जडण-घडण १७

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
8 Jan 2015 - 3:05 pm

पाऊस मुंबईच्या पावसाच्या लौकीकाला साजेसा कोसळत होता. आम्ही दोघांनी ठरलेल्या भागापर्यंत प्रवास केला आणि स्वतंत्रपणे कामाला सुरूवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळी भेट झाली, तेव्हा आणखी कोणीच ठरलेल्या ठिकाणी आलं नसल्याचं समजलं. आमचं जेवण झालं आणि त्यानंतर मित्राने बाहेरून ऑफीसमध्ये फोन केला. बरेच जण पावसामुळे आलेच नसल्याचं समजलं आणि दुपारनंतर आम्ही घरी गेलो तरी चालेल, असंही सांगण्यात आलं. तासभर सोबत काम करून परतायचं ठरवलं आम्ही दोघांनी. दिवसभरातल्या आणि इतर फुटकळ गोष्टींबद्दल बोलताना तास भरकन गेला. मग आम्ही गप्पा मारतच ऑफीसमध्ये पोहोचलो, बॅगा परत केल्या आणि आपापल्या घरी जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचलो. मध्येच त्याने जवळपास चर्च आहे का, ते विचारलं.ऑफीस बांद्र्याला होतं, मी त्याला माऊंट मेरी चर्चबद्दल सांगितलं. त्याने मी सोबत येऊ शकते का, असं विचारलं. आता गेले तर पावसामुळे माझं घरी पोहोचणं आणखी उशीरा झालं असतं, त्यामुळे मी नकार दिला. त्याला मात्र नक्की जा म्हणून सांगितलं आणि मी निघाले.
अंधेरीपर्यंतचा माझा प्रवास अर्थात रेल्वेने. फारशी गर्दी नव्हती. मी बसले आणि नकळत गेल्या काही दिवसांच्या धावपळीबद्दल मनात विचार सुरू झाले, मग आजच्या दिवसाबद्दल... मला घरी जायला उशीर होईल, हे एकच कारण होतं का त्याच्यासोबत जायला नकार देण्यामागचं...की मग टाळलं मी त्याला... मनात उमटलेल्या प्रश्नाने मी दचकले. हा मुलगा गुंतु लागलाय का माझ्यात.. मुलगा खरंच चांगला आहे. एक मित्र म्हणून त्याची सोबत मला आवडते. पण मित्र असे भरपूरच आहेत की... मग याच्याबद्दल काही वेगळं वाटू लागलंय का... नाही. नक्कीच नाही. पण मग याच्या मनात असं काही असावं, असं का वाटतंय...मलाच वाटतंय की खरंच तसं काही आहे... मी गोंधळून गेले. काही ठाम मत होईना... आमच्या छान गप्पा झाल्या होत्या दिवसभरात. त्याने त्याच्याबद्दल बरंच काही सांगितलं होतं. त्याचं घर, आई-वडील, बहीण, मित्रमंडळी, पुण्यातलं आतापर्यंतचं मुक्त जगणं आणि आताची आव्हानं... त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तो निकराचे प्रयत्न करत होता. चांगले दिवस टिकले नाहीत, मग वाईट दिवसही कायम नाही राहणार, असं म्हटलं मी आणि तो छान प्रसन्न हसला होता. थँक्स यार, म्हणून निघूनही गेला होता.
दुसऱ्या दिवशी पावसाची विश्रांती आणि मी कामावर हजर. पण आता दगदग जाणवू लागली होती. प्रवास आणि पायपीट अशा कामाची सवय नव्हती ना... तो सुद्धा आला होता. चर्चमध्ये काल गेलात का, असं विचारलं त्याला मी. त्याने डोळ्यांत रोखून बघत नकार दिला. हम साथ जाएंगे. तुम बता देना, कब चलना है... मी गोंधळून त्याच्याकडे बघू लागले, तोच त्याला कुणी हाक मारली आणि तिथून ओढून घेऊनही गेले. माझा गोंधळ आणखी वाढला.
त्या दिवशीही आम्ही सोबत काम केलं. राजेश, ज्यांच्या हाताखाली मी सुरूवातीला काम करत होते, त्यांनी मला सांगितलं, अब आप अपने आपसे काम कर लोगे, मेरे पास नये बच्चे है. हम एक ही एरीया मे रहेंगे, लेकीन आप इनके साथ कंटिन्यू कर लो.. मित्राकडे हात दाखवत त्यांनी सांगितलं आणि सगळेच निघालो.
त्या दिवसभरातही चांगलं काम झालं, भरपूर गप्पा झाल्या आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी माझ्या मनात त्याच्याबाबत उमटलेली शंका खरी ठरतेय असं वाटावं, असं बरंच काही जाणवून गेलं. खरं तर खूप किरकोळ गोष्टी, पण त्यांनी मनातल्या शंकेवर जवळजवळ शिक्कामोर्तबच केलं. नेहमीप्रमाणे मी घरी निघाले. आज पुन्हा तो स्टेशनपर्यंत सोबत, पुन्हा त्याने चर्चमध्ये येण्याबद्दल विचारलं. नकार देत मी ट्रेनमध्ये शिरले. थकव्यामुळे प्रवासात झोप लागली आणि घरी पोचेतो कणकण वाटू लागली. खूपच थकवा आला होता.
दुसऱ्या दिवशी तापच आला. मग ऑफीसमध्ये येऊ शकत नसल्याचं फोनवरून कळवलं आणि पुन्हा झोपले. दुपारनंतर औषध घेऊन, थोडंफार खाऊन पुन्हा झोपले, तो त्याचा फोन. स्वरात खूप काळजी आणि मी न गेल्याबद्दल नाराजी, दोन्ही. थोडंफार बोलून मी फोन ठेवला खरा पण विचारचक्र सुरू झालं. मित्र म्हणून हा मुलगा खरंच चांगला होता, प्रामाणिक होता, मेहनती होता, आमची मैत्रीही छान होती. पण मला खरंच त्याच्याबद्दल त्या पलीकडे काही वाटत होतं का... नाही. त्याला? बहुतेक ...हो. आणखी काही दिवसांच्या सहवासाने कदाचित मला तो आवडू लागलाही असता, मैत्रीच्या पलीकडे. पण त्यापुढे काय? माझ्या घरातली मंडळी कितीही समंजस असली तरी आम्हा दोघांचे धर्म वेगळे होते. मैत्री चालली असती आमची, पण त्यानंतर आयुष्यभराची साथ देणं मात्र घरच्या मंडळींना कधीच मान्य झालं नसतं. माझ्या भावी आयुष्याबद्दलच्या, जोडीदाराबद्दलच्या कल्पना स्पष्ट होत्या. या बाबतीत मला घरच्यांना दुखवायचं नव्हतं, त्यांना मान्य होणार नाही, असा कोणताही अट्टाहास करायचा नव्हता. पण त्याच वेळी या मित्राला दुखावणंही जमणार नव्हतं. जवळपास सगळे आधाराचे पाश त्याच्या हातून निसटले होते. मेहनती होताच तो, पण आत्ता त्याला ठाम भावनिक आधार हवा होता आणि तो ठामच हवा होता. आधार डळमळीत असून चाललं नसतं. मी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण त्यापलीकडे जाणं मला शक्य झालं नसतं. आम्हा दोघांचीही फरपट झाली असती... खूप उलट-सुलट विचार मनात येत राहिले...
कदाचित मी त्या चित्रातून बाहेर पडणंच योग्य झालं असतं. स्वार्थी होते का मी? नक्कीच... पण मला तडजोड करावी लागू नये, त्याचबरोबर त्याची आणखी तडफड होऊ नये, त्याच्या त्रासात माझ्यामुळे भर पडू नये, ही प्रामाणिक इच्छा होती. त्याच्याशी याबाबत बोलणं किंवा त्याला मनातलं बोलायची संधी देणं मूर्खपणाचं ठरलं असतं, कारण त्यानंतर मला स्वत:ला त्याला न सावरता निघून जाणं कठीण झालं असतं...
मी या कामाचा निरोप घ्यायचं ठरवलं. दगदग आणि ताप ही कारणं होतीच. आई-बाबांशी हे काम इथेच थांबवण्याबद्दल बोलले. त्यांनाही माझी दगदग बघवत नव्हती, त्यामुळे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा निर्णय सांगण्यासाठी एकदा तरी ऑफीसला जावं लागणार होतं. मी आणखी एक दिवस जाऊ दिला. आणखी विचार केला. घरी आलेला त्याचा फोनही बरं नसल्याचा निरोप देत घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी ऑफीसमध्ये पोहोचले. मुलाखत घेणाऱ्याला मी दगदग होत असल्याचं कारण देत दुसऱ्या दिवसापासून येणार नसल्याचं सांगितलं आणि सहकाऱ्यांसोबतच तिथून बाहेरही पडले. तो आला होता आणि माझा निर्णय ऐकून गोंधळलाही होता. त्याचं आणि राजेश सरांचं काही बोलणं झाल्याचं मी पाहिलं. मग आम्ही सगळेच सोबत स्टेशनवर आलो. इथून आमच्या वाटा वेगळ्या होत्या. मी सगळ्यांचा निरोप घेतला. काहींनी मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात काहीच अर्थ नव्हता. मग राजेशने मला जरा बाजूला घेत काम सोडण्याचं कारण विचारलं. मी अर्थात प्रकृतीचं कारण पुढे केलं. मग त्यांनी विचारलं, लेकीन ---का क्या... मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं.
तू नही जानती? वो तेरे लिये... मी त्यांना हातानेच थांबवलं.
आप आगे कुछ मत कहिये. ये बात शुरू ना हो, तो बेहतर है. उन्हे भी बता दिजिये की मैने कभी इस तरह नही सोचा..
पर मुझे बात पुरी तो करने दे...
नही. इस बारे में कोई बात नही... प्लीज...
बोलता- बोलता माझे डोळे भरून आले. त्यांना काही बोलता येईना. मोठ्या कष्टाने मी स्वत:ला सावरलं. खूप कठीण क्षण होता तो. त्यावेळी सावरलं नसतं तर पुढे वाहावत जाणं, इतकंच माझ्या हातात उरलं असतं. डोळे मिटून आतून येणारे कढ जिरवत मी शांत होत त्याच्याकडे वळले. तेवढ्या वेळातही आम्ही दोघं इतरांपासून काहीसे दूर आल्याचं माझ्या लक्षात आलं. खरं तर इतर सगळे दूर गेले असावेत... खूप वाईट होतं असं वागणं... पण... सहज स्वरात मी त्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. खरं तर त्याच्याकडे बघायचाही त्रास होत होता. खूप काही बोलायचं आहे, पण एक अक्षरही उमटू नये, अशी अवस्था झाली होती त्याची. खूप दुखावला गेला होता. मला त्याच्या नजरेला नजर देणं खूपच कठीण जात होतं. माझ्या बोलण्यावर नकळत मान डोलावली त्याने. लांबवरून माझी ट्रेन येताना दिसली. सगळा धीर गोळा केला आणि त्याच्याकडे न बघता, त्याला उद्देशून म्हटलं, चलती हूं मै. अब इसके बाद हमारी कभी बात नही हो पाएगी. मिलना तो नही होगा और आप मुझे कॉल भी नही करोगे... कभी नही... खयाल रखना...
तोपर्यंत ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली होती.त्याने भलतीकडे मान फिरवली होती. सोबतच्या इतरांना निरोपाचा हात करत, पाठमोऱ्या त्याच्याकडे बघत मी ट्रेनमध्ये शिरले. एक क्षणभर प्रचंड मोह झाला, त्याला हाक मारण्याचा... त्याच्या नजरेला नजर देत त्याचा निरोप घेण्याचा... पण मला नसतं जमलं... खूप निग्रहाने मी आत जाऊन बसले, पुन्हा मागे वळून न बघता. ट्रेन सुरू झाली आणि माझा बांध फुटला. खूप रडले मी. इतक्या वाईट पद्धतीने मी त्याला दुखावणं चुकीचं होतं. पण त्याला माझ्यामुळे कमीत कमी त्रास होईल किंवा होणारच नाही, यासाठी मला इतकंच करता येणार होतं...
पुढचा काही काळ खूप कठीण होता. माझ्या मनातलं अपराधीपण जात नव्हतं. त्या धक्क्क्याने मी चांगलीच आजारी पडले. त्या दिवसानंतर ३-४ दिवसांनी राजेश, विजय, फारूख ही वरीष्ठ मंडळी मला भेटायला, परतण्यासाठी माझं मन वळवायला घरी आली. पण माझी अवस्था बघून त्यांना काही बोलता आलं नाही. आई- बाबांनी मला आणखी दगदग झेपणार नाही, असं त्याना सांगितलं. मी काहीच विचारलं नाही आणि ते तिघेही निघून गेले...
१७ वर्षं उलटून गेलीत... आजही, त्याच्या प्रत्येक वाढदिवशी मी त्याच्यासाठी मनोमन प्रार्थना करते. तो सुखात असावा, असं मनापासून वाटतं... कदाचित मी फक्त मैत्रीच्या आधाराने सावरू शकले असते त्याला तेव्हा, पण तितकी समज नव्हती बहुतेक...
क्रमश:

जडण-घडण 1, 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 16

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Jan 2015 - 3:45 pm | मुक्त विहारि

तुर्तास इतकेच...

स्पंदना's picture

8 Jan 2015 - 4:17 pm | स्पंदना

सारासार विचार आणि भावना यांच्या आंदोलनात अडकलेलं मन.
पुढं काय झालं असतं हा प्रश्न, आणि आजही मन निमुट्पणे करत असलेली प्रार्थना!!
योग्य शब्दांत बरच काही....

मुक्त विहारि's picture

8 Jan 2015 - 7:41 pm | मुक्त विहारि

अगदी हेच मनात होते, पण ... मनातले भाव शब्दांत उतरत न्हवते...

विशेषतः "पुढं काय झालं असतं हा प्रश्न, आणि आजही मन निमुट्पणे करत असलेली प्रार्थना!!"

खूपच प्रांजळ आहे. आणि तटस्थ वाचक म्हणून या वळणावर काही मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. पुभाप्र.

नगरीनिरंजन's picture

8 Jan 2015 - 4:41 pm | नगरीनिरंजन

खूपच सुरेख लिहीताय! लिहीत राहा.

कठोर आणि मृदू भावनांचा संगम जाणवला या भागात.नेहेमीप्रमाणे गुंतवून ठेवलंत वाचण्यात!

बहुगुणी's picture

8 Jan 2015 - 5:49 pm | बहुगुणी

विवेकी आणि संयत क्षणांचं नेमकं वर्णन. या अवघड वळणावरून आयुष्य पुढे कसं सरकलं असेल याची उत्सुकताही आहेच.

आनन्दिता's picture

8 Jan 2015 - 10:51 pm | आनन्दिता

पुढचा भाग वाचायची उत्सुकता आहे. लवकर टाका..

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 12:43 am | खटपट्या

सर्व भागात हा भाग सर्वात जास्त भावला !!
तुमच्यासारखे निर्णय घ्यायला सर्वांनाच नाही जमत !

मनाचा तोल आणि ताल यातील हिंदोळा सगळेच अनुभवतात पण नेमकेपणाने शब्दात पकडण्याचं कसब वादातीत आहे *OK*

शलभ's picture

9 Jan 2015 - 2:56 pm | शलभ

अगदी असेच +१

पैसा's picture

11 Jan 2015 - 9:47 pm | पैसा

अतिशय प्रांजळ आणि मनाच्या गाभ्यातून आलेलं लिहिताय. खूप छान!

माधुरी विनायक's picture

13 Jan 2015 - 2:20 pm | माधुरी विनायक

जडण-घडणीच्या लेखनाचा हा प्रवास खरंच खूप समृद्ध करतोय. तुम्हा सर्वांचे प्रतिसाद बरंच काही नवं शिकवून जाताहेत. आतापर्यंत लाभलेली माणसांची श्रीमंतीही वाढत चाललीय. मुक्त विहारी, अपर्णा-अक्षय, स्वॅप्स, नगरीनिरंजन, अजया, बहुगुणी, आनन्दिता, खटपट्या, नादखुळा, शलभ, पैसा आणि सर्व वाचक- प्रतिसादकांचे मनापासून आभार.