जडण-घडण...5

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
9 Jul 2014 - 5:51 pm

गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयातली ती दोन वर्षं कमाल होती. शाळेच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर खूप काळाने मनाजोगा कंपू भेटला होता. हो, आता कंपू ची जाणीव होऊ लागली होती. घरापासून अंधेरी स्टेशनपर्यंत बस, तिथून २ नं. प्लॅटफॉर्मवरून सकाळी ८.५७ ची चर्चगेट स्लो लोकल. रेल्वेच्या नियमित प्रवासाचा पहिला अनुभव, तिथे पाच जणींचा एक कंपू. मग विद्यालयात आमचा १० जणींचा मोठ्ठा कंपू. पूर्ण वेळ अभ्यासक्रम, म्हणजे अख्खा दिवस आम्ही सगळ्या सोबत असायचो. पूर्ण वेळ साडी नेसणं अनिवार्य. सवय नसल्यामुळे सुरूवातीला काही मुली विद्यालयात जाऊन कपडे बदलून साडी नेसायच्या, मग हळू-हळू सरावल्या. मी मात्र रेल्वे प्रवासात अवांतर बोजा बाळगायचा नाही, या विचारावर ठाम असल्याने अगदी पहिल्या दिवसापासून घरूनच साडी नेसून निघायचे. त्या दोन वर्षांत साडी नेसायची सवय इतकी मुरली की आता मोजून तीन मिनीटांत निटनेटकी साडी नेसता येते आणि वेळप्रसंगी (विशेषत: गणपतीला गावी गेल्यावर तिथल्या आठवडाभराच्या वास्तव्यात) दिवसरात्र साडी नेसून सहज वावरताही येतं.
तेव्हा, अर्थात सेवासदन मधल्या त्या दोन वर्षांत एकदा उलटी साडी नेसून झाली होती. म्हणजे वर्ग सुरू झाल्यावर दुसऱ्या तासाला मैत्रिणीने, तुझी साडी आज वेगळी का दिसतेय, असं विचारलं, तेव्हा साडीचा फॉल बाहेरच्या बाजूला दिसला आणि उलटी साडी नेसल्याचा साक्षात्कार झाला.
पण ती दोन वर्षं खरंच भरभरून देणारी होती. बहुतेक शिक्षक खरंच छान होते. गणित हा विषय माझा नावडता. दहावीमध्ये भूमितीचा पेपर बरा लिहिल्यामुळे मी गणितात नापास झाले नाही, याची मला आजही खात्री आहे. अगदी आजही मला, दुसऱ्या दिवशी गणीताचा पेपर आहे आणि माझा काही अभ्यास झालेला नाही, असं स्वप्न अधी-मधी पडतं. गणिताच्या या पराकोटीच्या नावडीमुळे दहावी नंतर पुन्हा गणिताचा अभ्यास करावा लागणार नाही, या विचाराने आनंदले होते. पण त्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत गणिताशी दोन हात करायचा प्रसंग आला.
सेवासदनमध्ये गणिताचा पहिला तास. ओळखी-परिचय झाल्यानंतर जोग मॅडमनी सहज स्वरात विचारलं, आपल्या वर्गात गणित अजिबात न आवडणारं कोणी आहे का? दुसऱ्या क्षणाला माझा हात वर. माझ्या नंतर आणखी काही जणींनी हात उंचावले. पण पहिला वर आलेला अस्मादिकांचा हात मॅडमनी बरोबर हेरला होता. मला हाताने उभं राहायची खूण करत त्या म्हणाल्या, चला, आजपासून ही आपली गणीत विषयाची मॉनिटर. माझा चेहरा खर्रकन उतरला आणि मैत्रिणी खिदळू लागल्या. मी वैतागलेच. पण मॅडम ठाम होत्या. जाऊ दे. माझं गणित समजलं की त्या स्वत:च आपला निर्णय बदलतील, अशी मी स्वत:ची समजूत घातली. पण तसं झालं नाही.
आत्ताचं माहिती नाही, पण तेव्हा आम्हाला डी. एड्. ला उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी 40 गुण आवश्यक असायचे आणि 50 गुणांना विषय फर्स्ट क्लास असायचा. अर्थात एकूण टक्केवारीच्या बाबतीत 60 आणि त्यापेक्षा जास्त टक्के असणारे फर्स्ट क्लास वाले, असा नियम होता.
पहिल्या वर्षी नव्या ओळखी, नवे शिक्षक, सहाध्यायी विद्यार्थिनींच्या गटासमोर घेतलेले पाठ, प्रत्यक्ष शाळांमध्ये घेतलेले पाठ, त्यांचं मूल्यमापन, कायमची लक्षात राहिलेली वाई-महाबळेश्वर-प्रतापगड अशी तीन दिवसांची सहल, वाचनालयातून लाभलेला उत्तमोत्तम पुस्तकांचा खजिना आणि हळूहळू आपल्या कंपूबरोबरच संपूर्ण वर्ग आणि नंतर संपूर्ण विद्यालयाबद्दल वाढत गेलेली आपुलकी आणि अभिमान. अभ्यासही होता भरपूर आणि आधुनिक भारतीय शिक्षण सारखे रटाळ विषयही होते. हो. विषयाचं नाव कितीही आकर्षक वाटलं तरी फारच रटाळ होता तो विषय. गणिताबरोबर नावडीने का असो, पण त्या विषयाचाही अभ्यास करत होते.
बघता-बघता वर्ष सरलं. पहिल्या वर्षाची परीक्षा झाली. दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रमही सुरू झाला. आणि मग पहिल्या वर्षाच्या परीक्षेचा निकाल लागला. उत्सुकतेने सगळ्यांनीच आपापले निकाल हाती घेतले, पाहिले आणि मग परस्परांच्या निकालांबद्दल विचारणा सुरू झाली. मी ही निकाल पाहिला आणि चक्रावूनच गेले. मी नापास झाले होते, गणितात. तो कितीही नावडता विषय असला, तरी मी नापास होण्याइतका वाईट पेपर नक्कीच लिहिला नव्हता. आधी माझा विश्वासच बसेना. मग हळूहळू जाणीव झाली आणि धक्का बसला. माझ्या सगळ्याच मैत्रिणी जवळ होत्या. माझा चेहरा बहुतेक वाचला त्यांनी आणि निकाल पाहिला. त्या सगळ्यांनाही धक्का बसला. दहा जणींच्या आमच्या कंपूत मीच एकटी नापास झाले होते. सगळ्यांनाच मी नापास होणारच नाही, याची खात्री होती. पेपर पुनर्तपासणीला द्यायचा निर्णय त्यांनी परस्पर घेऊन टाकला. पण त्या वर्षी पेपर तपासणाऱ्यांचा काही घोळ झाला होता, त्यामुळे मला पुढच्या दोन महिन्यात पुन्हा गणिताचा पेपर द्यावाच लागणार होता.
मी खूपच निराश झाले होते. इतक्या वर्षात नापास आणि मी हे दोन्ही शब्द आजूबाजूला ठेवतानाही दहादा विचार करावा लागला असता. आणि आज.... घरी कसं सांगायचं....
खूपच अस्वस्थ होते मी. डोळे सतत पाझरत होते. अंधेरीपर्यंत मैत्रिणी सोबत होत्या. त्यांनी मला धीर देऊन नीट घरी जाण्याबाबत बजावून सांगितलं. अगदी घरापर्यंत सोबत यावं का, असंही विचारलं. मी नकार दिला आणि निघाले. घरी पोहोचताच माझा चेहरा पाहून काही तरी बिनसल्याचं आईच्या लक्षात आलं, पण तिने लगेच काही विचारलं नाही. चांगलं आठवतंय मला. मी साधारण रात्री पावणे आठ पर्यंत घरी पोहोचायचे. गॅसच्या दोन्ही शेगड्या पेटलेल्या आणि मी हात-पाय धुवून येईपर्यंत गरमागरम वाफाळतं जेवण समोर असायचं. जेवणाचे फार नखरे नव्हते माझे कधीच, पण गरमागरम जेवण असलं तर मी मनापासून भरभर जेवायचे.
नेहमीप्रमाणे गरम जेवण समोर असूनही माझी नजर शून्यात लागल्याचं आईने पाहिलं. काही झालं, तरी जेवणावर राग काढायचा नाही, अशी घरातली शिकवण होती. त्यामुळे आधीच कमी वाढून घेतलेलं जेवण मी कसंबसं संपवलं आणि माझं-माझं आवरत बसले. रात्री झोपण्यापूर्वी आई-बाबांना सांगितलं. दोघांनाही धक्का बसला. त्याहून जास्त वाईट वाटलं. आणि त्यांना माझ्यामुळे वाईट वाटतंय, हे जाणवून मी आणखी रडवेली झाले. निग्रहाने रोखून धरलेलं रडू कोसळतंय की काय, अशी स्थिती. पण सगळं ऐकून समजून घेतल्यानंतर, आता परीक्षेसाठी अभ्यासाला लाग, असं सांगत आई-बाबांनी तो विषय संपवला. मला खूप अपराधी वाटत होतं. तशाच अवस्थेत दुसऱ्या दिवशी सेवासदनमध्ये पोहोचले. पुन्हा परीक्षा देणं भाग होतं, ही वस्तुस्थिती असली तरी मला नापास होणं पचवताच येत नव्हतं. सगळ्या मैत्रिणी आणि अख्खा वर्ग मला जपत होता, हे समजत होतं. दुपारी जेवणाच्या सुट्टीत थोडंफार खाऊन मी माझ्या जागी शांत बसले होते. त्यानंतरचा तास मोकळाच होता. कशासाठी तरी वर्गाबाहेर गेलेली एक मैत्रिण वर्गात आली, टाळ्या वाजवत सगळ्यांना उद्देशून म्हणाली, मला तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायचीय. हातातली कामं थांबवा बघू अगोदर. मी सुद्धा काहीशा अनिच्छेने ऐकू लागले. तर ती म्हणाली, जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत आपला पहिला नंबर आलाय. आणि तो नंबर मिळालाय... माधुरीच्या निबंधाला. मी चकीत झाले. अरे हो, मी विसरूनच गेले होते स्पर्धेविषयी.माझ्या सगळ्या मैत्रिणींनी, अख्खा वर्गाने टाळ्यांचा कडकडाट केला. घोषणा करणारी मैत्रिण मला ओढतच वर्गासमोर घेऊन गेली आणि मला रडू कोसळलं.
मला काही बोलताही येईना. विद्यालयात पहिल्या दिवशी मला पोहोचवायला आई-बाबा आले त्यावरून चिडवणाऱ्या, नंतर प्रवासात सोबत करण्याचा शब्द देणाऱ्या आणि तो पाळणाऱ्या माझ्या मैत्रिणी, एक दिवस मी गैरहजर असताना दुसऱ्या विद्यालयातले विद्यार्थी येऊन बरंच काही सादरीकरण करून गेले, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझं काही ऐकून न घेता, तुझ्यामुळे काल आम्हाला त्यांचं कौतुक ऐकावं लागलं, का आली नाहीस काल, म्हणून फैलावर घेणाऱ्या, उलटी साडी नेसल्यानंतर आठवडाभर चिडवून बेजार करणाऱ्या, मी नापास झाल्याचं कळल्यावर मला सावरणाऱ्या आणि आता दुखावलेल्या मनस्थितीत मला मिळालेल्या या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या या मैत्रिणी.. काय नातं होतं आमचं... खूप भरून आलं होतं मला. सगळे प्रसंग डोळ्यासमोरून झरझर निघून गेले.
मला रडून शांत होऊ दिलं त्यांनी. नंतर मनापासून अभिनंदन केलं. सुंदर अक्षर असणाऱ्या एका मैत्रिणीनं माझ्या वहीतून निबंध वेगळ्या फुलस्केपवर उतरवला आणि नोटिस बोर्डवर लावला. तोवर विद्यालयातर्फे अभिनंदनाचा बोर्डही लागला होता. अगदी दुसऱ्या तुकडीतल्या मुलीही अभिनंदन करून गेल्या.
दिवसअखेरपर्यंत मी नापास होण्याच्या दु:खातून सावरत होते. आमच्याच वर्गातली एक हुशार मुलगी, स्मिता, माझ्या जवळ आली. खूप हुशार होती ती. तिनेही अभिनंदन केलं. मग म्हणाली, मला माहिती आहे, तुला गणित आवडत नाही ते. तरीही तू नापास होणार नाहीस, याची सुद्धा खात्री आहे. माझं गणित चांगलं आहे आणि मला ते आवडतं. तुझी हरकत नसेल तर मी तुझी गणिताची तयारी करून घेते. कदाचित माझ्या गणिताच्या आवडीमुळे तू मनापासून शिकू शकशील आणि मलाही पुन्हा गणिताचा आनंद घेता येईल. तीचा प्रामाणिकपणा माझ्या मनापर्यंत पोहोचला. स्मिताने खरंच माझी चांगली तयारी करून घेतली आणि गणिताच्या विषयात मी चांगल्या गुणांनी पास झाले. सुट्टीच्या दिवशी मी तिच्या घरी जायचे आणि ती माझा अभ्यास करवून घ्यायची. माझ्या घरी मी अशा प्रकारे अभ्यास करायची ही पहिलीच वेळ होती, पण आई-बाबांनी आक्षेप नाही घेतला. तिच्या घरच्यांनीही खूप सहकार्य केलं.
मजा म्हणजे डी. एड्. पूर्ण होऊन प्रत्यक्ष अध्यापनाच्या पाच वर्षांच्या काळात माझ्या हाताखाली शिकणारा एकही विद्यार्थी नापास होणार नाही किंवा कोणालाही गणिताची भिती वाटणार नाही, याची काळजी मी घेऊ शकले.
आता खूपदा लक्षात येतं... प्रत्येक बाबतीत माझे पाय ओढणाऱ्यांच्या तुलनेत आपला कोणताही निर्णय माझ्यावर न लादणारे, विचार करून निर्णय घेऊ देणारे आणि त्यासोबत येणारी जबाबदारी स्वीकारायची मानसिकता रूजवणारे, प्रत्येक निर्णयातल्या नकारात्मक बाबी ठळकपणे लक्षात आणून न देणारे माझे आई-बाबा, कुटुंबिय आणि निखळ नातं निभावणाऱ्या मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांचं पारडं नेहमीच जड राहिलं...आणि मी घडत गेले...

क्रमश:
जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

माधुरी विनायक's picture

9 Jul 2014 - 6:20 pm | माधुरी विनायक

माफ करा हं...
नकारात्मक बाबी ठळकपणे लक्षात आणून देणारे माझे आई-बाबा... तो चुकून पडलाय.

एस's picture

9 Jul 2014 - 6:34 pm | एस

हो ते समजलं. हरकत नाही. संपादकांना विनंती करून बदल करून घेऊ शकता.

एस's picture

9 Jul 2014 - 6:39 pm | एस

इतकं प्रांजळपणे लिहिलेलं वाचून खरंच छान वाटलं. तुमच्यासोबत या जडणघडणीचा चलत्चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहतोय इतकं सुरेख, प्रवाही, अभिनिवेशरहीत, साधं लिहिता आपण.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

ब़जरबट्टू's picture

10 Jul 2014 - 10:09 am | ब़जरबट्टू

आवडले विशेष.... तुमची लिहण्याची शैली आवडली.

बाबा पाटील's picture

10 Jul 2014 - 12:18 pm | बाबा पाटील

लेखनीत ताकद आहे तुमच्या.सतत लिहित जा.

सिद्धेश महाजन's picture

10 Jul 2014 - 9:50 pm | सिद्धेश महाजन

अप्रतिम.
खुप नशिब्वान आहात. अशी चान्गली माणसे आयुश्यात भेटली.

मुक्त विहारि's picture

11 Jul 2014 - 9:53 am | मुक्त विहारि

पुभाप्र

अजया's picture

12 Jul 2014 - 9:06 pm | अजया

आवडला आजचा भागही.

माधुरी विनायक's picture

30 Jul 2014 - 12:23 pm | माधुरी विनायक

थोडा उशीरा प्रतिसाद देतेय, पण तुम्हा साऱ्यांचे मनापासून आभार. हो, चांगली माणसं भेटण्याच्या बाबतीत मी सुदैवी आहे खरी आणि प्रांजळपणाबद्दल बोलायचं तर हे सारं तुमच्यापर्यंत पोहोचवताना माझा स्वत:शीही संवाद सुरूच आहे. हे सारे क्षण पुन्हा अनुभवतेय. आणि तुम्हा सर्वांचे प्रतिसाद मला या प्रवासात पुरेपूर साथ देताहेत. पुन्हा एकदा आभार...