो, हे मला मान्य होतं. चुका प्रत्येकाकडून होतात, अगदी माझ्याकडूनही, हे सुद्धा मान्य.पण त्या कबूल न करणं अजिबात न पटणारं. मग त्यावरून काही काळ सगळंच बिनसलेलं. आतापर्यंतचे सगळे प्रश्न, त्रास, समस्या नीट हाताळणाऱ्या बायकोचं असं वागणं, नवऱ्यासाठी काहीसं अनपेक्षित होतं का? मग यापुढे संपूर्ण पारदर्शक वागण्याचा शब्द आणि कालांतराने तो विषयही मागे पडला.

वैयक्तिक आयुष्यात या सगळ्या वेगवान घडामोडी सुरू असताना व्यावसायिक आघाडीवर सुद्धा बरंच काही सुरू होतं. सरकारी दृक् श्राव्य माध्यमात काम करू लागल्यानंतर पत्र सूचना कार्यालयातही काम सुरू झालं. सरकारी प्रसारमाध्यमात काम करताना फक्त बातमी शोधायची सवय लागून जाते. फापटपसारा नाही फारसा. त्याचमुळे असेल, पण खाजगी वाहिनीत मला कधी काम करता येईल, असं नाही वाटतं. सरकारी प्रसारमाध्यमातल्या बातम्या नेहमीच तितक्या ताज्या, तेज नसतील कदाचित. पण त्या बातम्या नसतात, असं नाही म्हणता येणार. बातमीमूल्य ओळखण्याचा आकाशवाणीने घालून दिलेला पाया चांगलाच मजबूत आहे.

एव्हाना संपर्काची नवी माध्यमं उपलब्ध होत असल्यामुळे शुभेच्छासंदेश लेखनंही काहीसं रेंगाळलं होतं. मात्र त्या क्षेत्रात जिथे खूप प्रयोग करून बघता आले, तिथून मिळालेला सर्वात मोठा ठेवा म्हणजे एका अत्यंत अनुभवी काकांचं मार्गदर्शन. मनोहर बोर्डेकर. नावाजलेले मुद्रितशोधक. ते मराठी मजकूर तपासण्यासाठी यायचे. तेव्हाच त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली होती. गोरेगावला राहायचे, पण मुंबईत बस, ट्रेनने सगळीकडे छान प्रवास करायचे. सुरूवातीच्या काळात माझ्या रचना, ते माझ्याच समोर तपासायचे. काही सुधारणा सुचवायचे. व्याकरणातल्या दुरूस्त्या मला मान्य असत, मात्र एखादा शब्द बदलणं कधीतरी मला नाही पटायचं. मग मी ते सांगायचा प्रयत्न करायचे. काका ऐकून घ्यायचे. मग म्हणायचे....
पण कवीला इथे काय म्हणायचंय माहिती आहे का... अगं हे --- वृत्त आहे, वगैरे.. वगैरे...
बरेचदा ऐकून घेतल्यानंतर एक दिवस त्यांना म्हटलंच, अहो काका, हे जे तुम्ही, कवीने असं म्हटलंय असं सांगताय ना... ती कवी मीच आहे...
आं.. अरे काय सांगताय? काय हो, खरं का हे...
त्यांनी शेजारी बसलेल्या आर्टिस्टला विचारलं. त्याने हसत मान डोलावली, तसे काका कौतुकाने म्हणाले, अगं मुली, मग सांगायचंस ना मला तसं आधीच. का इतकं ऐकून घेत बसलीस... तू लिहिलंय म्हणजे तुझी बाजूही विचारात घेतली पाहिजे...
आधीपासून छान जमलेली गट्टी नंतर वाढतंही गेली. अगदी ते काम संपल्यानंतरही. खूप शिकवलं काकांनी. स्वीकार मधला स्वी कायम दीर्घ हवा... अगं मध्ये गं वर अनुस्वार नाही द्यायचा.. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहून गेल्यात. दत्तू बांदेकर हे त्यांचे आवडते लेखक. बाळासाहेब ठाकरे एके काळचे वर्गबंधू. बोर्डेकर काका बोलायला लागले की त्यांच्या अनुभवांचा, किश्श्यांचा खजिना उलगडत जायचा. ते काम सोडल्यानंतरही मी काकांच्या संपर्कात होते. काका गोयंकार. फोन केला की सांगायचे, या घरी काकूच्या हातचे मासे खायला. तुझी काकू मस्त जेवण बनवते. तो योग काही आला नाही. गुरू पौर्णिमा आणि त्यांच्या वाढदिवशी मी आवर्जून फोन करायचे त्यांना. खूप बरं वाटायचं. नंतरच्या काळात त्यांनी विरार-वसई भागात घर घेतलं. आजारी पडले आणि काही वर्षांपूर्वीच त्यांना देवाज्ञा झाली. मला अजिबात न आवडणारं व्याकरण थोडं फार कळू लागलं असेल, तर त्याचं श्रेय बोर्डेकर काकांचं. चुकांची जबाबदारी सर्वस्वी माझी...

असेच छान लक्षात राहिलेले, त्यांच्या क्षेत्रातले पितामह, म्हणजे डॉ. अशोक रानडे. त्याचं झालं असं की सरकारी दृक् श्राव्य माध्यमात भाषांतरकार आणि वार्ताहर म्हणून काम करताना निवेदकांची निवड प्रक्रिया सुरू झाली होती. बरोबरच्या अनेकांनी पुढाकार घेतला. मी मात्र, चेहऱ्याला ओळख नको, या मुद्द्यावर ठाम. तोवर लग्न झालं होतं. नवरा आणि सासरे, याबाबत भरपूर उत्साही. त्यामुळे मी या निवड चाचणीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असा दोघांचा आग्रह. माहेरी माझ्या स्वभावाची पूर्ण कल्पना असल्याने आग्रह करण्याच्या किंवा भरीला पाडण्याच्या भानगडीत कोणी पडलं नाही. याच वेळी तिथेच काम करणारे एक ज्येष्ठ वृत्तनिवेदक आणि वृत्तनिवेदिका, दोघांनी अक्षरश: मागे लागून मला त्या प्रक्रियेत सहभागी व्हायला लावलं. तू अर्ज केला, म्हणजे लगेच निवड नाही होत काही. परीक्षा तर देऊन बघ. हा अनुभव तर घेऊन बघ. बरं. अर्ज केला. परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यापाठोपाठ स्क्रीन टेस्टसुद्धा. आणि मग प्रशिक्षण. मागच्या एका भागात उल्लेख आला होता आमच्या बंगाली संचालिका बाईंचा. त्या खूप उत्साही होत्या. आमचं प्रशिक्षण उत्तम व्हावं, हा त्यांचा आग्रह. मग त्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून डॉ. अशोक रानडेंकडून मार्गदर्शन. नव्या पॅनेलसाठी काही हजारांमधून निवडले गेलेले आम्ही साधारण बारा जण. डॉ. रानडे ऋषीतुल्य माणूस. स्वभावाने मिस्कील. वेगवेगळे व्यायाम प्रकार शिकवले त्यांनी. आमचे आवाज ऐकले, पुन्हा पुन्हा ऐकले. आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या. इथल्यापुरतं शिकू नका. हा एक प्रकारचा रियाज आहे, तो कायम ठेवा, असं बजावून सांगितलेलं आठवतंय.

प्रशिक्षण संपलं आणि मग प्रत्यक्ष मैदानात उतरायची तयारी. मनाने आपण कितीही तयार असलो तरी प्रत्यक्षात मात्र उलट आकडे मोजताना वाढत जाणारी धडधड रोल कॅमेरा हा शब्द ऐकू आला की टिपेला पोहोचते. मग शांत असल्याचा आव आणून कॅमेऱ्याशी बोलायचं. माझी सुरूवात बरी झाली पण एक दिवस खूपच वाईट अनुभव घेऊन आला. नेहमीप्रमाणे मी वेळेपूर्वी जागेवर जाऊन बसलेली. माईक, इअरफोन लावलेले. माईक टेस्टींग झालेलं. स्टुडिओमध्ये टाचणीस्फोट शांतता. सिग्नेचर ट्यून सुरू झाली, नेहमीप्रमाणे धडधड वाढलेली आणि तितक्यात.. फ्रंट कॅमेरा हाताळणाऱ्याचा फोन वाजला. माझी भितीने गाळण. उगाचच. त्याचा फोन वाजत होता. पण आम्ही लावलेला माईक खूप जास्त संवेदनशील असतो. सूक्ष्म आवाजही टिपणारा. आणि हा बाबा फोन बंद न करता बोलू लागलेला. रोल ऐकू आलं, पण मी तिथेच अडकलेली. मग तारांबळ सुरू. खूप वाईट सादरीकरण. वरीष्ठांनी खाणाखुणा आणि प्रोड्युसरने (इअरफोनमधून) शंख केल्यावर कॅमेरामॅनने फोन कट केला खरा, पण मला काही सावरता आलं नाही. आवंढे गिळत, मोठमोठे पॉझेस घेत एकदाचं बुलेटिन संपवलं. वाईट्ट वाचलं मी. हो. वाचलंच. सांगता आल्याच नाहीत बातम्या. दोन मिनिटं सुन्न होऊन बसले, मग तशीच उठून संचालिका बाईंकडे गेले.
मॅडम, वाईट झालं बुलेटिन. खूप वाईट. रडवेल्या स्वरात सांगितलं.
ते बघितलं मी. काय झालं तुझं, ते सांग आधी.
घडला प्रकार सांगितला. त्या कॅमेरामॅनने फोन घेतला तरी मी विचलित व्हायचं कारण नव्हतं, पण मी झाले. गोंधळले आणि वाईट परफॉर्मन्स दिला, हे मान्य केलं. मग त्यानंतर या प्रकाराबद्दल संबंधित वरीष्ठांशी झालेल्या चर्चा आणि संचालिका बाईंनी केलेली पाठराखण.
चूक झालीय तिची आणि तिला मान्यही आहे. पण नवखे असताना असा एखादा अनुभव येऊ शकतो. यापुढे काळजी घेईल ती.
झाल्या प्रकाराबद्दल चूक मान्य करून मी बिनशर्त माफी लगेच मागून टाकली होती, त्यामुळे ते प्रकरण इतरांनीही फार लावून धरलं नाही. आत्मविश्वास डळमळला होता थोडा, पण आता कच खाल्ली तर आपल्यावर विश्वास दाखवणाऱ्यांना वाईट वाटेल, हे मनात राहिलं. मग इतर काही वरीष्ठांनी वेळोवेळी स्वत:हून पुढाकार घेऊन केलेल्या सूचना. वाचन, बोलण्याची पद्धत, साड्यांचे पोत, रंग, केशरचना सगळंच आणि बरंच काही. यथावकाश मी ही सरावले.

मग एकदा मी स्टुडिओत जाऊन बसले, सगळे सोपस्कार पार पडले. सिग्नेचर ट्यून सुरू होण्यापूर्वी दार बंद होणार, तोच एक त्रिकोणी कुटुंब आत आलं. आई-बाबा आणि तीन-चार वर्षांचा मुलगा. स्टुडिओतल्या तंत्रज्ञाचे परिचित.
बातम्या बघायच्या त्यांना.
अहो, बाहेर टिव्हीवर बघू द्यात की... कॅमेरामॅनने सुचवलं.
हॅ... ते तर रोज बघतो. आज प्रत्यक्ष बघायच्यात.
बसले सुद्धा ते.
अहो , तुमचा छोटा बोलणार नाही ना... आवाज नाही चालणार इथे..
नाही बोलणार हो तो.. उगाच काळजी करता... हाहाहाहा...
अरे हसताय काय... मनात म्हणत, कसनुशी हसत मी कॅमेऱ्याकडे वळले. बातम्या सुरू झाल्या आणि संपल्याही. गुणी बाळ हो. नाही बोलला काही. छान हं बाळा, असं कौतुक करत, मनात हुश्श म्हणत मी तिथून बाहेर पडले.
असंच एकदा सकाळचं बातमीपत्र संपवून ऑफीसला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी होते. तुरळक गर्दी होती. बातम्या संपल्या संपल्या मी सवयीप्रमाणे चेहऱ्यावरची रंगरंगोटी पुसून टाकलेली. पण साडी तीच. रांगेत तीन बस स्टॉप. मी मधल्या स्टॉपवर आणि मागच्या बसस्टॉपवर कॉलेजला जाणाऱ्या मुलांचा एक घोळका. बहुतेक अकरावीतली मुलं. नवं नवं कॉलेजवाली. बस येतेय का, ते बघण्यासाठी मागे नजर टाकली तर माझ्याकडे बोट दाखवून बोलताना एक जण दिसला. मला वळलेलं पाहून चटकन ओशाळत त्याने हात खाली घेतला. असेल काही, असं म्हणत मी पुन्हा माझ्या विचारात. तर तो मुलगा चालत माझ्यापर्यंत पोहोचलासुद्धा.
ओ... मी तुम्हाला बघितलं. आज सकाळी. तुम्हीच होता ना टिव्ही वर...
मला हसू आलं. असं होतं होय...
हो. मीच ती.
मग, मी तेच सांगत होतो ना... चला, येतो हा मॅडम... आणि स्वत:वर खुश होत तो निघूनही गेला.
क्रमश:
जडण घडण , , , , , , , , , १० , ११ , १२ , १३ , १४ , १५ , १६ , १७ , १८ , १९ , २० , २१ , २२ , २३ , २४ , २५

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

5 Aug 2015 - 11:35 pm | एस

थोडंसं विस्कळीत अन् वेगवान वाटलं. दोन परिच्छेदांमध्ये एक रिकामी ओळ सोडल्यास बांधीवपणा येईल असे वाटले.

पुभाप्र.

प्रदीप साळुंखे's picture

5 Aug 2015 - 11:46 pm | प्रदीप साळुंखे

यांचा ताळमेळ बसत नाही,पण ठीक आहे ,छान.

माधुरी विनायक's picture

6 Aug 2015 - 12:06 pm | माधुरी विनायक

स्वॅप्स, प्रदीप साळुंखे प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया वाचल्या आणि हा भाग पुन्हा वाचून काढला. खरं तर अल्पविरामानंतरचा पहिला भाग सोडला तर इतर सगळे भाग एकटाकी लिहिले गेलेत. पण हा भाग खरंच विस्कळित वाटतोय. कदाचित या भागातला काळ तसा अलिकडचा असल्यामुळे मला स्वत:पासून वेगळं होऊन त्रयस्थपणे स्वत:ला बघणं जमलं नसावं. पुढच्या भागात ही काळजी घ्यायचा प्रयत्न करते. खऱ्याखुऱ्या आणि तत्पर प्रतिसादासाठी मनापासून आभार.

रातराणी's picture

7 Aug 2015 - 11:22 am | रातराणी

मस्त आहेत अनुभव.

प्रांजळपणा मनाला भिडतो. पु भा प्र

नाखु's picture

7 Aug 2015 - 5:50 pm | नाखु

काही स्पर्ष मुद्दे तर काही अस्पर्ष तरी बरेच सांगणारे नेम्की परिस्थीती/घालमेल अधोरेखीत करणारे.

पुभाप्र.

ता.क.कमालीचा तोल पाळलेले, खाजगीपण जपताना मोजके पण नेम्के जाहीर लिह्ण्यईची हतोटी कदाचीत आप्ल्या व्यवसाय कौशल्यातून आणि लेखनशैलीतून आली असावी. पण नक्कीच अनुकरणीय.

मुक्त विहारि's picture

7 Aug 2015 - 6:06 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

माधुरी विनायक's picture

26 Aug 2015 - 4:08 pm | माधुरी विनायक

रातराणी, gogglya, नाद खुळा , मुक्त विहारी आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार.

खटपट्या's picture

26 Aug 2015 - 4:39 pm | खटपट्या

नेहमीप्रमाणे मस्त !!

बहुगुणी's picture

26 Aug 2015 - 7:25 pm | बहुगुणी

वाचत रहावंसं वाटणारी मालिका

माधुरी विनायक's picture

4 Sep 2015 - 3:33 pm | माधुरी विनायक

खटपट्या आणि बहुगुणी धन्यवाद...