जडण-घडण 10

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
22 Aug 2014 - 6:08 pm

ऑफीसमध्ये जाणं शक्यच नव्हतं. फोन करून कळवलं. शिकवण्या बंद होत्या आठवडाभर, त्यामुळे मुलं नव्हती. खूप चिडचिड व्हायची माझी. असं आजारी होऊन पडून राहणं अजिबात आवडत नव्हतं आणि ऑफीसमधलं काम आवडू लागलं होतं. त्यात हा खंड. आतापर्यंत वर्षभरातून फारतर एकदा, ते सुद्धा तापाचं आजारपण. त्यात सुद्धा दोन दिवसांच्या वर नाहीच. त्यामुळे कांजण्यांचा त्रास जरा जास्तच जाणवत होता.
मग जवळ राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मॅडम आजारी असल्याचं समजलं. इयत्ता चौथीतला विद्यार्थी. मला बघायला घरी आला. मी झोपले होते. तो आल्यावर डोळे उघडून त्याच्याशी बोलले, अभ्यासाबद्दल विचारलं. उठता मात्र नाही आलं मला, अगदीच गलीतगात्र झाले होते. त्याच्या डोळ्यात पाणी बघून आणखी वाईट वाटलं. अभ्यास कर चांगला, असं सांगून मी पुन्हा डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी हा पठ्ठा पुन्हा हजर. या वेळेस हातात काही पुस्तकं. आईने त्याला जरा दटावलंच. अरे, तुझ्या मॅडमना बरं नाही, आराम करू देत. अभ्यास कसा घेता येईल तिला... त्यावर त्याचं उत्तर, मी माझा-माझा अभ्यास करतो ना... पण इथे, टीचर समोर बसू द्या नं... बरं, बस. पण गोंगाट नको. पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो चटकन बसला आणि अभ्यासाला लागला. अधनं-मधनं त्याच्या टिवल्या-बावल्या सुरूच होत्या. दुसऱ्या दिवशी त्याच्या बरोबर आणखी एक विद्यार्थी हजर. दंगा करणार नाही, असा माझ्या आईला शब्द देऊन दोघे बसले. पण मग हळूहळू मस्ती सुरू झाली आणि आजारपणामुळे उखडलेली मी माझ्याही नकळत माझ्या वैतागण्यामधून, चिडचिडीमधून बाहेर पडू लागले.
साधारण आठवडाभरानंतर मला बरं वाटू लागलं आणि मी ऑफीसमध्ये दुसऱ्या दिवसापासून येत असल्याचं कळवलं. घरी येणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना अगदी मनापासून थँक्यू म्हटलं. टीचरना त्रास होत असताना आपण थोडं हसवू शकलो, याचा गमतीदार आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. उद्यापासून मी ऑफीसला जाणार, पण काही अडलं तर खुशाल यायचं, असं त्यांना बजावलं आणि दोघांच्याही हातावर चॉकलेट्स देऊन घरी पाठवलं.
ऑफीस नियमीतपणे सुरू झालेलं. सर्वांनी स्वत: येऊन खुशाली घेतली आणि जेवणाच्या वेळी दोन आर्टीस्ट मला वरच्या मजल्यावर घेऊन गेले. माझ्यासोबत एक इंग्रजी आणि एक हिंदी, असे दोन कॉपीरायटर होते. त्यापैकी इंग्रजी कॉपीरायटर पंचेचाळीशीचे गृहस्थ होते. त्यांचं घर जवळ होतं, त्यामुळे ते जेवायला घरी जायचे. एक जबाबदार वरीष्ठ. खूप वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. त्यांच्याकडे माहितीचा, अनुभवांचा खजिना होता. टिपीकल ब्रिटीश विचारसरणीचे ख्रिश्चन गृहस्थ. शिस्तीचे भोक्ते. खूप गोष्टी त्यांच्याकडून कळत-नकळत शिकता आल्या. त्यांचा करडा आणि माझा भीडस्त स्वभाव हळूहळू निवळला आणि मग त्यांच्याशी छानच गट्टी झाली.
दुसरे गृहस्थ हिंदी कॉपीरायटर. प्रथमदर्शनी कवी वगैरे दिसणारा साधारण सत्ताविशीचा तरूण. सुरूवातीला माझ्याशी फटकूनच वागायचा. माझंही वागणं जेवढ्यास तेवढं. तो दिल्लीचा होता. मुंबईत पेईंग गेस्ट म्हणून राहायचा आणि बाहेरच जेवायचा. दिसायला लेखकछाप पण बोलायला बऱ्यापैकी आक्रमक. मग कधीतरी त्यानेच सांगितलं, मी कमी पगारावर काम करणार असल्यामुळे तो माझ्यावर नाराज होता. त्यामुळे म्हणे चुकीचा पायंडा पडू शकणार होता. मला याची कल्पनाच नव्हती. नंतर माझी बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याने मनातली अढी काढून टाकली आणि मग त्याच्याशीही चांगली मैत्री झाली. तो जेएनयू चा विद्यार्थी. लेखक म्हणून काम करण्यासाठी आणि नाव कमावण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये धडपडत होता. काही नियमीत उत्पन्न मिळावं, म्हणून हे काम करत होता. सुरूवातीला माझ्यावर त्याचा बराच प्रभाव पडला. त्याचं लिखाण, मुद्दा मांडायची पद्धत यामुळे तो ग्रेट वगैरे वाटत राहिला. नंतर मात्र जसजशी जावेद अख्तर, गुलजार इ. वाचत गेले, तसतसा त्याच्या कॉपीजमधल्या कल्पनांचा किंवा शब्द, उपमांचा उगम कळत गेला आणि माझ्या वाचनाचा आवाका समजू लागल्यानंतर त्याने माझ्यासमोर बाता मारणं बरंच कमी केलं...
या दोघांव्यतिरिक्त आमच्या ऑफीसमध्ये साधारण आठएक कलाकार होते, फाईन आणि कमर्शीअल आर्टीस्ट. बहुतेक वसई-विरारवाले. दोनच मुली. त्यापैकी एक बंगाली आणि एक मराठमोळी, पण कॉन्व्हेंट संस्कृतीत वाढलेली. बंगाली मुलगी सुरूवातीला शिष्ट वाटली. वयाने माझ्यापेक्षा मोठी, अविवाहित. मध्यम उंच आणि रेखीव. कलाकाराला साजेसं सुरेख टापटीप राहायची. मराठी मुलगी साधारण माझ्याच वयाची. पावणेसहा फूट उंच, लख्ख गोरी, प्रमाणबद्ध शरीरयष्टी. काळेभोर केस आणि तितकेच काळेभोर पारदर्शी डोळे. अतिशय देखणी. चटकन आणि तीव्र प्रतिसाद देणारी. चटकन चिडणारी, चटकन रडणारी आणि तितक्याच चटकन खळखळून हसणारी. तिचा चेहरा सहज वाचता यायचा. आजवर खूप जणांना भेटले, अनेकांशी सुरेख सूर जुळले, पण खरं सांगते, या मुलीइतका दुसरा पारदर्शी चेहरा मला अजून सापडलेला नाही.
या दोघींशीही माझं चांगलंच जुळलं. मग आणखी दोन नवीन मुलं आली. एक खूप उंच आणि दुसरा त्याच्या तुलनेत बुटकाच, साधारण साडेचार-पावणेपाच फूट उंच. दोघेही विद्यार्थी. कलाकार. शिकता-शिकता प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊ इच्छिणारे. अल्प मानधनावर काम करणारे.
उंच मुलगा यवतमाळचा. आई-वडील शिक्षक. दोघांचीही इच्छा, यानेही शिक्षक व्हावं. याच्या बोटांना मात्र रंग रेषांची ओढ. मारून-मुटकून हिंदी विषय घेऊन बी.ए. पूर्ण केलं. मग दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून आर्ट टीचर डिप्लोमा केला आणि कला शिक्षक म्हणून दोन वर्षं शिकवलं. पण जीव रमत नव्हता. शेवटी आई- वडिलांसमोर बसून मन मोकळं केलं. मला जे करावंसं वाटतंय, ते एकदा करू द्या. काहिशा अनिच्छेने वडिलांनी परवानगी दिली आणि बी.ए., ए.टी.डी. अशी शैक्षणिक पात्रता असलेला हा मुलगा दहावीमधून पुढच्या वर्गात आलेल्या मुलांबरोबर मुंबईतल्या आर्ट स्कूलमध्ये कलेची साधना करू लागला. खर्चासाठी वडिलांसमोर हात पसरायचा नाही, म्हणून हा स्वाभिमानी मुलगा शिकतानाच चार पैसे कमावण्यासाठी धडपडत होता. हा सुद्धा सुरूवातीला बऱ्यापैकी बुजरा होता. मग वाचनाच्या आवडीचा धागा जुळला आणि मैत्री पक्की झाली. आमची मैत्री अगदी आजही अबाधित आहे. माझ्या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ याने तयार केलं, तर याच्या लग्नाच्या सेटचं डिझाइन आम्ही दोघांनी अंधेरी पूर्वेच्या वांछा सिद्धीविनायक मंदिरात बसून पूर्ण केलं. याची बहीण आणि बायकोही माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. याच्या मुला-मुलीची नावं मीच सुचवली. सांगायला अभिमान वाटतो की शिक्षण पूर्ण केल्यानंतर साधारण दोन वर्षं मुंबईत काम केल्यानंतर त्याने यवतमाळला परतण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याने स्वत:चा सेट-अप सुरू केला आणि आजघडीला त्याने उत्तम जम बसवून आई-वडिलांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
दुसरा छोटू. अगदी आजही मी याला छोटू म्हणते. दोन भावांमधला मोठा. मध्यमवर्गीय कुटुंबातला. साधं-सरळ कुटुंब. टक्केवारीची स्पर्धा नव्वदीच्या आसपास रेंगाळत होती, तेव्हा याला दहावीला चौऱ्यांशी टक्के मिळाले होते आणि चांगलं सायन्सला जायचं सोडून आर्ट स्कूलला गेला म्हणून अनेकांनी त्याला वेड्यात काढलं होतं. हा सुद्धा त्या मराठी कलाकार मुलीसारखा जरासा पोरकट आणि चटकन चिडणारा. पण तिच्यासारखा लगेच राग नाही विसरायचा. धुमसत राहायचा. मग बाकीची वरीष्ठ कलाकार मंडळी त्याला आणखी चिडवायची, डिवचायची. अती झालं की रडवेला होऊन माझ्याकडे यायचा. बघ ना... म्हणून सुरू... सगळं बोलून मोकळं वाटलं की मग थोडंसं हसायचा... सॉरी, तू कामात होतीस ना, पण थँक्स... मला खूप बरं वाटलं, आता जातो, म्हणायचा... कधीतरी शेजारी बसून काही स्क्रिबल्स करत राहायचा. त्याला प्रवासात, स्टेशनवर, रस्त्यावर कॅरेक्टर्स दिसायची. मग साहेब तिथेच थांबून स्केचबुक बाहेर काढून रेखाटायला सुरूवात करत. आवर्जून दाखवायचा. माझी चित्रकला चांगली नसली तरी या वातावरणामुळे जाण मात्र प्रगल्भ होत चालली. सध्या हा छोटू एका आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेत आर्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे, बरं का...

क्रमश:

जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270
जडण-घडण 6
http://www.misalpav.com/node/28354
जडण-घडण 7
http://www.misalpav.com/node/28383
जडण-घडण 8
http://www.misalpav.com/node/28437
जडण-घडण 9
http://www.misalpav.com/node/28519

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

22 Aug 2014 - 6:27 pm | एस

तुमच्या जडणघडणीचे टप्पे (म्हणजे लेखाचे टप्पे) फार विचारपूर्वक आखले आहेत. केवळ मनात आलं म्हणून खरडलं असं हे लेखन नाहीये. मस्त. पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

22 Aug 2014 - 7:21 pm | मुक्त विहारि

हा पण भाग आवडला...

चित्रगुप्त's picture

22 Aug 2014 - 8:40 pm | चित्रगुप्त

लिखाण एकदम आवडले. आता भाग १ पासून सर्व वाचणार आहे.
जाहिरात क्षेत्राविषयी सुरुवातीपासूनची समग्र माहिती देणारा लेखही लिहावा. उदाहरणार्थ पौराणिक - ऐतिहासिक काळी 'जाहिराती' असत का? कश्या ? या व्यवसायाची सुरुवात केंव्हा, कशी, कुठे झाली? आता त्याची व्याप्ती किती आहे? जाहिरातीचे लोकांवर होणारे परिणाम, इ.इ.

अजया's picture

22 Aug 2014 - 8:53 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र

हर्षच's picture

22 Aug 2014 - 9:17 pm | हर्षच

मस्त
सर्व भाग वाचले. पुभाप्र.

दादा कोंडके's picture

22 Aug 2014 - 10:12 pm | दादा कोंडके

अगदी बाळबोध लेखन झालंय. कथनात प्रांजळपणा हवा होता. वास्तविक या वयात जडणखडण म्हणता यावी असं म्हणण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. वैचारिक द्वंद्व, वयामुळे येणारा एक बेफिकीरपणा आणि दुसर्‍या (विषेशतः आधिच्या) पिढीतल्या लोकांबरोबर होणारे मतभेद, स्वातंत्र्याची ओढ, शारिरीक बदल पचवताना येणारं दडपण, विरुद्धलिंगी व्यक्तींचं आकर्षण आणि हुरहुर वगैरे.

असं प्रत्येकाच्या आयुष्यात व्हायलाच हवे का?

रुपी's picture

22 Aug 2014 - 10:27 pm | रुपी

आणि तुमच्या त्या दोन विद्यार्थ्यांचंही कौतुक! इतक्या लहान वयातही त्यांना बरीच समज होती.

खटपट्या's picture

23 Aug 2014 - 1:36 am | खटपट्या

आवडला !!

माधुरी विनायक's picture

4 Sep 2014 - 5:49 pm | माधुरी विनायक

स्वॅप्स, मुवी, चित्रगुप्त, अजया, हर्षच, दादा कोंडके, रूपी, खटपट्या आणि तुम्हा सर्व वाचकांच्या प्रतिक्रिया उत्साह वाढवताहेत.
चित्रगुप्त यांस - जाहिरात क्षेत्राबद्दल फार अभ्यास नाही माझा आणि अर्धवट माहिती देणं पटणार नाही. शक्य होईल तेव्हा तुम्ही विचारणा केलेले तपशील जाणून घेऊन नंतर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.
दादा कोंडके यांस - खरंच बाळबोध झालं असेल.. मान्य. पण प्रांजळ नाही, असं नाही म्हणता येणार. काही तपशील कथनाच्या ओघात पुढे येतील.
एक सांगू का, तुमची प्रतिक्रिया वाचून मनात पहिला उमटलेला विचार म्हणजे, माझी जडण घडण ही एखाद्या मसाला चित्रपटाची कथा नाही हो. तुम्ही म्हणताय ते अगदीच चुकीचं नसेलही. मला नेमकं नाही सांगता येणार पण माझ्या सुदैवाने "वैचारिक द्वंद्व, वयामुळे येणारा एक बेफिकीरपणा आणि दुसर्‍या (विषेशतः आधिच्या) पिढीतल्या लोकांबरोबर होणारे मतभेद, स्वातंत्र्याची ओढ, शारिरीक बदल पचवताना येणारं दडपण, विरुद्धलिंगी व्यक्तींचं आकर्षण आणि हुरहुर वगैरे" माझ्या बाबतीत थोड्या वेगळ्या स्वरूपात सामोरे आले असतील...
असो. पुन्हा एकदा आभार.

प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद देत नसलो तरी लेखमाला वाचतो आहे. तुमच्या लेखनातील प्रांजळपणा, सहजता आणि साधेपणा आवडला. लिहित राहिल्याबद्दल धन्यवाद!

मराठी कथालेखक's picture

13 May 2016 - 6:25 pm | मराठी कथालेखक

प्रत्येक भागागणिक आत्मस्तुतीकडे कल वाढत असल्याचे दिसत आहे.. हे टाळले असते तर बरे झाले असते.
असो.