चिंब
वृक्ष जसा -
अंकुरण्या आधी
बीजस्वरूपी
अस्फुट असतो
बाण जसा-
सुटण्याच्या आधी
प्रत्यंचेवर
सज्ज राहतो
मंत्र जसा -
स्फुरण्याच्या आधी
बीजाक्षरी
निद्रिस्त राहतो
अर्थ तसा
उलगडण्या आधी
शब्दांच्या
निबिडात राहतो
ओथंबून मग
येतो अवचित
कोसळतो अन्
चिंब भिजवितो