जडण-घडण 15

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
9 Dec 2014 - 4:03 pm

आतापर्यंत मार्केटमध्ये कंपनीचं चांगलंच नाव झालं होतं. मला आठवतंय, त्या वर्षी दिवाळीसाठी वेगवेगळ्या आकारातल्या १०० पेक्षा जास्त शुभेच्छापत्रांसाठी मी संदेश लेखन केलं. यात आकार वैविध्याबरोबर पॉप अप, विनोदी, कॉर्पोरेट अशा प्रकारांचाही समावेश होता. एकंदर घोडदौड वेगात सुरू होती. मागच्या भागात सांगितलेल्या द्व्यर्थी किंवा काहिसे अश्लील शुभेच्छा संदेश लिहिण्याचं सुचवणाऱ्या त्या प्रसंगानंतर माझी एकंदर प्रतिक्रिया लक्षात घेत तो विषय तिथेच संपला होता.
मला त्या वेळी घड्याळं जमवायची आवड होती. पण ही घड्याळं मनगटावर कमी आणि माझ्या डेस्कवर जास्त वेळ दिसायची. खरं तर ते कुणाच्या लक्षात येऊ शकेल, असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. पण त्या प्रसंगानंतर मी फारच दुखावले किंवा डिवचले गेले की काय, अशी धास्ती बहुधा मालकांच्या मनात होती. त्या वर्षी त्यांनी दिवाळीला आमच्या संपूर्ण टिमला सुंदर डिझायनर घड्याळं भेट दिली. इतकंच नाही, तर चक्क एका महिन्याचा पगार बोनस दिला. इतक्या वर्षात तिथल्या कर्मचाऱ्यांना बोनस किंवा फारच मागे लागल्याशिवाय पगारवाढीची सवय किंवा अपेक्षा नव्हती आणि यंदा चक्क महागडी भेट आणि बोनस!!! सगळेच खुशीत होते. मला कळलंही नसतं की माझी नाराजी दूर करण्याचे हे प्रयत्न होते. पण घड्याळं भेट दिल्यानंतर ते स्वत: माझ्याकडे आले आणि विचारलं, क्यु मॅडम, आप घडियां इकट्ठा करने का शौक रखते हो, या पहनते भी हो... कंपनी की गिफ्ट पसंद आई या नही... मी घड्याळ सहसा वापरत नसल्याचं सांगत भेटीबद्दल आभार मानले. मग काहीशा खालच्या स्वरात त्यांनी मला विचारलं, अब आप नाराज तो नही, वो हिंदी कार्ड जैसी कॉपीवाली बात... आप भूल जाईये वो सब... खूब दिल लगाकर काम किजिये इसी तरह... मी हलकेच हसून मान डोलावली आणि ते निघून गेले.
त्यानंतर सीझन होता नवीन वर्षं आणि व्हॅलेंटाईनचा. मी म्हटलं तसं, तो काळ मराठी शुभेच्छापत्रांच्या बहराचा होता आणि आतापर्यंत आमच्या प्रत्येक नव्या रिलीजला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. पण आदल्याच वर्षी व्हॅलेंटाईन हा आपला सण नाही, अशी भूमिका घेत समाजातल्या काही घटकांनी व्हॅलेंटाईनची शुभेच्छापत्रं जाळणं, ती दुकानं पेटवून देणं, असले प्रकार केले होते. आमच्या दृष्टीने हा खूप मोठा इव्हेंट होता. पण जोखीमही दिसत होती. दिवाळी, नवीन वर्ष, दसरा, गुढी पाडवा अशा दिनविशेषांपूर्वी शुभेच्छांपत्रांच्या दालनांमधून त्या सणांची जाहिरात केली जायची. खूप विचार केल्यानंतर माझ्या मनात एक विचार चमकून गेला आणि मी मराठी कॅलेंडर मागवून घेतलं. मस्त... मला हवा तसाच योग होता. भविष्याचं नाही काही. त्या वर्षी व्हॅलेंटाईन आणि वसंत पंचमीमध्ये अवघ्या एका दिवसाचं अंतर होतं. जाहिरातींमध्ये व्हॅलेंटाईनचा उल्लेखही करायचा नाही. "वसंत - उत्सव प्रेमाचा" अशी टॅगलाईन दिली आणि धडाक्यात जाहिराती केल्या. ती युक्ती प्रमाणाबाहेर यशस्वी झाली आणि प्रेमऋतूच्या त्या सगळ्याच शुभेच्छापत्रांना उत्तम प्रतिसाद मिळाला. आम्ही सगळेच सुखावलो.
कामात सतत नवीन काही करून बघता येत असल्यामुळे मी सुद्धा रमले होते. आकाशवाणीतही काम सुरू होतं, त्यामुळे फारसा तोच-तोचपणा जाणवत नव्हता. बाहेरून, आधीच्या परिचयातून काही जणांनी प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी काम करण्याबद्दल विचारणा केली होती. पण मला तसं करणं म्हणजे या कंपनीचा विश्वासघात करण्यासारखं वाटत होतं. फसवणूक वाटत होती. प्रलोभनांना मी भूलण्याचा प्रश्नच नव्हता. संबंध बिघडणार नाही, याची काळजी घेत त्या सर्वांनाच नकार दिला. त्याचबरोबर, आपण या कंपनीच्या मराठी शुभेच्छापत्रांच्या क्षेत्रात पदार्पणापासून सोबत आहोत, हळूहळू कामाला प्रतिसादही मिळू लागला आणि आता तर नव्या रिलीजची वाटही बघीतली जातेय... या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग असणं सुखावणारं होतं. निश्चितच होतं. अर्थात माझ्या शब्दरचनेला कलाकार, सुलेखनकार, आमच्या कल्पना संगणकावर साकारणारे अशा सर्वांची तितकीच मोलाची साथ होती आणि चांगली जमून आलेली ही भट्टी अशीच टिकून राहावी, असं मनापासून वाटत होतं. पण...
कामं नेहमीप्रमाणे सुरू होती, पण आता कधीतरी मालक आणि हिंदी लेखक महाशय आमच्याच कक्षात बसून 'तशा' प्रकारच्या हिंदी शुभेच्छापत्रांबद्दल चर्चा करू लागले. मग इंग्रजीमधल्या तशा कार्डसची देवाणघेवाण, खरेदी आणि अनुषंगिक चर्चाही होऊ लागल्या. सुदैवाने आता माझ्यापर्यत त्यातलं काही येत नव्हतं, पण तरीही माझ्यासमोर होणाऱ्या त्या चर्चांनी मी काहीशी बुचकळ्यात पडले होते. तशात कधीतरी मालक, कधी हिंदी लेखक तर कधी अनुभवी व्हिज्युअलायझर अधून-मधून बाहेर जाताना दिसू लागले. कोणाशीतरी मुलाखतवजा बोलताना दिसू लागले. मी शक्यतो आपल्या कामाव्यतिरिक्त इतर बाबींकडे लक्ष न देणारी. पण माझ्यासोबत संगणकावर काम करणाऱ्या दोन मुलींनी थोडंसं बिचकत मला सांगितलं की मागच्याच आठवड्यात मालकांनी काही मराठी कॉपी रायटर्सना भेटायला बोलावलं होतं. त्यांना बहुतेक मराठीतही तशी कार्ड आणायची होती. सातत्याने मिळणाऱ्या यशाने त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. नव्याने बोलावलेल्या त्या कॉपीरायटर्सकडून खूपच कमी दरात त्यांना हवा तशा कॉपीज मिळणार होत्या. फक्त यातलं काही मला थेट सांगितलं नव्हतं. मी अस्वस्थ झाले. त्या दोघी माझ्या आधीपासून काम करणाऱ्या आणि त्या खूप विश्वासाने मला हे सारं सांगत होत्या.
तटस्थपणे पाहू गेलं तर मी अस्वस्थ होण्याचं काय कारण होतं? मी काम करत होते, त्याचा मोबदला मला मिळत होता. अमुक एक प्रकारचं लिखाण मी करणार नाही , हे स्पष्ट केल्यानंतर पुन्हा तशी विचारणाही झाली नव्हती. मी करणार नसलेलं काम इतर कोणी करू शकेल, ही शक्याताही मी गृहित धरली होती. खरं तर मी स्वत:च तसं सुचवलंही होतं. पण तरीही मी अस्वस्थ झाले. मला वाटतं, दोन कारणं असावीत. एक तर या कंपनीसाठी मी लिहिते, हे क्षेत्रातल्या बहुतेकांना आता समजलं होतं. त्यामुळे नंतरच्या काळात मी न लिहिलेल्या आणि इतर कोणीतरी लिहिलेल्या रचनाही माझ्याच नावावर खपण्याची शक्यता होती. आणि अशा प्रकारचं लिखाण कितीही खपणारं असलं, तरी मला त्याचं पालकत्व नको होतं. माझी इमेज जपत होते का मी? असू शकेल. पण मला ते पटलं नसतं. दुसरं कारण म्हणजे, पहिला मुद्दा अगदीच बाजूला ठेवला तरी त्या इतर कोणी लिहिलेल्या लिखाणावर माझ्याच समोर काम सुरू झालं, तर मी अस्वस्थ होणार. माझी चिडचिड होणार आणि मला तक्रारही करता येणार नाही.
विचारचक्र सुरू होतं. मग एके दिवशी त्या हिंदी लेखक महाशयांनी सहज सांगत असल्याचं दाखवत सांगितलं की मराठी कॉपीज लिहिणारे काही लोक मालकांना अलीकडे बरेचदा भेटतात आणि ते खूप कमी दरात त्यांना हव्या तशा कॉपीज देण्याबद्दल बोलतात. मी ऐकून घेतलं, प्रतिक्रिया मात्र दिली नाही.
मात्र एकंदर परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर अशा वातावरणात मी फार काळ काम करू शकेन असं नाही वाटलं. तुम्ही दुसरा/दुसरी कॉपी रायटर नेमताय का, असं मालकांना विचारणं मला पटत नव्हतं आणि खरं सांगायचं तर या अवांतर कटकटीचा कंटाळा आला होता. कामाचा ताण अजिबातच नव्हता पण मन:शांती मात्र हरवत चालली होती. मग काय? पुनश्च हरी ओम...
मालकांची, हिंदी लेखक महाशयांची एकत्र भेट घेतली आणि पुढच्या महिन्यापासून मी येऊ शकणार नाही, असं सांगितलं. मी दुसऱ्या कंपनीत जातेय का, असं विचारलं त्या दोघांनी. मी नकार दिला. त्यांनी पुन्हा कारण विचारलं. आता मन रमत नाही, असं म्हटलं मी. खरंही होतं ते. दोघे काही काळ विचारात पडले, मग म्हणाले, आप दोबारा सोचिये। मी होकार दिला आणि माझा विचार बदलणार नाही, हे लगेच स्पष्ट केलं. पुढचे काही दिवस मी कदाचित विचार बदलु शकेन, असा विचार करून सोबत काम करणाऱ्या सगळ्यांनीच थोपवण्याचा प्रयत्न केला. पण ते व्हायचं नव्हतं. या वेळी सुद्धा घरच्यांशी बोलून निर्णय घेतला होता. तो महिना संपला आणि मी त्या कंपनीचा, खरं तर तिथल्या सर्वांचाच निरोप घेतला. तिथे केलेलं काम मला खूप समाधान देऊन गेलं, एवढं नक्की.
क्रमश:
जडण-घडण 1 , 2 ,3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13, 14

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Dec 2014 - 2:33 am | मुक्त विहारि

एकदम मनापासून लिहीत आहात, हे वाक्या-वाक्याला जाणवत होते.

अशी स्वतःला ओळखून ठाम निर्णय घेणारी माणसं long-term कायमच यशस्वी होतात हे अनुभवलं आहे.

आता पुढील आव्हान काय स्वीकारलंत ते वाचायची उत्सुकता आहे.

खटपट्या's picture

10 Dec 2014 - 2:42 am | खटपट्या

+१

किते सुरेख घडी घातल्या सारख आयुश्य असत ना कुणा कुणाच?
हेवा वाटतो वाचून !!
छान लिहीता आहात.
पु.ले.शु.

सर्व भाग आवर्जुन वाचतेय.पुभाप्र.

शिरीष फडके's picture

10 Dec 2014 - 4:15 pm | शिरीष फडके

छान

एस's picture

10 Dec 2014 - 6:49 pm | एस

शिकण्यासारखे बरेच आहे. वाचतो आहे. मोबाईलवरून जास्त टंकतायेत नाही.

समिर२०'s picture

10 Dec 2014 - 9:46 pm | समिर२०

पुभाप्र

माधुरी विनायक's picture

12 Dec 2014 - 5:58 pm | माधुरी विनायक

मुक्त विहारी, बहुगुणी, खटपट्या, अपर्णा-अक्षय, अजया, शिरीष फडके, स्वॅप्स, समीर२० आणि सर्व वाचकांचे मनापासून आभार.
अपर्णा-अक्षय - घडी घातल्यासारखं आयुष्य वाचून मौज वाटली. प्रत्येकाच्या लेखी घडीची व्याख्या आणि अपेक्षेसारख्या घड्या या सापेक्ष असाव्यात असा विचार आला मनात...