जडण- घडण : 23

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
22 Jul 2015 - 2:24 pm

सौम्य मंगळाच्या प्रसंगानंतर वेगात धावणाऱ्या गाडीला गच्चकन ब्रेक लागावा, तसं झालं. आत्तापर्यंत आपण एकतर्फी किंवा एकांगी विचार करत होतो का, ते तपासून बघावं, असं वाटू लागलं. ... मी स्वत:ला लादतेय का याच्यावर, हा पहिला विचार मनात आला. अरे बापरे... लादलेलं कोणतंही नातं वाईटंच. आणि हे कळत असूनही मी तेच करत असेन तर ते आणखी वाईट. खरंच मी स्वत:ला लादत असेन, तर आत्ता इथेच थांबावं. मला त्रास नक्कीच होईल. खूप वाईटही वाटेल. पण लादलेली नाती नाही टिकत. त्यामुळे तसं असेल तर इथेच थांबलेलं बरं.
आणखी एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली. अगदी ठरतंय, असं वाटणारं एक लग्न रहित झालं खरं. पण त्या मुलाच्या घरच्यांनी पत्रिकेवर फारसा विश्वास न दाखवता आपली बाजू लावून धरायचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतरची त्यांची नाराजी... स्वत:च्या मतावर ठाम राहताना मी ही बाजू लक्षात घेतलीच नव्हती. मी अलिप्त असले तरी समोर आलेल्या मुलांची या सगळ्यात भावनिक गुंतवणुक होतीच. माझी काही कारणं असली तरी इतर कोणाच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार मला नक्कीच नाही. .
त्यात पुन्हा आई-बाबांचे समजावण्याचे प्रयत्न सुरू होतेच. मी ऐकत असले-नसले तरी. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे, पूर्ण विश्वास टाकणारे, माझे निर्णय मला घेऊ देणारे, भरभरून कौतुक करणारे माझे आई-बाबा. मी माझ्याच आई-बाबांना दुखावतेय. ते नाही समजून घेऊ शकत मला, इतकंच कळतंय, पण त्यामागे त्यांना वाटणारी काळजी खरंच निरर्थक आहे का... ज्याच्यावर मी इतका विश्वास दाखवतेय, त्यालाच आमच्या नात्याबद्दल आई-बाबांशी ठामपणे बोलता येत नाहीय,तर आई-बाबांनी समजून घ्यावं, ही माझी अपेक्षा एकांगी नाही का..
तसं नसेल, तर मग हा वेळकाढूपणा कशाला... अडचणी समोर आहेत, मग त्या सोडवायला हव्यात. प्रत्येक वेळी, काही वाईट होत नाही, असं म्हणून नशीबावर हवाला ठेवणं किती योग्य... एकमेकांना आवडणारे कोणीही दोघं... नातं कोणतंही असू देत... अगदी आई आणि बाळाचं नातं म्हटलं तरी... प्रत्येक आईचं आपल्या बाळावर खूप प्रेम असतं. पण ते बाळ आजारी पडल्यानंतर माझं बाळ, माझं बाळ म्हणत धाय मोकलून रडणारी, बाळाला सेकंदभरही नजरेआड होऊ न देणारी आई बरोबर, की बाळाला बरं वाटावं, यासाठी चटकन योग्य निर्णय घेऊन बाळावर उपचार होतील याची खबरदारी घेणारी, त्यासाठी धावपळ करणारी आणि बाळाला लवकर बरं वाटावं यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणारी आई बरोबर. फक्त प्रेम असणं पुरेसं नसतं. आपल्या माणसासोबत कायम खंबीरपणे उभं राहणं महत्वाचं. हे प्रत्येक नात्याला नाही का लागू होत...
मग थेट तसं विचारलंही. तर त्यावर उत्तर पुन्हा तेच. किती विचार करशील... नको इतकी काळजी करू. सगळं ठिक होणार आहे.
पण माझ्या बाबतीत आता आमच्या भेटण्या बोलण्याबद्दल घरच्यांपासून लपवाछपवी आणि हा ताण दोन्ही सहन होण्यापलिकडे गेले होते. मग म्हटलं.. आता तुम्ही काय ते ठरवा. खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा. मला आणखी काही बोलायचं नाही. मी कॉल करणार नाही. भेटणार सुद्धा नाही. तुमचा निर्णय झाला की कळवा. जेमतेम दिवस गेला मध्ये. मग पुन्हा कॉल... तू बोलणं बंद नको करू ना... मला खूप त्रास होतो त्याचा...
बोलणं सुरू झालं पुन्हा. पण आता काहीसा तुटकपणा येऊ लागलेला. माझ्या डोक्यातला गोंधळ तसाच कायम. मी फार देवभोळी नाही, पण आपल्या ज्ञातापलीकडे असलेल्या त्या कुठल्याश्या शक्तीवर, श्रद्धेवर माझा विश्वास आहे. घराजवळ एक शिवालय होतं. सकाळी गुरूजी पुजा करून गेले की फार क्वचित तिथे कोणी असायचं. शांत एकटं बसायची माझी आवडती जागा. त्या दिवशी मंदिरात गेले. गाभारा शांत. सुखद गारवा पसरलेला. नुकतीच पुजा आटोपलेली. ताज्या फुलांचा, उजळलेल्या दिव्यांचा, उदबत्त्यांचा प्रसन्न दरवळ. नकळत हात जोडले, डोळे मिटले आणि मनोमन शांत होत गेले. भरून आलेले डोळे उघडले आणि म्हटलं... यापुढे मला काहीच नाही ठरवायचं. कोणताच हट्ट नाही करायचा. लग्नाच्या बाबतीतला निर्णय आधीपासूनच आई- बाबांवर सोपवला होता. मग हे सगळं अवचित समोर आलेलं. पण हट्ट करून आपल्या मनासारखं होणार नसेल आणि आपली माणसंही दुखावली जाणार असतील तर... जे होतं, ते चांगल्यासाठी, यावर विश्वास आहे. माझ्या मतावर मी ठाम आहे, पण त्याला माझ्यासोबत ठामपणे उभं राहता येत नाही आणि माझ्या आई-बाबांना माझ्यावर या बाबतीत विश्वास दाखवता येत नाही. ठीक. आपण आपल्या परीने शक्य ते सगळं करतोय, केलंय. आता यापुढे जे समोर येईल त्याला सामोरं जायचं. सगळे हट्ट सोडून...
मनातून शांत व्हायचा प्रयत्न करत मी घरी परतले. आणखी काही संथ आणि जीवघेणे दिवस पुढे सरकले. संवाद काहीसा रेंगाळलेला. अशीच एक संध्याकाळ आणि नको असलेलं संकट पुन्हा समोर. दिवसाच्या या वेळी, इतक्या उशीरा मुलगा बघायची पहिलीच वेळ. माझा चेहरा तटस्थ, निर्विकार. आमचं घर चांगलंच प्रशस्त, ऐसपैस. मी अगदी आतल्या बेडरूममध्ये संगणकावर काम करत बसलेली. पण तिथून प्रत्येक खोलीतली हालचाल नजरेत यायची. मी कामात गुंतलेली. दारावर बेल वाजली. यावेळी भाऊ आणि बहिण अशी जोडगोळी समोर येत होती. माझी उदासीनता कायम असली तरी बाहेरच्या अतिरिक्त हालचालींमुळे माझं लक्ष काहीसं विचलीत झालं. आधी पायातले बूट काढले, मग मोजे, मग बाईकवर वापरायचे ग्लव्हज्, मग चेहऱ्यावरचा गॉगल, मग मास्क. त्यानंतर, मी फ्रेश होऊ का, अशी विचारणा आणि त्या दिशेने प्रस्थान. सगळे सोपस्कार पार पडले आणि मग आईने हाक मारली. मी त्याच अलिप्तपणे बाहेर गेले. जुजबी बोलणं झालं. या बहिणाबाई फारच उत्साही होत्या. प्रश्नांची सरबत्ती आणि मग मला आत, जिथे मी आधी बसले होते तिथे नेऊन आपल्या मोबाइलमध्ये माझे फोटो काढून घेतले. हे जरा अतीच होतंय, असं माझ्या चेहऱ्यावर लिहिलेलं कोणालाही स्पष्ट वाचता आलं असतं, पण त्यांचं सुरूच होतं.. . काही वेळानंतर ती भावंडं निघून गेली आणि मी नेहमीसारखं मनातल्या मनात हुश्श म्हटलं. पण ते तेवढ्यावर संपायचं नव्हतं.
आधीच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती. त्यांच्याकडून पसंती आली आहे, आम्हालाही स्थळ पसंत आहे. पुढची बोलणी करायचीत. तुला मुलगा कसा वाटला. माझ्या उत्तरात फारसा बदल नाही. मला काय वाटतंय हे मी सांगितलंय. तुम्हाला माझ्या मनासारखं नाही ना वागता येत, मग तुमच्या मनासारखं मला वागलं पाहिजे. मला याबाबत आणखी काहीच बोलायचं नाही. तुम्हाला पटेल, ते करा... आवाज स्थिर ठेवत इतकं सांगितलं आणि उठलेच तिथून.
पुन्हा एकदा त्याच्या कानावर घातलं. पुन्हा तेच उत्तर. आम्ही पहिल्यांदा इथेच भेटलो होतो, ते आठवलं एकदम... नको असलेल्या विचारांनी डोक्यात आणि पाण्याने पापण्यांत गर्दी केलेली. खूप निग्रहाने रोखून धरलेलं पाणी. तू काळजी करू नको. पुन्हा तेच... या वेळी मात्र मनातून पूर्णपणे कोलमडून गेलेली मी. का नाही समजू शकत इतकी साधी गोष्ट. मला खूप त्रास होतो या सर्वाचा. पण नाही... फारसं काही न बोलताच परतले मी.
पुन्हा एकदा लग्नाची बोलणी. दोन्हीकडचे नातेवाईक. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तोच आनंद. यावेळी मात्र बैठक पूर्ण झाली. साखरपुडा,लग्न एकाच दिवशी. मुहूर्त जेमतेम पंधरा दिवसांनंतरचा. घाई का... त्याचे आई-वडील वयाने थकलेले. नंतर मुहूर्त खूपच उशीरा आहेत. पसंती झालीच आहे मग का थांबावं. फक्त लग्नानंतर महिनाभर घराच्या बाबतीत थोडी तडजोड. जुन्या बैठ्या घरांच्या जागी इमारत बांधली जाणार होती, तोवर दोन वर्षं इमारतीत आणि नंतर नव्या इमारतीत स्वत:च्या हक्काच्या घरात. तोपर्यंत लग्नानंतर महिनाभर बैठ्या घरात. मुलाचं स्वत:चं घर हवं, ही माझ्या आईची अटही पूर्ण होणार होती. सगळं ठरूनच गेलं एकदम.
त्याच्याशी बोलणं झालं. लग्न ठरलं, तारखेसह, हे सुद्धा सांगितलं. मग समोरून लगेच काहीच प्रतिसाद नाही आणि मी फोन ठेवून दिला. रडायचं नाही ना... रडू आलं तरी ते समोर पोहोचू द्यायचं नाही... या वेळी ते शक्य झालंच नसतं.
घरात आनंदाला उधाण आलेलं. माझ्यासमोर माझा अंदाज घेत सगळं चाललेलं. तयारीसाठी हातात अगदी कमी दिवस. आमचा गोतावळा मोठा, त्यामुळे कामांची धांदल उडालेली. सगळ्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या. केळवणं वगैरे काही नाही. ती कोणाच्याही घरी येणार नाही. ज्यांना हौस असेल त्यांनी इथेच या. आईने सगळ्यांना परस्पर कळवलं.
मी त्या सगळ्यात असून नसल्यासारखी. सगळ्या नातेवाईकांनी अभिनंदन केलं. असं ठरतं लग्न.. आयुष्यभराची साथ.. माझ्या मनापर्यंत काही पोहोचत होतं की नाही, ते सुद्धा आठवत नाही. लग्नाची तारीख ठरली, त्याच दिवसांत माझ्या काही असाइनमेंट ठरलेल्या. त्या रद्द कराव्या लागणार होत्या. मग एक दिवस मी स्टुडिओत असताना एका अनोळखी नंबरवरून आलेला कॉल. रेकॉर्डिंगमध्ये आहे, नंतर करते, असं सांगून फोन ठेवला. काम संपल्यावर नंबर फिरवला तर पलीकडे, ज्याच्याशी लग्न ठरलंय तो. काही जुजबी बोलणं. मी श्रोत्याच्या भूमिकेत आणि समोरून माझ्या प्रतिसादावरून अंदाज घेत पुढे चाललेला संवाद. एकूण स्वरात प्रामाणिकपणा आणि आनंद, दोन्ही. आवाजातला तो खरेपणा कुठेतरी भिडला मनाला आणि ताठरपणा सोडून मी नीट बोलले.
मग पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेट. दोघांचीच. समोरच्या स्वरात आनंद, उत्सुकता कायम. छान प्रसन्न व्यक्तिमत्व. देखणा तरीही घरगुती, ओळखीचा वाटावा, असा चेहरा. पुन्हा एकदा घरच्या सगळ्यांबद्दल माहिती दिली. स्वत:बद्दल सांगितलं. माझ्याबद्दल विचारलं. मी नेमकंच बोलत होते बहुतेक. मग मी अचानक विचारलं. मला का होकार द्यावासा वाटला. मग त्याच प्रश्नाची प्रतिक्षा असल्यासारखं चटकन समोरून आलेलं उत्तर. तुला माहितीये का, सहा महिन्यांपूर्वी आम्ही तुमच्या घरी फोनवर चौकशी केली होती. पण तेव्हा जुजबी माहिती विचारून घेतल्यानंतर फारसा प्रतिसाद नव्हता मिळाला. आणि आता पुन्हा बोलणं झालं आणि चक्क लग्नच ठरून गेलं. कुंभ-पूर्वा भाद्रपदा हे कॉम्बीनेशन हवं होतं मला. आपल्या समाजाच्या मंडळात मी थोडं-फार काम करतो. वधू-वर सूचक मंडळाचं काम बघताना स्वत:साठीही मुली शोधणं सुरूच होतं. तेव्हाच तुझे तपशील पाहिले होते.
मला काहीसं आश्चर्य वाटलं. म्हटलं, बस, इतकंच. पत्रिकेतली एक रास आणि एक नक्षत्र, इतकं पुरतं पसंतीसाठी... मग समोरच्या चेहऱ्यावर थोडं आणखी हसू. पहिल्यांदा आलो होतो आम्ही तुमच्याकडे. मी आणि ताई. तेव्हाची आपली भेट. नेमकं बोलून तू आत निघून गेलीस. नो नॉन्सेन्स. माझ्यासारख्या मुलाला अशीच बायको हवी...
आणखी काही अवांतर बोलणं झालं. मग त्याला म्हटलं, काही सांगायचंय तुम्हाला. हा, बोल ना. एक मुलगा आहे. आम्हाला लग्न करायचं होतं. पण त्याच्या काही अडचणी आहेत आणि पत्रिकाही जुळत नाहीत आमच्या.
मग पुढे...
पुढे काही नाही. लग्न ठरलंय आपलं. कायम साथ द्यायची असेल तर या नात्याची सुरूवात लपवा-छपवी किंवा खोट्याच्या पायावर व्हायला नको, असं वाटलं, म्हणून सांगतेय.
मला काही करता येईल का...
मी चमकून वर पाहिलं. हे अगदीच अनपेक्षित. समोरचं माणूस आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून आवडलंय. लग्नही ठरलंय आणि तरीही मागचा पुढचा विचार न करता असं विचारता येऊ शकतं. मी अवाक झाले.
नाही. काहीच नाही करता येणार. मला माझ्या मर्यादा कळतात. त्या मी ओलांडलेल्या नाहीत. यापेक्षा जास्त तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता...
मला नाही विचारायचं काही. भूतकाळ प्रत्येकाला असतो...
मग आणखी काही वेळ शांतता. पण ती जीवघेणी नाही. समजून घेणारी, अनपेक्षितपणे समोर आलेलं स्वीकारण्यासाठी आम्हा दोघांनाही थोडा वेळ देणारी शांतता..
क्रमश:
जडण-घडण
1 , 2 , 3 , 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 , 14 , 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

22 Jul 2015 - 2:49 pm | एस

'क्रमशः' फार नेमक्या जागी टाकता तुम्ही! :-)

इंटरेस्टिंग!

नाखु's picture

22 Jul 2015 - 4:35 pm | नाखु

भूतकाळ प्रत्येकाला असतो...

सलाम

रुपी's picture

23 Jul 2015 - 12:03 am | रुपी

सर्वात आधी अभिनंदन!

स्वतःबद्दल इतकं स्पष्ट आणि तटस्थपणे लिहिता याबद्दल खरंच कौतुक वाटतं.

बहुगुणी's picture

23 Jul 2015 - 1:39 am | बहुगुणी

इतर भागांप्रमाणेच 'जसं घडलं तसं' थेट लिहिण्याची हातोटी. पुढील प्रवास कसाही झाला असू दे, पण मनातून शांतपणे स्वतःला ओळखणं ही या भागातली अ‍ॅचिव्हमेंट वाटली.

प्रभो's picture

23 Jul 2015 - 9:32 am | प्रभो

येऊ द्या पुढे!

खतरनाक लिहीलंय तुम्ही दंडवत स्वीकारा माधुरीताई! मनातली क्षणोक्षणीची घालमेल काय योग्य शब्दात मांडली आहे तुम्ही व्वाह मजा आ गया :)
एकच विनंती आहे, कृपया वेळात वेळ काढून पुढचे भाग लवकर टाका हो :)

उमा @ मिपा's picture

23 Jul 2015 - 10:49 am | उमा @ मिपा

या भागाची आतुरतेने वाट बघत होते (तुम्ही सध्या व्यस्त आहात हे ठाऊक असूनही), ही कलाटणी अजिबातच अपेक्षित नव्हती. स्वतःला इतकं ओळखणं, अतिशय संतुलित विचार, प्रामाणिकपणा खरंच कौतुकास्पद.

रातराणी's picture

23 Jul 2015 - 12:21 pm | रातराणी

सही झालाय हा भाग. अनपेक्षित वळण घेतलय. आता पुढचा भाग येईपर्यंत चैन पडणार नाही. : )

प्रियाजी's picture

23 Jul 2015 - 3:33 pm | प्रियाजी

हाही भाग अतिशय रंगला आहे. स्वतःबद्दल ईतक्या अलिप्तपणे लिहणे हे स्थिर चित्तवृत्ती दाखवते. तुमचे लेखन फारच आवडते. तुमच्या कामातून सवड काढून पुढचा भाग टाका.

पैसा's picture

23 Jul 2015 - 5:27 pm | पैसा

स्वतःच्या भावना इतक्या नेमक्या कळणे आणि ते व्यवस्थित लिहिता येणे, दोन्ही दुर्मिळ! खूप छान लिहिताय!

स्त्रियाचि घालमेल अगदि करेक्त दाखवलि आहे.

समीरसूर's picture

24 Jul 2015 - 9:11 am | समीरसूर

सुंदर! अप्रतिम लिखाण. ओघवती शैली. खरोखर उत्कंठावर्धक आहे ही मालिका. लवकर पुढचा भाग टाका.

खटपट्या's picture

24 Jul 2015 - 10:04 am | खटपट्या

जबरदस्त लीहीताय ताई तुम्ही. सर्वांनाच असं लीहायला जमतं असं नाही, निदान मला तरी..

भूतकाळ सर्वांनाच असतो. (काही लोक तर भूतकाळातील आठवणीत जगत असतात.)

माधुरी विनायक's picture

28 Jul 2015 - 3:36 pm | माधुरी विनायक

स्वॅप्स, नाद खुळा, रूपी, बहुगुणी, प्रभो, क्रेझी, उमा@मिपा, रातराणी, प्रियाजी, पैसा, palambar, समीरसूर, खटपट्या आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार. अगदी सुरूवातीच्या कुठल्यातरी भागात हे लिखाण फार कंटाळवाणं होतंय का, असं वाटून इथेच थांबवावं का, असं वाटू लागलं होतं. पण तुमच्यापैकी काहींनी पुढे लिहित राहण्याची सूचना केली. ती मान्य करून मी लिहित राहिले आणि माझी मी मला पुन्हा नव्याने सापडत गेले. खूप खूप आभार.

सचिन कुलकर्णी's picture

15 Sep 2015 - 7:31 pm | सचिन कुलकर्णी

शेवटचे काही भाग मिसले होते. ते आत्ता वाचतोय. हा भाग वाचून, तुमचं स्वत:च्याच मनाशी केलेलं compromise बघून खरंच डोळ्यात पाणी आलं.