जडण-घडण 1६

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
19 Dec 2014 - 4:18 pm

साधारण वर्षभरानंतर पुन्हा एकदा निवांतपणा. मी मजेत होते. आकाशवाणी सुरू होतंच. रूचेल तसं फ्री लान्सींगही सुरू होतं. फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या, त्यामुळे हातात पूर्णवेळ नोकरी नसण्याचं टेन्शन नव्हतं आणि मुख्य म्हणजे माझ्या सोयीनुसार मला हवा तेवढाच वेळ काम आणि प्रवास करून माझ्या बरोबरीच्या सर्वांइतकंच, किंबहुना थोडं जास्तच उत्पन्नही हाती येत होतं. त्याहून महत्वाचं म्हणजे माझ्या घरातल्या सर्वांनी कायम दाखवलेला विश्वास. अगदी दहावी किंवा त्यानंतरही मी काय करावं, शिकवणी लावावी का, डी.एड्. करावं का, त्यानंतर पुढे शिक्षण घ्यावं का, अशा सगळ्याच बाबतीत घरच्यांनी सल्ले जरूर दिले, पण दबाव नाही आणला. नोकऱ्यांच्या बाबतीतही तेच. या सगळ्यातून मिळालेली सगळ्यात मोलाची शिकवण म्हणजे आपले निर्णय आपण घ्यायचे, त्यावर ठाम राहायचं आणि मग त्या निर्णयाला जोडून येणारी जबाबदारीही स्वीकारायची. तिथे पळवाटा शोधायच्या नाहीत. अपयश आलं तर ते पचवायचं, आपल्या चुका शोधायच्या ,मान्य करायच्या आणि पुन्हा पुढे चालू लागायचं...
डी. एड्. पूर्ण केल्यानंतर शाळेत तीन वर्षं शिकवताना मी मुंबई विद्यापीठातून इतिहास विषय घेऊन आधी बी.ए. आणि मग एम ए. पूर्ण केलं. फार कौतुक नाही यात. शाळेत शिकवत असताना तर १ मे पर्यंत शाळेत जावं लागायचं. २ मे पासून सुट्टी आणि १३/14/15 मे च्या आसपास परीक्षा सुरू व्हायच्या. ते आठ-दहा दिवस मी संपूर्ण वेळ (अर्थात झोपेचे आठ तास वगळून) अभ्यासात बुडून जायचे. बी.ए. ची तीन आणि एम ए. ची दोन अशी सलग पाच वर्षं हा क्रम सुरू होता. पण त्या अभ्यासातून मी फक्त पदव्या मिळवल्या, ज्ञान नाही, याची पुरेपूर जाणीव आहे मला.
आकाशवाणी आणि निवांत लेखन सुरू असतानाच घरात आता माझ्या लग्नाचे वारे वाहू लागले होते. माझ्या कानावर अधून-मधून यायचा हा विषय. पण प्रत्येक गोष्ट व्हायची तेव्हा होईल, असा स्वभाव, त्यामुळे त्या आघाडीवर मी बऱ्यापैकी शांत होते. मग एक दिवस आई-बाबा समोर बसले. आता तुझ्या लग्नासाठी मुलं बघु लागतोय आम्ही. तुझ्या बघण्यात कोणी असेल तर सांग. आमच्या काही फार अपेक्षा नाहीत, पण मुलगा आपल्यातला हवा. किमान पदवीधर, निर्व्यसनी, चांगली नोकरी आणि मुख्य म्हणजे स्वत:चं घर असणारा. मी हसले. ठीक आहे, बघा, म्हणाले. मग माझ्या अपेक्षांबद्दल विचारलं. मी म्हटलं, तुम्ही बघताय तेवढं मला पुरेसं वाटतं. त्यापलीकडे माझ्याही अपेक्षा नाहीत. पुन्हा त्यांनी विचारलं, कोणी असेल तर खरंच सांग. मी नकारार्थी मान हलवली. आई-बाबा एकमेकांकडे बघत हसत उठले आणि नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला निघाले.
मी माझ्या आवडत्या जागी विसावले. शुभेच्छापत्रासाठी मजकूर लिहायचा होता. प्रेम... आज माझ्या लग्नाचा विषय निघाला होता. मनात तोच विषय सुरू होता आणि काही वर्षं मागे गेले मी...
डी.एड्. च्या दुसऱ्या वर्षाची, शेवटची परीक्षा संपली होती. निकाल लागायला तीन महिने होते आणि महिनाभरात मी कंटाळून गेले होते. काहीतरी काम हवं होतं करायला. काहीही. मनाजोगं काही मिळत नव्हतं. अशात वर्तमानपत्रात एका मार्केटिंग कंपनीची जाहिरात वाचली. घरी येणारे फिरते विक्रेते पाहिले होते मी. तसंच असेल का हे. पण आपल्याला कुठे कायम करायचंय असलं काम. एक अनुभव घेऊन बघावा का. रिकामपणाला खूप कंटाळले होते मी. आई- बाबांना फारसं पसंत नव्हतं, पण प्रयत्न करून बघू द्यावं, म्हणून त्यांनी होकार दिला आणि त्याच दिवशी फोन करून दुसऱ्या दिवशी मी त्या कंपनीत पोहोचले सुद्धा.
फिरते विक्रेते स्वरूपाचंच काम होतं. सगळीच खूप हुशार दिणारी तरतरीत मुलं-मुली. फार शिक्षण झालेलं नसावं बहुतेकांचं.पण उत्साहाने भारलेलं वातावरण. खूप जोश, आक्रमकता आणि जल्लोषही. घरगुती वापराची काही उपकरणं विकायचं काम. अर्थात ही उपकरणं बाजारात उपलब्ध नव्हती. दिवसाला किमान ५० ते ८० घरांना भेट द्यायची आणि उपकरणं दाखवायची. विकत घ्यायला उत्सुक असणाऱ्यांना विकत द्यायची. अनुभवी माणसांच्या हाताखाली माझ्यासारख्यांचं प्रशिक्षण सुरू व्हायचं. थोडीशी द्विधा मनस्थिती झाली, पण कंटाळ्यावरचा उपाय समोर दिसत होता.
दुसऱ्या दिवसापासून मी कामाला सुरूवात केली. राजेश नावाच्या सिनीयरसोबत फिल्डवर जायचं होतं. मुली होत्या, पण माझ्या ग्रुपमध्ये नव्हत्या. आमच्या ग्रुपमध्ये राजेश, विजय आणि फारूख असे तीन सिनीयर होते आणि त्या प्रत्येकाच्या हाताखाली प्रत्येकी दोन जण नवखे. राजेश युपीचा, विजय पारशी तर फारूख कोकणी मुसलमान.राजेश सर्वांशी मिळून-मिसळून वागणारा, विजय खूप महत्वाकांक्षी, त्याला मॅनेजर व्हायची घाई होती. कसला तरी ताण असावा त्याच्या मनावर. उंच, गोरापान, देखणा आणि खूप सिगरेट्स पिणारा. त्याच्या मनावरचा तो कसलातरी ताण स्पष्ट जाणवला मला पहिल्याच भेटीत. फारूख खुशालचेंडू. काम मनापासून करायचा पण कुठेतरी पोहोचायची घाई नव्हती याला. आला क्षण मनापासून जगायचा, खूप हसायचं, सोबतच्यांना हसवायचं आणि मजेत राहायचं, असा खाक्या. याव्यतिरिक्त या तिघांच्या हाताखाली असणारे माझ्यासारखे नवखे लोक, मुलंच. पण या तिन्ही सिनियर्सनी मला नेहमीच स्वत:सोबत बरोबरीने वागवलं. कदाचित कामाला सुरूवात करण्यापूर्वी माझी मुलाखत घेणाऱ्याकडून त्यांना माझ्याबद्दल काही समजलं असावं. म्हणजे, माझी डी. एड्. ची पार्श्वभूमी, काही काळासाठी हे वेगळं काम करून बघायची उत्सुकता वगैरे वगैरे... अशा पार्श्वभूमीच्या मुलीने मार्केटिंगमध्ये काम करायची तयारी दाखवणं त्यांच्यासाठी काहीसं अनपेक्षित असावं...
पहिल्या दिवसअखेर मी काम बऱ्यापैकी समजून घेतलं. दुसऱ्या दिवसअखेर माझ्याकडची चक्क पाच उत्पादनं विकली गेली. तिसऱ्या दिवशी सकाळी नेहमीच्या वॉर्म अप मिटिंगमध्ये कौतुक झालं. शिकलेल्या - शिकवल्या गेलेल्या एका नियमात मी माझ्यापुरता बदल केला होता. . दिवसाला किमान ५० ते ८० घरांना भेट द्यायचं टार्गेट पूर्ण करण्यापेक्षा उत्पादनांची माहिती समोरच्यांपर्यंत त्यांना समजेल अशा पद्धतीने देण्यावर माझा भर असायचा. त्यांच्या शंका दूर होईपर्यंत मी थांबायचे. आधी सिनीयर्सनी इतका वेळ एका संभाव्य ग्राहकाला देऊ नको, असं सुचवलं, पण एकंदर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचं प्रमाण बघून ते सुद्धा निवांत झाले.
चौथा दिवस उजाडला. खूप दिवस विसावा घेतल्यानंतर अचानक फिरतीचं काम सुरू केल्यामुळे मी दमले होते, दगदग होत होती. पण हे नवं काही करून बघणं या क्षणाला आवडत होतं.
त्या दिवशीच्या वॉर्म अप मिटिंगमध्ये एक नवा चेहरा दिसला. सणसणीत उंच, सडसडीत प्रमाणबद्ध देहयष्टी, देखणा सावळा चेहरा, कुरळे केस आणि खूप उत्सूक चमकदार डोळे. त्याची सतत सर्वांशी बडबड सुरू होती. बोलणं प्रामुख्याने इंग्रजी भाषेत आणि मध्येमध्ये थोडेफार हिंदी शब्द. उच्चारांमध्ये दाक्षिणात्य लकब. नाव... मित्र म्हणू त्याला. कारण तो खरोखरच सगळ्यांचा खूप चांगला मित्र असल्याचं जाणवत होतं. मी त्याला पहिल्यांदाच बघत होते, दोन तीनदा आमची नजरभेट झाली. मग तो स्वत:च आला माझ्याजवळ. हॅलो... त्याने हात पुढे केला. मी हात जोडले आणि नमस्ते म्हटलं. तो एक क्षणभर गडबडला, लगेच म्हणाला, हम हॅलो बोलके, शेकहँन्ड करके विश करते है... मी म्हटलं, हम तो नमस्ते ही करते है... एक क्षणभर रोखून बघीतलं त्याने , माझे नमस्कारासाठी जुळवलेले दोन्ही हात हातात घेऊन शेकहँन्ड केला आणि हसू लागला. मी ही मोकळेपणाने हसले... आश्चर्यंच होतं, मी इतकी चटकन कोणातच मिसळत नाही.. मग आत्ता... मला माझंच नवल वाटत राहिलं... इतकी जवळीक कोणाशी साधणं किंवा कोणाला साधू देणं, हे माझ्या बाबतीत नव्यानेच घडत होतं. तो आणखी काहीतरी बोलून माझ्या सिनीयर राजेशच्या खांद्यावर हात टाकून बाहेर निघून गेला.
थोड्याच वेळात आपापल्या बॅगा घेऊन आम्ही बाहेर पडलो. तो नव्हता आमच्यासोबत. नेहमीप्रमाणे कामाला सुरूवात झाली आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांच्या बोलण्यातून त्याच्याबद्दल काही तपशील समजले. पुण्यातल्या गर्भश्रीमंत घरातला तो एकुलता एक मुलगा. प्रचंड लाडावलेला. केरळी ख्रिश्चन. शिक्षण बी. कॉम. घरातलं वातावरण खुलं आणि कर्मठही. ही दोन भावंडं. मोठी बहिण, मराठी मुलाच्या प्रेमात पडलेली. तो मुलगा मुंबईकर, शिक्षणासाठी पुण्यात गेलेला. तिचे वडील जमदग्नी आणि बहिणीला त्याच मुलाशी लग्न करायचं होतं. आई साधी गृहिणी. बहिणीने वडिलांचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला आणि त्यांचा ठाम नकार पाहून पळून जाऊन लग्न केलं. दोघं लग्नानंतर आई आणि भावाचा निरोप घेऊन मुंबईत आले. मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबातला. याची बहिण नव्या घरी रूळली खरी, पण आई आणि भावाची आठवणही यायची. मग कधीतरी वडिलांच्या नकळत फोन करून खुशाली घेणं, चोरून भेटणं चालायचं. मोबाईल नव्हते ना तेव्हा. कधीतरी वडिलांना या सगळ्याचा सुगावा लागला. मुलीने अशा पद्धतीने लग्न केल्याने ते संतापलेलेच होते. त्यात बायको आणि मुलगा अजून तिच्याशी संबंध ठेवून आहेत, हे समजल्यानंतर आणखी चिडले. मग वारंवार भांडणं, चिडचिड, मनस्ताप. कधीतरी या सगळ्याचा कडेलोट झाला आणि हे महाशय घरातून बाहेर पडले. मुंबई गाठली. बहिण आणि तिच्या कुटुंबियांशी बोलले. स्वत: नोकरी करायच्या प्रयत्नांना लागले. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ही नोकरी. पुण्यातून मुंबईत येऊन जेमतेम महिना उलटला होता, पण प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तो प्रचंड मेहनत करत होता. आईची आठवण आली की हळवा व्हायचा. आधीचं आयुष्य खूपच ऐशारामात गेलेलं, त्यामुळे मुंबईतल्या धकाधकीशी जुळवून घेतानाही त्रास होत होता. सर्व मित्र-मंडळीही मागे सोडून आलेला. इथे मात्र आपल्या वागण्याने आणि कामातल्या मेहनतीने सगळ्यांना जिंकून घेतलं होतं. मला बघताक्षणीच तो वेगळा वाटलेला... आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल चांगलं मत झालंच. एकदम घर सोडायचा निर्णय आततायी वाटला, पण एकंदर आपल्या विचारांशी प्रामाणिक दिसतोय, असं मत झालं.
मग त्या दुपारी जेवणासाठी आम्ही एकत्र जमलो, तिथे तो सुद्धा आला. इतरांनी बाहेरून मागवलेलं खाणं आणि मी नेहमीप्रमाणे नेलेला पोळी-भाजीचा डबा. इतरांबरोबर त्यालाही खाण्याचा आग्रह केला. त्यानेही आढेवेढे न घेता नीट खाऊन घेतलं. अगदी खूप वर्षांपासून ओळख असावी तितक्या सहज आमचं बोलणं होत होतं. इतरांशी बोलतानाही त्याचं माझ्याकडे अधूनमधून बघणं मला जाणवत होतं, पण आश्चर्य म्हणजे मी अजिबातच चिडले नाही. जेवणानंतर आम्ही पुन्हा कामाला सुरूवात करणार, तोच राजेश सर माझ्याकडे आले. मला म्हणाले , आज मुझे जल्दी निकलना होगा, आप इनके साथ कंटिन्यू कर लेना, फिर शाम को सब इकठ्ठा ऑफीस चले जाना... त्याला हाक मारून बोलावून घेत, मला सांगितलेलं पुन्हा त्याला सांगत राजेश सर निघूनही गेले. मी क्षणभर गोंधळले, मग त्याच्याकडे पाहिलं. चले? त्याने विचारलं आणि आम्ही निघालो.
काम नेहमीसारखं पार पडलं, आमचं मैत्र चटकन जुळलं. सोबत चालताना, बोलताना त्याने बरंच काही सांगितलं, माझ्याबद्दल विचारलं, अगदी सहज छान गप्पा झाल्या आमच्या. मग संध्याकाळी ऑफीस आणि तिथून घरी. नेहमीप्रमाणे दिवसभरातल्या घडामोडी जेवताना घरच्यांच्या कानावर घातल्या, अर्थात त्या मित्राबद्दलही सांगितलं. सलग कामाचा सहावा दिवस होता, माझा थकवा आई-बाबांना दिसत होता. तुझी दगदग होतेय, तर सोडून दे हे काम... आता महिना-दीड महिन्यात निकाल लागेल, तोवर आराम कर. मग आहेच काम करायचं... आई-बाबांनी समजावलं.. आत्ता अजून तरी जमतंय मला, आणखी काही दिवस करून बघते, असं सांगत मी झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी रविवार, सुट्टीचा दिवस. मागचा आठवडा खूपच धावपळीचा होता, त्यामुळे मी निवांतपणे दिवस घालवला आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कामावर जायला निघाले. पावसाचे दिवस होते. मुंबईतला परिचयाचा धो-धो पाऊस कोसळत होता. जावं की नाही या विचारात मी बसची वाट बघत होते, इतक्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. अरे विशू... कुठे निघालास... मी विचारलं. हा विशाल. जन्मापासून मूकबधीर, पण खूप हुशार. आई वडील सुशिक्षित, त्यामुळे याला विशेष मुलांच्या शाळेत घातलेलं. पवईहून पार्ल्याला एकटा ये-जा करायचा. वय १६-१७ च्या आसपास, इयत्ता सहावीत होता तेव्हा. मला म्हणाला, ताई... पाऊस... शाळा... शाळेत स्पीच थेरेपी घेत असताना तो थोडेफार उच्चार शिकलेला. मला लीप रिडींग बऱ्यापैकी जमतं आणि त्याच्यासाठी ते जास्त सरावाचं. त्याच्या घशातून अर्धवट उमटलेले शब्द मी ऐकले आणि कामावर जायचं ठरवलं. इतका पाऊस असताना हा एवढासा मुलगा, ज्याला धड बोलताही येत नाही, तो शाळेत जाणार आणि आपण कामावर जावं का, याचा विचार करावा, याची मलाच लाज वाटली. आम्ही सोबतच बसमध्ये चढलो आणि अंधेरीला पोहोचल्यानंतर आपापल्या मार्गाला लागलो.
मी पोहोचले तोवर बरेचजण पोहोचत होते. नेहमीप्रमाणे वॉर्मअप मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये रोज कोणीतरी एखादा किस्सा, विनोद, गाणं असं काहीतरी सादर करायचं, एकमेकांना स्फूर्ती द्यायची, असा शिरस्ता होता. आज माझी पाळी होती. क्षणभर विचार करून मी सकाळचा विशूचा किस्सा सांगितला. तो सगळ्यांना आवडला आणि तसं बहुतेकांनी आवर्जुन सांगितलं सुद्धा. मग निघायची लगबग सुरू झाली आणि माझा नवा मित्र समोर येऊन उभा राहिला.
राजेश ने कॉल किया था, वो लेट हो जाएगा... उसने सजेस्ट किया, हम दोनो आगे निकल जाएंगे, वो हमे जॉइन कर लेगा.. ठीक है, म्हणत मी निघाले... मग चालता-चालता त्याने माझा किस्सा आवडल्याचं सांगितलं. पण ऐकणाऱ्यांमध्ये मला तो दिसला नव्हता. तो उशीरा आला होता आणि मागे शांत बसून त्याने तो किस्सा ऐकल्याचं मला सांगितलं. ठीक आहे, अशा आशयाने मी मान डोलावली आणि आम्ही निघालो. आज आम्ही दोघंच पुढे निघालो. ग्रुप मधले बाकीचे सगळेच उशीरा येणार होते...
क्रमश:
जडण-घडण 1 , 2 ,3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13, 14 , 15

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

19 Dec 2014 - 8:13 pm | एस

या वळणाची वाट पाहत होतो! ;-) वा, मजा येतेय वाचताना. पुभाप्र!

खटपट्या's picture

20 Dec 2014 - 2:36 am | खटपट्या

+१

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 1:05 am | मुक्त विहारि

"आपले निर्णय आपण घ्यायचे, त्यावर ठाम राहायचं आणि मग त्या निर्णयाला जोडून येणारी जबाबदारीही स्वीकारायची. तिथे पळवाटा शोधायच्या नाहीत. अपयश आलं तर ते पचवायचं, आपल्या चुका शोधायच्या ,मान्य करायच्या आणि पुन्हा पुढे चालू लागायचं..."

मस्तच....

बहुगुणी's picture

20 Dec 2014 - 1:20 am | बहुगुणी

फ्लॅशबॅक!...अर्थातच योग्य ठिकाणी 'क्रमशः' आलंय :-)

माधुरी विनायक's picture

22 Dec 2014 - 4:57 pm | माधुरी विनायक

स्वॅप्स, खटपट्या, मुक्त विहारी, बहुगुणी आणि सर्व वाचक-प्रतिसादकांचे मनापासून आभार...