जडण-घडण...6

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
21 Jul 2014 - 6:15 pm

डी.एड्. च्या त्या दोन वर्षांनी मला भरभरून दिलं. उत्तम गुण मिळवून पाणावल्या डोळ्यांनी आम्ही सर्वांनीच विद्यालयाचा निरोप घेतला. आधी वरचेवर होणारं बोलणं कालांतराने कमी होत गेलं पण मैत्रीची नाळ मात्र टिकली.
त्यानंतर सुरूवात झाली नोकरी शोधायला. डी.एड्. करण्यापूर्वी वरचेवर वर्तमानपत्रात दिसणाऱ्या पाहिजेत च्या जाहिरातींना आता महत्व आलं. हो -ना करता-करता घरापासून चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर असणाऱ्या एका विद्यालयात प्राथमिक शिक्षकाचं पद रिक्त असल्याचं समजलं. उत्साहाने शाळेत पोहोचले. पहिला पाठ घेतला आणि निरीक्षकांनी 'उद्यापासून या' असं सांगितलं. मी खूष. पगार... पाचशे रूपये फक्त. धक्का नाही ना बसला? ही गोष्ट १९९७ सालची आणि शाळा मुंबईतली.
शाळा चालत येण्या-जाण्याच्या अंतरावर. मी अगदी मनापासून रूळले शाळेत. खूप उपक्रम राबवले. अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलांना जाणीवपूर्वक पुढे आणलं. बुजऱ्या, गरीब पण हुशार मुलांनी एरवी पुढे-पुढे करणाऱ्या मुलांच्या बरोबरीने धीट व्हावं, त्यांना आत्मविश्वास द्यावा, यासाठी एका वेळी चक्क दोन किंवा तीन मुलांना परीक्षेत दुसरा/ तिसरा गुणानुक्रमांक विभागून द्यायचे उद्योग केले. हस्तलिखितं करून घेतली. शाळेच्या जवळ जवळ सगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं. मुलांसोबत वावरताना खूप-खूप शिकले. शिक्षक मुलांना शिकवतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त मुलं शिक्षकांना शिकवत असतात, हा माझा वैयक्तिक अनुभव. वर्गात मनाविरूद्ध काही झालं की नकळत मम्मी म्हणून हाक मारणारा निखिल, असंख्य लहान मुलांच्या सार्वत्रिक सवयीप्रमाणे मध्येच काहीतरी आठवून ते सांगायला पप्पा... अशी हाक मारणारी नेहा (हो, पप्पाच. बरोबर वाचलंत तुम्ही), ईद च्या दुसऱ्या दिवशी भलामोठा डबा भरून स्वादिष्ट शिरकुर्मा आणणारी साबिया... बाईंनी वर्गातल्या नाटकात घ्यावं म्हणून मोठ्या बहिणीला माझ्या घरी घेऊन आलेला गणेश... खूप मोठी यादी आहे. आणखी एक मुलगा आठवतो, त्याच्या उच्चारांमुळे... दत्पर, पुस्कत, पिवशी... असलं भन्नाट बोलायचा तो. शब्द सरळ उच्चारता यायचे, तरी... या मुलांनी भरभरून केलेलं प्रेम आणि टाकलेला विश्वास याचं मोल नाही. मी आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं, पण या क्षेत्रात मिळालेल्या समाधानाला तोड नाही. गंमत म्हणजे यातली बहुतेक मुलं अवचित कधीतरी समोर येतात, हाक मारतात, आठवणीत रमतात, तेव्हा इतकं छान वाटतं ना, की बस्स...
अर्जुन नावाचा एक मुलगा अजून आठवतो. पहिलीच्या वर्गाची मी वर्गशिक्षिका होते, तेव्हा तो माझ्या वर्गात होता. आई-वडीलांची स्थिती बेतास बात. हा मुलगा गतीमंद होता. पण त्याच्या आईने त्याला या शाळेत घातलं होतं. समजावूनही त्यांनी अर्जुनला दुसऱ्या शाळेत किंवा उपचारासाठी दुसरीकडे नेलं नाही. दुर्दैवाने मलाही त्याच्यासाठी फार काही करणं शक्य झालं नाही. त्याला शिकवलेलं फारसं कळायचं नाही. छोटंसं सलग वाक्यही बोलता यायचं नाही. तो आधी शिशु वर्गातही गेलेला नव्हता. वह्या-पुस्तकं सगळी आणायचा, पण वह्या सगळ्या रेघोट्यांनी भरलेल्या, बहुतेक पानं फाडलेली. एक दिवस शाळा भरल्यानंतर पहिला तास संपला असावा आणि त्याची आई भेटायला आली. मी मुलांना अभ्यास देऊन त्यांना भेटायला वर्गाबाहेर गेले. त्यांच्या हातात एक वही होती. डोळ्यात पाणी. मला काही कळेना. कोणी त्रास दिला होता का अर्जुनला वर्गात आणि माझ्या लक्षात आलं नाही... पण मी तर त्याच्या बाबतीत नेहमीच काळजी घ्यायचे.. अगदी मधल्या सुट्टीतही माझी एक फेरी असायचीच वर्गात... मी त्यांना विचारलं, काही झालंय का... त्यांच्या डोळ्यातलं पाणी ओघळलं. मला म्हणाल्या, बाई, ही वही बघा... काही न समजून मी वही हातात घेतली... त्यात अ हे अक्षर ३-४ वेळा लिहिलं होतं. दुरेघी वही. लिहिल्यानंतर जी ओळ मोकळी सोडायची असते, त्या ओळीत लिहिलेलं. अर्जुनची आई सांगू लागली... काल अर्जुनने लिहिलं. बाई हे शिकवल्या.. असं म्हणाला... अ हे एक अक्षर त्याला लिहिता येणं आणि ३ शब्दांचं पूर्ण वाक्य बोलता येणं, ही त्यांच्या लेखी खूप मोठी गोष्ट होती. त्या रडूच लागल्या. मी वयाने त्यांच्यापेक्षा तशी लहानच होते. मी ही भांबावून गेले. पण कसंबसं शांत केलं त्यांना. अर्जुनचं काही होणार नाही, त्याला शाळेत घालण्यात अर्थ नाही, असं सांगून घरातल्यांनी त्याला शाळेत घालायला खूप विरोध केला होता. त्या आईने मात्र सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्याला शाळेत घातलं. त्याने लिहिलेलं ते अक्षर आणि उच्चारलेलं वाक्य, हा त्यांच्यासाठी मोठाच विजय होता.
मग त्यांना समजावून सांगितलं. गतीमंद मुलांच्या शाळेत त्याला घालण्याबद्दल पुन्हा सांगितलं. पण त्यांनी याच वर्गात हे वर्ष पूर्ण करू द्यात, अशी विनंती केली आणि त्या निघून गेल्या. वर्ष अखेर त्या निकाल घ्यायला आल्या. अर्जुन अर्थात नापास झाला होता. तरीही त्या हसऱ्या चेहऱ्याने भेटून गेल्या. त्याला वेगळ्या शाळेत घालणार, हे सांगून गेल्या. नंतर मात्र कधी भेट नाही झाली त्यांची...

क्रमश:

जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण ४
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

धन्यवाद!

मुलांसोबत वावरताना खूप-खूप शिकले. शिक्षक मुलांना शिकवतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त मुलं शिक्षकांना शिकवत असतात, हा माझा वैयक्तिक अनुभव.

हे आई-बाबा या भूमिकांनाही तंतोतंत लागू आहे.

खूप छान. आवडलं एकदम. अर्जुनच्या विजयाबद्दल त्याचे, त्याच्या आईचे व तुमचे अभिनंदन. (स्वगत - संवेदनशीलतेच्या सीमारेषा व्यवहारात कधी धूसर होत जातात हे हल्ली जाणवत नाही तितकंसं... हम्म्म्)

मुक्त विहारि's picture

22 Jul 2014 - 12:03 am | मुक्त विहारि

ह्या इतक्या मुलांत , मला मात्र "अर्जून"च लक्षांत राहिला.

खटपट्या's picture

22 Jul 2014 - 12:18 am | खटपट्या

खूपच छान ! अर्जुन आणि त्याच्या आईचा अनुभव हेलावून गेला

रेवती's picture

22 Jul 2014 - 1:16 am | रेवती

वाचतीये. हे लेखन आवडलं.

पहाटवारा's picture

22 Jul 2014 - 7:08 am | पहाटवारा

काल्-परवाच्या बंगलोर अन काकीनाडाच्या बातम्यांनी मनाला आलेले मळभ थोडे का होईना दूर करणार्‍या या आठवणींनी बरे वाटले.
लिहित रहा.. तुमचा स्वर अन सूर अतीशय प्रामाणीक आहे..
-पहाटवारा

मितभाषी's picture

22 Jul 2014 - 8:36 am | मितभाषी

हेच बोलतो.

स्वाती दिनेश's picture

22 Jul 2014 - 1:37 pm | स्वाती दिनेश

हा भागही आवडला.
स्वाती

स्मिता चौगुले's picture

22 Jul 2014 - 1:42 pm | स्मिता चौगुले

खूपच छान !

माधुरी विनायक's picture

30 Jul 2014 - 12:27 pm | माधुरी विनायक

स्वॅप्स, मुवी, खटपट्या,रेवती, पहाटवारा, मितभाषी, स्वाती दिनेश, स्मिता चौगुले आणि सर्व वाचकांचे आभार... विद्यार्थ्यांच्या असंख्य आठवणी मनात घर करून राहिल्यात.. मला हे क्षेत्र अनुभवता आलं, इतकं निर्भेळ, निरपेक्ष प्रेम आणि विश्वास मिळाला, हे मोठंच भाग्य..