जडण-घडण...4

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
26 Jun 2014 - 4:43 pm

अशी खूप वर्षं सरली. दहावी इयत्तेनंतर गावी जाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. शिक्षण सुरूच होतं. फारसा विचार किंवा प्रयास न करता चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळून गेला. एखाद-दुसरा अपवाद वगळता ओळखीचं फारसं कुणी नव्हतं. कोणाच्या अध्यात-मध्यात नाही, अशी ती अकरावी-बारावीची दोन वर्षं निघून गेली.
बारावीचा निकाल लागला आणि मी आमच्याच कॉलेजमध्ये पुढच्या वर्षासाठी प्रवेश घेतला. त्या छोट्याश्या कालावधीतही लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे अनंत भावे सर. मराठी शिकवायचे. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीच त्यांची लेक्चर्स ऐकता आली.
कॉलेज सुरू झालं होतं आणि एक दिवस सातवी ते दहावी अशी चार वर्षं माझ्याच वर्गात असणारी रझिया घरी आली. मधल्या दोन वर्षांत तिचा अजिबातच संपर्क नव्हता. तिला डी. एड्. करायचं होतं आणि कोणाची तरी सोबत हवी होती. डी. एड्. करायला म्हणा किंवा अर्ज भरायला म्हणा. तेव्हा एकट्यानं कुठेही भटकता किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचता येईल, असा आत्मविश्वास अजिबातच नव्हता. माझ्याशी बराच वेळ बोलून ती घरी गेली. पुन्हा आली. आता तिच्या आई-वडिलांची परवानगी मिळवायची होती. तिला मी सोबत हवी होते. आईने मला परवानगी दिली आणि मी तिच्या घरी गेले. तिच्या अम्मी-अब्बांशी बोलले. ते मला ओळखत होते. आम्हाला नाराज करायचं नाही म्हणून किंवा एक प्रयत्न करू दे म्हणून, त्यांनी परवानगी दिली.
दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन रझिया हजर. मला विचारलं, तू पण अर्ज भरणार आहेस ना... मी उत्तरले, अगं माझं कॉलेज सुरू झालंय केव्हाच. मी तुझ्यासोबत अर्ज भरायला येईन. पण तिच्या आई-बाबांचा समज झाला होता की मला सुद्धा अर्ज भरायचा आहे आणि नंबर लागलाच तर तिला माझी सोबत होईल आणि म्हणून ते राजी झाले होते. मला काही सुचेना. संध्याकाळी आई-बाबांशी बोलते म्हटलं आणि मी कॉलेजला निघून गेले. संध्याकाळी आई-बाबांशी बोलले तर त्यांनीही सुचवलं की मला डी.एड्. करणं आवडू शकेल. करीयर वगैरे भानगडी नव्हत्या फारशा डोक्यात. पण आई-बाबांचं सांगणं पटलं आणि रझियाच्या घरी जाऊन मी सुद्धा अर्ज भरणार असल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रझिया तिच्या शेजारच्या आणखी एका मुलीला, मनिषाला घेऊन आली. ती आमच्या पेक्षा एका वर्षानं मोठी होती. तिलाही डी.एड्. चा अर्ज भरायचा होता. वाईट म्हणजे आमच्या चर्चेत तीन दिवस निघून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता.
आम्ही तयारीला लागलो. प्रमाणपत्रांची जमवाजमव केली. घरी कल्पना दिली. संध्याकाळी त्या दोघी पुन्हा घरी आल्या. दुसऱ्या दिवशी सोबत घ्यायच्या कागदपत्रांची उजळणी केली. सकाळी नऊ वाजता निघायचं ठरलं. त्या दोघींचं घर बस स्टॉपच्या जवळ होतं, त्यामुळे मी तिथे नऊ वाजता पोहोचायचं, असं ठरलं आणि त्या दोघी परत गेल्या.
दुसऱ्या दिवशी मी वेळेच्या पाच मिनिटं आधी तिथे पोहोचले. वाट बघू लागले. साधारण 15 मिनिटांनंतर मी कंटाळून तिच्या घरी गेले. तिची आई घरात होती. चटकन पुढे येत मला म्हणाली, अरे तू इथे कशी? मला काही कळेच ना. मी म्हटलं, अहो, सकाळी नऊ वाजता निघायचं ठरलं होतं आमचं. कुठे आहे रझिया? आणि मनिषाचाही पत्ता नाही. आम्ही तिघी जाणार होतो.
त्या म्हणाल्या, त्या दोघी आणि रझियाच्या काकांचा मुलगा, असे तिघे सकाळीच 8 वाजता गेले. आज शेवटचा दिवस आहे ना. तिचा भाऊ म्हणाला, लवकर गेलेलं बरं. पण तुला सांगितलं नाही का? रात्री ठरलं त्यांचं.
त्या जे सांगत होत्या, त्याचा अर्थ माझ्या डोक्यात शिरायला वेळ लागला. असं कसं वागू शकतात या, मला का नाही सांगितलं, रात्री उशीर झाला तर सकाळी सांगता आलं असतं... माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिची आई म्हणाली, बेटा, मला वाटलं, तुला सांगितलं असेल त्यांनी. आता काय करणार तू...
मी बघते काहीतरी... एवढं म्हणून मी तिथून निघाले. भरल्या डोळ्यांनी घरी परतले. घरी कोणीच नव्हतं. आई-बाबा कामावर, मोठी बहिण आणि लहान भाऊ कॉलेजला. मी खूपच दुखावले गेले होते. आधी खूप रडूच आलं. धो-धो रडले. काय करावं कळेना. थोडा वेळ शांत बसले आणि विचार केला. अर्ज भरण्यासाठी परळला जायचं होतं. घरापासून बसने अंधेरीपर्यंत, तिथून पुढे ट्रेन. त्यानंतर कसं जायचं, माहित नाही. ट्रेनने तोवर प्रवास केलाच नव्हता. बाबा खूप घाबरायचे ट्रेनच्या प्रवासाला. अजून घाबरतात. माझाही आजवरचा प्रवास बसनेच झाला होता. मोठ्ठा श्वास घेतला. तसंही माझं स्वत:चं डी. एड्. करायचं ठरलं नव्हतंच, गेलेच नाही तरी काय फरक पडतोय असा विचार करतेय तोच दुसरं दुखावलेलं मन झालेल्या फसवणुकीने उसळलं. का वागल्या असतील त्या असं...
मी बाबांच्या ऑफीसमध्ये फोन लावला. जे झालं, ते त्यांना सांगितलं. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मला म्हणाले, तू नाही गेलीस तरी चालेल. पण जायचा प्रयत्न करणार असलीस तर घाबरू नको. आपल्याला बोलता येतं की नाही? मग आपण काही हरवत नाही एकटे असलो तरी. तुला जे मनापासून करावंसं वाटतं, ते कर. माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत याची खातरजमा करून बाबांनी फोन ठेवला.
मी उठले, रडून विस्कटलेला चेहरा स्वच्छ धुतला आणि निघायचं ठरवलं. आवरून बस स्टॉपवर आले. अंधेरीलाही जाण्याची माझी पहिलीच वेळ. बसचा नंबर माहिती होता. बस आली, मी चढले. तिकीट काढून कंडक्टरलाच स्टेशनपर्यंत कसं जायचं, ते विचारलं. त्यांनीही सांगितलं. स्टेशनवर पोहोचून तिकीट काढलं आणि गर्दीतल्या एका मुलीला विचारलं, परेलला जायला ट्रेन कुठून मिळेल? ३ नं. प्लॅटफॉर्म. इतकं बोलून ती गर्दीत गुडुप झाली. मी आणखीच बावचळले. समोर पायऱ्या दिसत होत्या. बहुतेक लोकं त्या चढून वर जात होते. मी ही निघाले. वर पोहोचल्यानंतर प्लॅटफॉर्म्सना नं. दिल्याचं लक्षात आलं. हुश्श. ३ नं. वर उतरले आणि तिथेच उभी राहिले.
त्याच प्लॅटफॉर्मला ट्रेन येताना दिसली. मी सज्ज उभी. पण ट्रेन थांबली आणि समोरच्या डब्यातून पुरूषांचा लोंढा खाली आला, दुसरा लोंढा आत शिरला. मला काही कळायच्या आत ती ट्रेन सुटली होती. मग लक्ष देऊन पाहिलं तेव्हा पुढे एका ठिकाणी बायका दिसल्या. मी तिथवर पोहोचले. शेजारच्या दोन-तीन मुली/बायकांना, येणारी ट्रेन परेलला थांबेल ना, असं विचारलं. त्यांनी होकार दिला आणि पुढच्या ट्रेनमध्ये मी चक्क चढू शकले. आता परेल आलं, ते कसं कळणार? पुन्हा आसपासच्या बायकांकडे विचारणा. सगळ्यांनी व्यवस्थित माहिती दिली, अगदी परेल कोणत्या स्टेशन नंतर, कोणत्या बाजुला येईल, ते सुद्धा सांगितलं. एका बाईने तर कुठे जायचंय ते ही विचारलं आणि शाळेचं नाव ऐकून मला तिथवरचा रस्ता दाखवायचंही मान्य केलं. मी बरीचशी सावरले.
यथावकाश मी परेलला उतरून त्या बाईसोबत शाळेपर्यंत पोहोचले. जाताना रस्ता लक्षात ठेव, नाही समजलं तर कोणालाही विचार, असं सांगून ती बाई निघून गेली. शाळेत अर्ज भरणाऱ्यांची बऱ्यापैकी गर्दी होती. मी रांगेत उभी राहिले आणि मागच्या-पुढच्या मुलांना विचारून अर्ज, प्रमाणपत्र, प्रती, अशी चळत तयार ठेवली. बराच वेळ त्या दोघी मैत्रिणी दिसतात का, ते पाहिलं. पण नाही दिसल्या त्या.
साधारण सव्वा तासाने माझा नंबर आला. अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रं बघून आतल्या कारकुनाने फी चे पैसे घेतले आणि मी हुश्श करणार तोच त्याने विचारलं, हे काय, तू अटेस्टेशन नाही का केलंस, प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपीज शिवाय अर्ज नाही भरता येणार. मी त्याला खूप लांबून आल्याचं सांगितलं. तो म्हणाला, इथे जवळचं एक जेपी राहतात. त्यांच्या घरी जा आणि तुझ्या प्रमाणपत्रांच्या कॉपीज अटेस्टेड करून आण. पुन्हा रांग लावू नकोस, थेट पुढे माझ्याकडे ये.
मी विचारात पडले. इकडे-तिकडे पाहिलं, तर पानवाल्याचं दुकान दिसलं. धीर करून त्याच्याकडे गेले आणि त्यालाच विचारलं, इथले जेपी कुठे राहतात ते. (जेपी म्हणजे काय, ते सुद्धा मला माहिती नव्हतं) त्यांचं घर जवळंच होतं. त्याने त्यांच्या घरी कसं जायचं, ते सांगितलं. मी भीत-भीत त्यांच्या घरी गेले. कोणी मराठी गृहस्थ होते. मला नाव सुद्धा आठवत नाही त्यांचं. त्यांनी काम विचारलं आणि हसत हसत सह्या करून दिल्यासुद्धा. चहा विचारला, मी नको म्हणाले आणि भरभर पावलं उचलंत शाळेत पोहोचले. कागदपत्रं त्या कारकुनाकडे सोपवली आणि अर्ज भरल्याची पोचपावती घेऊन निघाले.
या गडबडीत दुपारचे दोन वाजत आले होते. मी परतीचा रस्ता आठवत निघाले, तोच मला त्या दोघी दिसल्या. शाळेच्या आवारात, एका बाकावर बसलेल्या. माझा संताप उसळून आला, पण वरकरणी शांत राहात मी त्यांच्याजवळ पोहोचले. त्या दोघीही मला बघून गडबडून उभ्या राहिल्या.
अरे, तू कशी इथे?
अर्ज भरायचा होता ना मला, म्हणून आले होते. पण तुम्ही इथे का बसलाय, आणि भाऊ होता ना सोबत तुझ्या...
हा... पण इथे अटेस्टेशन लागतं ना. भावाला परत घरी पाठवलंय, अटेस्टेशन करून आणायला. आम्ही त्याचीच वाट बघतोय.
मला आताच त्यांच्याचकडून अटेस्टेशनचं कळत असेल, अशा स्वरात सांगितलं त्यांनी.
मी त्यांना अर्ज भरून आल्याचं सांगितलं आणि त्यांचे चेहरे बदलले. दोघींनी सारवा-सारव सुरू केली.
अग, काल रात्री उशीरा आला हिचा भाऊ. तोच म्हणाला लवकर निघूया. तुला सांगायला वेळच नाही मिळाला... वगैरे, वगैरे... दोघी आलटून-पालटून बोलू लागल्या.
ठिक आहे, म्हणत मी त्यांना थांबवलं.
रझिया हळूच मला म्हणाली, ते अटेस्टेशनचं काय केलंस तू...
एक क्षणभर मनात विचार आला... का सांगू यांना? बघू देत भावाची वाट. मला फसवतात काय... पण मग मलाच असं वागू नये, असं वाटलं.
मी त्यांना जेपीच्या घरी जाण्याबद्दल सांगितलं आणि पत्ता समजावून परत निघाले. अजिबात थांबले नाही त्यांच्यासाठी. परतीचा प्रवास असाच विचारत-विचारत झाला. संध्याकाळी पाचच्या सुमाराला घरी पोहोचले. भूक लागलीच होती, दमले होते. जेवून घेतलं.
आधी आई आणि पाठोपाठ बाबा आले. आईला बाबांनी फोन करून सांगितलं असावं. दोघांनी अगदी हात-पाय सुद्धा न धुता मला दिवसभरात काय झालं, ते विचारलं. रेल्वे प्रवासाचा पराक्रम आणि सोबतीसाठी अडून न राहता एकटीने प्रवास करायचा आणखी एक पराक्रम ऐकून दोघांनीही आनंद व्यक्त केला. रझिया आणि मनिषाबद्दल विचारलं, पण तो विषय उगाळत नाही बसले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या दोघी सॉरी म्हणायला घरी आल्या. पण मी शांतच होते.
कहर म्हणजे प्रवेश मिळालेल्यांच्या पहिल्याच यादीत माझं नाव होतं. मला अकरावी-बारावी एनसीसीचे अतिरिक्त गुण मिळाले असावेत. मात्र त्या दोघींपैकी एकीचीही निवड होऊ शकली नाही.
कोणाच्याही सोबतीसाठी अडून राहायचं नाही, हा खूप मोठा धडा शिकले मी तेव्हा. खरंच, पुढे अनेकदा या धड्याने मला आणखी खंबीर बनवलं. डी.एड्. ला नंबर लागला आणि प्रथम वर्ष बी ए चा प्रवेश रद्द करून मी गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयात प्रवेश घेतला. आता इतक्या नावाजलेल्या संस्थेत प्रवेश मिळाल्याचा आनंद मानायचा की तिथे पोहोचण्यासाठी रोज कराव्या लागणाऱ्या रेल्वे प्रवासाला घाबरायचं, ते कळत नव्हतं.
विश्वास ठेवाल, पहिल्या दिवशी माझे आई-बाबा (हो, बाबा सुद्धा. चक्क ट्रेनचा प्रवास करून) मला पोहोचवायला आले होते.
क्रमश:

जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 4:46 pm | बॅटमॅन

आयला हा तर (काईंड ऑफ) क्वीनसारखाच प्रकार झाला की! (लाक्षणिक अर्थाने फक्त)

मस्त लिहिलेय ओ. आवडले.

एस's picture

26 Jun 2014 - 4:50 pm | एस

कोणाच्याही सोबतीसाठी अडून राहायचं नाही, हा खूप मोठा धडा शिकले मी तेव्हा. खरंच, पुढे अनेकदा या धड्याने मला आणखी खंबीर बनवलं.

अभिनंदन. पहा, आधीच्या भागापर्यंतच थांबला असतात तर आम्हांला इतकं चांगलं वाचायला मिळालं नसतं. वाचतोय. पुभाप्र.

सखी's picture

26 Jun 2014 - 10:09 pm | सखी

आम्हांला इतकं चांगलं वाचायला मिळालं नसतं. - अगदी अगदी.
अनुभव व लेखन दोन्ही आवडलं आणि परत तेच जाणवलं त्या अश्या वागल्या म्हणुन खूपदा आपणही अद्द्ल घडवण्यासाठी तसचं किंवा अजुन काहीतरी करायला जातो किंवा करत नाही (मदत या अर्थी). मला नेहमी तेव्हा वाटतं त्यांनी गाय मारली तर आपण वासरु कशाला मारायला पाहीजे, तुम्ही तसे केले नाहीत याच अर्थातच कौतुक वाटतं. पुलेशु.
बाकी मधुराच्या क्वीन या लेखाची आठवण मलाही झाली जमल्यास नक्की वाचा.

यशोधरा's picture

27 Jun 2014 - 7:56 am | यशोधरा

थ्यांक्स सखी, मधुराच्या लेखाची लिंक देण्याबद्दल. पुन्हा आज वाचला क्वीन लेख आणि परत तितकाच आवडला. :)

बहुगुणी's picture

26 Jun 2014 - 5:05 pm | बहुगुणी

जिद्द आवडली, आणि कोत्या वृत्तीच्या मैत्रिणींनाही शेवटी मदत करण्याचा दिलदारपणा देखील आवडला. अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! लिहित रहा!

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2014 - 5:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

अनुभव आवडला..पुभाप्र

मुक्त विहारि's picture

27 Jun 2014 - 8:20 am | मुक्त विहारि

सहमत...

असंका's picture

26 Jun 2014 - 5:10 pm | असंका

लय भारी!!

रेवती's picture

26 Jun 2014 - 6:04 pm | रेवती

छान लिहिलाय अनुभव.

मधुरा देशपांडे's picture

26 Jun 2014 - 10:29 pm | मधुरा देशपांडे

छान लिहिलंय. मलाही माझ्याच लेखातल्या या ओळी आठवल्या.

आपल्या सगळ्यांमध्ये एक रानी दडलेली आहेच. त्यासाठी लंडन काय आणि मुंबई काय? कधी कुठल्या घटनेतून हे घडेल तो प्रत्येकीचा चित्रपट...

:) तुमच्यातली रानी वाचून आनंद झाला.
जडण घडण चे पुढचे भाग वाचायला आवडतील.

कोणाच्याही सोबतीसाठी अडून राहायचं नाही, हा खूप मोठा धडा शिकले मी तेव्हा. खरंच, पुढे अनेकदा या धड्याने मला आणखी खंबीर बनवलं.

अगदी खरं आहे! सुरेख जमला आहे हा भाग.

सुबोध खरे's picture

27 Jun 2014 - 11:57 pm | सुबोध खरे

+१११११

मुक्त विहारि's picture

27 Jun 2014 - 8:22 am | मुक्त विहारि

पु भा प्र

nasatiuthathev's picture

27 Jun 2014 - 8:27 pm | nasatiuthathev

हे वाचल्यानंतर अगोदरचे भाग वाचण्यास भाग पाडलत....

पैसा's picture

29 Jun 2014 - 8:54 pm | पैसा

जिद्द हवी. बस!

माधुरी विनायक's picture

30 Jun 2014 - 11:29 am | माधुरी विनायक

मधुरा, क्वीन वरचा लेख मस्त. सखी, लेखाच्या दुव्यासाठी खरंच आभार आणि सर्वांच्या प्रतिसादांबद्दलही आभार. गाता गळा, शिंपता मळा च्या धर्तीवर हात लिहिता ठेवायचा प्रयत्न नक्कीच करेन.

मराठी कथालेखक's picture

13 May 2016 - 3:46 pm | मराठी कथालेखक

लेखनशैली आवडली. जुन्या आठवणी, प्रसंग तपशीलात लिहले आहेत पण पाल्हाळिक वाटत नाही.

का कुणास ठावूक मला स्वतःच्या अशा अतिशय जुन्या आठवणीत (शाळेतील, कॉलेजातील) रमायला , किंबहूना त्या कुणाला सांगायला वा स्वतःशीच आठवायला आवडत नाही (शाळेतील तर नाहीच नाही.) पण इतरांच्या वाचायला आवडतात.. :)