जडण- घडण : २४

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 3:28 pm

लग्नाची नियोजित तारीख जवळ येत चाललेली. त्याच्याकडून काहीच संवाद नाही. मी सुद्धा स्वत:शीच कठोरपणे वागत संपर्क नाहीच केला पुन्हा. तेच उत्तर पुन्हा ऐकणं सहन नसतं झालं.. नियोजित नवऱ्याशी बोलणं सुरू. मैत्रीचा, विश्वासाचा एकमेव संवाद. जे त्याला कळत नव्हतं, आई-बाबांपर्यंत पोहोचत नव्हतं, ते याला कसं समजून घेता येतंय, याचं आश्चर्यही वाटत नव्हतं. बाकी सगळी कवाडं घट्ट मिटून घेतल्यासारखी. स्वत:ला शांत ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते. प्रत्येक रात्र तगमग करणारी, झरत्या डोळ्यांनी उशी भिजवणारी. मुलीचं लग्न होतं, म्हणजे ती आपलं घर, आई- वडील, भावंडं, शेजार-पाजार, आपल्या ओळखीचं सगळं मागे सोडून पूर्णपणे नव्या वातावरणात जाते. ती काळजी, ताण, हूरहूर, दु:ख काहीच जाणवत नव्हतं. काय होणार, हा एकच विचार... लग्नाचा दिवसही उजाडला. आई-बाबांचे भरले डोळे, वरवर हसरे तरी मला जाणवणारे उदास चेहरे आणि मी. माझ्यापर्यंत फारसं काही पोहोचत नसल्यासारखं. आम्ही घराबाहेर पडलो, विधी सुरू झाले. बघता- बघता साखरपुडा आणि लगेच लग्न लागलंसुद्धा.
मग पाठवणीची वेळ. लहान भाऊ समोर आला आणि खाडकन वास्तव समोर आलं. उद्यापासून हा रोज नाही दिसणार. आई-बाबा पण नाही. ज्या घरावर मनापासून प्रेम आहे, ज्याचा कोपरान् कोपरा, प्रत्येक आवडती जागा माझी आहे, ते घर सुद्धा नाही. ज्या घरात, ज्या माणसांमध्ये मी लहानाची मोठी झाले, ते सगळं पुन्हा कधीही तितकं माझं असणार नाही. हादरून गेले मी. आमच्या घरात स्पर्शाने बोलण्याची पद्धत नाही फारशी. आई-बाबा, भावंडाशी सुद्धा एका विशिष्ट वयानंतर स्पर्शाची जवळीक नाही, मनाचे धागे मात्र घट्ट होत गेलेले. आणि आता ते सगळं समोर दिसू लागल्यावर लहान भावाच्या कुशीत शिरून खूप-खूप रडू फुटलेलं.आत्ता-आत्ता पर्यंत माझ्या खांद्याला लागणारा हा लहान भाऊ... आज मी याच्या खांद्याला लागतेय... हा मला धीर देतोय, समजावतोय, मी आहे, असा दिलासा देतोय... गेले कित्येक दिवस एकांतात मूकपणे डोळ्यातून वाहणारं पाणी आता विद्रोह करत होतं. वाईट रडले मी. खूप खूप रडून घेतलं. आई- बाबांची काळजी घे, असं सांगितलं त्याला पुन्हा-पुन्हा. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आणि हा लहान भाऊही शिक्षण, नोकरीनिमित्त दिवसातला बराच काळ घराबाहेर. दोन्ही भावंडांच्या तुलनेत मी जास्त काळ घरात. आणि आता मी तिथे नसल्यामुळे आई-बाबांना घर अगदी अंगावर येणार होतं. त्यात आणखी माझ्या मनस्थितीचा विचार करून आई-बाबा दोघांना काळजी वाटत राहणार. केवढं काय-काय जाणवून गेलं तेवढ्या वेळात. नवऱ्याचा कसनुसा होणारा चेहरा बघितला. प्रयासाने शांत झाले.
फार काही लक्षात येण्यापूर्वी आम्ही नणंदेच्या घरी पोहोचलो. इथे का..? नणंदेची इच्छा होती म्हणे, लग्नानंतरची आमची पुजा त्यांच्याकडे व्हावी म्हणून. त्यांच्या यजमानांना कार्यालयाकडून मुंबईच्या मध्यवर्ती भागात बंगलेवजा घर राहायला मिळालं होतं. मग देवदर्शन, पुजा. सासू-सासरे आणि आम्ही दोघं, असं चौकोनी कुटुंब एकत्र राहणार होतं. पुजा आटपून जेवणांना उशीर झालेला आणि तरीही वयाने थकलेले सासरे आमच्यासोबत जेवण्यासाठी थांबलेले. सासरे थांबलेत? जेवण्यासाठी...? ते खूप संतापी आहेत. त्यांची जेवणाची वेळ ठरलेली आहे. ते ती बदलत नाहीत. त्यांना भूक सहन होत नाहीत. औषधांची वेळ उलटून चाललेली, असं बरंच काही आजूबाजूच्या नातेवाईकांकडून कानावर आलेलं. तोवर सासू-सासऱ्यांशी जेमतेम पाया पडण्यापुरती तोंडओळख. त्यांचं वेळेत जेवून न घेणं पटलं नाही.
त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं, बाबा, जेऊन घ्या तुम्ही. भूक लागली असेल ना आणि औषधंही घ्यायचीत.
नाही देवा... भूक ना... ठीक आहे, आपण सोबत बसू..
चेहऱ्यावर आपुलकी आणि मोठ्ठसं हसू.
अरे.. हे संतापी आहेत ना... ऐकण्यात काही गफलत झाली का? कारण आत्ताचं बोलणं तेवढ्यापुरतं, वरवरचं किंवा खोटं नाही वाटत.
बाबा... बरं.. आपण जेवून घेऊ.. . मग आम्ही सगळेच बसलो जेवायला.
त्यांचं बोलणंही वरवरचं नव्हतं आणि नातेवाईकांचंही खरं होतं. बाबा आमच्या नातेवाईकांमध्ये शिघ्रकोपी आणि संतापी, शिस्तीचे भोक्ते म्हणून प्रसिद्ध होते. पण माझं-त्यांचं नेहमीच उत्तम जमलं. त्यांनी मला एकदाही नावाने हाक मारली नाही. देवा म्हणून हाक मारायचे मला. खूपदा सांगूनही यात बदल नाहीच झाला.
तीन-चार दिवसांनंतर संध्याकाळी आम्ही आमच्या घरी जायला निघालो. हे सुद्धा शहराच्या मध्यवर्ती भागातच. घरी पोहोचलो. एका शेजारणीने ओवाळून स्वागत केलं. तर, हे आमचं घर. अगदीच आटोपशीर. माहेरच्या घरातल्या कुठल्याही एका खोलीपेक्षा हे घर छोटं होतं. अर्थात, सेल्फ कंटेंड. वर पोटमाळा होता. वाईट वाटलं का घर बघून. नाहीच. कोणतीही परिस्थिती स्वीकारायला तयार असणारी ती मीच होते ना. सोबत बदलली होती. फक्त या वेळी विश्वास होता. बरंच काही आपसूक स्वीकारलं गेलं. थोडं कोणाच्यातरी रागाने, थोडं आश्वासक प्रेमाने.
लग्नानंतर आठवडाभरात आम्ही दोघं आपापल्या कामावर रूजू. अचानक ठरलेल्या लग्नामुळे फारशी सुट्टी मिळाली नव्हती. मग समोरून त्याचा फोन. थंड स्वरात माझा प्रतिसाद.
झालं का लग्न. अरे वा, अभिनंदन... मला नाही बोलावलंस लग्नाला...
खूप दुखावलेला आवाज आणि मग बरसलेच मी. आता माझ्याशी या पद्धतीने बोलायची हिंमत करू नका. मला काय हवंय याचा विचार ना तुम्ही केला, ना माझ्या आई-बाबांनी. मग तुम्हा सगळ्यांच्या मनासारखं मला वागावं लागलं. हे असंच व्हायला हवं असेल ना तुम्हाला. झालं ना मनासारखं.. मग नका बोलू आता माझ्याशी. कधीच नको.
सगळा राग उफाळून वर आलेला. खूप बोलले. पुन्हा कधीही बोलायचं नाही माझ्याशी... जवळजवळ धमकावूनच फोन ठेवला. यावेळी रडू थांबवता आलं नव्हतं.. विखरून गेल्यासारखं वाटत होतं.
मग घरी गेल्यानंतर नवऱ्याने नजरेत टिपलंच काही. कशीबशी जेवणं आटपून पोटमाळ्यावर गेलो आम्ही. काय झालंय, नवऱ्याचा प्रश्न. त्याचा फोन आला होता... इतकंच म्हणू शकले मी आणि नवऱ्याच्या कुशीत शिरले. त्याने काहीच विचारलं नाही. समजावलंही नाही. कुशीत घेऊन मला रडू दिलं. शांत होऊ दिलं.
आपण खरे कसे आहोत, काय आहोत, हे ज्याला सांगावं लागू नये, किमान लपवावं लागू नये, असं एक तरी माणूस असावं आयुष्यात. जगणं सोपं होत नसेल त्यामुळे, पण सुसह्य नक्कीच होतं. मला हवा होता तसा बेस्ट फ्रेंड सापडत गेला...
बरंच काही घडलं नंतरच्या काळात. पुन्हा आलेले त्याचे फोनकॉल्स. मला पुन्हा फोन करू नका, असं वारंवार सांगत होते खरी, पण त्याच्या मनस्थितीची कल्पना होतीच मला. शेवटी सांगितलं, आता लग्न करा तुम्ही. लवकरात लवकर. हास्यास्पद वाटतंय का... पण सोबत कोणी असणं, ही त्याची गरज होती. आमच्यातला संवाद संपल्यामुळे त्याची होणारी तगमग मला कळत होती. म्हणूनच लग्न करायचा आग्रह... मग हळूहळू थांबलाच संवाद...
संसाराच्या आघाडीवर गेले आणि त्यात कधी गुंतून गेले, समजलंही नाही. मी नव्या घरी गेले आणि वयाने थकलेल्या सासुबाईंनी सगळ्याच जबाबदाऱ्या सोपवून दिल्या. नव्या नवरीचा नवखेपणा अनुभवताच आला नाही. इतर भावंडं आणि नवऱ्याच्या वयात बारा-तेरा वर्षांचं अंतर. त्यामुळे आमच्या लग्नापूर्वी अनेक भाचे आणि पुतण्यांचीही लग्न झालेली. मला घरात वावरताना पाहून, आमच्या लग्नाला न आलेले कोणी परिचित सासूबाईंना विचारायचे, नात आलीय का... मग त्या हसून सांगायच्या, नात नाही, सूनबाई. लग्नापूर्वी घरच्यांचे समारंभ वगळता इतर ठिकाणी जाणं टाळायचेच मी. इथे मात्र ते शक्यच नव्हतं. बहुतेक भाचे-भाच्या, पुतण्या माझ्याच वयाच्या मागचे-पुढचे. गोतावळा खूपच मोठा आणि नवरा सख्ख्या-चुलत भावंडांमध्ये सर्वात धाकटा. वयातल्या जेमतेम अंतरामुळे त्याचं सर्व भाचे-पुतणे मंडळीशी सख्य. आणि मग माझंही. ध्यानी-मनी नसताना अचानक झालेलं हे लग्न, सासरची जबाबदारी आणि नातेवाईकांचा गोतावळा. फारच वेग आला जगण्याला. त्यात आणखी घराचं काम रखडलेलं आणि त्यामुळे आई-बाबांना लागून राहिलेली रूखरूख. अपुऱ्या जागेत मला किती तडजोडी कराव्या लागत असतील, या विचाराने होणारी घालमेल.
लग्नापूर्वीचं निवांत, रमत-गमत, कोणतीही जबाबदारी नसणारं जगणं हरवूनच गेलं. लग्न ठरवताना घर बघण्यासाठी दोन्ही काका येऊन गेलेले. आई-बाबांनी घर पाहिलं ते लग्नानंतरच. आणि मग त्यांना बसलेला धक्का. जेमतेम महिनाभर तिथे राहावं लागेल, ही चुकीची ठरलेली समजूत. मग मला पहिल्या बाळाची लागलेली चाहूल. त्या सगळ्यामुळे मला त्रास होत असेल, या विचाराने अस्वस्थ होणारे आई-बाबा. त्यांना तसं बघताना कसलातरी विकृत आसूरी आनद होत होता का मला... असं वाटणं चुकीचं आहे, हे उमजूनही... हा निर्णय तुमचा. मी तो स्वीकारला आणि निभावूनही नेणार आहे. आता नवऱ्याकडे तक्रार करू नका, असं निक्षून सांगितलं मी आणि ठाम राहिले नवऱ्याच्या सोबत.. मग बरंच काही घडत गेलं. पहिल्या लेकीचा जन्म, मंदीच्या तडाख्यात सापडलेलं नवऱ्याचं करीयर, त्याचं सैरभैर होणं, खूप समजून घेणाऱ्या सासऱ्यांचं निधन, मग अनपेक्षितपणे कौटुंबिक वादातून घराच्या मालकीवरून झालेले वाद, त्यावरून स्वत:च्याच घरच्या मंडळींच्या वागण्याने पराकोटीचा दुखावलेला नवरा, एका परिचित स्नेह्याने दिलेल्या मैत्रिपूर्ण सल्ल्यावरून फक्त आशीर्वाद असू द्या, असं सांगत आमचं घरावरचा हक्क सोडणं, संकटांची मोठ्ठी लाट येऊन गेल्यानंतर पुन्हा हळूहळू बसणारी संसाराची घडी... या सर्व प्रवासात नवऱ्याबरोबरचं नातं आणखी घट्ट, प्रगल्भ होत गेलेलं.
घराबाबत कधीच न बाळगलेली अनिश्चितता आता वाट्याला आलेली. त्यात सोबत लहान बाळ, निश्चित कमाईचा मार्ग नाही, भाड्याची घरं बदलणं, सगळीच तारांबळ. स्वभाव मानी, त्यामुळे कोणासमोर हात पसरायचा नाही. हे दिवस सुद्धा जातील, असा दिलासा एकमेकांना देत राहिलो, मनाने एकमेकांना अधिक उमजत गेलो. मग हळूहळू ते ही दिवस सरले. स्वत:च्या घराची आस होती. आस म्हणण्यापेक्षा डोक्यावर हक्काचं छप्पर नाही, हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. माझ्या मुलीच्या डोक्यावर हक्काचं छप्पर हवंच. लहान का असेना. खूप घरं बघीतली. आम्हा दोघांचाही गमतीदार अनुभव. लग्नासाठी मी पाहिलेली मुलं, नवऱ्याने पाहिलेल्या मुली आणि लग्नानंतर आम्ही दोघांनी पाहिलेली घरं, यांची संख्या मोजण्याच्या पलीकडली... पदरी नवा पैसा शिल्लक नसताना एक घर आवडलेलं. बँकेच्या बरोबरीने आई- बाबा आणि भाऊ आर्थिक मदतीला उभे राहिले आणि स्वत:च्या घरातही स्थिरावलो. हळूहळू सगळीच देणी फेडत आणलेली.
आणि मग एके दिवशी ऑफीसमध्ये असताना अनोळखी नंबरवरून आलेला फोन...
हॅलो...
काय आवाज आहे गं तुझा...
पलीकडे तो आणि मी स्तब्ध...
क्रमश:
जडण-घडण
1 , 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 16 , 17 , 18 , 19 , 20 , 21 , 22 , 23

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

28 Jul 2015 - 6:05 pm | प्रसाद१९७१

वा वा. मस्तच. पुढचा भाग लगेच येऊ द्या

प्रचंड घालमेल. आणि स्वतःबद्दल इतकं मोकळेपणानं बोलणं विस्मयचकीत करणारं आहे.

रातराणी's picture

29 Jul 2015 - 12:45 pm | रातराणी

अतिशय प्रामाणिकपणे मनाची अवस्था मांडलीये. तुमच्याबरोबर तुमच्या
जोडीदाराचे खूप कौतुक वाटले.

नाखु's picture

29 Jul 2015 - 12:58 pm | नाखु

सर्वात वेगवान भाग.
पण तटस्थता (त्र्ययस्थपणे) लिहिण्याला कुर्नीसात.
संसार हा सहचर्याने फुलण्यातच खरी मजा आहे. तो प्रेमविवाह आहे का अअ‍ॅरेंज हा मुद्दा फरक करीत नाही हे माझे व.म. आहे.

पुलेशु नाखु

खटपट्या's picture

29 Jul 2015 - 1:49 pm | खटपट्या

खूप छान !!
पु.भा.प्र.

आयुष्याच्या याच कालखंडात अशा घटना वेगाने घडुन संसार हळूहळू सेटल होतो बहुतेक.प्रांजळपणे लिहिलेला हा भाग खूप आवडला.

स्पंदना's picture

31 Jul 2015 - 6:25 am | स्पंदना

सगळच पटत गेलं लिहीलेलं.
छान वाटल वाचताना शेवटी.

माधुरी विनायक's picture

1 Aug 2015 - 12:47 pm | माधुरी विनायक

"घडलं, ते असं" या तटस्थतेने लिहिता येण्याचं श्रेय माझ्याइतकंच तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांचंही आहेच. प्रसाद१९७१, स्वॅप्स, रातराणी, नाद खुळा, खटपट्या, अजया, स्पंदना आणि सर्व वाचक-प्रतिसातकांचे आभार.