जडण-घडण 9

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
14 Aug 2014 - 12:42 pm

ठरल्या वेळेआधी पंधरा मिनिटं मी त्या कार्यालयात जाऊन पोहोचले. छोटंसं ऑफीस. जुजबी माहिती विचारून, एका अर्जात माझे तपशील नोंदवल्यानंतर एकाने मला, आता कॉपी टेस्टला चला, असं सांगितलं. मी काहीशा उत्सुकतेने त्याच्या मागोमाग गेले. त्याने माझ्या हातात काही इंग्रजी शुभेच्छापत्रं ठेवली. कोरे कागद दिले. ही ग्रीटींग कार्ड मराठीत करा, असं सांगून मी आणखी काही विचारायच्या आत निघूनच गेला.
मी ती कार्ड पाहिली. वाचून, समजून घेतली. यांना शब्दश: भाषांतर हवंय का? पण ते फारच औपचारीक, कृत्रिम झालं असतं. आजूबाजूला कोणी नाही. असो. आपल्याला योग्य वाटेल, तसं लिहू, असं ठरवलं आणि लिहू लागले. साधारण तासाभरात माझं लिहून झालं. आता हे कोणाकडे द्यायचं, असा विचार करत मी उभी राहिले. दोन पावलं पुढे टाकली असतील, तोच तो मघाचाच मनुष्य पुन्हा हजर. मी ते कागद त्याच्याकडे सोपवले. टेस्ट तपासून झाली की कळवू, असं त्याने सांगितलं आणि मी तिथून बाहेर पडले.
साधारण तिसऱ्या दिवशी त्याच ऑफीसमधून फोन आला. तुम्ही कॉपी टेस्ट मध्ये पास झालात. उद्या दुपारी तीन वाजता कंपनीचे मालक मुलाखत घेतील, हजर राहा. मी ठरलेल्या वेळी, खरं तर थोडं आधीच ऑफीसमध्ये पोहोचले. मालक आलेले नव्हते. ते वेळेत येतील, असं सांगण्यात आलं. पण वेळ उलटून गेली. निर्धारित वेळेच्या साधारण अर्ध्या तासाने मी पुन्हा विचारणा केली. पंधरा मिनिटात पोहोचतील, असं उत्तर मिळालं. मला वेळ न पाळणारी माणसं पटत नाहीत. पंधरा मिनिटात मालक आले नाहीत, तर सरळ निघायचं असं ठरवलं. ती पंधरा मिनिटं संपली आणि मी उठलेच. मी निघते, असं रिसेप्शनवर सांगितलं आणि निघाले. मी खरंच निघाले, हे बघून तो माणूस रिसेप्शन सोडून माझ्या मागे बाहेर आला. आत्ता येतील सर, असं मला सांगतोय तोच समोर गाडी थांबली आणि त्यातून एक गृहस्थ उतरले. त्या गृहस्थांनी रिसेप्शनवरच्या माणसाला, काय झालं, असं विचारलं. उत्तरादाखल त्याने, कुछ नही सर, असं उत्तर त्यांना देत, मॅडम आप प्लीज अंदर चलिये, सर आ गये है, अशी विनंती केली. बरं, बघू भेटून, असं म्हणत मी पुन्हा ऑफीसमध्ये शिरले.
मालक हे पस्तिशी-चाळीशीचे गृहस्थ असावेत. गुजराथी. मला लगेच भेटायला बोलावलं आणि वेळेत पोहोचू न शकल्याबद्दल त्यांनी माफी मागितली. चला, म्हणजे वेळ पाळता न येणं चुकीचं आहे, इतकं कळतंय यांना, असं मनातच म्हणत मी माझा राग बाजूला ठेवला.
त्यांना माझं लिखाण आवडल्याचं त्यांनी सांगितलं. शुभेच्छापत्रांसाठी डिझाइन्स तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. मोजके आठ-दहा कलाकार हाताशी होते. मार्केटमध्ये चांगलं नावं होतं. ते स्वत:च मार्केटिंग करायचे. २००० चा नोव्हेंबर महिना. मराठी शुभेच्छा पत्रांचा काळ बहरत होता. खूप जणांकडून विचारणा झाल्यानंतर त्यांनी इंग्रजीबरोबर मराठी लेखक नेमायचा निर्णय घेतला आणि त्यानुसार माझी निवड झाली होती. मी पूर्वी अशा प्रकारचं काम केलेलं नाही, पण हे काम करायला आवडेल, हे स्पष्ट केलं. त्यांनी पगाराची अपेक्षा विचारली. मी मनात हो-ना करत साडेतीन हजार म्हटलं आणि ते ताडकन उभेच राहिले. डन, आप कलसे जॉईन कर लो, असं आनंदाने म्हणाले. मला हे काहिसं अनपेक्षित. आनंद चेहऱ्यावर दिसलाच, पण शिकवणीची मुलं होती. त्यांना म्हटलं, सध्या हातात काही काम आहे, त्यामुळे मी पुढच्या महिन्यापासून येऊ शकेन. एक क्षणभर विचार करून ते ठीक आहे म्हणाले आणि मी निघाले.
घरी पोहोचल्यावर घरातल्या सर्वांनाच या नव्या जॉब बद्दल सांगितलं. एखादं काम मनासारखं पूर्ण झालं, तरंच सांगायचं, नाही तर नाही, असा माझा खाक्या. त्यामुळे निवड होईपर्यंत घरात कुणाला फारसं माहिती नव्हतं. शिक्षकी क्षेत्र नाही, इतकी जुजबी कल्पना होती. आता निवड झाल्यानंतर सगळेच तपशील आनंदाने सांगितले. शाळेत पहिल्या वर्षी साडे पाचशे, दुसऱ्या वर्षी साडे सहाशे आणि तिसऱ्या वर्षी साडेसातशे रूपये दरमहा पगार होता. त्यामुळे साडे तीन हजार पगार मागितला आणि त्यांनी लगेच मान्य केलं, हे आनंदाने सांगितलं. सगळ्यांनाच बरं वाटलं.
मग माझ्या आनंदावर विरजण पडणार नाही, अशा पद्धतीने ताईने विचारलं, प्रवास खर्च वेगळा देणार आहेत का? अरेच्चा, असं काही असतं का? माझ्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह. ऑफीस बांद्र्याला, म्हणजे बस आणि ट्रेनचा रोजचा प्रवास. शाळेत मी चालतंच जायचे,त्यामुळे हा प्रश्न आलाच नाही. ताईला म्हटलं, मला नाही माहिती. विचारून सांगते. पण बहुतेक वेगळे पैसे मिळत नसावेत. ऑफीस जॉब करायची पहिलीच वेळ आणि काहीतरी ठाम ठरल्याशिवाय कोणालाही काही सांगायचं नाही, विचारायचं नाही, असा माझा खाक्या. त्यामुळे असे प्रसंग पुढेही येत राहिले. ( फार कौतुकाने सांगायची गोष्ट नाही ही, हो ना)
पाहू पुढे, असा विचार करून मी शिकवणीच्या मुलांकडे वळले. मुलांना कल्पना दिली, पालकांशी बोलले. तोवर मुलांना आपला अभ्यास आपण करायची गोडी लागत होती. पण काही अडलं की विचारावं लागायचं. शिकवण्या बंद करा पण आम्हाला काही अडलं तर आम्ही येणार, असा शब्द मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही दिला - घेतला. मी काहीशी निर्धास्त झाले.
चालू महिनाभर शिकवण्या सुरू राहिला आणि पुढच्या महिन्यात पहिल्या तारखेला ऑफीसमध्ये हजर झाले. पहिलाच दिवस. पुर्वार्ध शांततेत गेला.एका प्रशस्त इमारतीमध्ये तळ आणि पहिल्या मजल्यावर ऑफीस होतं. मी तळ मजल्यावर होते. खालून वर जायला आतूनच जीना होता. काही जणांची ये-जा सुरू होती. बहुतेकांनी स्वत: पुढाकार घेऊन ओळख करून घेतली. मी खरं तर बावरले होते. जेवायच्या वेळेत सर्वांनी वर बोलावून सुद्धा खाली एकटीच जेवले. संकोचाने.
संकोच पर्व सुरूच होतं पण हळूहळू ओळखी वाढत होत्या. तीन वर्षं, दिवसभर लहान मुलांसोबत राहायची सवय लागली होती, त्यामुळे मोठ्या किंवा समवयस्कांच्या या छोट्याशा कुटुंबात मी काहीशी अवघडून गेले होते. काम समजून घेऊ लागले होते. साधारण आठवडा असाच गेला आणि एके दिवशी ऑफीस मधून परतताना सणकून ताप भरला. घरी पोहोचेपर्यंत संपूर्ण अंग रसरसू लागलं होतं, आतून धग जाणवत होती. थोडं काही पोटात ढकलून झोपले. सकाळी उठले तर अंगावर पाणीदार फोड दिसत होते. कांजण्या...वयाच्या बावीसाव्या वर्षी.

क्रमश:

जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270
जडण-घडण 6
http://www.misalpav.com/node/28354
जडण-घडण 7
http://www.misalpav.com/node/28383
जडण-घडण 8
http://www.misalpav.com/node/28437

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

विटेकर's picture

14 Aug 2014 - 2:45 pm | विटेकर

सगळे भाग आत्ताच वाचून काढले !
तुमची लेखनशैली, खरेतर कथनशैली फारच छान आणि ओघवती आहे. हाडाच्या शिक्षक आहात तुम्ही !
फार सुंदर लिहिता तुम्ही ! लिहित रहावे.

आण्खी एक ..

पटापटा लिहित रहावे , भाग फार लहान होताहेत.
आय हेट क्रमश:!

सस्नेह's picture

14 Aug 2014 - 5:46 pm | सस्नेह

छान लिहिते आहेस. साध्या घटनासुद्धा खुलवून रंगतदार केल्या आहेत.

नेहमीप्रमाणे हाही भाग सुन्दर !!!
पु.भा.प्र.

मुक्त विहारि's picture

16 Aug 2014 - 12:50 am | मुक्त विहारि

आवडला..

विलासराव's picture

16 Aug 2014 - 9:43 am | विलासराव

मस्त लिहीताय. हेवा वाटतो मला त्यांचा ज्यांना आपल्या मनातील विचार योग्य शब्दात कागदावर उतरवता येतात.
खासकरुन आंतरीक अनुभव.
माझ्या हातात असेल तर मी या विषयातील योग्य लोकांना नोबेल देईल.
कारण बराचसा गोंधळ आपल्याला काय म्हणायचे हे योग्य शब्द न वापरल्याने (सुचल्याने) होतो असे मला वाटते.

अवांतरः
मलाही असेच अनुभव लिहावे वाटतात पन मग संकोचुन मी टाळतो
मला १९९४ ला पहीला जॉब मिळाला मुंबईत. त्यांनी सांगीतले १२०० पगार+ ३०० कन्व्हेअंस.
मला ते ३०० कशाचे ते समजायला २ महीने लागले. ईंग्रजी माझ आजही अगाधच आहे ना म्हणुन.
अहो इंग्रजीच कशाला माझ मराठी व्याकरण आनी शुद्धलेखनसुद्धा अगाधच आहे.
आनी शब्दांची समज तर त्याहुन जास्त.

एस's picture

16 Aug 2014 - 1:20 pm | एस

बाकी वरील सर्व प्रतिसादांप्रमाणेच.

पुभाप्र

माधुरी विनायक's picture

4 Sep 2014 - 5:34 pm | माधुरी विनायक

मनापासून आभार आणि उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.

जाऊ द्या हो. माफी कसली मागताय....त्या निमित्ताने आपला जुना धागा वर आला- म्हणजे, आमचा वाचायचा राहिला होता हो हा, म्हणून म्हटलं!

कांजिण्या शाळेत जाणार्‍यांना होतात असं काहीतरी असतं ना? मुलांना होतात, तसंच मुलांच्या आजुबाजुच्यांना पण होतातच. उन्हाळ्यात होतात ना बहुधा? यंदा मी एप्रिलच्या सुरुवातीला उदगीरला गेलो होतो, तिथल्या ब्रँच मॅनेजरला वयाच्या ३८व्या वर्षी कांजिण्या झाल्या होत्या. त्याच्या मुलाकडून त्याच्याकडे आल्या....

खूप हृद्य लेखन. लेखनात मज्या आहे ओ तुमच्या!

- बॅटू बर्वा.

मराठी कथालेखक's picture

13 May 2016 - 6:15 pm | मराठी कथालेखक

एखादं काम मनासारखं पूर्ण झालं, तरंच सांगायचं, नाही तर नाही, असा माझा खाक्या.

काहीतरी ठाम ठरल्याशिवाय कोणालाही काही सांगायचं नाही, विचारायचं नाही, असा माझा खाक्या

थोडि आत्मस्तुतीची किनार जाणवत आहे
बाकी लेख चांगला...