जडण-घडण 12

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
17 Oct 2014 - 3:39 pm

पहिल्या ऑफीस जॉबचा निरोप घेतल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस छान निवांत गेले. मनाला आलेलं साचलेपण हळू हळू निथळू लागलं. सकाळी उठायचं, रोजची कामं आवरायची, आईला मदत हवी का, ते पाहायचं, मग निवांत पेपरवाचन... दुपारच्या जेवणानंतर गेल्या अनेक महिन्यात वेळोवेळी कुठे कुठे खरडून ठेवलेल्या ओळी, कल्पना चाळायच्या... असे खूपच कागद जमले होते. छान वेळ जायचा. संध्याकाळी बाबा ऑफीसमधून आल्यानंतर आई-बाबांसोबत चहा. मग ते दोघं नेहमी एक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायचे. मी कधी त्यांच्यासोबत तर कधी एकटीच भटकायचे. माझे बाबा नीटीमध्ये होते. आयआयटी सारखीच नॅशनल इंडस्ट्रीयल इंजिनियरींग इन्स्टीट्यूट. बाबा प्रशासकीय विभागात होते. नेमकं सांगायचं तर विहार लेकच्या आधीचा स्टॉप. तिथूनही साधारण एक किलोमीटर आत. खूप छान निवांत परिसर आहे हा. माझं संपूर्ण लहानपण इतक्या सुरेख ठिकाणी गेल्याचं मला मनापासून समाधान आहे, आनंद आहे. भरपूर उंच हिरवीगार झाडं, त्यांच्या गार सावल्या, मनमुराद भटकता यायचं तिथे. लहानाची मोठी तिथेच झाले, त्यामुळे प्रत्येक वळण ओळखीचं. संध्याकाळी लायब्ररीमध्ये जाऊन अगदी आठच्या आसपास त्या निर्मनुष्य वाटेवरून एकटं येतानाही भिती वाटल्याचं आठवत नाही. मी बहुतेकदा एकटीच भटकायचे. बरेच परिचित भेटायचे. अगदी अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या काका-काकूंपासून समवयस्क मित्रमंडळींपर्यंत सगळेच. त्यांच्याशी थोडंफार बोलून माझा फेरफटका पुन्हा सुरू व्हायचा. रात्रीचे आठ म्हणजे आज फार रात्र नाही वाटणार कदाचित, पण तेव्हा साडेआठ वाजता जेऊन आम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत झोपी जायचो. तेव्हा क्वचित कधी तरी ती सक्ती वाटायची. आज मात्र रात्री आठच्या आसपास घरी येऊन सगळं आवरून झोपायला रात्रीचे साडेबारा वाजतात, तेव्हा त्या दिवसांच्या आठवणी नकळत डोळ्यात पाणी आणतात...
कालाय तस्मै नम: ... असो. तर दिवस रमत-गमत निवांत चालले होते. अधून-मधून सहकाऱ्यांशी फोनवर बोलणंही व्हायचं. त्यापैकी एक-दोघांनी फ्री लान्सींगसाठी संदर्भ दिले आणि थोड्या विसाव्यानंतर सुचेल तसं मी लिहू लागले. अर्थात फ्री लान्सींगची कामं मिळत असली तरी त्यानंतरची वसुली करणं मात्र हळूहळू शिकूनच घ्यावं लागलं. आवकही फार वाईट नव्हती.
मग एक दिवस तिथल्याच एका मित्राने सहज बोलता-बोलता सांगितलं, अगं, काल आकाशवाणीवर वृत्तनिवेदकांसाठी जाहिरात ऐकली आणि चटकन तू आठवलीस. तुझा आवाज आणि वाचन, दोन्ही छान आहे. तू का प्रयत्न करत नाहीस? मी म्हटलं, अरे त्यासाठी पत्रकारीतेचं शिक्षण घेतलेलं आवश्यक असेल. तर तो म्हणाला की त्यांनी सांगितलेल्या माहितीत अशी काही अट ऐकल्याचं त्याला आठवत नव्हतं. मग त्याला म्हटलं, मी उद्या ऐकते आकाशवाणी. बघू कदाचित ती जाहिरात पुन्हा ऐकू येईल.
आमच्या घरी आकाशवाणी सकाळी सुरू असायचं पण दुपारी मी विविधभारती ऐकायचे. दुसऱ्या दिवशी आठवणीने सकाळपासून मराठी वाहिनी लावून ठेवली आणि दुपारी एक-दीडच्या सुमाराला ते निवेदन ऐकलं. कागद पेन घेऊन तयार होतेच. पत्रकारीतेची अट बंधनकारक नव्हती. पत्ता लिहून घेतला. छानपैकी अर्ज लिहिला आणि दिला पाठवून. अर्ज पाठवल्यानंतर सुरूवातीचा आठवडाभर ते लक्षात राहून गेलं होतं. आपल्याला अर्जाचं उत्तर येईल का, अशी उत्सुकताही होती. मग पंधरवड्यानंतर अर्ज पाठवल्याचं हळूहळू विस्मरणात जाऊ लागलं आणि मी पुन्हा माझ्या कामात आणि दिनक्रमात गुंतले.
साधारण महिनाभरानंतर सरकारी खाकी रंग मिरवणारा लखोटा घेऊन बाबा घरी आले. त्यांनी ते पत्र उघडलंही नव्हतं. माझ्या हातात पत्र देऊन आई-बाबा दोघंही काहीशा उत्सुकतेने बघू लागले. मी उत्साहात पत्र उघडून वाचलं, तर ते माझ्याच अर्जाचं उत्तर होतं. साधारण पंधरा दिवसानंतर रविवारी लेखी परीक्षा होती. आकाशवाणीतच. मी खुश. आई-बाबाही आनंदले.
अरे, पण त्याच दिवशी बाय ताईचा साखरपुडा... आता? ही ताई म्हणजे माझी सर्वात मोठी आतेबहीण. घरातलं पहिलं कार्य. तिचे बाबा नव्हते, त्यामुळे मोठे मामा-मामी म्हणून आई-बाबाच त्या आघाडीवर सक्रीय होते. परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी दोन. साखरपुडा संध्याकाळी होता. परीक्षा चर्चगेटला आणि साखरपुडा जोगेश्वरीला. मी थोडी खट्टूच झाले. दोन्ही मुहूर्त साधायचेच होते. पण परीक्षेला जायचं म्हणजे आम्हा भावडांच्या भल्यामोठ्या गोतावळ्यातल्या धमाल मस्तीला मुकावं लागणार होतं. बघू. तेव्हाचं तेव्हा.
पत्र पुन्हा एकदा नीट वाचलं. संभाव्य प्रश्नांचं स्वरूप दिलं होतं. त्या दिवसापासून आकाशवाणीवरच्या बातम्या लक्षपूर्वक ऐकायला सुरूवात केली. बातमीपत्रांच्या वेळा समजून घेतल्या. पेपरवाचन नियमित होतंच, पण शेअर बाजार, सोन-चांदी धातूंच्या दरासंदर्भातल्या बातम्या, उद्योगजगतातल्या बातम्या कशा लिहिलेल्या असतात, ते आवर्जून वाचू लागले. त्या मित्रालाही, अर्ज केला आणि उत्तर आलं, हे आवर्जून कळवलं.
याचदरम्यान कधीतरी राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचं वर्तमानपत्रातलं निवेदनही वाचनात आलं. नवोदित लेखक कवींना प्रोत्साहन म्हणून त्यांनी काही साहित्य मागवलं होतं. मंडळाच्या तज्ञांना ते पसंत पडल्यास, अर्थात लेखनाची निवड झाल्यास ते मंडळातर्फेच पुस्तकरूपात प्रसिद्ध केलं जाणार होतं. मी त्यापूर्वी बरीच वर्षं कवितेच्या वाटेवर चालत होते. हा प्रयत्न करून बघावा का, असं चटकन मनात आलं. पण कविता पुन्हा स्वच्छ हस्ताक्षरात नेटक्या लिहून काढायच्या म्हणजे वेळ लागणार होता. शेवटची तारीख पाहिली, तर महिनाभराचा अवकाश होता. बरं तर. आधी परीक्षेतून मोकळे होऊ.
परीक्षेच्या दिवशी सकाळी शैक्षणिक प्रमाणपत्रांची पडताळणी आणि मग परीक्षा, असा क्रम होता. लवकरच निघावं लागलं. संध्याकाळी साखरपुड्याला घालायचे कपडे आईकडे सोपवले आणि थोडीशी नाराज होऊनच मी परीक्षेला निघाले.
आकाशवाणीत पहिल्यांदा पाऊल टाकताना मात्र एकाच वेळी दडपण, आनंद, उत्सुकता असं सगळं मनात दाटून आलं होतं. धडधडत्या मनाने सभागृहात पोहोचले तर तिथे शेकडो मुलं-मुली आधीपासून उपस्थित असल्याचं दिसलं. आमच्या नंतर आणखी एका तुकडीची परीक्षा होणार, हे समजलं. प्रमाणपत्रांची पडताळणीसाठी जुळवाजुळव करताना आपल्यापेक्षा खूप हुशार आणि प्रत्यक्ष प्रसारमाध्यमात काम करणारी मंडळीही स्पर्धेत आहेत हे सुद्धा समजलं.
आपण खरंच ही परीक्षा देतोय का? पण ही सगळीच मंडळी आपल्यापेक्षा खूप वरचढ आहेत. त्यांच्या भाषेतली सफाई, आत्मविश्वास आणि अनुभव यांच्या तुलनेत आपण कुठेच नाही. काय बरं करावं? जाऊ या का असेच थेट आत्याकडे. नकोच ही परीक्षा. जमेल का आपल्याला?
बरेच उलट-सुलट विचार मनात येऊन जाईपर्यंत प्रमाणपत्र पडताळणीच्या रांगेत मी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेही होते. पडताळणी झाली, मग म्हटलं, आलोच आहोत इतक्या लांब, तर परीक्षा देऊनच जाऊ. फार तर आपल्याला जास्त काही लिहिता येणार नाही. ठीक आहे ना... परीक्षेत नेमकं काय विचारतात, हे तरी समजेल...
व्हायचं ते होवो, परीक्षा द्यायची, फार विचार करायचा नाही, स्वत:कडून फार अपेक्षा ठेवायच्या नाहीत आणि आई-बाबांनाही तशी स्पष्ट कल्पना द्यायची असं ठरवलं आणि पेपर हाती घेतला. अरे वा, यातलं बरंच येतंय. बऱ्यापैकी पेपर लिहिला पण वर्णनपर उत्तरं लिहिताना, या क्षेत्रात काम करणाऱ्यांची ही उत्तरं आपल्यापेक्षा खूप वेगळी आणि अभ्यासपूर्ण असतील, असं सारखं मनात येत राहिलं. साधारण पावणे दोन वाजता पेपर लिहून आणि लिहिलेलं वाचून संपला. प्राप्त स्थितीत करता येण्यासारखं सगळं आपण केलं आहे, याची खात्री मनाने दिली आणि परीक्षकांकडे पेपर सोपवून मी बाहेर पडले.
आपण फार छान पेपर लिहिला नाही, याची इतकी खात्री होती की निकाल कधीपर्यंत लागेल, हे विचारायलाही थांबले नाही. तडक रेल्वे गाठली आणि नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी कुटुंबियांमध्ये जाऊन पोहोचले. जेवता-जेवता पेपर कसा गेला ते आई-बाबांच्या कानावर घातलं आणि मग आवरून कार्यक्रमात मस्त रमून गेले.
क्रमश:
जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270
जडण-घडण 6
http://www.misalpav.com/node/28354
जडण-घडण 7
http://www.misalpav.com/node/28383
जडण-घडण 8
http://www.misalpav.com/node/28437
जडण-घडण 9
http://www.misalpav.com/node/28519
जडण-घडण १०
http://www.misalpav.com/node/28600
जडण-घडण ११
http://www.misalpav.com/node/28838

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

विटेकर's picture

17 Oct 2014 - 4:24 pm | विटेकर

खूप सुन्दर लिहिताहात तुम्ही !
कदाचित स्वान्त सुखाय म्हणून असेल पण गती पण फार स्लो आहे.
पु ले शु आहेच

असंका's picture

18 Oct 2014 - 10:19 am | असंका

सहमत....!

रेवती's picture

17 Oct 2014 - 5:33 pm | रेवती

छान चाललय!

एस's picture

17 Oct 2014 - 5:37 pm | एस

स्वतःलाच विचारत, स्वतःच उत्तर देत, कधी स्वतःबरोबरच आपण एखाद्या वाटेवर मनस्वी वाटचालीला निघतो तसा हा मस्त अनुभव. भरपूर रिलेट करता येतंय.

पुभाप्र! :-)

सस्नेह's picture

17 Oct 2014 - 9:58 pm | सस्नेह

पायवाटेवर निवान्त रमतगमत चालत जावं तसं

समीरसूर's picture

17 Oct 2014 - 6:54 pm | समीरसूर

हाच लेटेस्ट भाग आहे का? मला वाटलं ११ लेटेस्ट होता...

पण हा भाग देखील सुरेख. आपली नवनवीन क्षेत्रं चोखाळण्याची उमेद आणि प्रयत्नांची चिकाटी दोहोंना सलाम! :-) अर्थात आपली गुणवत्ता वादातीत आहेच यात शंकाच नाही. :-) पुढचे भाग लवकर येऊ द्या. मस्त उत्सुकता तयार झालीये.

समीरसूर's picture

17 Oct 2014 - 6:55 pm | समीरसूर

आता पुस्तक लिहा. खूप छान होईल यात शंका नाही. शुभेच्छा!

पैसा's picture

17 Oct 2014 - 9:44 pm | पैसा

छान तब्बेतीत लिहिताय. वाचते आहे.

मुक्त विहारि's picture

18 Oct 2014 - 5:11 am | मुक्त विहारि

आवडला...

पुभाप्र... (पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत)

आजच हा भाग पहिला वाचला. आता मागचे सर्व क्रमाने वाचून येतो. शैली आवडली.

अजया's picture

18 Oct 2014 - 5:00 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र.

माधुरी विनायक's picture

1 Nov 2014 - 1:07 pm | माधुरी विनायक

विटेकर, कंफ्युज्ड अकौंटंट, रेवती, स्वॅप्स, स्नेहांकिता, समीरसूर, पैसा, मुक्त विहारी, कंजूस, अजया आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार.
एक विचारायचं होतं... पुढचा लेख टाकताना हल्ली जाणवतं की लेखाच्या लांबीपेक्षा हल्ली आधीच्या भागांच्या दुव्यांची लांबीच नजरेत भरतेय. थोडं विचित्रच दिसतंय ते. मी जडण घडण भाग १ ते ५, ६ ते १० असे दोन आणि त्यानंतरचे पुढचे पाच भाग झाल्यानंतर ते ११ ते १५ एकत्र असे भाग पुन:प्रकाशित केले तर चालेल का?किंवा काही वेगळा पर्याय सुचतोय का...

पहाटवारा's picture

4 Nov 2014 - 2:06 am | पहाटवारा

जडण-घडण 1 2 3

असे करता येइल.
-पहाटवारा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Nov 2014 - 3:47 am | निनाद मुक्काम प...

सुंदर लेखन
पहाटवारा ह्यांची सूचना चांगली आहे मी देखील लेखमालेत तसेच करतो.
अर्थात असे ओघवते लिखाण माझ्याने होत नाही हा भाग वेगळा

माधुरी विनायक's picture

10 Nov 2014 - 6:06 pm | माधुरी विनायक

पुढच्या भागात पहाटवारा यांची सूचना अंमलात आणायचा प्रयत्न करतेय. सूचनेबद्दल आभार.

एक सुचवू का - प्रत्येक भागाला शीर्षक देता आलं तर नवीन (आणि नेहेमीचा) वाचक चटकन लेखाकडे खेचला जाईल. उदा. या भागाचं शीर्षकः "आकाशवाणीचे दरवाजे ठोठावताना"

माधुरी विनायक's picture

21 Nov 2014 - 6:11 pm | माधुरी विनायक

आदूबाळ, तुमची सूचना खरंच छान आहे पण ती पहिल्या भागापासून अंमलात आणायला हवी होती का, असं वाटतंय. तंत्रज्ञानाशीही फार गट्टी नाही, त्यामुळे पहाटवारा यांची सूचना प्रत्यक्षात आणायलाही मध्ये दोन भाग जावे लागले. पण तुमची सूचना नक्की लक्षात राहिल.मनापासून धन्यवाद.