बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

मुलामुलांचीऽऽऽ
मजेमजेचीऽऽऽ
बालचित्रवाणी
फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ
फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ
बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी

तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती.... स्वप्नी आले काही , एक मी गाव पाहिला बाई', 'स्वप्नामध्ये आम्ही पाहिला नवलाईचा गाव, वेशीवरती पाटी होती मोठ्ठ्यांना मज्जाव', 'एकतरी झाड लाऊया हो, एकतरी झाड जगवूया! रंगीत रंगीत फुलाफुलांनी परिसर अपुला सजवुया' अशी गाणी कानात आणि मनात रुंजी घालू लागली. २०-२५ मिनिटांच्या या कार्यक्रमावर मी मनापासून प्रेम केलं.
गाणी, हस्तकला , चित्रकला, खेळ, गप्पा, गणित , विज्ञान, इतिहास, भूगोल अशा अनेक विषयांवर अगदी बालमनाचा ठाव घेणार्‍या छोटेखानी कार्यक्रमांची ही लळा लावणारी जंत्री. अजुनही लहान व्हावसं वाटतं आणि बालचित्रवाणी बघायची इच्छा अनावर होते.

बालचित्रवाणिसोबतच इतर आवडीच्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे गोट्या. आजही मानसी मागीकर यांना पडद्यावर पाहिले की गोट्याची माई हीच प्रतिमा डोळ्यासमोर येते ( माझ्या स्मरणशक्तीप्रमाणे ह्यांनीच गोट्याच्या माईची भूमिका केली होती). त्या गोट्याची भूमिका करणार्‍या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे.

मना घडवी संस्कार, मना आकार संस्कार असे सुस्वर शब्द कानी पडले की मी अगदी आवर्जून टी.व्ही. समोर येऊन बसायचो. संस्कार मालिकेतून कळत-नकळत झालेले संस्कार आजही साथ-सोबत देतात. अश्या मालिकांचे आज वावडे का?

'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' , 'बंदिनी - स्त्री ही बंदिनी. हृदयी पान्हा, नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी' , 'परमवीर - जो करे जीवाची होळी, छातीवर झेलून गोळी...' , 'हॅलो हॅलो हॅलो...हॅलो इन्स्पेक्टर ' अशी कितीतरी शीर्षकगीते मनात घर करून आहेत. पण ह्या सर्वांत मनात घर केलं ते बालचित्रवाणीने ते मात्र कायमचं. आज तात्यांचा लेख वाचून त्याची आठवण आली आणि लिहावसं वाटलं इतकचं...

प्रतिक्रिया

ओंकारशेठ,

सुंदर लेख रे! मना घडवी संस्कार आणि ती मालिका छानच होती. मोहन जोशींनी त्यात छान काम केलं होतं!

मुलामुलांचीऽऽऽ
मजेमजेचीऽऽऽ
बालचित्रवाणी
फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ
फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ
बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी

मस्तच आहे हे गाणं! :)

त्या गोट्याची भूमिका करणार्‍या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे.

गोट्याचं काम करणार्‍या त्या मुलाचं आडनांव घाणेकर का काहीसं होतं एवढं मला आठवतंय.

'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात'

हे माझंदेखील अतिशय आवडतं गाणं. आम्ही मित्रमंडळी जेव्हा घरगुती मैफल जमवतो तेव्हा पुष्कळदा हे गाणं मी गातो. कधी पुण्याला आलो तर एखाद-दुसरा पेग पिऊन तुलाही हे गाणं भर हाटेलात ऐकवीन! :)

ह्याचे शब्द खालीलप्रमाणे -

'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात'

बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात!

असो..

आपला,
(माळरानातला) तात्या.

गोट्याचे नाव जॉय घाणेकर.
या सगळ्यांत 'संस्कार' ही मालिका मला सर्वाधिक आवडायची.
देव सर, कीर्तने मॅडम सगळी मंडळी ओळखीचीच वाटायची. मोहन जोशींची हेडमास्तरांची अतिशय सुंदर भूमिका. मुलांनीसुद्धा छान कामे केली होती. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी असलेली शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असो.
संस्कार मालिकेचे शीर्षकगीतही मस्त. गायन-संगीत श्रीधर फडके चूभूद्याघ्या.
तेजस्पर्शाने दूर हो अंधार
जैसा मुळांचा वृक्षा असे आधार
शिल्पास जैसा आकारी शिल्पकार
मना घडवी संस्कार
(सुसंस्कृत)बेसनलाडू

ॐकार,
छान आठवण करून दिली. माझी शाळा दुपारची असायची. आणि बालचित्रवाणी कार्यक्रम सव्वा अकरा ला सुरू व्हायचा. ११:१५ ते ११:३५/४० मग ११:४० ते १२:०० अशा दोन लहान भागात तो कार्यक्रम दाखवायचे.
तो कार्यक्रम बघता बघताच मी जेवण करायचो, मग शाळेला जायचो.

त्यातील एक कथा नेहमी आठवते. ती बाहुल्या वापरून दाखवलेली. एक मुलगी दुसर्‍या मुलाला स्वच्छतेचे महत्व सांगत असते. त्यात त्या मुलाला शिंक आल्यावर ती मुलगी (दोन्ही बाहुल्याच) स्वतःचा रूमाल देते. तो मुलगा नाक शिंकरून तसाच रूमाल परत देतो. तर ती मुलगी म्हणते: "शीऽऽऽऽऽऽ घाणेरडाऽऽऽऽऽऽ" मग त्याला ती रूमाल धूवून देण्यास सांगते. वगैरे वगैरे.

संस्कार हेही छानच होते. संस्कारमधील नेमके सर्व भाग आठवत नाहीत. पण सर्व मुले परीक्षेत बघून लिहिण्याची परवानगी मागतात ते आठवते. तेव्हा मुख्याध्यापक त्यांना परवानगी देतात. आता बघूनच लिहायचे म्हणून ते अभ्यासच करत नाही.पुस्तकाला हातच न लावल्याने नेमके परिक्षेच्या वेळी कुठल्या प्रश्नाचे उत्तर कोठे शोधावे हे ही त्यांना समजेनासे होते.

गोट्या मधील च ची भाषा व दोन वजा म्हणजे एक अधिक प्रमाणे दोन नकार म्हणजे एक होकार असा लावलेला अर्थ अजूनही मस्तच वाटतो.

आणखी ही भरपूर आठवणी आहेतच.

घरी केलेली मिसळ व पाव खाण्यास गेल्याने प्रतिसाद अर्ध्यातच सोडावा लागला ;)

सध्या मी बाबुराव अर्नाळकरांचे 'धनंजय' हे पुस्तक वाचतोय. ते वाचताना डोळ्यासमोर 'परमवीर'-कुलदीप पवार व 'हॅलो इन्स्पेक्टर'- रमेश भाटकरच समोर येताहेत. 'धनंजय' ची भूमिका कोणी केली होती हो? त्यातील 'छोटू' बहुधा विजय गोखलेंनी साकार केला होता.

धनंजय = मोहन जोशीच!
त्याचप्रमाणे प्रभाकर ही आणखी एक डिटेक्टिव मालिका असल्याचे आठवते. त्यात प्रभाकर = शफी इनामदार.
(स्मरणशील)बेसनलाडू

धनंजय = मोहन जोशीच
वाटलेच होते. खात्री करत होतो. धन्यवाद :)

अगदी ११ वी १२ वी पर्यंत बाघितली ;-) ११ वाजता कॉलेज असताना सकाळी १० वाजता जेवणाचं ताट टीव्हीसमोर बसून बालचित्रवाणी आणि यूजीसी चे फिजिक्स्/मॅथ्स चे क्लासेस बघायचो.

ससा रे ससा तो कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली...

हे गाणे म्हणणारी चष्मीस मुलगी आणि सोबतचे लहानगे वादक अजूनही आठवतात.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित