जडण-घडण १३

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
10 Nov 2014 - 6:08 pm

माझी रोजची कामं सुरू होतीच. फ्री लान्सींग बरं चाललं होतं. कंपन्यांना आवश्यकतेनुसार मजकूर द्यावा लागायचा. पण कधी तरी एखाद्या शुभेच्छापत्रांच्या दुकानात शब्द ओळखीचे दिसावेत, उत्सुकतेने कार्ड हातात घ्यावं आणि आपणच लिहिलेला तो मजकूर फार सुसंगत नसलेल्या चित्रासह दिसावा, अशी स्थिती झाली की मन खट्टू व्हायचं. कधी कधी तर मजकूर छापल्यानंतर तो तपासलाही गेलेला नसे. चुकीच्या ठिकाणी तोडलेली वाक्यं, व्याकरणाच्या चुका बघून वाईट वाटायचं. या कामासाठी मी वेगळे पैसे नाही घेणार, असं सांगूनही प्रत्येक वेळी ही तसदी घेतली जायचीच, असंही नव्हतं. आता या पलीकडे काय करायचं?
तर असे दिवस चालले होते आणि पुन्हा एक खाकी लखोटा घरी आला. आकाशवाणीच्या लेखी परीक्षेत मी चक्क पास झाले होते आणि स्वर चाचणीसाठीचा दिवस-वेळ सांगणारं ते पत्र माझ्या हातात होतं. मी मनापासून आनंदले. काही वेगळं करून बघता येईल, शिकता येईल, याची उत्सुकताही होती. पुन्हा एकदा आकाशवाणी मुंबईच्या त्या वास्तुमध्ये मी दाखल झाले. स्वर चाचणी झाली. फार ताण घेऊ नका, सहज वाचा अशा जुजबी सूचना उपस्थित वरीष्ठांनी दिल्या होत्या. दोन दिवसातच स्वर चाचणीचा निकाल आकाशवाणीच्या सूचना फलकावर लागला, निवड झाल्याचं रीतसर पत्रही आलं आणि प्रशिक्षणाचं वेळापत्रक मिळालं.
वरीष्ठ आणि सहकाऱ्यांच्या ओळखी झाल्या. मला मुळात चटकन चौघांमध्ये मिसळणं म्हणजे संकटच वाटायचं. इथे तर सगळेच आपल्यापेक्षा खूप हुशार आणि सर्वच बाबतीत वरचढ आहेत, आपण खूप नवखे आहोत, हे पक्कं मनात होतं, त्यामुळे मी बुजलेली असायचे. पण आकाशवाणीच्या वृत्त कक्षातलं तेव्हाचं वातावरण इतकं सहज, अकृत्रिम होतं की मी हळूहळू मोकळी होत गेले.
दरम्यानच्या काळात साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळाकडे कविता पाठवून झाल्या होत्या आणि त्यांच्या परीक्षण मंडळाने काव्य संग्रहाची निवड झाल्याचं कळवलं होतं. अर्थात या सर्वात दोनेक महिने निघून गेले होते. माझ्या पहिल्या ऑफीस जॉबमधल्या त्या माझ्या यवतमाळच्या मित्राने त्या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ तयार केलं. एकंदरीत दिवस छान चालले होते.
आकाशवाणी मुंबईच्या वृत्त कक्षात आधी सर्व कायमस्वरूपी मंडळींशी परिचय. यात संपादक आणि दोन वृत्तनिवेदक. त्याव्यतिरिक्त तंत्र सहाय्य करणारी मंडळी. मग जिल्हानिहाय वार्ताहर आणि इतर बातमीस्रोत. हंगामी भाषांतरकार आणि वृत्तनिवेदक असणारे इतर सगळे आर्टीस्ट बेसीसवर काम करणारे. अर्थात प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार पुढच्या महिन्यातील दिवस आणि वेळांची नोंद उपलब्धता पुस्तिकेत करायची आणि त्यानुसार पुढच्या महिन्याचा तक्ता लागायचा. सर्व कलाकारांना प्रत्येक महिन्यात मिळणाऱ्या ड्यूटीजची संख्या निश्चित होती. अनेक जण आपापली नोकरी-व्यवसाय सांभाळून हे काम करतात तर काही जण आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय अशा ठिकाणी महिन्यातले विशिष्ट दिवस हंगामी तत्वावर वर्षानुवर्षं काम करतात. वृत्त कक्षासाठी अशा प्रकारच्या कलाकारांचं पॅनेल अर्ज - लेखी परीक्षा - स्वर चाचणी - प्रशीक्षण या प्रक्रियेद्वारे निवडलं जातं आणि निवडल्या गेलेल्या कलाकारंचा पॅनेलमध्ये समावेश होतो.
सर्वात आधी आदल्या दिवशीची बातमीपत्र काढून वाचायची. म्हणजे प्रकट वाचन. उपस्थित वरीष्ठांपैकी कोणी मोकळं असलं, तर त्यांच्यासमोर नाहीतर मग आम्ही प्रशिक्षणार्थी एकमेकांसमोर हे प्रकट वाचन करायचो. शब्दोच्चार, दोन वाक्यं तसंच दोन बातम्यांमधला योग्य विराम, बोली भाषेचा वापर याबाबतच्या एकमेकांच्या चुका, दोष दाखवायच्या आणि मग सुधारणांसह पुन्हा वाचन. कधीतरी एखाद्या उच्चाराबाबत शंका वाटली की वरीष्ठांकडून शंका निरसन. ते वर्ष होतं २००१-०२. तेव्हा बातमीपत्रासाठी हाताने बातम्या लिहिल्या आणि तशाच वाचल्या जात. टाईप केलेल्या बातम्या अलीकडच्या पाच-सहा वर्षांत सुरू झाल्या. तोपर्यंत हाती लिहिलेल्या बातम्याच वाचल्या जात. मग जुनी बातमीपत्रं वाचताना बातम्या वाचण्याबरोबरच त्यांच्या लिखाणाचंही निरीक्षण. कोऱ्या कागदावर चारही बाजूला मोकळी जागा सोडून, दोन शब्द आणि दोन वाक्यांमध्येही योग्य अंतर सोडून सुवाच्य अक्षरात शिरोरेखा देत बातमी लिहायची. संपादकांना बातमीत आवश्यकतेनुसार सुधारणा करता यावी म्हणून मोकळी जागा सोडायची. बातमीपत्राचं थेट प्रसारण होतं, ध्वनीमुद्रण नाही, त्यामुंळे लिहिलेली बातमी वाचताना वाचणाऱ्याला त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली जायची. बातमीत फार सुधारणा असल्यास ती पुन्हा लिहून काढायची.
तेव्हा दुपारी पावणेदोन वाजता पाच मिनिटांचं एक प्रादेशिक, संध्याकाळी सात वाजता दहा मिनीटांचं एक प्रादेशिक आणि संध्याकाळी पावणेआठ वाजता पंधरा मिनिटांचं एक एफ एम अशी तीन बातमीपत्रं प्रसारित व्हायची. त्याव्यतिरिक्त एफ एम वर दुपारी साडे तीन आणि साडे चार वाजता क्रमश: हिंदी आणि इंग्रजी भाषेतलं एक बातमीपत्रं, रोजची जिल्हा वार्तापत्र, ध्वनीचित्र असे इतर कार्यक्रम असायचे. या सर्व प्रकारांसाठी लेखनाचा आणि मुख्य म्हणजे भाषांतराचा भरपूर सराव व्हायचा. बातमी कशी करायची, तर तेव्हा पीटीआय आणि युएनआय अशा दोन वृत्त संस्थांचे टेलीप्रिंटर वृत्तकक्षात होते. दिवसाच्या सुरूवातीला वृत्तकक्षात पोहोचणारे आपण पहिले असलो की रात्रभरात जमा झालेली बातम्यांची भेंडोळी स्वागताला हजर असायची. मग त्या भेंडोळ्यांचे जमतील तसे दोन किंवा तीन रोल करायचे. प्रत्येक रोलवरच्या बातम्या बघून त्यातल्या योग्य बातम्या बाजूला काढायच्या, बाजूला काढलेल्या बातम्या एकेकाने करायला घ्यायच्या किंवा संपादक त्या बातम्या करायला देत असत. मग त्या तपासणं, पुन्हा लिहून काढणं, आपण लिहिलेली बातमी मोठ्या आवाजात वाचून पाहणं, असं सगळं चालायचं. इंग्रजी बातमीवरून बातमी करताना ती आधी पूर्ण वाचून घ्यायची, चटकन न समजलेल्या शब्दाचा अर्थ संदर्भाने लागतोय का, ते पाहायचं. नाहीच जमलं तर डिक्शनरी पाहायची. मग पुन्हा बातमी वाचायची आणि मूळ कागद नजरेसमोर न ठेवता आपल्याला समजलेली बातमी लिहून काढायची. ती तपासली जायची. बातमीची वाक्यं छोटी सुटसुटीत हवी, शक्यतो निधनाव्यतिरिक्त इतर बातम्या लिहिताना व्यक्तीच्या नावाने वाक्याची सुरूवात करू नये, कालवाचक शब्दाने वाक्याची सुरूवात नको, व, परंतु, केले, घेतले ऐवजी आणि, पण, केलं, घेतलं असे बोलण्यातले शब्द वापरावेत. बातम्या देऊ नका, सांगा... असे अनेक धडे वृत्त कक्षाने दिले. आज एखादी ओळ छापलेला कागद सरळ केराच्या टोपलीत भिरकावताना कोणाला पाहिलं की वाईट वाटतं, कारण आम्हीच नव्हे तर आमच्या वरीष्ठांनीही गैरसोईच्या वेळी टेलीप्रिंटरवर छापलेल्या बातम्यांचे पाठकोरे कागद बातम्या लिहिण्यासाठी वापरल्याचं लख्ख आठवतं. वस्तु हाताशी आहेत, म्हणून त्या कशाही वापरायच्या नाहीत. सरकारी मालमत्ता असणाऱ्या वस्तु वापरतानाही जबाबदारीचं भान राखावं, असे वरकरणी किरकोळ वाटणारे पण प्रत्यक्षात महत्वाचे असणारे धडे इथेच मिळाले. ते सुद्धा शब्दातून नाही तर वरीष्ठांच्या कृतीमधून.
जबाबदार अधिकारी, वरीष्ठ आणि पत्रकारीता, रंगभूमी, मालिका, चित्रपट, साहित्य, शिक्षण, वकीली, डॉक्टरी, प्राध्यापकी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर काम करणारे सहकारी यांच्यासोबत प्रशिक्षण पूर्ण करणं आणि नंतर काम करणं हा खरोखरंच समृद्ध करणारा अनुभव होता, आजही आहे. आपण कोणीतरी ग्रेट आणि प्रशिक्षण घेणारे दुय्यम असा भाव, खरं तर भेदभाव तिथे जाणवला नाही. माझं शुभेच्छापत्र लेखन, प्रकाशनाच्या वाटेवर असणारा काव्यसंग्रह, खाण्याबद्दल उदासीनता, भीडस्त स्वभाव, इतरांच्या तुलनेत स्वत:बद्दल सुरूवातीला वाटलेला न्यूनगंड या साऱ्यासह त्या वातावरणाने मला स्वीकारलं.
दिवसातून दोनदा चहा व्हायचा तेव्हा. क्वचित कधी संध्याकाळी भूक लागली तर खाण्यासाठी खाली फेरी व्हायची. मात्र प्रशिक्षणाच्या काळात, तुम्ही पैसे द्यायचे नाहीत, ड्यूटी सुरू झाल्या की मग पाहू, अशी प्रेमळ दटावणी वरीष्ठांकडून मिळायची. प्रशिक्षणाला येणाऱ्या कोणालाही परकं, एकटं वाटणारच नाही, इतका ओलावा असायचा. कोणाच्या तान्ह्या बाळाची खुशाली असो किंवा माझ्या डब्यात असणाऱ्या घावणे, आंबोळ्या, चटणी, मालवणी चवीच्या भाज्यांचं कौतुक असो किंवा मग मी खाण्याचा कंटाळा करतेय हे लक्षात आल्यावर डब्यात ठेवून दिलेल्या पोळीकडे लक्ष वेधत, तू संपव डबा, मी बसलेय सोबत, असा हक्काचा आग्रह असो... ते सगळं इतकं सहज होतं, आजही आहे की मी माझ्याही नकळत त्या वास्तुच्या, माणसांच्या आणि संस्कारांच्या प्रेमात पडले.
प्रशिक्षण रमत-गमत पूर्ण झालं आणि पुढच्या महिन्यापासून ड्यूटीजही मिळू लागल्या. आधी तीन मिनीटांच्या कॉमेंट्रीचं रेकॉर्डींग, मग जिल्हा वार्तापत्र, कॉमेंट्री, विधीमंडळ समालोचन मग पाच मिनिटांचं थेट बातमीपत्र आणि नंतर संध्याकाळी सातचं मुख्य बातमीपत्रं, असा चढत्या भाजणीचा प्रवास झाला. या प्रवासात खूप वेगवेगळे अनुभव आले. वर सांगितलं, त्याप्रमाणे हाती लिहिलेल्या बातम्या वाचाव्या लागायच्या. आता सगळ्यांचीच अक्षरं सुवाच्य असायचीच असं नाही. त्यामुळे वृत्त कक्षात नीट वाचता आलेली बातमी स्टुडियोमध्ये न अडखळता वाचता येईलच, अशी खात्री वाटायची नाही. मग चाचरत हळूच संपादकांना विनंती करून ती बातमी स्वत:च्या अक्षरात पुन्हा लिहून काढायची आणि ती वाचायची. आता ती बातमी एखाद्या वरीष्ठ भाषांतरकाराने लिहिलेली असली आणि त्यांना हे समजल्यावर अपमानित वाटलं तर... असं मनात यायचं. पण तसं कधी झालं नाही.
विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाचा एक प्रसंग आठवतोय. तिथल्या कामकाजाचं समालोचन संध्याकाळी सातच्या बातम्या संपल्यानंतर प्रसारीत होतं. ते साधारण पंधरा मिनिटांचं असतं. त्या मजकुराचे कागद साधारण सहा-सव्वा सहाच्या सुमाराला वृत्त कक्षात पोहोचतात. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सदनांमध्ये दोन स्वतंत्र पत्रकार बसतात. अर्थात दोन वेगवेगळ्या माणसांच्या हस्ताक्षरातलं लिखाण वाचायचं असतं. फक्त वाचायचं नाही तर चुका न करता रेकॉर्डही करायचं असतं. त्या दिवशी हा मजकूर हातात पडायला संध्याकाळचे ६.४० वाजले. हे रेकॉर्ड करून घे, असं संपादकांनी सांगितलं. मी तशी नवखीच होते. मजकूर वाचून, दुरूस्त करून घेतला खरा, पण एका स्क्रीप्टमधल्या मजकुरात ल, ह, श ही अक्षरं इतकी भन्नाट लिहिली होती की मला प्रत्येक वेळी थांबून वाचावं लागत होतं. हातात वेळ खूपच कमी होता. मी गडबडून गेल्याचं एका वरीष्ठ निवेदिकेनं पाहिलं. त्या माझ्याजवळ आल्या, हातातले कागद पाहिले आणि विचारलं, काय झालंय... भन्नाट आहे ना अक्षर... गडबडलीस का... मी काहीसं संकोचत होकार देताच त्यांनी संपादकांना सांगितलं, अहो मॅडम, हे अक्षर चटकन लागणं कठीण दिसतंय, काही फरक नाही याच्या अक्षरात. बघा बरं. वेळ पण कमी राहिलाय आणि हिला काही अक्षर लागणार नाही. मी हिला घेऊन जाते स्टुडियोत आणि वाचते... संपादकांनी कागद हातात घेऊन पाहिले आणि नजरेनेच होकार देत मला त्यांच्यासोबत जायची खूण करत त्या बातमीपत्राच्या कामात पुन्हा गर्क झाल्या. अनुभव म्हणजे काय, हे त्या दिवशी मी जवळून पाहिलं. फक्त एकदा मजकूर नजरेखालून घालत त्या निवेदिका माझ्यासोबत स्टुडियोत आल्या, आवाजाची लेव्हल तपासून तंत्रज्ञाने खूण करताच त्यांनी वाचायला सुरूवात केली आणि बघता-बघता रेकॉर्डींग पूर्ण केलं सुद्धा. सातच्या बातम्या सुरू होईपर्यंत त्यांचं रेकॉर्डींग पूर्ण झालं होतं आणि त्यातले तुरळक पॉझेस काढण्याच्या कामाला सुरूवात झाली होती. अगदी वेळेत ते काम पूर्ण झालं. काम नेटकं आणि अचूक होण्याबरोबर ते वेळेतही व्हायला हवं असतं, याची जाणीव तेव्हा प्रकर्षानं झाली...

क्रमश:
जडण-घडण १ , 2 , ३ , ४ , ५ , ६ , 7 , 8 , 9 , 10 , 11 ,
जडण-घडण 12 - http://www.misalpav.com/node/29159

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

माधुरी विनायक's picture

10 Nov 2014 - 6:12 pm | माधुरी विनायक

मागच्या भागात पहाटवारा यांच्या प्रतिसादातल्या सूचनेनुसार पूर्वीच्या भागांना क्र. देण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो फसला बहुतेक. माफ करा मंडळी, पुन्हा प्रयत्न करते. तोवर... आधीच्या भागांचे हे दुवे.

जडण-घडण १
http://www.misalpav.com/node/28093
जडण-घडण २
http://www.misalpav.com/node/28102
जडण-घडण ३
http://www.misalpav.com/node/28126
जडण-घडण 4
http://www.misalpav.com/node/28163
जडण-घडण ५
http://www.misalpav.com/node/28270
जडण-घडण 6
http://www.misalpav.com/node/28354
जडण-घडण 7
http://www.misalpav.com/node/28383
जडण-घडण 8
http://www.misalpav.com/node/28437
जडण-घडण 9
http://www.misalpav.com/node/28519
जडण-घडण १०
http://www.misalpav.com/node/28600
जडण-घडण ११
http://www.misalpav.com/node/28838
जडण-घडण १२
http://www.misalpav.com/node/29159

पहाटवारा's picture

11 Nov 2014 - 3:14 am | पहाटवारा

1)"Insert/edit Link (Alt+L)" असे लिहिलेल्या आयकोन ला टिचकी मार
2)मग खालील ऊदहरणाप्रमाणे माहिति भरा
a)Link URL : http://www.misalpav.com/node/28093
b)Link Text: 1
c)Link Title:1
३) मग ते असे दिसेल : 1

हाकानाका ..

रचाकने.. बाकि हाहि भाग मस्तच..
-पहाटवारा

अगदी तन्मयतेनं ह भाग वाचला.
असं काही शेअर केल्याबद्दल मनापासून आभार!

रामदास's picture

10 Nov 2014 - 8:35 pm | रामदास

लेखमाला मी वाचलीच नव्हती. आता वाचतो. हा भाग अर्थातच चांगला झाला आहे.

मुक्त विहारि's picture

10 Nov 2014 - 9:42 pm | मुक्त विहारि

आवडला...

सुनील's picture

11 Nov 2014 - 8:37 am | सुनील

लेखमाला आवडतेय.

सुधा नरवणे आणि शरद चव्हाण हे आकाशवाणीवरील अनुक्रमे सकाळ आणि संध्याकाळचे वृत्तनिवेदक लख्ख आठवताहेत.

खटपट्या's picture

11 Nov 2014 - 9:01 am | खटपट्या

खूप छान झाला हाही भाग !

वाचतेय.छान चाललीये मालिका.पुभाप्र

समीरसूर's picture

11 Nov 2014 - 11:07 am | समीरसूर

हा ही भाग उत्कृष्ट! संपूर्ण मालिकाच काहीतरी नवीन, छान, वेगळं वाचल्याचा आनंद देतेय. शुभेच्छा! :-)

आकाशवाणीवरील बातम्यांच्या अनेक आठवणी आहेत. अर्थात बातम्या ऐकल्याच्या आठवणी. :-)

सकाळी ६:५५ वाजता संस्कृत बातम्या असत. अजूनही असतात. संस्कृत बातम्यांची "इयम आकाशवाणी, प्रवाचकः बलदेवानंद सागरः..." अशी धीर-गंभीर सुरुवात झाली की दिवस सुरू झाल्यासारखं वाटे. या वृत्तनिवेदकाचा आवाज असा मजबूत आणि स्वच्छ! ऐकायला खूप मस्त वाटायचं. एक आगळं चैतन्य वाटायचं.

सकाळी ७:०५ ते ७:१० मराठी बातम्या असत. "आकाशवाणी, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे..." यांचा आवाजदेखील एकदम स्वच्छ, खणखणीत, आणि आश्वासक वाटे. या बातम्यांमध्ये अनेकदा वाक्याच्या शेवटी "...आहे" चा इतका अतिरेक होत असे की ऐकतांना मजा वाटत असे. "पंतप्रधान श्री नरसिंहराव यांनी देशाला उद्देशून हे आव्हान केलं आहे. ही पाऊलं उचलणं देशाच्या हिताचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे...."

आमच्या लहानपणी जळगांव केंद्रावर उषा शर्मा नावाच्या निवेदिका होत्या. त्यांचा आवाज इतका मधूर आणि मुलायम होता की त्या बोलत असतांना ऐकतच रहावे असे वाटत असे. त्यांनी अगदी "आवक - घेवडा २ क्विंटल, गवार शेंग - १ क्विंटल. बाजारभाव - कांदा - ठोक ७ रुपये किलो..." वगैरे जरी सादर केलं तरी गोड वाटायचं. अर्थात त्यांनी कधी बाजारभाव सांगीतले नाहीत.

जळगांव आकाशवाणीवर भैय्या उपासनी हे एक दमदार आवाजाचे सादरकर्ते होते. "नमस्कार मंडळी" असे म्हणून त्यांनी कार्यक्रम सुरू केला की ऐकतांना उत्साह संचारत असे. यांचं दुर्दैवानं काही वर्षांपूर्वी अकाली निधन झालं. यांनी 'गोट्या' मालिकेमध्ये गोट्याच्या वडिलांची भूमिका छान साकारली होती. आकाशवाणीवरून छोट्या पडद्यावर असा प्रगतीचा प्रवास सुरू असतांनाच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि एक गुणी निवेदक-नट हरवला.

पहाटवारा's picture

11 Nov 2014 - 12:10 pm | पहाटवारा

मस्त प्रतीसाद ..सुधा नरवणेंचे 'आहे' एक्दम पिन्-पोईंट ..
लहानपणी आमच्या घरी तर सकाळी रेडिओ हा जणू काहि टाईमकीपर असे. प्रत्येक कार्यक्रमानुसार आप्-आप्ली कामे ऊरकली तरच आम्ही अन आई (शिक्षीका असल्याने)शाळेत वेळेवर पोहोचत असू. ती सवय अजूनहि आहे .. आता जर बीबीसी वल्ड न्युज वाल्या लाक्श्म्मी सिंग यांच्या न्युज गाडिच्या एफ एम वर ऐकु आल्या नाहि तर समजावे . ऊशीर झाला .. :)
-पहाटवारा

माधुरी विनायक's picture

21 Nov 2014 - 5:53 pm | माधुरी विनायक

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार...सुधा नरवणे, शरद चव्हाण, भय्या उपासनी यांच्याबरोबर माझ्या शाळेतल्या आठवणींमधला आवाज म्हणजे भालचंद्र जोशी... आकाशवाणीने खरंच भरभरून दिलं, वाढत्या वयात आणि प्रत्यक्ष काम करतानाही...प्रतिसादांनीही अनेक आठवणी जागवल्या...