जडण-घडण १८

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
19 Jan 2015 - 5:57 pm

दारावरची बेल वाजली आणि मी विचारांच्या, आठवणींच्या तंद्रीमधून बाहेर आले, वास्तवात आले. फेरफटका मारायला गेलेले आई-बाबा घरी परतले होते. मी पुन्हा माझ्या कामात गढून गेले. आता सध्या आकाशवाणी आणि शुभेच्छापत्रांसाठी फ्री लान्सींग असं काम सुरू होतं. माझीही भटकंती, अवांतर वाचन आणि अर्थात वर्तमानपत्र वाचन नियमीत सुरू होतं. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची जाहिरात वाचली. खरं तर अध्यापन पेशा सोडून साधारण तीन वर्षं उलटून गेली होती, तरीही प्रयत्न करून बघावा का, असं मनात आलं. मग म्हटलं, करूयाच प्रयत्न.
घरी फारशी कल्पना न देताच शाळेत पोहोचले. शाळा मालाडमध्ये. चर्चशी जोडलेली. आधी लेसन झाला. चर्चचे फादर हेच शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी लेसन पाहिला. मग मुलाखत झाली. पहिल्या इयत्तेच्या वर्गावर मी लेसन घेतला होता. फादरनी तो आवडल्याचं सांगितलं आणि कामाच्या स्वरूपाची कल्पना दिली. माझी नेमणूक एका वर्षासाठी असणार होती. पहिल्या इयत्तेची क्लास टीचरशीप आणि तिसऱ्या- चौथ्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांची पाचव्या इयत्तेपासून सुरू होणाऱ्या मराठी आणि हिंदी या विषयांची पूर्वतयारी करून घेणं, ही मुख्य जबाबदारी. या शाळेचा माध्यमिकचा निकाल तसा चांगला असला तरी मराठी आणि हिंदी विषयांमध्ये मुलं मागे पडत होती. त्यामुळे ही उणीव दूर करण्यासाठी माझी विशेष नेमणूक. शाळेत इंग्रजी हीच संवादाची भाषा. वेतन दरमहा साडेचार हजार रूपये. शनिवार, रविवार सुट्टी. सर्व धार्मिक सणांच्याही सुट्ट्या होत्याच. मुख्य म्हणजे सुट्टीच्या दिवशी मी आकाशवाणीत काम करायला त्यांची मुळीच हरकत नव्हती. हे माझं आवडतं काम होतं, नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना आनंदाने होकार दिला. पण त्याच वेळी एक विनंती केली. शाळेत संवादाची भाषा इंग्रजी, असा नियम होता. मी फादरना म्हटलं, मला अस्खलीत, खरं तर चुका नसलेलं इंग्रजी बोलायचा सराव व्हायला थोडा वेळ लागेल. त्यावर फादर उत्तरले, जस्ट बी कॉन्फीडन्ट. योर इंग्लिश इज फार मोर बेटर देन माय अदर टिचर्स... मी माझ्या परीने चांगलं काम करायचा शब्द देऊन घरी परतले.
एव्हाना घरच्यांना वेगवेळ्या क्षेत्रातल्या माझ्या भटकंतीची काहीशी सवय झाली होतीच. तरीही पुन्हा शिक्षकी पेशा म्हटल्यावर घरची मंडळी सुखावलीच. मी नेमाने शाळेत जाऊ लागले. बहुतेक सहशिक्षिका दाक्षिणात्य होत्या. त्यांच्यात मी अगदीच मिसळून नाही गेले, पण पूर्णपणे वेगळीही पडले नाही. आवडतं काम करायला मिळाल्यामुळे मी खुश होते. मग एके दिवशी मी इयत्ता चौथीच्या वर्गावर असताना फादरकडून बोलावणं आलं. मधल्या सुट्टीत मी त्यांना भेटायला गेले. त्यांनी त्रासिक चेहऱ्याने माझं स्वागत केलं आणि चौथीच्या वर्गातून आवाज का येत होता, असं विचारलं. त्या मुलांना मी मराठी भाषेत एक गोष्ट सांगितली होती आणि थोडा वेगळा उपक्रम म्हणून मुलांनाच त्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारायला सांगितले होते. त्या उत्साहात मुलांचा आवाज अंमळ वाढला होता. त्यावर फादर म्हणाले, उपक्रम चांगला आहे, पण तुम्ही शिकवत असताना मुलांचा इतका गोंगाट नाही चालणार. दे आर नॉट सपोज टू टॉक सो मच वित यु. इन फॅक्ट, दे शुड नॉट टॉक टू यु. दे शुड लिसन. दे नीड नॉट चॅट वित यु... मी काहीशी चक्रावले. नवीन भाषा शिकताना संवाद हे खूप प्रभावी माध्यम ठरतं. पण फादरना मी मुलांशी बोलावं किंवा त्यांना बोलू द्यावं, हेच पटत नव्हतं. खरं तर त्या कट्टर कॉन्व्हेट वातावरणात मुलांनी इंग्रजीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत बोलावं, हेच त्यांना मान्य होत नव्हतं, त्याचमुळे ते अस्वस्थ झाले होते, असं माझ्या लक्षात आलं. इथे वाद घालण्यात अर्थच नव्हता.
यापुढे मुलांचा आवाज शक्यतो वर्गाबाहेर येऊ नये, याची काळजी घेते, असं फादरना सांगितलं आणि मी निघाले. पण त्यात फारसा अर्थ नव्हता. काटेकोर शिस्तीतून थोडासा मोकळा श्वास घेता यायचा मुलांना. इंग्रजीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषांमधली मजा कळू लागली होती. त्यामुळे त्या तिसरी-चौथीच्या मुलांना मराठी आणि हिंदीच्या तासाला हळू आवाजात बोलायला भाग पाडणं, हे एक दिव्यच होतं. परिणाम... दर तासाच्या सुरूवातीला मुलांना शांत राहण्याचं आवाहन, त्यासाठी नव्या गोष्टीची/ गाण्याची लालूच, शांत राहणारी मुलं आणि मग शिकण्यात रमून गेल्यावर उत्साहात नकळत कोणाचा तरी उत्साही सूर लागायचा आणि मग सगळेच सुरू व्हायचे. एकदा मात्र अशा वातावरणात फादर स्वत:च वर्गावर आले आणि मुलांवर बरसले. त्यांना शिक्षाही दिली आणि जाता-जाता माझ्याकडे चिडून बघत मधल्या सुट्टीत पुन्हा येऊन भेटायची सूचना केली. सगळा वर्ग चिडीचूप. मुलांना विश्वासात घेऊन सांगितलं की तुमचा उत्साह कळतोय मला, तुम्हाला हे शिकायला आवडतंय, हे सुद्धा समजतंय. पण शाळेची एक शिस्त आहे आणि आपण ती पाळलीच पाहिजे. तसं होणार नसेल तर मला हे माझं आवडतं काम अर्धवट सोडून जावं लागेल. सगळा वर्ग चिडीचूप. मग त्यातली एक विद्यार्थीनी उठली. सॉरी टिचर म्हणाली. सगळ्यांतर्फे सॉरी, आमच्यामुळे तुम्हालाही फादर रागावले. आम्ही यापुढे दंगा करणार नाही, पण तुम्हीच शिकवा... तिच्यापाठोपाठ हात वर करून सात-आठ मुलांनी बोलायची परवानगी मागितली. सूर एकच, आम्ही चुकलो. पुन्हा असं नाही होणार... मुलं रडवेली झाल्याचं पाहून खरंच वाईट वाटलं. इयत्ता चौथी हा प्राथमिकमधला सर्वात वरचा किंवा मोठ्या मुलांचा वर्ग. पण म्हणून ती मुलं इतकी मोठी होती का? शाळेत अभ्यास, त्यानंतर प्रत्येक मुलाचे ट्यूशन क्लास, दोन्हीकडे भरमसाठ अभ्यास. अगदी पहिल्या इयत्तेपासून किंवा थेट के.जी. पासून हे चक्र सुरू. मुलांपेक्षा पालकांमध्ये एका-एका गुणासाठी चढाओढ. पहिल्या इयत्तेतल्या मुलांच्या पालकांना अर्ध्या गुणासाठी भांडताना आणि आपल्या मुलाची चूक समजल्यावर त्यांचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान करताना कित्येकदा पाहिलंय मी...
आपण सगळेच काळजी घेऊ, फादरबरोबर बोलते मी, असं सांगून निघाले. फादरसोबत आधीच्याच प्रसंगाची आणि संवादाची पुनरावृत्ती. यापुढे तक्रार येणार नाही, याची दक्षता घेते, असं पुन्हा एकदा म्हटलं आणि वर्गात परतले. खरं तर मनातून अस्वस्थ झाले होते मी. मला शिकवायला आवडत होतं, मुलं आवडीने शिकत होती. ज्या कामासाठी माझी नेमणूक झाली होती, ते व्यवस्थित सुरू होतं. पण माझं मुलांशी किंवा मुलांनी माझ्याशी बोलणं अगदी माझ्या सह-शिक्षिकांनाही पसंत नव्हतं. त्यांच्याशी बोलताना अनेकदा त्यांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली होती. बघ हो, फादरना हे पसंत पडणार नाही, असंही सांगितलं होतं. आपण ठरलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा. मुलांशी काय बोलायचं? आपण शिकवू तेवढं मुलांनी ऐकायचं, वेगळं काय बोलायचं असतं? आणि तसंही, ही मुलं ट्यूशनला जातात ना. इथे नाही कळलं तर तिथे विचारतील. आपण फार आटापिटा कशाला करायचा, असा माझ्या सहशिक्षिकांचा बाणा होता. मी मुलांना डोक्यावर चढवलंय, फालतू लाड करतेय, असा आणखी एक समज. त्यामुळे त्याही नाराज होत्याच.
अशात शिक्षकदिन उगवला. मी वर्गात शिरले, हजेरी घेतली आणि हळूहळू त्या माझ्या पहिल्या इयत्तेच्या छोटुल्या मुलांच्या डोळ्यांमध्ये गमतीदार भाव आणि ओठांवर साधारण सारखेच शब्द... टिचर, आय हॅव अ सरप्राईज फॉर यू... त्या सगळ्यांनाच मला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, प्रत्येकाला माझ्याशी हात मिळवायचा होता. मलाही गंमत वाटली. म्हटलं ठीक आहे. मीच प्रत्येकाच्या जागेवर येते. पहिल्या विद्यार्थ्यापासून सुरूवात केली आणि थबकलेच मी. जवळ-जवळ प्रत्येक मुलाच्या हातात रंगीत कागदात गुंडाळलेली भेटवस्तू. अगदीच तुरळक मुलांच्या हातात गुलाबाची फुलं आणि काहींच्या हातात त्यांनी स्वत: तयार केलेली शुभेच्छापत्र. मी वर्गासमोर उभी राहिले. मुलांना म्हटलं, मी प्रत्येकाच्या जवळ येऊन शुभेच्छा स्वीकारते, पण मला भेटवस्तू नको. मुलं हिरमुसली. प्रत्येकाच्या जागेवर गेले की हसतमुखाने समोरून येणारं हॅप्पी टिचर्स डे आणि त्या पाठोपाठ गिफ्ट स्वीकारण्याचं आर्जव. अनेकांनी अगदी घरच्यांकडे हट्ट करून टिचरसाठी आणलेले तर बऱ्याच पालकांनी स्वत: च होसेने खरेदी केलेले ड्रेस, महागडी घड्याळं, मेक अप सेट, पेन सेट, आर्टीफीशियल ज्वेलरी सेट्स आणि बरंच काही... मुलांचे हिरमुसले चेहरे बघवेनात. मी फुलं आणि शुभेच्छापत्रं स्वीकारली. हे तुम्हा सगळ्यांकडून मला, असं सांगून त्यांचे आभार मानले आणि शिक्षक दिनाचं महत्व थोडक्यात सांगून अभ्यासाकडे वळले.
दुसऱ्या वर्गातही पुनरावृत्ती. मोठ्या मुश्कीलीने समजावलं मुलांना. मधल्या सुट्टीपर्यंत हाच उद्योग सुरू होता. मधल्या सुट्टीत टिचर रूम मध्ये पोहोचले तर सगळ्याच शिक्षिका एकमेकींना आपापली गिफ्टस् दाखवण्यात रमल्या होत्या. मला आश्चर्य वाटलं आणि खटकलं सुद्धा. एक-दोघींनी मला खोचकपणे विचारलंसुद्धा, काय, तुला फक्त फुलं आणि कार्डस्? नो गिफ्ट? मी फक्त हसले. मधल्या सुट्टीनंतरचा शेवटचा तास पुन्हा माझ्याच वर्गावर होता. तर ज्यांच्याकडची गिफ्ट मी स्वीकारली नव्हती, त्या माझ्या छोट्या दोस्तांनी मधल्या सुट्टीत वहीच्या पानावर माझ्यासाठी शुभेच्छापत्रं तयार केली होती. मी थक्क. आतापर्यंत अक्षरश: काही हजार शुभेच्छापत्रांच्या निर्मितीत मी सहभागी झाले होते, पण या मुलांनी मधल्या सुट्टीत साध्या कागदावर तयार केलेली शुभेच्छापत्रं, त्या मागच्या भावना त्या सर्वांच्या वरताण होत्या. अगदी साधे शब्द. I love you Teacher पासून Thankyu for being my mother in the school (थँक्यू चं स्पेलींग तसंच होतं हं) असे अनेक शब्द. मी त्या सगळ्यांचे खूप-खूप आभार मानले. लेखणीच्या जोरावर असंख्य शुभेच्छापत्र लिहिणाऱ्या, उत्तम कमाई करणाऱ्या आणि शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून निव्वळ लिखाणाने, कल्पनांनी स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचा नकळत अभिमान बाळगणाऱ्या मला त्या मुलांनी शुभेच्छांचा सहजसोपा अर्थ आपल्या कृतीतून शिकवला होता...निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम व्यक्त करणारी ती सगळी शुभेच्छापत्रं मी आजही जपून ठेवलीत...
क्रमश:
जडण-घडण , , , , , , , , , १० , ११ , १२ ,१३ , १४ , १५ , १६ , १७

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

सुधांशुनूलकर's picture

19 Jan 2015 - 6:19 pm | सुधांशुनूलकर

तुम्हाला मिळलेली शुभेच्छापत्रं अनमोल आहेत.. तुम्हाला मिळालेलं 'ज्ञानपीठ'च जणू!

खूप छान लेखन. सर्व भाग आवडले आहेत.

राघवेंद्र's picture

19 Jan 2015 - 7:31 pm | राघवेंद्र

"निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम व्यक्त करणारी ती सगळी शुभेच्छापत्रं मी आजही जपून ठेवलीत..."
आवडले.

नाखु's picture

20 Jan 2015 - 11:01 am | नाखु

संपन्न अनुभव.

एस's picture

19 Jan 2015 - 8:23 pm | एस

मस्त!

सुचेता's picture

19 Jan 2015 - 9:22 pm | सुचेता

लहाण , मुलांसोबत निरागस होता आलं तर हे असे आभाळासारखे क्शण गवसतात

मुक्त विहारि's picture

19 Jan 2015 - 10:17 pm | मुक्त विहारि

आवडला...

खटपट्या's picture

19 Jan 2015 - 10:36 pm | खटपट्या

खूप छान लेख !!

सौन्दर्य's picture

20 Jan 2015 - 2:15 am | सौन्दर्य

अगदी भारावून गेलो. फार छान लिहिलेत.

स्पंदना's picture

20 Jan 2015 - 4:44 am | स्पंदना

माझ्या मुलाला त्याची टिचर आधीच सांगुन ठेवते की तिला रेड वाईन आवडते की व्हाईट, मग त्या प्रमाणे खरेदी!! :(

सुनील's picture

20 Jan 2015 - 8:54 am | सुनील

*yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo:

स्नेहल महेश's picture

20 Jan 2015 - 11:31 am | स्नेहल महेश

वाचताना नकळत डोळात पाणी आलं
खूप छान लेख

पदम's picture

20 Jan 2015 - 12:03 pm | पदम

मस्तच.

खर सांगयच तर मा़झ्याही डोळ्यात पाणी आल वाचताना

सविता००१'s picture

20 Jan 2015 - 4:07 pm | सविता००१

मस्तच लिहिताय.
लहान मुलांबरोबर एकरूप होता येणं हीच खरी कमाल असते. तीच तुम्हाला छान जमली आहे. प्रत्येकाला नाहीच जमत हे.
मला फार फार आवडलं हे....

मधुरा देशपांडे's picture

20 Jan 2015 - 6:54 pm | मधुरा देशपांडे

तुमचे विद्यार्थी भाग्यवान आहेत. खूप छान लिहिलं आहे. शेवट तर खूप आवडला.

बॅटमॅन's picture

20 Jan 2015 - 7:06 pm | बॅटमॅन

लेख आवडला असे म्हणवत नाही कारण तो फादर डोक्यात गेला. *****!!!!

माधुरी विनायक's picture

28 Jan 2015 - 5:04 pm | माधुरी विनायक

सुधांशुनूलकर, राघव ८२, नादखुळा, स्वॅप्स, सुचेता, मुक्त विहारी, खटपट्या, सौंन्दर्य, अपर्णा-अक्षय, सुनील, स्नेहल-महेश, पद्म, सविता ००१, मधुरा, बॅटमॅन आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे मनापासून आभार...
अपर्णा, तुमचा स्वानुभव धक्कादायक...
मधुरा, विद्यार्थ्यांइतकीच मी सुद्धा भाग्यवान. निव्वळ विश्वास आणि प्रेम यांचा पाया लाभलेलं हे नातं... खूपच हवंहवंस...
बॅटमॅन, खरंय तुम्ही म्हणताय ते...

पैसा's picture

28 Jan 2015 - 8:39 pm | पैसा

किती छान!