जडण-घडण...3

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
23 Jun 2014 - 11:52 am

गावच्या भटकंतीतला प्रत्येक वर्षीचा पहिला उद्योग म्हणजे वाडीतल्या सगळ्या आंब्याच्या झाडांची पाहणी करायची, मिळतील तितक्या कैऱ्या मिळतील तिथेच खायला सुरूवात करायची आणि परतताना जमतील तितक्या कैऱ्या घरी आणायच्या. पहिले तीन-चार दिवस पडवीत आम्ही जमवलेल्या कैऱ्या टोपलीत पडून राहायच्या. दात पुरेसे (म्हणजे वैताग येण्याइतके) आंबट झाले, करकरू लागले की कैऱ्या घरी आणायचा हा क्रम थांबायचा.
आश्चर्य म्हणजे झाडाखाली पडलेल्या, क्वचित फुटलेल्या आणि न धुता खाल्लेल्या त्या कैऱ्यांमुळे कधीच खोकला झाला नाही किंवा आम्ही आजारीही पडलो नाही. आमच्या गावात कलमी आंब्यांची हौस कमी, रायवळ आंबे मात्र भरपूर.. सगळ्या आंब्यांना नावं पडली होती. बिटकीचा अर्थांत वाटोळा, छोटासा आणि पिवळा जर्द , तो घोटाचा आंबा, खूप चिकट डिक असणारा डिकळा आंबा, लालबुंद दिसणारा लाल आंबा, कितीही पिकला तरी आंबंटच लागणारा आम्टांबा... आणि गंमत म्हणजे खूप आंब्यांच्या झाडांच्या मध्ये घर असणारी ती 'आंब्याखालची आज्जी'. मस्त ना... आंब्याचा हंगाम असो-नसो, वाडीतली मोठी माणसंही त्या आजीला 'आंब्यातळली वैनी (तळली-तळची-खालची)' म्हणूनच हाक मारायची.
त्यातला एक आंबा आमचा विशेष लाडका. रोहिणीचा आंबा. नक्षत्र नाही. गावी वारूळाला रोहिणी म्हणतात. त्यात नाग राहतो, असा समज. नाग पण म्हणायचं नाही. हातानेच फणा दाखवून 'काल थंय असलो (हाताचा फणा) दिसलो माका', असं सांगितलं जायचं. तर त्या आंब्याच्या पायथ्याशी एक वारूळ होतं, म्हणून तो रोहिणीतला आंबा. अतिशय चविष्ट. आम्हां मुलांचा आवडता. माझा तर इतका आवडता की एका वर्षी माझ्या ताईने मला वाढदिवसाला रोहिणीतला आंबा भेट दिला आणि मे महिन्यात माझा वाढदिवस असल्याचा मला मनापासून आनंद झाला. (मे महिन्यात शाळेला सुट्टी असल्यामुळे शाळेतल्या सोबत्यांसह वाढदिवस साजरा करता यायचा नाही ना, म्हणून मी थोडी नाराज असायचे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून 12 जूनपर्यंत वाढदिवस असणाऱ्यांना कळेल ते दु:खं) तर, असा तो आमचा लाडका आंबा.
आंब्याच्या जोडीला फणस, बोंडू (काजुची फळं, मस्त रसरशीत लाल, पिवळ्या, गुलाबी, केशरी रंगाची) जांभळं, करवंद, हसोळी असला काय-काय रानमेवा. बोंडुच्या खाली लटकणारे ओले काजुही चांगलेच चविष्ट लागायचे, पण ते सोलुन आतला गर बाहेर काढणं महा कठीण. गावातले सवंगडी, आत्या, काका, काकी असं कोणी ना कोणी आम्हाला ते सोलुन द्यायचे. भटकताना सापडलेले सुकलेले अख्खे काजू आम्ही घरी आणायचो. ते पुरेसे जमले की आवारातला पालापाचोळा, काटक्या गोळा करून आजी त्याचा जाळ पेटवायची आणि त्यात ते अख्खे काजु भाजले जायचे. बाहेरून काळेकुट्ट झाले की ते बाहेर काढून आम्हाला विभागून द्यायची. तोवर आम्ही सगळी मुलं (वानरसेना) त्या जाळाभोवती कोंडाळं करून टिवल्या-बावल्या करत बसून राहायचो. हळू-हळू काजू भाजले जात असल्याचा खरपूस दरवळ पसरायचा आणि आमची अस्वस्थ चुळबुळ वाढायची. 'आज्जी, भाजले गे ते काजी, काढ आता आगीत्सून.' सगळेच एकमेकांची री ओढायचो. भाजलेले काजू आगीतून बाहेर काढले आणि विभागणी झाली की हाताला खोबरेल तेल लावून हातोडी, दगड, अडकित्ता असं हाताला लागेल ते घेऊन काजू फोडायला सुरूवात. एक-एक काजू फोडून, शक्यतो अख्खा गर अलगद बाहेर काढून पहिला गर आज्जीला भरवायचा, मग आईला, घरात असले तर बाबा आणि काकांना सुद्धा. आणि मग आमचे हात आणि तोंडं सुरू.
काजू खाण्याचा कार्यक्रम आटोपला की हाताला भरपूर साबण लावून त्याचा फेस काढत, तो फेस आणि पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत हात धुतले जायचे. पाण्याची आणखी वेगळीच कथा.
आम्ही गावी जायचो उन्हाळ्यात. विहिरींचं पाणी आटत आलेलं. वाडीत दोन विहिरी. आम्ही मात्र नेहमीच एकाच विहिरीवरून पाणी भरायचो. आता आठवून मजा वाटतेय, पण एक दिव्यच होतं ते. आमचं घर उंचावर आणि विहीर होती खाली. ती सगळी वाट दगड-धोंड्यांची. रिकामी भांडी घेऊन उतरायचं आणि भरली भांडी घेऊन चढण चढायची, असलं सगळं ते. पण भेद-भाव नसायचा. आम्हां बहिणींच्या बरोबरीने भाऊसुद्धा पाणी भरायला असायचे. आम्ही बहिणी दोघींच्या जोडीने चालायचो. दोघींच्या मध्ये एक हंडा आणि बाहेरच्या बाजुला कडेवर प्रत्येकी एक. दोघी मिळून एका खेपेला तीन हंडे. लहान बहीण असली तर एकच छोटी कळशी. समोरून गाई-गुरं आली की मात्र पंचाईत व्हायची. मारका म्हणून कुप्रसिद्ध असणारा बैल येताना दिसला की धांदल. मग दोन मुली आणि तीन हंडे अशी ती छोटीशी वरात त्या बैलाच्या नजरेत येणार नाही अशा प्रकारे लपायची आणि तो बैल खाली गेला की भरभर घरी यायची. या सगळ्यात कितीदा ठेचकाळलं, खरचटलं, लागलं तरी त्याकडे सहज दुर्लक्ष करता यायचं...

जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093

जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

अनिता ठाकूर's picture

23 Jun 2014 - 12:19 pm | अनिता ठाकूर

अरे! मी पहिली? छान! आम्हाला गावच नसल्याने, अशी वर्णने फक्त वाचणे! *sad*

आंबा, कैरी, जांभळे अन करवंदे यांच्यासारखेच चविष्ट वर्णन.

मुक्त विहारि's picture

23 Jun 2014 - 3:02 pm | मुक्त विहारि

डोळ्यासमोर परत एकदा बालपण उभे राहिले, वाचता वाचता अचानक लेख धूसर झाला.

माधुरी विनायक's picture

25 Jun 2014 - 5:12 pm | माधुरी विनायक

प्रतिसादांबद्दल मनापासून आभार. पुढे लिहावं की नाही या विचारात होते. प्रतिसाद वाचल्यानंतर लिहावं असं वाटू लागलंय. धन्यवाद...

पुढे लिहावं की नाही या विचारात होते.
नक्कीच लिहा, मिपाकर वाचत असतात, जमेल तेव्हा प्रतिसाद देतातच, प्रत्येक वेळेस शक्य होतेच असं नाही.

एस's picture

25 Jun 2014 - 7:46 pm | एस

मिळालेल्या प्रतिसादांच्या संख्येवरून स्वतःच्या लेखांची लोकप्रियता किंवा लेखांचा दर्जा इथे जोखू नये, ती काही खरी कसोटी नाही. शतक काय कुठलेही धागे करतात आणि त्यात भिक्कार धागेच जास्त पुढे असतात. ;-) (अशा धाग्यांच्या कर्त्यांनी कृपया ह. घ्या!) लोक आवर्जून चांगल्या लेखांची वाट बघतात-वाचतात. फक्त लेखमालेसारख्या लेखनाला दर वेळी प्रतिसाद देतीलच असे नाही. त्यामुळे लेखन थांबवू नका!

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 8:49 pm | प्यारे१

+१११

लेखन थांबवू नका!

माधुरी विनायक's picture

26 Jun 2014 - 4:39 pm | माधुरी विनायक

लोकप्रियतेसाठी नाही, फार बोर करतेय का वाचणाऱ्यांना, फारच व्यक्तिगत होतंय का लिखाण, असं वाटत होतं. आता पुढचा भाग टाकते. धन्यवाद.

यशोधरा's picture

26 Jun 2014 - 9:16 pm | यशोधरा

आजोळ - पणजोळची आठवण आली.