जडण घडण - २५

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
1 Aug 2015 - 12:44 pm

जडण-घडण -२५
...कसे आहात. आज कसं काय बोलावंसं वाटलं...
मला रोज वाटतं. इथून ये-जा करावी लागतेच मला. मग... जाऊ दे. तू कशी आहेस. मी इथे उभा आहे, आपल्या बस स्टॉपवर...
मला छान हसू आलं.
अरे वा, लवकर आलात.
मग बराच वेळ माझी चौकशी. कशी आहेस, काय करतेस, घरातलं सगळं आणि बरंच काही. खरं तर मी कार्यालयात इतका वेळ कधीच फोनवर नसते. तो दिवस मात्र अपवाद ठरला. केवढं विचारायचं, बोलायचं आणि सांगायचं राहिलं होतं त्याचं. मी क्वचित बोलत होते.
मग म्हटलं, एका दिवसातच बोलायचंय का सगळं. बरं. मग पुन्हा बोलायला नको. संपवून घ्या आजच सगळं बोलणं.
अग ए... आत्ता सुरूवात केलीय बोलायला आणि लगेच एका फोन कॉलमध्येच कटवणार आहेस का मला..
मी नाही कटवत. आता मी विचारणार... आणि मी मूळ मुद्द्यावर. लग्न केलंत की नाही.
हो.
छान. काय ठरवून की प्रेम विवाह, मी मजेत विचारलं.
माझ्याकडून ठरवून नाही आणि तिच्याकडून प्रेम विवाह.
बरं. बोला.
मग त्याची गोष्ट सुरू. माझ्या लग्नानंतर विस्कटून गेलेले दिवस.
किती सोपं होतं ना तुझं रागावणं.तुझ्या लग्नानंतर किती दिवस तुझ्या घरासमोर येऊन कितीतरी वेळ उभा राहून गेलो, आठवत सुद्धा नाही. खूप वाईट होते ते दिवस. अपराधी वाटायचे. दु:ख जास्त होतं की अपराधीपण, ते सुद्धा कळत नव्हतं. घरात, मित्रांना सगळ्यांना माहिती होतंच. मग एका मित्राने या मुलीबद्दल सांगितलं. माझ्याच एका मित्राची बहिण. तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. एकदातरी भेट, म्हणून मित्राने विनंती केली. भेटलो आणि असलं काही शक्य नाही, हे तिला सांगितलं. समजावण्याचा प्रयत्न केला. पंजाबी कुटुंब. तिला मोठी बहिण आणि लहान भाऊ. घरात शिस्तीचं वातावरण. मोठ्या बहिणीने घरच्यांच्या मनाविरूद्ध पळून जाऊन लग्न करायचं ठरवलेलं. ती घरातून निघाली आणि ही सुद्धा घरातून निघून थेट माझ्याकडे आली. लग्न करूया म्हणाली. तिचा चुलत भाऊ मित्र होता, पण तो या सगळ्याच्या विरूद्ध. वातावरण चांगलंच तापलेलं आणि ती परत जायला तयार नाही. आम्ही मुलं असतो ना माधुरी, आम्हाला मूर्ख पुरूषी इगो असतो. हे असलं काही झालं की तो सुखावतो.
मग बोलण्याला अचानक ब्रेक... बापरे, कळतंय का तुला. अगं आपण एकमेकांना किती कमी वेळा नावाने हाक मारलीय आतापर्यंत... तुला आठवतंय का. खरंच की. तू सुद्धा फार क्वचित नावाने हाक मारलीस मला. हो ना...
नावाने किंवा इतर कुठल्या संबोधनानेही एकमेकांना हाक मारायचीही गरज फारशी भासली नव्हती, हे आत्ता पहिल्यांदा जाणवलं. मलाही.
बरं. पुढे..
तर आमचा तो मूर्ख पुरूषी इगो. तो सुखावला. मग बोललो भावाशी आणि लग्न केलंच. मग काय.. हळू हळू शांत झालं सगळं. एक मुलगी आहे आम्हाला. बापाला मस्त नाचवते. नोकरी तीच सुरू आहे. घराचं नाही जमलं अजून काही. भाड्याच्या घरात राहतोय सध्या.
जमेल ते सुद्धा. आता होईल सगळं नीट.
त्याच्यासोबत हे सगळं बोलताना ही मीच बोलतेय का, असं दूरून विचारणारी एक मी मलाच समोर दिसत होती.
मग थोड्या वेळाने बोलणं आटोपतं घेतलं आणि समोरून प्रश्न. मी पुन्हा फोन करू ना. घेशील फोन... बोलशील का माझ्याशी.
हो बोलेन. मग फोन ठेवला त्याने. त्याचं सगळं मार्गी लागतंय, याचा मनापासून आनंद झालेला. थोडं आश्चर्य त्याच्या गोष्टीबद्दल, थोडं आश्चर्य माझ्या स्वत:च्या वागण्याबद्दल. अरे वा. छान स्वीकारलं मी हे सगळं. स्वत:चं खूप आश्चर्य वाटलं. पण नंतर विचार केल्यावर उमजलं. हे स्वीकारलं असेल पण राग कायम आहेच. तो नाही गेलेला. खूप प्रयत्न करूनही.
मग नंतरच्या काळात बोलणं होत राहिलं वेगवेगळ्या विषयांवर.
एक प्रश्न मध्ये-मध्ये डोकं वर काढायचा. तुला एकदा बघायचंय. कधी दिसणार आहेस प्रत्यक्ष.
काय घाई आहे. कधीतरी होईल भेट. एकाच शहरात राहतोय आपण.
तसं नाही. मला खरंच बघायचंय तुला एकदा. शेवटचे भेटलो, ती शेवटची भेट आहे, हे माहितीच नव्हतं ना..
काही दिवसांनी पुन्हा तोच प्रश्न.. मग थोडं थांबून , मोठ्ठा श्वास घेत विचारपूर्वक दिलेलं उत्तर.
भेटू ना. पूर्ण कुटुंबानीशी भेटू. फक्त इतक्यात नाही. माझ्या डोक्यातला राग अजून तसाच राहिलाय. तो जात नाही, तोवर नको भेटायला.
अजून राग आहे..
हो आहे. तो राहणारच. I don't make every battle a war. एका हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीही माणसं नाहीत, ज्यांच्यावर राग आहे, टिकलाय. तुम्ही त्या यादीत आहात.
बरं. तेव्हा भेटू. पण कुटुंबासह?
हो, माझ्या नवऱ्याला सगळं माहिती आहे. अगदी आपण आत्ता बोलतोय, ते सुद्धा.
तू काय बरी आहेस ना.
मग थबकत विचारलं, तूच सांगितलंस ना.. कधी...
लग्नापूर्वीच... आत्ताही, त्याच्यापासून लपवावं, असं काही बोलतो का आपण? आणि मी नवऱ्याला सांगणार नाही, असं का वाटलं तुम्हाला. न सांगता मी लग्न केलं असतं?
हम्म.. तू सांगितलंच असणार, मला कळायला हवं होतं ते..
तुम्ही नाही सांगितलं का बायकोला.
नाही. काहीच नाही.
का, असा प्रश्न नाही विचारला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय करावं, हा सर्वस्वी त्याचा प्रश्न होता. मी आगंतुक सल्ला देण्याचा प्रश्नच नव्हता. मग कधीतरी विचारलेला प्रश्न. तू का नाही निघून आलीस सरळ माझ्याकडे.. मी हसले. म्हटलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार मी नक्की.
बरेचदा धो-धो बोलून होतं कोणत्याही विषयावर. मग पुन्हा हमखास येणारं वाक्य. असं बोलणं नाही होत कुणाशी. बरं वाटलं बोलून.
एकदा फोन येऊन गेलेला माझ्या नकळत. मग काही वेळाने मी पाहिलं आणि कॉल केला.
अगं, माझे वडील होते सोबत मघाशी. तुझं घर दाखवलं त्यांना... मग तुला फोन लावलेला...
बरं झालं, मी फोन उचलला नाही ते. नका असं करू. हे असं होणार असेल तर बोलणं पूर्णपणे थांबवायचं.
खूप वारंवार बोलणं होतंय, असं वाटलं एकदा. मग म्हटलं, गरज नाही इतकं वरचेवर बोलायची. मी माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या माणसांमध्ये खुश आहे. मनापासून. तुम्हीही आहात. आपण ठीक आहोत, इतकं कळण्यासाठी वर्ष-सहा महिन्यातून एखादा फोन पुरेसा आहे.
बरेचदा आपापल्या लेकींबद्दल बोलणं व्हायचं. मग लेकीच्या शाळा प्रवेशाचा निर्णय घेण्याआधी फोन. कशाला प्राधान्य द्यावं, ते कळत नाही. थोडावेळ बोलले, शंका संपल्या त्यांच्या आणि मग म्हटलं, तुम्ही एक प्रश्न विचारला होता.. आता उत्तर देऊ का...
हो. तू म्हणाली होतीस तेव्हा. सगळं ठीक होईल. झालं असतं. मलाच खात्री नव्हती वाटली.
ते झालंच. पण मी दुसऱ्या प्रश्नाबद्दल बोलतेय. तू का निघून आली नाहीस माझ्याकडे, असा प्रश्न होता तुमचा.
हो. मग.. समोरच्या स्वरात उत्सुकता.
प्रश्नाला उत्तर प्रश्न. फक्त मला उत्तर नकोय. माझा प्रश्न हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर. जे उत्तर द्यावंसं वाटेल, ते स्वत:लाच द्या.
बोल.
खूप जीव आहे ना लेकीवर. जनरली बाप-लेकीचं नातं तसंच असतं. आपल्या लेकीला जगातलं बेस्ट ते सगळं मिळावं, असं वाटतं. हो ना. मी पण अशाच एका बाबाची मुलगी आहे, जिच्यावर तिच्या आई-बाबांनी खूप प्रेम केलंय, खूप जीव लावलाय. तुम्ही मला विचारलात तोच प्रश्न तुमच्या लेकीसमोर आला तर... एक बाप म्हणून तुमच्या मुलीने कसं वागावं, असं वाटेल... ती अशी निघून गेली तर... जन्मापासून प्रेमाने लहानाचं मोठं करणाऱ्या आई-बाबाचं नातं, काही महिन्याच्या, एखाद-दोन वर्षांच्या प्रेमासाठी लेकीला विसरता आलं, हे जिव्हारी लागेल का...
निघून येणं किंवा निघून जाणं तसं सोपं... अशा वेळी ठाम उभं राहणंच कठीण असतं बरेचदा...
जडण घडण
, , , , , , , , , १० , ११ , १२ , १३ , १४ , १५ , १६ , १७ , १८ , १९ , २०, २१ , २२, २३ , २४

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

माधुरी विनायक's picture

1 Aug 2015 - 12:46 pm | माधुरी विनायक

क्रमश: लिहायचं राहून गेलंय. क्षमस्व..

स्पंदना's picture

1 Aug 2015 - 12:58 pm | स्पंदना

मैत्रीणीकडूनची वागण्याची अपेक्षा मुलीने प्रत्यक्षात उतरवली तर?

वा! काय प्रश्न आहे.

आज भारतातल्या निम्म्याच्यावर पुरुषांना हा प्रश्न विचारला पाहिजे. बाहेर तुमची बहिण, आई, मुलगी फिरतेय, तिच्यावर हा प्रसंग गुदरला तर?

gogglya's picture

4 Aug 2015 - 12:27 pm | gogglya

हेच मनात आले...

नाखु's picture

1 Aug 2015 - 1:12 pm | नाखु

निरगाठ सोडावी अशी नाती सम्जण्याची हातोटी खास आहे.
जो स्वतःशी प्रामाणीक तो सगळ्यांची प्रामाणीक अशी माझी तरी धारणा आहे.
पुभाप्र.

नितवाचक नाखु

राघवेंद्र's picture

5 Aug 2015 - 1:51 am | राघवेंद्र

आवडला.

बहुगुणी's picture

5 Aug 2015 - 2:52 am | बहुगुणी

मैत्रीणीकडूनची वागण्याची अपेक्षा मुलीने प्रत्यक्षात उतरवली तर?
वा! काय प्रश्न आहे.
Exactly! अत्यंत मार्मिक प्रश्न विचारून प्रश्नाचं उत्तर दिलंत!

एकंदरीत प्रवास वाचून या टप्प्यावर काहीसं असं वाटलं असेल ना?
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुम्किन, उसे इक खूबसूरत मोड देकर, छोडना अच्छा!
चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो...

अजया's picture

5 Aug 2015 - 7:22 am | अजया

नेहमीप्रमाणेच ओघवतं कथन.

अनन्त अवधुत's picture

5 Aug 2015 - 5:44 am | अनन्त अवधुत

आणि ते मार्मिक असते.. परिणामकारक.
पु .भा. प्र.

माधुरी विनायक's picture

5 Aug 2015 - 1:05 pm | माधुरी विनायक

स्पंदना, gogglya, नाद खुळा, मुक्त विहारी, राघव ८२, बहुगुणी, अजया, अनन्त अवधुत आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार. हे सर्व लिहिताना आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचत स्वत:ला आजमावताना संमिश्र भावना आहेत मनात. खरंच खूप आभार..

पैसा's picture

5 Aug 2015 - 1:07 pm | पैसा

खूप सुरेख, ओघवतं लिखाण!

माधुरी विनायक's picture

6 Aug 2015 - 12:09 pm | माधुरी विनायक

धन्यवाद पैसा'जी...

समीरसूर's picture

10 Aug 2015 - 2:28 pm | समीरसूर

खासच! खूप सुरेख!

असे प्रसंग हाताळणं खरंच कठीण असेल. पण ज्या सोप्या पद्धतीनं तुम्ही हे प्रसंग हाताळलेत त्याला तोड नाही. आणि लिखाण तर अगदी मनाला भिडणारं. एखाद्या अवखळ झर्यासारखं...नितळ

समीरसूर's picture

10 Aug 2015 - 2:28 pm | समीरसूर

खासच! खूप सुरेख!

असे प्रसंग हाताळणं खरंच कठीण असेल. पण ज्या सोप्या पद्धतीनं तुम्ही हे प्रसंग हाताळलेत त्याला तोड नाही. आणि लिखाण तर अगदी मनाला भिडणारं. एखाद्या शांत वाहणार्या झर्यासारखं...नितळ

माधुरी विनायक's picture

26 Aug 2015 - 4:04 pm | माधुरी विनायक

धन्यवाद समीरसूर...