जडण-घडण...7

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
24 Jul 2014 - 2:58 pm

जडण-घडण...7
शाळेत मी छान रमून गेले होते. डी. एड्.च्या मैत्रिणीही संपर्कात होत्या. अनुभवांची देवाण - घेवाण सुरू होती. अशात एके दिवशी त्यापैकीच एका मैत्रिणीचा फोन आला. तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं, पण फार धक्का नाही बसला. म्हटलं तर फार वेगळी गोष्ट नाही. ती दोन भावांची एकुलती लाडकी बहीण. ९६ कुळी. आणि जातीबाहेरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली. घरून प्रचंड विरोध, मात्र मावशीची साथ, कारण मुलगा खरंच चांगला होता. अगदी दोघांची कुटुंबं एकमेकांना उत्तम ओळखणारी. पण मुलगा आपल्यातला नाही, या एका कारणावरून तिच्या घरच्यांचा विरोध. त्यावरून रोज वाद. शेवटी घरातल्यांच्या नकळत बाईंनी घर सोडलं आणि मावशीकडे पोहोचलेली. मुलाकडच्यांनी परिस्थिती लक्षात घेत लागलीच लग्नाची तारीख ठरवली, दोन दिवसातली. पण मावशी सोबत असली तरी आई-वडील, भाऊ यांची साथ नाही, म्हणून ती अस्वस्थ होती. खूप -खूप रडली.
आता यात एक आणखी वेगळी गंमत होती, बरं का.
काय होतं की डी.एड्.च्या दोन वर्षात आम्ही सगळ्याच एकमेकींना छान ओळखून होतो. प्रेमात पडणं, या गोष्टीपासून मी तशी दूरच होते. बाकी सगळ्या आघाड्यांमध्ये आघाडीवर असले तरी. मला वाटायचं, प्रेमाबिमात पडायच्या भानगडी नकोच आपल्याला. उगीचच आपल्याला त्रास, घरच्यांना त्रास आणि हो, समोर जो कुणी मुलगा असेल त्याला आणि त्याच्या घरच्यांनाही मनस्ताप. कदाचित तेव्हा दूरदर्शनवर पाहिलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांचा परिणाम असेल. एकंदर काय, तर प्रेमात पडणं आणि त्यामुळे इतरांना होणारे त्रास, याचा विचारही मला सहन होत नसे. नको तितकी हळवी होते मी याबाबतीत. त्यामुळे मित्र-मैत्रिणी भरपूर असले तरी याबाबतीत माझ्याभोवतीचा परीघ शक्यतो कुणी ओलांडू नये, याची पुरेपूर काळजी मी घेत असे.
शाळेतल्या वेड्या नकळत्या वयात नवव्या इयत्तेत असताना वर्गातल्या एका मुलाला मी आवडत असल्याचं मला समजलं. पण मी तर थेट त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हते. माझ्या एका मैत्रिणीने मध्यस्थी करत, तो कसा चांगला मुलगा आहे, वगैरे ऐकवलं होतं. त्यावर मी तिला, आपलं सध्या अभ्यास करायचं वय आहे. पुढे जेव्हा जे व्हायचं तेव्हा होईल. आत्ता मला या सगळ्यात गुंतायचं नाही, असं गंभीरपणे सांगितलं होतं.
त्यानंतरही माझ्या विचारात फार फरक नाही पडला. डी.एड्. च्या सगळ्याच मैत्रिणींना माझे या बाबतीतले विचार माहिती होते. त्यामुळे प्रेम प्रकरणांबद्दलची चर्चा शक्यतो माझ्यासमोर व्हायची नाही. अगदीच कधी विषय सुरू असला आणि मी तिथे असले तर, जाऊ दे, आपण नंतर बोलू. हिच्या बालमनावर परिणाम होईल, असं म्हणत सगळ्या हसायच्या आणि तो विषय तिथेच संपायचा. तशी एंगेज असलेल्या मैत्रिणींबद्दल मला साधारण माहिती होती. पण मी स्वत:सुद्धा त्यात फार लक्ष नाही घालायचे. बहुतेक प्रेमात पडणं हा माझ्या लेखी फार मोठा गुन्हा असावा, असं वाटत असावं त्यांना. मी सुद्धा त्यांचा हा समज बदलायच्या फंदात पडले नाही. आणि आज चक्क लग्न करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या या मैत्रिणीने मलाच फोन केला होता.
मी शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेतलं. लग्नाला मी यावं, असा आग्रह आणि घरचे सोबत नसल्याचं दु:खं, असे दोनच मुद्दे ती धरून बसली होती. तिला बोलू दिलं. मग म्हटलं, काळजी करू नकोस. मी बघते काही करता येतं का ते. तिच्याकडून घरचा फोन नंबर घेतला. भाऊ घरी कधी असतो, ते विचारून घेतलं आणि फोन ठेवला.
खरं तर मी तिच्या भावाला पाहिलं सुद्धा नव्हतं. तिच्याच तोंडून तो खूप रागीट असल्याचंही ऐकून होते. काही वेळ विचार करून मी तिच्या घरचा फोन नंबर फिरवला. आता नेमकं आठवत नाही, पण ती तुमची एकुलती बहिण आहे, तुमचा तिच्यावर खूप जीव आहे, हे मला माहिती आहे. तिचं लग्न तिने ठरवल्याप्रमाणे होईलंच, पण तुम्हाला आयुष्यभर रूखरूख लागून राहील.... असं बरंच काही बोलले. त्याने एका अक्षराने काही विचारलं नाही. माझं बोलून झाल्यावर, फोन ठेवू का, असं विचारलं. मी त्याला लग्न लागणार, त्या बँक्वेट हॉलचा पत्ता आणि वेळ सांगितली. पुन्हा एकदा विनंती केली आणि ठेवते, असं म्हणून फोन ठेवून दिला. नंतर बराच वेळ धडधडत्या मनाने शांत होत राहिले. मग आमच्या कंपूतल्या मैत्रिणींना फोनाफोनी. पण जिल्हा परिषदेची भरती सुरू असल्याने बहुतेक जणी मुंबईबाहेर होत्या. फक्त एक विवाहित मैत्रिण तिच्या नवऱ्यासह येऊ शकणार होती. मी माझ्या घरी सर्व कल्पना दिली होती. त्यामुळे मी आणि माझी ताई अशा आम्ही दोघी हॉलवर पोहोचलो.
चांगला प्रशस्त हॉल होता. ती विवाहित मैत्रिण सुद्धा पोहोचली होती. जिचं लग्न होतं, तिच्या सासरची मंडळी खूपच जपत होती तिला. आम्हाला मनापासून बरं वाटलं. नजरानजर होताच तिच्या डोळ्यात उमटलेले भाव मला अजून विसरता आलेले नाहीत.
सुरेख आणि आटोपशीर लग्नसोहळा आटोपला. आम्ही वधू-वरांना भेटून शुभेच्छा, आहेर देऊन आणि जेवून निवांत बसलो होतो. तिच्या बाजूने खरं तर तिच्या मावशीकडची मंडळी आणि आम्ही इतकेच होतो, पण त्रयस्थाला ते समजलंही नसतं इतकं सगळ्यांनीच सांभाळून घेतलं होतं.
आता आम्ही निघावं म्हणत होतो, पण तिची अस्वस्थ नजर मला हलू देत नव्हती. विवाहित मैत्रिणीसोबत तिची दोन लहान मुलं होती आणि एकत्रच निघावं असं आमचं ठरत होतं. मी मात्र उगीचच रेंगाळत होते. तितक्यात मंचावर थोडी गडबड ऐकू आली. तिचा भाऊ आला होता. एकटाच. पाणावल्या डोळ्यांनी तिने माझ्याकडे बघीतलं आणि त्याला मिठी मारून ती रडू लागली. मी सुद्धा हलकेच डोळे पुसले, बहिण आणि मैत्रिणीकडे पाहिलं आणि निश्चिंत होत आम्ही सगळेच बाहेर पडलो.
नंतर मैत्रिणीने फोन केला तेव्हा समजलं, तिच्या भावाला अगदीच राहवेनासं झालं, तो आई- वडिलांशी, दुसऱ्या भावाशी बोलला. पण त्याच्यासोबत यायला त्यांनी नकार दिला. मग बहिणीसाठी घडवलेला हार आणि बांगड्या घेऊन हे महाशय हॉलवर पोहोचले. तिच्या सासरच्या सगळ्यांनाच तो उत्तम ओळखत होता. लग्न लागताना नसला तरी आल्यानंतर मात्र बहिणीची पाठवणी करूनच तो निघून गेला.
अवांतर - तिच्या सासरचे खरंच छान आहेत बरं का. आता दोन कन्यारत्नांसह त्यांचा संसार मजेत सुरू आहे.

क्रमश:

जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270
जडण-घडण 6
http://www.misalpav.com/node/28354

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

24 Jul 2014 - 3:26 pm | मुक्त विहारि

आवडला...

Mrunalini's picture

24 Jul 2014 - 3:55 pm | Mrunalini

आवडेश. :)

भिंगरी's picture

24 Jul 2014 - 4:13 pm | भिंगरी

लेखन आवडले माधुरीताई
आणि तुमच्या जडण-घडण २ मधील पिपाणी वरून आठवले,
आम्ही लहानपणाचे उद्योग..........
आंब्याच्या आतल्या कोयीला एका बाजूने दगडावर घासून घेत असू. आतली चीर दिसू लागली
कि तिला हलकेच थोडेसे उघडून त्यात एखाद्या पानाचा तुकडा सारत असू
.दुसऱ्या बाजूच्या पोकळीतून फुंकर मारली असता छान पिपाणी वाजत असे.
(हे वाचताच पहा कशा सगळ्या मिपाकरांच्या पिपाण्या वाजतील)
हे आमचे मोठ्यापणीचे उद्योग............

रेवती's picture

24 Jul 2014 - 5:01 pm | रेवती

चांगले लेखन.

प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद देत नसले तरी लेखमाला वाचते आहे.
तुमचा प्रांजळपणा आणि साधेपणा लक्षात येण्याजोगा आहे.

मितभाषी's picture

24 Jul 2014 - 6:36 pm | मितभाषी

आसेच म्हन्तो

यशोधरा's picture

24 Jul 2014 - 6:58 pm | यशोधरा

आवडला हा भाग. नंतर तरी अढी संपली का मुलीच्या आईवडिलांची?

अनन्या वर्तक's picture

24 Jul 2014 - 7:56 pm | अनन्या वर्तक

माधुरीताई मी प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद देत नाही तरी लेखमाला वाचते आहे तुमची आणि मनापासून आवडते आहे सुद्धा. तुमच्या लेखनातील सहजता आणि साधेपणा आवडला. पुढील भागाची वाट पाहते आहे.

सचिन कुलकर्णी's picture

24 Jul 2014 - 9:01 pm | सचिन कुलकर्णी

ओघवती लिखाणशैली.

रुपी's picture

25 Jul 2014 - 1:26 am | रुपी

सातही भाग एका दमात वाचून काढले! फार सुंदर लिहिले आहे.

खटपट्या's picture

25 Jul 2014 - 5:04 am | खटपट्या

हा भाग खूप छान !!
सर्वच भाग छान आहेत.

एस's picture

25 Jul 2014 - 1:45 pm | एस

मी जडणघडणीचे सगळे भाग पुन:पुन्हा वाचत असतो. आतिवास यांच्या मर्जी ह्या शतशब्दकथेतील दुसरा परिच्छेद आजकाल मराठी संस्थळांवर नेहमीच अनुभवण्यास येतो. त्या भाऊगर्दीत, आरड्याओरड्यात, कोलाहलात असे लेख म्हणजे वार्‍याची सुखद झुळूक वाटतात.

धन्यवाद. आणि आवर्जून लिहीत रहा. पुभाप्र.

>>आवर्जून लिहीत रहा. पुभाप्र.

असेच म्हणतो.

सस्नेह's picture

25 Jul 2014 - 3:30 pm | सस्नेह

साधे प्रान्जळ अन हृदयस्पर्शी लेखन.

सखी's picture

25 Jul 2014 - 5:05 pm | सखी

लेखनातला प्रामाणिकपणा आवडला, छान लिहीलयं. नशिब तो भाऊ माथेफिरु वगैरे नव्हता तसा असता तर काय याची कल्पना करवत नाही.

माधुरी विनायक's picture

30 Jul 2014 - 12:38 pm | माधुरी विनायक

कसे आभार मानू तुम्हा साऱ्यांचे... तुमच्या प्रतिसादांमुळेच ही जडण-घडण आकाराला येतेय. मुवी, मृणालिनी, भिंगरी, रेवती, आतिवास, मितभाषी, यशोधरा, अनन्या, सचिन, रूपी, खटपट्या, स्वॅप्स, सूड, स्नेहांकिता, सखी खूप खूप आभार.
भिंगरी - आता पिपाणीचा नवा प्रयोग लेकीला नक्की करून दाखवणार. मागच्या गाव-भेटीत आम्ही चाफ्याच्या फुलांच्या वेगवेगळ्या अंगठ्या करून पाहिल्या..
यशोधरा - आई-वडील बहुधा अजून संपर्कात नाहीत, पण दोन्ही भाऊ आहेत.
स्वॅप्स - आठवणींच्या वाटेवरचं पहिलं पाऊल माझं होतं, पुढची वाट तुम्ही सर्व वाचकांनी दाखवलीत...
सखी - जातीवरून विरोध असला तरी तो भाऊ दुष्ट नाही याची मला खात्री होती.. पण तुम्ही म्हणताय तसंही घडू शकलं असतं, किंबहुना अनेकदा तसं घडतंही.. दुर्दैवाने...

मैत्र's picture

30 Jul 2014 - 2:13 pm | मैत्र

तुम्ही जे सरळ साधं ..अभिनिवेश रहित लिहिताय तेच छान वाटतंय.

काहीसं लाऊड थिंकींग म्हणावं असं. (म्हणजे प्रकट स्वगत ... लाऊड अर्थाने नव्हे)

आपल्या जवळच्या ओळखीत कोणीतरी चहा पिता पिता, जुन्या आठवणी मित्र मैत्रीणींना सांगाव्यात इतकी सहजता आहे.
नवीन धागा दिसला की लगेच उघडून वाचला जातो.

लिहीत राहा.

माधुरी विनायक's picture

31 Jul 2014 - 1:26 pm | माधुरी विनायक

धन्यवाद मैत्र.