जडण-घडण...1

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
18 Jun 2014 - 6:13 pm

एक-एके-एक काम करण्याचा मला भयंकर कंटाळा. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केली. ती आजही सुरूच आहे म्हणा. या मुशाफिरीमध्ये खूप माणसं भेटत गेली, खूप अनुभव मिळत गेले आणि बरंच काही शिकता आलं. या प्रवासात शाळा हा महत्वाचा टप्पा आणि त्यानंतर पुढचे टप्पे. पण फारसं ठरवून काही केलं नाही. समोर आलं, ते स्वीकारत गेले. म्हणजे बारावी झाल्यानंतर त्यातल्या त्यात जवळच्या मैत्रिणीला डी.एड्. चा अर्ज भरायचा होता, म्हणून मी पण भरला. त्यातल्या त्यात जवळची, म्हणजे इयत्ता सातवी आणि त्यानंतर दुसऱ्या शाळेत आठवी ते दहावी अशी साधारण चार वर्षं आम्ही दोघीही एकाच वर्गात होतो. त्यापूर्वी म्हणजे पहिली ते सातवी मी, मनोज, संदेश आणि दीपक असे आम्ही चौघं शाळेत एकत्र असायचो. आपला ग्रुप किंवा कंपू आहे, हे कळण्याचं वय नव्हतं आणि तितकी समजही नव्हती.
परीक्षेत वर्गात गुणानुक्रमे पहिल्या चार क्रमांकांसाठी आमच्यात स्पर्धा असायची. त्याव्यतिरिक्त जयश्री, मुमताज, पुष्पा, मन्सूर असे आणखी भरपूर सोबती. धमाल होते ते दिवस. शाळेतल्या स्पर्धा, निवडणुका, चाचणी परीक्षा, सण सगळंच मस्त होतं. आंतरशालेय स्पर्धांमध्ये मात्र मी आणि मनोज असे आम्ही दोघंच सहभागी व्हायचो. दीपक आणि संदेश तसे भिडस्त, त्यामुळे त्यांचा असल्या उपद्व्यापांमध्ये सहभाग नसे.
अशीच एक वक्तृत्व स्पर्धा होती. शाळेतून एकच प्रतिनिधी पाठवणं शक्य होतं, त्यामुळे सर्व इच्छुकांची शाळेत एक स्पर्धा घेऊन त्यातल्या विजेत्याला स्पर्धेला पाठवायचं, असं ठरलं.
माझे बाबा सरकारी नोकरीत होते आणि मला वाचनाची अफाट आवड. बाबांच्या कार्यालयाचं समृद्ध वाचनालय माझ्यासाठी कायम खुलं होतं. मी छान भाषण तयार केलं. सहावीत असेन बहुतेक. माझं भाषण मीच तयार करायचे. शक्यतो लिहून काढणं टाळायचे. मुद्दे काढून त्यानुसार भाषण करायचे.
शाळेतल्या भाषणाचा दिवस उजाडला आणि मी काहीशी नाराज होऊन शाळेत गेले. घसा खवखवत होता माझा. ठरल्याप्रमाणे सगळ्यांची भाषणं झाली. माझी किंवा मनोजची निवड होणार, हे नक्की होतं. आम्हा दोघांचीही भाषणं चांगली झाली, पण खोकल्यामुळे मला थांबावं लागत होतं. निकाल ऐकवण्यापूर्वी मुख्याध्यापिकांनी आम्हाला बोलावून घेतलं. आमच्या वर्ग शिक्षिकाही तिथे होत्या. त्या म्हणाल्या, "तुम्हा दोघांचीही भाषणं छान झाली. पण माधुरी, तुला खोकला येतोय आणि स्पर्धा परवा आहे. मनोजची तयारीही चांगली झालीय. तर आपण त्याला या स्पर्धेला पाठवूया, असं आम्हाला वाटतं." मी थोडी नाराज झाले क्षणभर, पण बाई म्हणाल्या ते योग्यच होतं. मी हसून म्हणाले, "हो बाई, मनोजलाच पाठवणं बरोबर आहे." बाईंनी आम्हाला दोघांना जवळ घेतलं, शाबासकी दिली आणि बाहेर पाठवलं. बाहेर आल्यानंतर मला थांबवून मनोज म्हणाला, तू खूप मनापासून केलीस ना तयारी. तुझे मुद्दे खूप चांगले आहेत. बघ, परवा पर्यंत तुला बरं वाटलं, तर तूच जा स्पर्धेला. मला चालेल. मी त्याच्या वरताण उत्तर देत म्हटलं, शहाण्या, जायला मिळतंय ना, मग निमूट जा. माझे मुद्दे चांगले आहेत ना, मग आपण तुझ्या भाषणावर आणखी थोडं काम करूया, या मुद्द्यांची भर घालू या. आणि हो, नंबर घेऊनच यायचंय स्पर्धेतून...
आम्ही त्याचं भाषण पुन्हा तयार केलं आणि तो पठ्ठ्या सुद्धा झोकात दुसरा क्रमांक पटकावूनच शाळेत परतला. पहिली ते सहावी एका वर्गात होतो आम्ही. सातवीला मात्र दुपारचा एक वर्ग आणि आमचा एक वर्ग असे दोन वर्ग एकत्र करून पुन्हा त्यांचे दोन वर्ग करण्यात आले. दुर्दैवाने आम्ही वेगवेगळ्या वर्गांमध्ये गेलो, पण रक्षाबंधन असो, वनभोजन असो किंवा आणखी काही कार्यक्रम... आमची गट्टी सातवीच्या वर्गातही तशीच टिकली. त्यानंतर मात्र आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये गेलो आणि ती गट्टी संपल्यातच जमा झाली.
साधारण सात वर्षांनंतर अनपेक्षितपणे माझ्या या लाडक्या मित्राची पुन्हा भेट झाली. मी शाळेत शिकवत असल्याचं त्याला आमच्याच शाळेतल्या एका मुलाकडून समजलं. तोवर आम्ही दोघांनीही घरं बदलली होती, त्यामुळे तो शाळेजवळ मला भेटायला आला होता. खूप-खूप गप्पा मारल्या आम्ही. तेव्हा फोन फारसे वापरात नव्हते, तो शिकायला बाहेर गावी जायचा होता, कुठे ते आता आठवतही नाही. त्यामुळे पुढे संपर्कच नाही उरला. अजुनही कधीतरी लहर आली की मी आंतरजालावर त्याच्या नावाचा शोध घेते. मला खात्री आहे, एक दिवस तो नक्की अचानक माझ्यासमोर येणार आणि आम्ही पुन्हा गप्पा मारण्यात रंगून जाणार. केवढं काय-काय सांगायचंय त्याला...
क्रमश:...

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

रेवती's picture

18 Jun 2014 - 6:16 pm | रेवती

वाचतीये. हे लेखन आवडले.

अनिता ठाकूर's picture

18 Jun 2014 - 7:04 pm | अनिता ठाकूर

अगदी प्रांजळ लेखन! माधुरी, तुमचे नाव वाचले की मी लगेच तुमचे लेखन वाचते. लिहित्या रहा. कारण,मला फक्त वाचताच येते.

मस्त मुक्तक. क्रमशः लिहायचे राहिलेय वाटते. :-)

स्मिता चौगुले's picture

20 Jun 2014 - 8:28 am | स्मिता चौगुले

मस्तच.. लिहिते रहा

यशोधरा's picture

20 Jun 2014 - 8:32 am | यशोधरा

आवडले.

मुक्त विहारि's picture

20 Jun 2014 - 9:33 am | मुक्त विहारि

पु. भा. प्र.

अनुप ढेरे's picture

20 Jun 2014 - 10:06 am | अनुप ढेरे

छान लिहिलय...

माधुरी विनायक's picture

20 Jun 2014 - 2:43 pm | माधुरी विनायक

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
स्वॅप्स, क्रमश: लिहिलंय...

मराठी कथालेखक's picture

13 May 2016 - 1:03 pm | मराठी कथालेखक

छान छान
मला आपलं वाटत असतं की आम्ही मुलगेच फक्त मुलींच्या आठवणी काढून नेटवर शोधत असतो. जुन्या मित्राला "लाडका" म्हणून जालावर शोधणारी मैत्रीण पाहून छान वाटंलं...

मला शोधत असेल का बरं कुणी :)