जडण-घडण ८

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
31 Jul 2014 - 1:24 pm

त्या शाळेतली तीन वर्ष जवळपास संपत आली. बहुतेक जानेवारी महिना असावा. शाळेला अनुदान मिळायच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. व्यवस्थापनाने एकावेळी एका शिक्षकाबरोबर बोलायला सुरूवात केली. अनुदान मिळवण्यासाठी संस्थेला द्यावे लागलेले पैसे, त्याच्या परतफेडीसाठी अनुदान मिळाल्यानंतर पहिली तीन वर्षं प्रत्येकाच्या पगारातून कापली जाणारी रक्कम आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रत्येकाला तारीख न लिहिता लिहून द्यावा लागणारा राजीनामा. मला इतर शिक्षकांकडून समजत होतंच. शेवटी माझीही वेळ आली.
एके दिवशी मधली सुट्टी संपल्यानंतर संस्थाचालकांनी मला बोलावून घेतलं. बदली शिक्षिकेकडे वर्ग सोपवून मी निघाले. तीन वर्षांत शाळेतल्या जवळ जवळ प्रत्येक उपक्रमात माझा सहभाग होता, त्यामुळे बोलण्यात बराच मोकळेपणा होता. त्यांनी वर सांगितलेल्या गोष्टी मला सांगितल्या आणि माझा प्रतिसाद ऐकण्यासाठी विराम घेतला. मला या सर्वांची पूर्वकल्पना होतीच. मी म्हटलं, सर, शाळेला अनुदान देण्यासाठी संस्थेला पैसे द्यावे लागले असतील, हे माझ्या विचारांविरूद्ध असलं तरी खोटं नाही, याची मला खात्री आहे. पण तुम्ही कापणार असलेली रक्कम खूप जास्त आहे. ते सुद्धा एकवेळ मान्य करता येईल. पण मग तारीख नसलेला राजीनामा? तुमचा इतकाही विश्वास नाही का आमच्यावर ? इतकी वर्षं बघताय आम्हाला... मी तर अजून लहान आहे, फारशा जबाबदाऱ्या नाहीत माझ्यावर, पण आपले इतर शिक्षक... त्यांचं काय? एम.एस्सी. एम एड्. सारखी शैक्षणिक पात्रता असणारे शिक्षक आपल्याकडे साडेपाचशे- सहाशे रूपये पगारावर काम करताहेत, इतक्या पैशात बसने येणं परवडत नाही तर सायकलवरून प्रवास करतात ते... संध्याकाळी शाळेत शिकवण्या घेतात, तेव्हा त्यांचं घर चालतं...मान्य की नाममात्र भाडं आकारून तुम्ही त्यांना शिकवण्यांसाठी वर्गखोल्या देता... पण राजीनामा... बोलता-बोलता मला रडू कोसळलं...
संचालक माझ्या वडिलांच्या वयाचे, मला ओळखणारे आणि मी वयाने लहान असले तरी माझ्या विचारांचा आदर करणारे, किमान तसं भासवणारे होते. त्यांनी चटकन पाणी पुढे केलं, उठून माझ्या खुर्चीजवळ आले आणि डोक्यावर थोपटून 'शांत हो' म्हणाले. पुन्हा माझ्याशी बोलू लागले. आतापर्यंत टिचर म्हणणारे संचालक थेट एकेरीवर आले. मला म्हणाले, माधुरी, तू आधी रडणं थांबव. मी तुला ओळखतो. तुझं म्हणणं मला पटलं. आणखी एक, मी आतापर्यंत आपल्या सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांशी बोललो. पण कोणालाही स्वत: शिवाय इतर कोणाबद्दल बोलावंसं नाही वाटलं. मग तू इतका विचार का करतेस? तुझं म्हणणं मला पटलं, असं मी म्हटलं तरी मला तसं वागता येणार नाही. हा निर्णय माझा एकट्याचा नाही तर संपूर्ण व्यवस्थापनाचा आहे. मी काय करू शकतो, तर पगारातून तुझे पैसे कापण्याची तीन वर्षं संपली की तुझा राजीनामा मी तुझ्या हातात देईन, तू तो इथेच माझ्यासमोर फाडून टाकायचा. फक्त यातलं काहीही इतर कोणाला समजता कामा नये. आता तुला आणखी काही सांगायचं आहे का? मी शांत होत, मानेनेच नकार देत बाहेर आले, आमच्या कक्षात जाऊन पाच मिनिटं शांत बसले, मग वर्गात पोहोचले.
घरी गेल्यानंतर आई-बाबा, भावंडं सगळ्यांच्या कानावर हा प्रकार घातला.सगळ्यांनी ऐकून घेतलं, आपापल्या परीने काही सुचवलं. अंतिम निर्णय माझाच असणार होता. मी शांतपणे विचार करत झोपून गेले. साधारण आठवडाभरात माझा निर्णय झाला.
मी संस्थाचालकांना भेटले. त्यांना सांगितलं, सर, तुम्ही जे सांगितलं, ते मला पटलं असं नाही म्हणता येणार. कदाचित तुम्ही तुमच्या जागी बरोबर असाल, पण मला हा प्रकार मान्य नाही. मला वाद घालायचा नाही आणि वाढवायचाही नाही. या शैक्षणिक वर्षातले जेमतेम दोन महिने उरलेत. मला तेवढ्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं नाही. मी हे वर्ष पूर्ण करते, त्यापुढे मात्र मी येणार नाही. सरांनी ऐकून घेतलं. म्हणाले, वाटलंच होतं, तू असा काहीतरी विचार करणार. हे बघ, तू लहान आहेस. घाईत निर्णय घेऊ नकोस. आई-बाबांशी बोल.फक्त तीन वर्षांचा प्रश्न आहे. तुझी नोकरी निश्चित होऊन जाईल. तीन वर्षं कधी गेली, कळणार सुद्धा नाहीत. अजून वेळ आहे, विचार कर. उत्तरादाखल मी हसले. माझा विचार झालाय सर, येते मी, असं म्हणून मी निघाले.
त्यानंतर माझ्या सह शिक्षकांनी मला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. मी सर्वांचं ऐकून घेतलं. आई-बाबांनीही समजावलं. बहुतेकांचा सूर एकच, तीन वर्षांचा तर प्रश्न आहे. नंतर आयुष्यभर कायम नोकरीची निश्चिंती आणि सगळीकडे हे असंच सुरू आहे. उद्या दुसऱ्या शाळेत असाच अनुभव येणार नाही कशावरून... वगैरे, वगैरे... त्यांचं बरोबर होतं, पण माझा निर्णय झाला होता. माझी जी काही घालमेल होती, ती निर्णय होईपर्यंत. एकदा निर्णय झाला की त्यावर ठाम राहायचं आणि मग जे होईल त्याची जबाबदारी स्वीकारून सामोरं जायचं, हा माझा स्वभाव सगळ्यांनाच सुपरिचित. त्यामुळे कोणीही दबाव आणायच्या भानगडीत पडलं नाही.
परीक्षा संपल्या, निकाल लागले. शाळेतून अनुभवाचं प्रमाणपत्र घेतलं. संस्थाचालकांनी, पुन्हा यावंसं वाटलं तर नक्की सांग, असं सांगितलं. मी हसून होकार दिला, सर्वांचा निरोप घेतला आणि निघाले. वाईट वाटत होतं, पण आपण चूक करत नाही, याची खात्री होती.
त्यानंतर चार-पाच शाळांमध्ये मुलाखतीला गेले, पाठ घेतले, निवड झाली. एक-दोन ठिकाणी रूजूही झाले. पण आठवडाभरातच नोकरी कन्फर्म करण्यासाठीचे तिथले दर आणि अटी समजल्या आणि मन विटून गेलं. एका शाळेत तर मी बाबांच्या मित्राच्या ओळखीने गेले होते. अर्थात निवड गुणवत्तेवरच झाली. पण आठवडाभरातच तिथलेही दर समजले. मी पुन्हा अस्वस्थ. बाबांच्या मित्राचं म्हणणं, तुझ्याकडून कोणी पैसे मागतंय का? मागणारही नाही. तू तुझ्यापुरतं बघ ना... मी हतबुद्ध...
पुन्हा तिथे परत जायचं नाही असं ठरवलं होतं, तर संध्याकाळी पहिल्या शाळेतले दोन विद्यार्थी पालकांसह घरात. मला कळेना. आईने त्यांची बोळवण केली आणि माझं जेवण झाल्यानंतर, आधी पूर्ण ऐकून घे, मग बोल असं सांगत बोलायला सुरूवात केली. विद्यार्थ्यांच्या खाजगी शिकवण्या घेणं मला अमान्य होतं. मी स्वत: कधीच अशा प्रकारच्या शिकवणीला गेले नाही आणि शिक्षकांनी वर्गात नीट शिकवलं तर विद्यार्थ्यांना बाहेर शिकवणीला जायची गरज नाही, असं माझं स्पष्ट मत होतं. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत असंख्य पालकांनी विचारूनही मी त्यांना नकार देत होते. आता मी शाळेत नाही, हे लक्षात आल्यावर हे पालक घरी आले होते. माझ्याच हाताखालून पुढच्या वर्गात गेलेली मुलं. आता ती अभ्यास करत नाहीत, बाईंना क्लास घ्यायला सांगा, असं सांगण्यासाठी या पालकांनी माझ्या पालकांना गाठलं होतं.
मी क्लास घेणार नाही असं सांगताच आई म्हणाली, तू शाळांचे अनुभव बघतेच आहेस. शिकवणी घेतलीस तर तुझा शिकवण्याचा सराव सुरू राहील आणि या मुलांचंही नुकसान होणार नाही. मुलांना शिकवा, म्हणत घरी आलेल्या पालकांना नकार देणं मला योग्य वाटत नाही. मी थबकले. थोडा वेळ विचार करून उद्या बोलू, असं आईला सांगितलं. दुसऱ्या दिवशी माझं आवरून होतंय, तोच वेगळेच तीन पालक हजर. आता माझा नाईलाज झाला. मला नवी नोकरी मिळाली तर क्लास बंद करावा लागेल, मुलांचं नुकसान होईल, हे सांगून झालं. त्यावर, तुम्हाला नोकरी लागेल तेव्हा क्लास थांबवा पण आता शिकवायला सुरूवात करा, असं पालकांनी सांगितलं. अगदीच निरूपाय झाला आणि मी दुसऱ्या दिवसापासून मुलांना पाठवा, असं सांगितलं. फी किती, असा प्रश्न पालकांनी विचारला. आधी मुलांना येऊ देत, आपण महिनाभर बघू, मग बोलू असं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी चार-पाच विद्यार्थी हजर. शाळा सुरू होऊन महिना उलटून गेलेला. तेवढा काळ भरून काढायचा होता. अभ्यासाला लगेच सुरूवात झाली. माझ्याही नकळत माझे विद्यार्थी, त्यांची भावंडं, त्यांच्या वर्गातली इतर मुलं... हा हा म्हणता महिनाअखेरपर्यंत 40 पेक्षा जास्त मुलं येऊ लागली. त्यांच्या इयत्तेनुसार तुकड्या पाडल्या. पण मला खरंच हे सारं पटत नव्हतं. मी माझ्या पद्धतीने अभ्यास घ्यायला सुरूवात केली. मुलांना अभ्यास नेमून द्यायचा, त्यांचा त्यांनाच करू द्यायचा. चुकीची उत्तरंही चालतील, पण प्रयत्न करू द्यायचा. काही चुकलेलं असलं तर मी मदत करायचे. शक्यतो त्यांना आपला अभ्यास आपण करायची सवय लागावी, असा माझा प्रयत्न होता.
मुलांच्या संख्येने पन्नाशीचा आकडा ओलांडला आणि माझ्याकडच्या अगदी लहान मुलांचा ताबा आईने घेतला. धाकट्या भावाचं गणित उत्तम होतं. तो मुलांना गणितात मदत करू लागला.
असेच दिवस सरकत होते आणि एक दिवस मी लोकसत्तामध्ये जाहिरात वाचली. मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे कॉपीरायटर पाहिजेत. कॉपीरायटर म्हणजे काय? चांगल्या अक्षरात लिहिणारे का... मग भाषेवर प्रभुत्व कशासाठी? फोन करावा का, हो-नाही करता-करता फोन फिरवलाच. जाहिरातीचा संदर्भ दिला. कॉपीरायटिंग म्हणजे काय, मला माहिती नाही. पण मराठीची जाण आहे. थोडं फार स्वतंत्र लेखन झालंय, काही बक्षिसं मिळालीत. मला या पदासाठी अर्ज करता येईल का, असं विचारलं. कॉपी टेस्ट साठी परवा सकाळी दहा वाजता या, असं सांगून समोरच्याने फोन ठेवून दिला....

क्रमश:
जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270
जडण-घडण 6
http://www.misalpav.com/node/28354
जडण-घडण 7
http://www.misalpav.com/node/28383

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

31 Jul 2014 - 2:17 pm | ब़जरबट्टू

येऊ द्या अजुन..

बाकी मी प.... :)

एस's picture

31 Jul 2014 - 3:24 pm | एस

जिथे शेवट केलाय ना, ते म्हणजे क्लास! काय प्रभुत्व आहे तुमचं लिहिण्याच्या तंत्रावरही.

मस्त उत्सुकता लागून राहिली आहे. थांबू नका, लिहीत रहा.

बन्डु's picture

31 Jul 2014 - 4:38 pm | बन्डु

मस्त्त लिहिता ताई तुम्ही. पु.ले.शु. :)

mbhosle's picture

31 Jul 2014 - 4:47 pm | mbhosle

सगळे भाग एकत्र वाचले, खुप छान लिहलय .

बाबा पाटील's picture

31 Jul 2014 - 6:54 pm | बाबा पाटील

कथा कांदबरीलाही हात घाला,नक्की यश मिळेल. *ok*

अनन्या वर्तक's picture

31 Jul 2014 - 9:10 pm | अनन्या वर्तक

माधुरी हा भाग सुद्धा सुंदरच आहे. आत्ता लवकरच पुढचा भाग येवू दे उत्सुकता वाटते आहे.

मुक्त विहारि's picture

31 Jul 2014 - 10:45 pm | मुक्त विहारि

आवडला

अमित खोजे's picture

31 Jul 2014 - 10:49 pm | अमित खोजे

हा भाग वाचून काहीतरी लिहिल्याशिवाय राहातच नहिये. छान लिहिताय तुम्ही तुमचे अनुभव.
आत्मचरीत्रच म्हणाना एका पद्धतीचे. वाचतोय लिहित राहा.

शाळांमध्ये चालणारे राजकारण सुद्धा समजतंय. तुम्ही साधारण वर्ष किंवा कालावधी सांगितलात तर जरा बरं होइल. म्हणजे किती वर्षांपूर्वी हे चालायचं, अजून चालतंय कि नाही ते .. नक्कीच तुम्हाला सांगायचं नसेल तर तो हि विकल्प आहेच.

रुपी's picture

2 Aug 2014 - 5:42 am | रुपी

हाही भाग सुंदर! खूप छान, ओघवती शैली आहे!

पण एक शंका आहे - तारीख नसलेला राजीनामा? तो मागाण्याचे नक्की प्रयोजन काय?

नेहमीप्रमाणे हाही भाग अप्रतिम.

माधुरी विनायक's picture

11 Aug 2014 - 2:43 pm | माधुरी विनायक

तुम्हां साऱ्यांचे पुन्हा एकदा आभार मंडळी.
अमित खोजे यांस - वर्ष १९९७ ते २०००
रूपी यांस - तारीख नसलेला राजीनामा अशासाठी की नंतर एखाद्या शिक्षकाने या प्रकाराविरूद्ध आवाज उठवला तर त्याचा राजीनामा त्याच्याच विरोधात हत्यार म्हणून वापरता येईल. (असा माझा अंदाज)