मातृत्वाचा शृंगाररस
मातृत्वाचा शृंगाररस
चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार
कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान
ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ
हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार
अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन