आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची.
अशीच काही वर्षे गेली. घरात अजुन एक बाळ आले. कोळ्याला वाटायला लागले, सभोवताल बदलतच नाहीये. तीच झोपडी, तेच जुने कपडे. रात्रीची झोप उडाली. एक दिवस स्वप्नात एक म्हतारा आला. स्वप्नात आला कि खरोखर आला हे काय कोळ्याला कळाले नाही. त्याने कोळ्याला सांगितले, की तुझे नशिब झोपलेले आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही, काहीही बदलणार नाही.