जडण-घडण 11

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
15 Sep 2014 - 6:20 pm

माझ्या या पहिल्या-वहिल्या ऑफीस जॉबमध्ये मला लाभलेले रिपोर्टींग बॉस अर्थात कंपनीचे मालक सुद्धा छानच होते. कुटुंबवत्सल गुजराथी गृहस्थ. फक्त एकच तक्रार होती यांच्याबद्दल. साधारण वर्षभर काम केलं असेल मी तिथे. त्या संपूर्ण काळात किंवा त्यानंतरही त्यांनी मला माझ्या योग्य नावाने हाक मारली नाही. माधुरी ऐवजी माधवी म्हणायचे. मला व्यक्तीश: कोणीही माझ्या नावाची मोडतोड केलेली किंवा ते बदललेलं रूचत नाही. पहिल्यांदा त्यांनी मला माधवी म्हणून हाक मारली, तेव्हा त्यांना थांबवत मी नावातली दुरूस्ती लक्षात आणून दिली. त्यानंतर पाच-सहा वेळा हा प्रकार झाल्यावर मी काहीशी वैतागलेच. त्यांना स्पष्टच विचारलं, सर, आप मुझे मेरे नाम से आवाज क्यू नही देते? मेरा नाम माधुरी है और आप मुझे हमेशा माधवी नाम से बुलाते है... त्यावर त्यांचं भन्नाट उत्तर, आपका नेचर सॉफ्ट है, आपकी बाते भी आपके नेचर जैसी है। ऐसे में आपके नाम में र जैसा हार्श लेटर सूट नही करता। माधवी नाम एकदम सॉफ्ट है और आपको सूट भी करता है। मी हतबुद्ध! तरीही म्हटलं, लेकीन सर, मेरा नाम तो माधुरी है । मुझे अपना नाम पसंद है। अगर आप मुझे माधवी नाम से बुलाते रहेंगे, तो मुझे हर बार आपको याद दिलाना होगा। मुझे कोई ऐतराज नही, लेकीन आगे चलके आप बुरा नही मानना। ठीक है, म्हणून हसत त्यांनी तो विषय तिथेच संपवला.
या सरांना मराठी भाषेची चांगली आवड होती आणि शुभेच्छा पत्रांमध्ये खूप काळ घालवल्यामुळे मजकुरातले बारकावे ते बरोबर ओळखायचे. मी मुलगी, त्यामुळे खूप वेळा माझ्या मजकुरामध्ये फेमीनाईन (स्त्रीलिंगी) क्रियापदं यायची. मग सर सांगायचे, आप न्यूट्रल लिखने की कोशीश किजिए। कार्ड देनेवाला लडका या लडकी कोई भी हो सकता है। ज्यादातर कार्ड बर्थ डे के होते है। वैलेंटाईन या भाई-बहन - माता- पिता जैसे रिश्तों के लिए गिने-चुने कार्ड बनते है। ऐसे में अंग्रेजी में You लिखना काफी आसान हो जाता है, लेकिन हम मराठी में ऐसे नही लिख सकते।
मग मी कॉपीत दुरूस्ती करायचे किंवा मग नवीनच कॉपी लिहून दाखवायचे. माझी कॉपी माझ्याच तोंडून ऐकायची, हा त्यांचा नेम. मराठी भाषा ऐकायला खूप आवडायचं सरांना. कदाचित वर्षानुवर्षं इंग्रजी भाषेत काम केल्यामुळे तोच तो पणा जाणवत असेल...
शुभेच्छापत्र किंवा शुभेच्छा संदेश लेखनाचा माझा पाया इथे खूपच पक्का झाला. अगदी दुसऱ्याच महिन्यात मला हजार रूपयांची पगारवाढ मिळाली. हळू-हळू काही वेगळं करून बघावंसं वाटू लागलं. मग कधी एखादं विनोदी कार्ड तर कधी एखाद्या संकल्पनेवर आधारीत संदेश, असं सुरू झालं. पण आधी म्हटल्याप्रमाणे तेव्हा मराठी शुभेच्छापत्रं पदार्पण स्थितीत होती आणि कंपनीचे मालक फार वेगळा प्रयोग करायला अनुकुल नसायचे. जास्तीत जास्त फ्लोरल (फुलांच्या चित्रांवर आधारीत) काम करायला ते प्राधान्य द्यायचे. मात्र दिवाळी सारखे सण किंवा नात्यांचे वाढदिवस अशा विषयांमध्ये मला थोडंफार स्वातंत्र्य घेता यायचं.
सुरूवातीचे सात-आठ महिने मजेत गेले. नंतर मग कामातला तोच-तोच पणा त्रास देऊ लागला. सतत जनरल बर्थडे लिहून लिहून इतका कंटाळा आला की आपण खूप यांत्रिकपणे हे काम करतोय ही जाणीव अस्वस्थ करू लागली. कंपनीला मजकुरात किंवा डिझाइनमध्ये वेगळे प्रयोग किंवा चाकोरी बाहेरचं काम करायचं नव्हतं आणि तोवर बाजारात वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत शुभेच्छापत्रं येऊ लागली होती. सर्व्हे साठी बाहेर पडलं की हा फरक आणखी जाणवायचा.
खरं तर शुभेच्छा देणं हा आनंददायी अनुभव असणं अपेक्षित असतं. मला मात्र, आपण शब्दांचे खेळ करतोय, तेच शब्द, त्याच चाकोरीत अडकलोय आणि काहीच वेगळं करत नाही हा विचार अस्वस्थ करू लागला होता. मग मध्येच एक पोस्टरचं काम आलं. त्यात वेगवेगळ्या चार विषयांवर जगभरातले तत्वज्ञ, विचारवंत आणि तत्सम लोकांचे विचार मराठी भाषेत अनुवादित करायचे होते. असाच एक Quote होता, God could not be everywhere, therefore he made mother.
याचा मराठी अनुवाद अगदी सहज उतरला, तो असा...
ईश्वराचं सगळीकडे अस्तित्व एकाच वेळी शक्य नाही म्हणूनच त्याने घडवलं नातं, ते म्हणजे "आई"
तो अनुवाद आणि ती संपूर्ण सीरीज खूप समाधान देऊन गेली. त्या निमित्ताने वेगळ्या प्रकारचं वाचनही झालं. कामाचं कौतुकही झालं. पण पुन्हा तेच. ये रे माझ्या मागल्या...
साधारण महिनाभर खूप विचार केला, कामात रमायचा प्रयत्नही केला. बाहेर नोकरीसाठी फार अनुकुल वातावरण नसताना आणि शिक्षण क्षेत्रातल्या राजकारणाला विटल्यानंतर पुन्हा त्या क्षेत्राकडे इतक्यात वळायची फारशी इच्छा नसताना हातातली नोकरी फक्त साचेबद्ध आहे म्हणून करत राहायची का, किंवा ती सोडणं योग्य आहे का, यावर विचार केला. पण मग आपण आपली स्वत:ची फसवणुक नाही करू शकत. प्रत्येक वेळी कॉपी लिहिताना, हे कृत्रिम आहे असा विचार मनात यायचा. हे शुभेच्छापत्र देणारा किती मनापासून देईल, पण त्या शब्दांमधला फोलपणा, निर्जिवता मला बोचत राहायची.
मनाविरूद्ध काम करणं नाही जमत मला. मग घरातल्यांशी बोलले, मोकळी झाले. मला नाही करावंसं वाटत हे काम. कदाचित फ्री लान्सींग करता येईल, याची कल्पना दिली. घरचे माझ्यासोबत होतेच. मग सरांशी बोलून राजीनामा दिलाच. ऑफीसमधल्या सगळ्यांनी मला ब्रेक घे हवा तर, पण नोकरी सोडू नको. सतत तेच लिहून असं होऊ शकतं, स्वत:ला थोडा वेळ देऊन बघ, असं सांगितलं. पण मागे फिरायला मनाची तयारी होईना. परतावंसं वाटलं तर आवर्जुन यायचं, असं सरांनी आग्रहाने सांगितलं. अगदी मनापासून आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या त्यांनी. सहकाऱ्यांनीही निरोप दिला. भरल्या मनाने आणि डोळ्यांनी खूप चांगले अनुभव आणि पुढच्या काळात टिकणारी अनमोल मैत्री असा मोलाचा ठेवा घेऊन मी माझ्या पहिल्या ऑफीस जॉबचा निरोप घेतला...
क्रमश:
जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270
जडण-घडण 6
http://www.misalpav.com/node/28354
जडण-घडण 7
http://www.misalpav.com/node/28383
जडण-घडण 8
http://www.misalpav.com/node/28437
जडण-घडण 9
http://www.misalpav.com/node/28519
जडण-घडण १०
http://www.misalpav.com/node/28600

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

15 Sep 2014 - 7:31 pm | एस

वाचतोय.

विलासराव's picture

15 Sep 2014 - 9:07 pm | विलासराव

असंच संवेदनशील मन जपा.
मी ३५ व्या वर्षी कामातुनच रिटायरमेंट घेतली.
स्वतःचा चांगला व्यवसाय असुनही अंग काढुन घेतलं, अर्थातच काही पैशाची तरतुद करुनच.मुख्य म्हणजे गरजा कमी केल्या.
आता त्यालाही १० वर्शे झाली, एकच काम मन ज्यात रमेल ते करणे.

रुपी's picture

15 Sep 2014 - 10:11 pm | रुपी

खरं तर मी वात बघत होते पुढचा भाग केव्हा येतो याची. तुमचे बॉस छानच होते.
मनाविरुद्ध काम करण्याऐवजी ते सोडणे सगळ्यांनाच जमत नाही.

अजून थोडे मोठे भाग येउ द्या.

मुक्त विहारि's picture

15 Sep 2014 - 11:55 pm | मुक्त विहारि

लिखाण आवडले...

किती सुंदर शब्दांकन आणि सहज ओघवती शैली !
पुभाप्र

कुसुमावती's picture

17 Sep 2014 - 1:21 pm | कुसुमावती

खुप छान झालाय भाग.

पुभाप्र

सुधांशुनूलकर's picture

17 Sep 2014 - 4:49 pm | सुधांशुनूलकर

आतापर्यंतचे सर्व भाग वाचले. खूप आवडले.
सहजसुंदर लेखनशैली. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय लेखन. व्यक्तिचित्रणही सुंदर.

लिहीत राहा.

स्पंदना's picture

19 Sep 2014 - 7:43 am | स्पंदना

वाचतेय हं!

दोन भागांमधला विराम थोडा जास्त लांबलाय, याची कल्पना आहे. त्याबद्दल मनापासून क्षमस्व.
काऊबॉय, स्वॅप्स, विलासराव,रूपी, मुक्त विहारी, स्नेहांकिता, कुसुमावती, सुधांशुनूलकर, अपर्णा-अक्षय आणि सर्व वाचकांचे आभार.
मनाविरूद्ध काम करण्यातली अपरिहार्यता खरंच त्रासदायक. त्यातून प्रत्येकाला सुटका करून घेणं शक्य होतंच, असंही नाही. सुदैवाने मला अशा संधी मिळाल्या आणि त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. हे अनुभव शब्दबद्ध करताना स्वत:चा प्रवास त्रयस्थपणे अनुभवणंही खूप छान वाटतंय. व्यक्त होण्याची ही संधी मिपा मुळे मिळतेय, त्याबद्दलही आभार...

समीरसूर's picture

17 Oct 2014 - 6:16 pm | समीरसूर

आजचा दुपारच्या तीनच्या आसपासचा सुमार. दोन-तीन दिवसांपासून जवळपास दिवसभर भयंकर डोकं दुखतंय. काय झालंय कळत नाही. आज संध्याकाळी ७:३० पर्यंत थांबायला लागणार आहे हे आधीपासून माहित होतं. सकाळी ८:१६ वाजता कार्यालयात पोहोचलो तेव्हाच आजचा संपूर्ण दिवस मला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलाय या जाणीवेने पोटात गोळा आला. कंटाळवाणं काम कसंबसं पूर्ण करत होतो; आवश्यक त्या चर्चा नेटाने पार पाडत होतो. मी कार्यालयात सहसा चहा-कॉफी पीत नाही. आज अशक्य डोकं दुखत असल्यामुळे तीन वेळा चहा आणि एकदा कॉफी प्यालो. डोकं भणभणतच होतं आणि तेवढ्यात या लेखमालिकेकडे नजर गेली. इतके दिवस आपल्या नजरेस कशी नाही पडली याचं राहून राहून आश्चर्य वाटत असतांनाच सगळे ११ भाग वाचून काढले.

बर्‍याच दिवसांनी असं छान, मनापासून आलेलं, कुठलाही अविर्भाव नसलेलं, कुठल्याही अवजड विषयाची बाधा न झालेलं, सोपं, साधं आणि तरीही काहीतरी चांगलं वाचल्याचा आनंद देणारं लिखाण वाचनात आलं. सगळे भाग वाचून खूप छान वाटलं. मनाला तरतरी आली.

शाळेतल्या नोकरीचे दर खरोखर डोळे पांढरे करणारे आहेत. माझ्या गावातील माझ्या शाळेत काही शिक्षकांनी दहा-दहा वर्षे बिनपगारी नोकरी करून नंतर शिक्षकांच्या अनुदानप्राप्त जागा रिक्त झाल्यानंतर किंवा नवीन जागांना मंजुरी मिळाल्यानंतर १५ ते २० लाख रुपये भरून अशा जागा मिळवल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. निवृत्तीवेतन जरी नसले तरी सहाव्या वेतन आयोगामुळे पगार भरपूर आहेत. छोट्या गावात खर्च फारसे नसतात. सातवा वेतनआयोग लागू झाला तर साधारण १२-१३ वर्षे नोकरी झालेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षकाचा पगार रु. ८०००० ते रु. ९०००० च्या आसपास जाईल. सुट्या भरपूर मिळतात. तेच तेच शिकवून अनुभव गाठीशी आल्याने कामासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. शिवाय अवांतर गोष्टी करण्यासाठी मोकळा वेळ भरपूर मिळतो. शिकवण्या किंवा अजून दुसरा काही व्यवसाय (जीवन विमा एजंट, आरडी एजंट, क्लासेसमध्ये शिकवणे, वगैरे) केल्यास उत्पन्न अधिकच वाढते. समाजाकडून शिक्षक म्हणून आदर मिळतो तो निराळाच. भविष्य एकदम सुरक्षित आणि समृद्ध होऊन जाते. मुलांच्या भविष्याची तरतूद भरभक्कमपणे करता येते. हे सगळे अतिआकर्षक फायदे दिसत असल्याने उमेदवार वर्षानुवर्षे बिनपगारी नोकरी करूनदेखील ऐपत नसेल तर एक-दोन एकर शेती विकून, दागिने गहाण टाकून किंवा विकून, घरादारावर कर्ज घेऊन, उधारी-उसनवारी करून अगदी जमेल तसा पैसा उभा करतात आणि आपले भविष्य सुरक्षित करून घेतात. आज हा दर तालुक्याच्या गावाला साधारण रु. १०-१५ लाख आहे. शहरात किती असेल याची कल्पनाच करवत नाही. हा सगळा पैसा व्यवस्थापनाच्या घशात जातो. खूप अस्वस्थ आणि निराश करणारे असले तरी हेच वास्तव आहे! :-( कमी पगार देणं, बिनतारखेचे राजीनामे लिहून घेणं, जास्त पगारावर सह्या घेऊन ३०-४०% रक्कम पगार म्हणून देऊन बाकी व्यवस्थापनातल्या लोकांनी वाटून घेणं, बोली लावून शिक्षकाची नेमणूक करणं, वगैरे अगदी सर्रास चालतं. सत्राशे साठ डी. एड. आणि बी. एडची कॉलेजेस उघडल्यानंतर पुरवठा हजार पटीने वाढला पण इतक्या लोकांना संधी कुठे आहेत? या पेशात दुर्दैवाने गुणवत्ता पाहिली जात नाही. आणि एवढे फायदे मिळत असतील तर जे या मार्गाने नोकर्‍या मिळवतात त्यांना तरी कसा दोष द्यायचा? ज्यांना मराठीत एक अचूक वाक्य नीट उच्चारांसकट स्पष्ट म्हणता येत नाही असे उमेदवार मग मराठीचे शिक्षक होतात; हिंदीमध्ये जाहिरातींना 'विज्ञापन', संशोधनाला 'अनुसंधान', अर्थतज्ञांना 'अर्थशास्त्री', शिक्षणाला 'शिक्षा', आणि शिक्षेला 'दण्ड' म्हणतात हे ही माहित नाही असे उमेदवार दहावीचे हिंदीचे शिक्षक म्हणून नेमले जातात. निरीक्षण शक्ती नाही, वाचन नाही, नवनवीन शिकण्याची आवड नाही असे हे शिक्षक विद्यार्थ्यांचं काय भवितव्य घडवत असतील देव जाणे. :-( आणि आजमितीला दारू ढोसणारा, जिथे-तिथे पैसे खाण्याचे मार्ग शोधणारा, शिक्षकांच्या रजेची मंजुरी देण्याच्या बदल्यात पैसे मागणारा असा मुख्याध्यापक माझ्या पाहण्यात आहे. आणि अजून ११ वर्षे तो हे पद भोगणार आहे. पगार घेणार रु. १००००० ते रु. १२०००० च्या घरात. इंग्रजी विषयचा द्विपदवीधर पण टाईम्स ऑफ इंडियामधले दोन परिच्छेद सलग वाचू शकेल की नाही शंका आहे.

एनीवे, बरेच विषय असे मन विषण्ण करणारे आहेत. आपली लेखमाला खूपच सुंदर आहे. पुढील सगळे भाग नक्की वाचणार.

बाय द वे, आपला काव्यसंग्रह कोणता? वाचायला नक्कीच आवडेल. :-)

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2014 - 11:54 am | टवाळ कार्टा

चायला...इथे १२-१२ तास काम करुन याच्या ६०% पण पगार नाही :(

माधुरी विनायक's picture

1 Nov 2014 - 12:51 pm | माधुरी विनायक

धन्यवाद समीरसूर.
प्रतिसाद भावला. काव्यसंग्रहाचं नाव जीवन. प्रत्यक्ष जीवन किती खडतर, किती अनपेक्षित आणि तरीही अनुभवावंसं वाटू शकतं, हे उमजायच्या आधी, अगदी शाळकरी वयापासून औपचारिक शिक्षण संपेपर्यंतच्या वयातल्या कविता आहेत त्यात. फार साध्या बाळबोध कविता, पण त्या वयातल्या भावना तशाच होत्या आणि तशाच अभिव्यक्त झाल्या. ती मी नव्हतेच असं म्हणता येणारच नाही. पण ती मी आणि आजची मी खूपच वेगळ्या आहेत, अर्थात कुठेतरी काही धागे अजून जुळतात म्हणा...
भलतीकडे वाहावत गेले का मी... असो.
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.

समीरसूर's picture

11 Nov 2014 - 11:12 am | समीरसूर

कुठे मिळू शकेल वाचावयास (विकत)? आणि अजून लिहित रहा. आपली मालिका एक छान पुस्तकाचं मटेरियल नक्कीच आहे. शुभेच्छा!