फोरिनची पाटलीण

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
13 Apr 2011 - 1:16 pm

एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता. यंदाच्या विधानसभेच्या काळात चितकरवाडीतले बबनराव पाटील (आमदार) एकतर वरच्या वारीला जाणार किंवा सक्रीय राजकाराणातुन निवृत्त होणार याची खात्री असल्यामुळे शंकररावांचे लक्ष आता आमदारकीकडे लागले होते. त्यामुळे गावच्या राजकारणावरची पकड यंदा त्यांनी जरा घट्ट केली होती. मीटिंगा सुद्धा ते ग्रामपंचायतीच्या हापिसात न घेता दुपारच्या टायमाला घरीच घ्यायचे. मीटिंगमध्ये चहा, भजी, फरसाण, लाडु ठेवुन ते पंचायत सदस्यांना राखुन होते. शिवाय घरी मीटिंग घ्यायचा फायदा म्हणजे दत्तात्रयपंत भट आपसुक घरी येउन बसलेले असायचे त्यांच्याशी सल्ला मसलत व्हायची.

शंकरराव निवांत झोपाळ्यावर टेकले होते. झोपाळा चांगला ४ माणसांना बसण्यासाठी बनवला होता पण शंकरराव त्याच्यावर एकटेच बसायचे. त्याच्यावर बसल्यावर त्यांना सिहांसनाधिष्ठीत का काय ते झाल्यासारखे वाटायचे. झोपाळा कर्रर्रर्रर्र कट्टट्ट कर्रर्रर्रर्र कट्टट्ट आवाज करत मागेपुढे होत होता. शंकररावांना जरा तंद्री लागल्यासारखी झाली होती. आज नेहेमीपेक्षा जरा लवकर उठुन ते शेतावर चक्कर मारुन आले होते. शिवा महार त्यांच्या शेतावर पुर्वापार कामाला होता. आताशा कामं तोच बघायचा. गोठ्यावर त्याचा मुलगा भानाजी असायचा आणि वाड्यावर (ज्याला ते भोसल्यांचा महाल म्हणायचे) धाकला सुभान्या असायचा. त्यामुळे शंकरराव तसे निवांत असायचे. थोरला आनंदराव अमेरिकेत डॉक्टरकी करायचा आणि धाकले दोघे विलासराव आणि अजिंक्यराव पुण्याकडे शिकायला ठेवले होते. सुमेचं मागच्या वर्षीच लग्न झाले होते आणि थोरली सुलक्षणा तर वर्षाकाठी एका नातवाच्या / नातीच्या जन्माचा सांगावा धाडत होती. दोन्ही पोरी दिल्या घरी सुखी होत्या. आता शंकररावांना आनंदरावांच्या लग्नाची चिंता लागुन राहिली होती. दूर अमेरिकेत पोराचे खाण्याचे हाल होत असतील. एकदा का लग्न झाले की काळजी मिटली. त्यांनी समणापूरच्या पाटलाची पोरगी पण त्याच्या साठी बघुन ठेवली होती. पण आनंदराव यायचे टाळत होते. त्यांना आनंदरावांचे आनंद हे नावच आवडायचे नाही. पण पार्वतीबाईंच्या (म्हणजे शंकररावांच्या अर्धांगिनी) आग्रहाखातर मुलांची नावे त्यांनी मॉर्डन ठेवली होती. मुलींबाबत मात्र त्यांनी ऐकले नाही. आपल्या आज्जीचे नाव सुमन, धाकटीला दिलं आणि मोठ्या म्हातारीचे नाव (म्हणजे शंकररावांच्या पुज्यांची पहिली बायको. तिला मूलबाळ होइना म्हणुन त्यांनी दुसरे लग्न केले. शंकररावांवर मोठ्या म्हातारीचा भारी जीव.) सुलक्षणा थोरलीला लावले. मोठी म्हातारी वारल्यानंतर दोनच महिन्यांनी सुलक्षणा जन्मली. म्हातारी मोठ्या भाग्याची एकादशीला गेली. त्यामुळे शंकरराव एकादशीला मोठी पूजा करायचे. ही पूजेची सूचना पंतांनी केलेली. खरे म्हणजे स्वतःच्या दक्षिणेच्या सोयीसाठी. पण शंकररावांना पटली. पंत आले की पुढच्या महिन्यातल्या पुजेची बोलणी पण करता येतील आणि जमल्यास त्याचवेळेस आनंदरावांचे शुभमंगल करावे या विचारात शंकरराव होते .

पंतांकडुनच पत्र लिहून घ्यावे असा विचार करत असतानाच पोस्टमन आला. शंकररावांची तंद्री लागलेली बघुन थोडा घुटमळला पण अखेर धीर करुन त्याने हाक मारलीच. शंकरराव भानावर आले. पत्र आले आहे ते सुद्धा पाकीटातुन म्हणजे आनंदरावांचे हे त्यांनी ओळखले. तार आली म्हणजे खानदानातला कुठलातरी म्हातार्‍या / म्हातारीसाठी वड्याच पीठ मळायला घेतलं गेलं आहे, पोस्टकार्ड आले म्हणजे सुमी किंवा सुलक्षणा बाळंतपणासाठी येते आहे आणि इनलँड लेटर आले म्हणजे कुणाची तरी ख्याली खुशाली कळणार अशी शंकररावांची खूण गाठ होती. गावात कुरीयर येण्याचे दिवस नव्हते ते आणि गंमत म्हणुन लोक फोन करायचे नाहीत. केलाच तर तो लागण्याची शक्यता ६०स एक या गुणोत्तरात असायची. असेही गावात फोन मोजुन चार. एक पाटलांकडे, एक नाईकांकडे, एक पंचायतीच्या कार्यालयात आणि एक सरपंचांच्या गावातल्या कट्टर वैर्‍याकडे हंबीररावाकडे.

पोस्टमन आला तसा शंकररावांनी त्यालाच पत्र वाचायला सांगितले. त्यांना वाचता यायचे नाही असे नाही. पण आनंदरावांचे पुणेरी मराठी त्यांना फारसे झेपायचे नाही आणि वाचायचा असाही त्यांना मनापासुन कटाळा होता. आनंदरावांच्या पुणेरी मराठीचा मात्र त्यांना मनापासून अभिमान. दत्तात्र्ययपंतांना ते हमखास म्हणायचे "काय भट तुमा बामणांच्या पोरासारखा झ्याक मराठी बोलतो की नाही आमचा आनंदराव?" शंकररावांचे पत्र वाचायचे पोस्टमनच्या जीवावर आले होते. त्याला आधीच २०-३० पत्रे वाटायची होती. झालीच तर तुकारामवाडीत जाउन एक पार्सल द्यायचे होते. पण शंकररावांना नाही म्हणायची त्याची टाप नव्हती. त्याने मुकाट्याने पत्र उघडुन वाचायला सुरुवात केली.

तेवढ्यात दत्तात्रयपंत सुद्धा आले. पंत गावातले एकमेव ब्राह्मण. लग्न, मुंजी, बारश्या पासुन ते मयतीपर्यंत सगळे तेच करायचे. लग्नाला एक बामण मयतीला दुसरा ही पुण्यातली चैन गावाला परवडण्यासारखी नव्हती आणि पंतांनाही. गावातले एकमेव ब्राह्मण घर पुण्याला स्थलांतरीत झाल्यानंतर पार्वतीबाईंनी आपल्या माहेरहुन पंतांना बोलावुन घेतले त्यालाही आता २५-३० वर्षे होत आली होती. पंत तसे बेरकी. चार बूकं शिकलेली होती त्यांनी, शिवाय वेद पुराणं पाठ होतीच. त्याशिवाय पंतांचा राजकारणाचा अभ्यास दांडगा होता आणि मूळातच राजकारणी मुरब्बीपणा त्यांच्या अंगात मुरलेला होता. गरज पडल्यास शंकरराव सुद्धा त्यांचा सल्ला घेत. त्यामुळे गावात पंतांना मान होता. पंत फारसे श्रीमंत नव्हते पण पैका राखुन होते शिवाय लोकांना पुजेचे योग्य ते उपाय सांगुन ते पैसा पदरात पाडुन घेत. त्यांच्या पोरांच्या शिक्षणाचा खर्चही शंकररावच करत. दोन्ही पोरं शंकररावांच्या पोरांबरोबरच शिकत होती त्यामुळे पंतांना तसा काही घोर नव्हता. त्यामुळे फावला वेळ ते गावच्या राजकारणात काड्या इकडुन तिकडे सरकावुन घालवत असत.

पोस्टमनने पहिली ख्यालीखुशालीची वाक्ये ऐकवुन झाली. गाडी दुसर्‍या परिच्छेदाकडे वळली. "आबा, ( आनंदराव पुण्याला राहुन आणि मग अमेरिकेत जाउनही आपल्याला आबाच म्हणतात. बाबा / पप्पा असली खुळं त्यांच्या डोक्यात शिरली नाहीत हे ऐकुन शंकररावांना नेहेमीच बरे वाटायचे) बरेच दिवस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, पण धीर नाही झाला कधी. पण आता सांगायलाच हवे.मी १५ तारखेला गावाकडे येतो आहे. सोबत क्रि....." पोस्टमनच्या तोंडुन पुढचे शब्दच निघाले नाहीत. त्याने एक मोट्ठा आवंढा गिळला. झक मारली आणि आज सरपंचाकडे आलो असे काहीसे झाले त्याला. मध्येच थांबल्यावर शंकरराव भडकले,"काय रे सुक्काळीच्या औंदा पोस्त नाय का रे मिळाली तुला यवस्थित? असा बा मेल्यागत थाबलास ते मध्यच.". पोस्टमन खुळ्यागत बघतच राहिला नुसता. शेवटी पंतांनी पत्र त्याच्या हातातुन काढुन घेतले. वाचुन दाखवावे की नाही हा प्रश्न त्यांनाही पडला हे बघुन शंकरराव बेचैन झाले. "अहो असं काय लिवलय आनंदरावांनी पंत. वाचा तरी. नाहीतर इकडे द्या, आमी वाचतो. देवाच्या दयेने ४ बुकं शिकलोय आमी बी." . शेवटी पंतांनीच पुढचे वाचुन दाखवले "सोबत क्रिस्टीन पण आहे. तुमची सून" पुढचे ऐकायचे भानच शंकररावांना उरले नाही. दाराआड उभे राहुन ऐकणार्‍या पार्वताबाईंनीही डोळ्याला पदर लावला.

शंकर रावांचा चेहरा लालेलाल झाला. कपाळावरची शीर न शीर दिसु लागली. मुठी आवळल्या गेल्या. दंड फुरफुरायला लागले. शंकरराव तसे पैलवान गडी. एक बुक्की मारली तर चार विटा फोडतील. त्यामुळे पार्वतीबाइंनी चटकन पुढे होउन टेबलावरची आनंदरावांनी मागल्या वर्षी अमेरिकेहुन आणलेली फुलदाणी काढुन घेतली. न जाणे रागाच्या भरात शंकररावांनी ती फोडली तर?

शंकररावांना तर काही सुधरेना झाले. "मायझव खानदानाची इज्जत धुळीला मिळवली रांडेच्यानं. हीच थेरें उधळायची होती म्हनुन गेला होता का रे अक्करमाशा अमरिकेला. य तर खरं तु, मुनसिपाल्टीचा पास तयारच ठेवतो तुझ्यासाठी आणि त्या भवानीसाठी." शंकरराव म्हणतील ते खरे करतील याची पार्वतीबाईंना खात्री होती त्यामुळे त्या भ्यायल्या. समजावणीच्या सुरात म्हणाल्या "जाउ द्या आता. आपलंच लेकरु हाये. लग्न करुन आपल्याच गावला तर येतोय नव्हं?". "अगं पण किरिस्ताव हाये पोरगी. बारदानात छी थू होइल ना आमची. ४२ पिढ्यात आम्ही शहाण्ण्व कूळं सोडुन सोयरीक नाही केली कधी. सिवाजी महाराजांपासुन परंपरा हाय या वाड्याची. सिवाजीराजांचे वंशज आम्ही ही असली पापं करु होय?" वास्तविक तो वाडा ४०० वर्षे जुना आहे याचा काहीही पुरावा नव्हता. शंकरराव भोसले शिवाजीमहाराजांचे वंशज असल्याचाही काही पुराव नव्हता. पण शंकररावांचा आज्जा मोठा धोरणी. त्याने गावात बातमी पसरवुन दिली की त्यांचे पुर्वज शिवाजी महाराजांचे चुलत चुलत चुलते होते आणि त्यांना गावची पाटीलकी वंशपरंपरेने महाराजांनीच बहाल केली आहे म्हणुन. त्यावर संशय घेण्यासाठी कोणाची माय व्यायली नव्हती. " अगं तिंच्या नावातच क्रिस्त हाय. म्हंजे कट्टर असणारे ती. कोण जाणे आनंदरावाला पण धर्म बदलायला लावल. ते काही जमायच नाही. तु रवा भाजायला घे. आनंदरावाचा तेरावा घालयचाय मला १५ तारखेलाच."

आता मात्र पार्वतीबाई घाबरल्या. त्यांनी पंतांकडे आशेने बघितले. शंकररावांना समजावु शकतील असे ते एकमेवच होते. पंतही विचारात पडले होते. शंकररावांनी खरेच आनंदरावांना गोळी घातली असती तर त्यांना फाशी झाली असती आणि त्यांच्या तेराव्यानंतर पंतांची आमदनी कमी झाली असती याची पंतांना भिती. पण मूळातच इद्रट डोके त्यांचे. त्यांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली " हे बघा सरपंच, लग्न तर झालय आता. जी काही छी थू व्हायची ती तर होइलच. उलट आनंदरावांना तुम्ही बेदखल केलेत तर अजुन होइल. त्यापेक्षा थंड डोक्याने विचार करा. गोर्‍या सुनेचा उपयोगच होइल राजकारणात. तुमच्या धर्मनिरपेक्ष पणाची साक्ष पटेल लोकांना. शिवाय गोर्‍या कातडीचा उपयोग होतोय प्रचारात" "आरं पण" शंकरराव मध्येच म्हणाले. पण हा डाव सोडला तर प्रकरण हाताबाहेर जाइल हे माहिती असल्यामुळे पंत त्यांना मध्येच तोडत पुढे बोलत राहिले " आणि असे बघा इंदिराबाईंच्या पोराने पण गोरी बायकोच केली की हो. आणि आज काय परिस्थिती आहे? तीच बाई देश चालवती आहे ना? तुम्ही पण गोरी ख्रिश्चन सून स्वीकारली तर तुम्हाला फायदाच होइल पक्षात. मग नंतर सवडीने तिला द्या की हिंदु धर्माची दीक्षा." ही मात्रा मात्र लागु पडली. शंकरराव विचारात पडले.

पंतांनी एका दगडात बरेच पक्षी मारले होते. पहिली म्हणजे शंकररावांचा राग शांत झाला होता. दुसरा म्हणजे त्यांनी क्रिस्टीनला स्वीकारले तर आनंदरावांचे वैदिक पद्धतीने धूमधडाक्यात लग्न लावता येणार होते. सूनबाईंच्या शुद्धीकरणाची पूजा वेगळीच आणि मग धर्मांतरण घडुन आले तर चांदीच. सगळ्यामध्ये पूजेच्या पौराहित्याचा मान त्यांचाच. चांगले पाच पंचवीस हजार सुटले असते. शिवाय या सल्ल्याबद्दल शंकररावांची मर्जी अजुन वाढणार ते तर वेगळेच.

शंकररावांच्या डोक्यातही चक्रे फिरु लागली. त्यांनाही प्रचारात गोर्‍या सुनेचा उपयोग होणार होताच. शिवाय सरपंचपदाच्या वारसदाराचा प्रश्न होताच. आनंदरावांना काहीतरी कारण काढुन इथेच ठेवुन घेउ आणि करुन टाकु सरपंच असा त्यांचा साधा डाव होता. वास्तविक सरपंचपदासाठी उंडगे अजिंक्यराव योग्य होते. असेही १० वी पर्यंत ते कसेबसे पास होत गेले होते. शिक्षणाचा त्यांचा उजेडच होता. पण आताशी दोघा थोरल्या भावांच्या नादाने कॉलेजात शिकत होते झालं. (वास्तविक गोम अशी होती के शंकररावांचे कट्टर वैरी हंबीरराव. त्यांची कन्या अजिंक्यरावांच्या कालेजात (आणि कलिजात) शिकत होती आणि दोघांचा टाका भिडला होता. गावात राह्यलो तर बाप भेटु देणार नाही म्हणुन दोघे पुण्याला शिकत होते.). विलासराव बुळे असल्यामुळे ते पण आनंदरावांच्या पावलावर पाउल टाकुन अमेरिकेला जाणार याची शंकररावांना खात्री होती. पण अनायासे संधी साधुन आली आहे तर ती ते सोडायला तयार नव्हते.

तरी शंकररावांनी थोडी कुरकुर केलीच. "फोन नव्हता करत येत व्हय त्याला. आम्ही काय फोनमध्ये घुसुन मारणार होतो व्हय त्याला?" पण गावातले फोन १५ दिवस बंद आहेत ( शंकररावांच्या सांगण्यावरुन चोरीछुपे हंबीररावांच्या घरची लाईन तोडण्यासाठी गेलेल्या माणसांच्या कृपेने गावातले चारही फोन बंद पडले होते) याची आठवण करुन दिल्यावर ते शांत झाले. हाच मौका साधुन पंतांनी त्यांचे बोलणे पुढे रेटुन शंकररावांना पटवले. आणि मग मात्र शंकररावांना आठवण झाली की आज तर १४ तारीख. म्हणजे आनंदराव उद्याच येणार. गावात गोर्‍या सुनेची बातमी फिरवायला लागणार. जाहिरातबाजी करायला लागणार. सूनेच्या गृहप्रवेशाची तयारी करावी लागणार. लवकरातला लवकर मुहुर्त साधुन देवाब्राह्मणांसमोर लग्न लावुन द्यायला लागणार. एक ना दोन, हजार कामे.

त्यांनी तत्काळ सुभान्याला हाळी दिली. तो मागल्या दाराआडुन सगळे ऐकत होताच. त्याला तत्क्काळ गावात दवंडी पिटाळायला सांगितली. "असे कर नाईकांकडे जा. त्यांच्या तोंडात साखर घालुन बातमी दे आणि त्यांना इकडे धाडुन दे" नाईक गावची बडी असामी. शिवाय शंकररावांना राजकीय स्पोर्ट त्यांचाच. त्यांच्या शेतावर राबणारी, गोठ्यावर काम करणारी, त्यांच्या घरची मिळुन नाही म्हणली तरी हजार पाचशे टाळकी. त्यांना योग्य तो मान द्यायला हवा. "मग तसाच पुढे जा उपसरपंचांना धाडुन दे. भावी सरपंच येताहेत म्हणावं." थोडक्यात तुम्ही सरपंचपदाची आस लावुन बसु नका. "तसाच पुढं जाय आणि हंबीररावांना निरोप दे." हंबीररावांचे नाव ऐकताच सुभान्या थबकला. शंकररावांची आणि हंबीररावांची दुष्मनी आख्ख्या पंचक्रोशीत मशहूर होती. हंबीररावांच्या आज्ज्याने श़ंकररावांची वडिलोपार्जित २० एकर जमीन आणि २ विहिरी हडपल्या तेव्हापासुन दोन्ही घरं एकमेकांवर दात खाउन होती. " तर रे हंबीर राव चुलते नव्हं आमचे. बिरादरीला मान द्यायला नगं?" शंकरराव गालातल्या गालात हसत म्हणाले. वास्तविक ते हंबीररावांना खाली दाखवायचे एक संधी सोडायचे नाहीत. ही संधी कशी सोडणार. गोरी सून म्हटल्यावर हंबीररावाची कशी जळणार हे शंकररावांना चांगलच माहिती होती. " तुझ्या पांढर्‍या पायाच्या सूनेसमोर आमची गोरी सून कशी दिसतीय बघ म्हणाव". हंबीररावाच्या पोराच लग्न झाल आणि दुसर्‍र्‍या दिवशी त्याचा आजा गेला. म्हणुन सगळे गाव त्या पोरीला बिचारीला पांढर्‍या पायाची म्हणायचे. वास्तविक हंबीररावाचा बा गेल्याचा शंकररावाला आनंदच झाला होता. पण त्याच्या सूनेला पांढर्‍या पायाची म्हणुन त्यांना असुरी आनंद मिळायचा.

नंतर पंतांकडे वळुन ते म्हणाले. अजिंक्यरावांना आणि विलासरावांना पण बोलावुन घ्या पंत. तुम्हीच धाडा निरोप. पंतांनीही वेळ न घालवता पत्र लिहायला सुरुवात केली. पोस्टमन असाही अजुन थांबलाच होता. आनंदरावांच थडग उभारल जाणार की नाही याची त्याला अजुन नीटशी कल्पना आलेली नहती. पण पत्र जातायत म्हणजे सगळे मार्गी लागले असे समजुन तो जायला निघाला. ते बघुन शंकरराव म्हणाले "काय रं खज्जाळीच्या कुठं निघालास. पत्र पाठवायची हायत ऐकलस नव्ह.? हातासरशी घेउन जा. उद्या या वक्ताला पोरं घरी हवीत माझी." आता सरपंचाने हुकुम सोडला म्हणजे विलासराव, अजिंक्यराव पोचलेच पाहिजेत हे पोस्टमन जाणुन होता पण पोष्टाचा कारभार पण तो जाणुन होता. पोस्टाने पत्र पाठवली तर कदाचित आनंदरावांच्या नातवाच्या बारश्यालाच ती पोरांना मिळतील ही शक्यता नाकारता येत नव्हती. शेवटी त्याने मनोमन एस्टीतुन पत्रं पाठ्वायचा निश्चय केला. रंग्या डायवरला पत्र पोचवण्याची गळ घालायची त्याची योजना होती. जे चार पैसे जायचे ते जाउ देत. गोर्‍या सुनेकडुन या वर्षाला जास्त पोस्त घेउ असा व्यावहारिक विचार त्याने केला.

इकडे सुभान्याच्या कृपेने गोर्‍या सुनेची जाहिरात गावभर झाली. हंबीररावांच्या घरी सुद्धा त्यांच्या समर्थकांची जोरदार मीटिंग झाली. सून गोरी नसुन तिच्या अंगभर कोड उमटले आहेत अशी हाकाटी फिरवावी असा बेत ठरला आणि तो अंमलातही आणला गेला. हे समजल्यावर शंकरराव अजुनच चिडले. मोठा जुलुस करायच बेत त्यांनी पक्का केला. बॅंड बोलवला. खास मळ्यामध्ये ठेवलेली मर्सिडीज आनंदरावांना आणायला मुंबैच्या विमानतळावर पाठवुन दिली. ११ सवाष्णींकडुन सूनबाईंना ओवाळण्याचा घाट घाताला. गावच्या मारुतीच्या गुरवाला सांगावा धाडुन दिला की पोरगा आणि सून येइल त्यांच्या पुजेची तेयारी ठेवावी. खास गोदावरीचं पाणी भरुन सात कळशी मागवल्या. चंदनाचा धूर घरात पसरवला.

आनंदरावांना या गोष्टीची काहीच कल्पना नाही. आबा चिडला असेल याचीच त्याला चिंता होती. क्रिस्टीन ख्रिश्चन असल्याने आबा सहजी तयार होणार नाहीत हे त्याला माहिती होते. वास्तविक तो उदारमतवादी होता. क्रिस्टीनच्या ख्रिश्चन असण्याला त्याचा काही आक्षेप नव्हता. त्याने जरी धर्म बदललेला नसला तरी तिकडे जाउन त्याचे "अँडी" असे नामकरण झाले होते ते त्याला मान्य होते. क्रिस्टीनला बघुन आबा आपल्याला हिमालयात गाडुन वर "अँडीज अँडीज " म्हणुन नाचेल असे एक चित्र सुद्ध त्याच्या डोळ्यासमोर तरळुन गेले. पण आल्या परिस्थितीला सामोरा जायला तो तयार होता.

१५ तारखेला आख्खा गाव सजला होता. शंकररावांच्या वाड्यावर तर दिवाळीच धूम होती. पंत सुद्धा आपले पितांबर नेसुन आले होते. शंकरराव खादी घालुन तयार होते. आज त्यांनी खास जिल्हामंत्र्यांना पण निमंत्रण दिले होते. पार्वतीबाईंनी पैठणी नेसली होती. सूनेसाठी खानदानी शालू काढुन ठेवला होता. क्रिस्टीनच्या गोर्‍या रंगाला अंजिरी शालू कसा खुलुन दिलेस याची महिलामंडळात् चर्चा चालु होती. गावकुसावर शंकररावांची मर्सिडीज दिसल्या पासुन तिसर्‍या मिनिटाला वाड्यावर वर्दी पोचली होती. तोवर गाडी पोचलीच. शंकररावांना राहवेना ते पार्वतीबाईंना उद्देशुन म्हणाले "एSSSS पार्वती अगं जाय ना काजळाची डबे घेउन ये. सूनबाईला दृष्ट लागायची कोणाचीतरी" पार्वतीबाई कुंकवाचा करंडा घेउन तयार होत्याच त्या जाउन जाई काजळाची डबी पण घेउन आल्या.

मर्सिडीज पोचली. दरवाजा उघडला. आनंदराव बाहेर पडले. अमेरिकी रितीरिवाजांना अनुसरुन त्यांनी क्रिस्तीनच्या बाजुचा दरवाजा उघडला आणि क्रिस्टीनने गावात पहिले पाऊल टाकले. ते बघताच शंकररावांच्या छातीत बारीकशी कळ उमटली, पंतांनी डोके गच्च धरले आणि आपल्या सुनेच्या गालावर काजळ दिसेल की नाही या शंकेने पार्वतीबाईंच्या हातातली काजळाची डबी उघडीच्या उघडीच राहिली.

शंकररावांची अमेरिकन सून मूळची नायजेरियन वंशाची होती.

****************************************************************

ही कथा मूळ दुसर्‍या कोणीतरी लिहिली आहे असा दोघा - तिघांचा आक्षेप आहे. मी लिहिली तेव्हा मला खरेच ते माहिती नव्हते. मी गेले दोन आठवडे या कथेचे डिटेलिंग करत होतो. प्रत्यक्ष आयुष्यात असा एक किस्सा समजला होता. त्यावरुन कथा लिहिली. पण जर ती आधी अशीच लिहिली गेली असेल तर (काही ज्येष्ठ सदस्य तसे म्हणतात म्हणजे नक्की असेल) किंवा अगदी कथासूत्र अशी असलेली एखादी कथा असेल तरी हा धागा उडवण्याची संपादक मंडळाला विनंती करतो.

कलाकथामांडणीसंस्कृतीवावरधर्मविनोदवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनविचारलेखप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

गणपा's picture

13 Apr 2011 - 1:24 pm | गणपा

च्यायला हा मृत्युंजयपण सध्या सुसाट सुटलाय. क्रिकेट, मुक्तक, काव्य, कलादालन ज्या ज्या विभागात हात घालतोय तिथे तिथे ठसा उमटवतोय. (काकांनी* डोक्यावर हात ठेवला की काय याच्या?)
(शेवट काहिसा अपेक्षित होता पण मज्जा आली वाचताना.)
*कोणते काका? सांगायची गरज आहे का? ;)

मेघवेडा's picture

13 Apr 2011 - 2:14 pm | मेघवेडा

दाद्या लै भारी सुटलाय..

मजा आली! और आन्दो!

गवि's picture

13 Apr 2011 - 1:28 pm | गवि

अरे.. खरेच जबरा फुल्ल्टू सुटलायस..

ब्येष्ट...

जब्रा धमाल आली..... एवढे व्हर्सटाईल विषय घेऊन कथा लिहिणे साधे काम नव्हे... ग्रेट आहेस.

अरुण मनोहर's picture

13 Apr 2011 - 1:29 pm | अरुण मनोहर

आधी कुठेतरी वाचलेली गोष्ट आहे ही. मला वाटते, शं. ना. किंवा व. पु. अशा कोणातरी प्रसिद्ध लेखकाची अशीच गोष्ट आहे. फार तर ही वेगळ्या व्यक्ती घेऊन लिहीली आहे.

निदान मूळ कल्पना परकीय असे लिहिण्याचे विसरलात का हो?

मृत्युन्जय's picture

13 Apr 2011 - 1:42 pm | मृत्युन्जय

शक्यता नाकारता येत नाही. मला वाचल्याचे आठवत नाही. कथेतला शब्द न शब्द माझा आहे. तरीही अशी कुठली कथा असल्यास संपादक मंड्ळाने ही कथा उडवावी अशी नम्र विनंती.

गवि's picture

13 Apr 2011 - 1:46 pm | गवि

उडवू नये अशी विनंती.

लेखकाला अज्ञात अशी एखादी सर्वसाधारण अशाच सिमिलर लाईनीवरची कथा (पण नेमकी कोणाची हे शोधून काढावे लागेल) जर आधी कोणी लिहिली असेल तरी त्यामुळे ही कथा "आधारित" ठरत नाही.

ही कथा ओरिजिनलच वाटते.

गणेशा's picture

13 Apr 2011 - 1:53 pm | गणेशा

असेच म्हणतो ...

निशदे's picture

14 Apr 2011 - 12:32 am | निशदे

कथा उडवू नका. हवे तर नंतर 'मूळ कथा' वगैरे संपादित करून टाका.......पण छान झाली आहे कथा.....
:)

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2011 - 1:37 pm | नगरीनिरंजन

खंग्री कथा! मस्त जमली आहे. शेवटाला गडबड होणार हे माहिती असूनही हसू आलंच.
मृत्युंजयराव फॉर्मात!

मराठमोळा's picture

13 Apr 2011 - 1:39 pm | मराठमोळा

लै भारी... हुच्च!!!!!

आत्मशून्य's picture

13 Apr 2011 - 1:41 pm | आत्मशून्य

मराठीमधे मी या कथेशी तंतोतंत समान टी.व्ही. एपीसोड पण पाहीला आहे. फक्त नेमके नाव आठवत नाही.

बाकी प्रतीक्रीया एव्हडीच देतो रेसीजम मूर्दाबाद.

अरुण मनोहर's picture

13 Apr 2011 - 1:49 pm | अरुण मनोहर

मला वाटले होते की, फक्त व्यक्ती आणि बॅकगाउंड बदलून लिहीली आहे.
पण आत्मशून्य म्हणतात त्याप्रमाणे तंतोतंत समान एपिसोड असेल तर,
*प्लेगॅरिजम मुर्दाबाद.*

जर कल्पना वापरून नविन गोष्ट बनवली असेल तर निदान तसे श्रेय मूळ लेखकाला द्यायला हवे होते.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 1:55 pm | परिकथेतील राजकुमार

शक्यता नाकारता येत नाही. मला
प्रेषक मृत्युन्जय दिनांक बुधवार, 13/04/2011 - 13:42.
शक्यता नाकारता येत नाही. मला वाचल्याचे आठवत नाही. कथेतला शब्द न शब्द माझा आहे. तरीही अशी कुठली कथा असल्यास संपादक मंड्ळाने ही कथा उडवावी अशी नम्र विनंती

हे स्पष्टपणे लिहिले गेले असताना फुकाची बोंबाबोंब का चालु आहे समजले नाही. लेखक जर प्रामाणिकपणे मान्य करत आहे की चूक झाली असल्यास लेखन उडवले तरी चालेल तर येवढा दंगा करुन त्यानी एखाद्याच्या खून केल्यासारखे आरोप का गेले जात आहेत ?

अशी घटना नजरचुकीने अथवा जाणुन बुजुन ह्या आधी आंतरजालावर कधी घडलीच नाहिये का? दरवेळी आपण समाजसुधारणेचा वसा घेतल्यागत धावुन आलेच पाहिजे का? स्वतःचे चार ओळी वाचनीय लिहिण्याचे कर्तुत्व नसलेली आणि काय वाचावे ह्याचे ज्ञान तर त्याहुन नसलेली अज्ञानी मंडळी गणप्ती समोरच्या उंदरासारख्या उड्या मारताना बघुन अंमळ मौज वाटली.

अवांतर :- खालती अ‍ॅडीभौनी दिलेली संयमित प्रतिक्रीया आवडली.

अरुण मनोहर's picture

13 Apr 2011 - 2:14 pm | अरुण मनोहर

आवरा...!
जर आत्मशून्य ह्यांनी म्हटल्याप्रमाणे तंतोतंत तशी असेल तर...... असे लिहिले होते. ते वाक्य आत्मशून्यच्या प्रतिक्रीयेवर होते.

त्यानंतर लगेच मृत्युन्जय ह्यांच्याशी खरडवहीत खुलासे देखील झाले. माझे त्यांना उत्तर
>>लगोलग खुलासा केला हे चांगले.
तुम्ही म्हणता तशी शब्दनशब्द तुम्ही स्वतः लिहिलाही असेल. कधी कधी होते असे. जुन्या वाचलेल्या कथांमधले आवडलेले बीज पुन्हा नवे रोपटे धरून आपल्या मनात फुलते.
मी वाचलेली कथा मध्यमवर्गीय, बहुदा चाळकरू पार्श्वभुमीवरची आहे. त्यात अशीच वातावरण निर्मीती केली आहे, असेच शेजारर्यांचे संभाषण, जळणे वगैरे.
बहुदा पत्र वाचून दाखवणे त्यात नव्हते.

ती कथा नक्कीच व.पु. ची असावी. पण गॅरंटीड आठवत नाही. असो.
<<

हे त्यांनी दिलखुलासपणे ऐकून घेतले आणि आमच्या दोघातला हा मामला संपला.

पण कोणीतरी ह्यानंतर देखील "कसले खुलासे देत बसला आहेस रे" म्हणून लेखकाला उचकावित आहे.

असो.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार

अंधारात मारलेला दगड येवढा मोक्याच्या जागी लागेल असे वाटले नव्हते.

पण कोणीतरी ह्यानंतर देखील "कसले खुलासे देत बसला आहेस रे" म्हणून लेखकाला उचकावित आहे.

लोकांच्या खरडवह्या ह्या जरी सार्वजनीक* असल्या अतरी त्यातल्या खरडी अश्या संबंधितांच्या परवानगी शिवाय धाग्यांवर येउनयेत अस वाटत.

* खरड वही जरी वय्यक्तिक असली तरी कुणीही कुणाचीही खव वाचु शकतो म्हणुन सार्वजनीक.

आत्मशून्य's picture

13 Apr 2011 - 11:22 pm | आत्मशून्य

होय मी सेम अशाच कथेचा एक एपीसोड मूबै दूरदर्शनच्या एका मराठी टी.वी. सीरीयल मधे खूप वर्षांपूर्वी पाहीला आहे. त्यामधे जेव्हां बापाला मूलाचे पत्र येते की त्याने अमेरीकन मूलीशी लग्न केले आहे ते वाचून बाप प्रचंड खूश होतो, तो खेडेगावतील एक प्रतीश्ठीत व्यक्ती असतो म्हणून स्वागताला सगळीकडे फूले लाव, महागडा बेंडबाजा आण, रोशणाइ कर, ओवाळायला सूवासीनींची रांग जमव असे सगळे ऊद्योग अत्यंत ऊत्साहाने करत असतो (मेन फोकस तो हे सगळ कसं करतो हे दाखवण्यातच जास्त होता). आणी त्यामागे सगळ्यात महत्वाच कारण तो हे सांगत असतो (स्वगत) की आता आपल्या पूढील पीढ्या कशा एकदम गोर्‍या नीर्माण होतील(म्हणूनच मी रेसीजम मूर्दाबाद म्हटले आहे). व म्हणून त्याने स्वागताची तयारी जय्यत केलेली असते, पण जेव्हां त्याचा मूलगा पांढर्‍या अ‍ॅम्बेसीडर मधून ऊतरतो आणी सोबत एक अफ्रीकन अमेरीकन यूवती ऊतरते तेव्हां तीला बघून त्याचा नूरच पालटतो.

आदिजोशी's picture

13 Apr 2011 - 1:44 pm | आदिजोशी

खूप पूर्वी टिव्ही वर एक हिंदी कथांची मालिका झाली होती. त्यातील एका भागाचे कथानक आहे हे.

लेखकाने कॄपया तसा निर्देश करावा ही विनंती. ज्याचे श्रेय त्याला द्यावे.

मृत्युन्जय's picture

13 Apr 2011 - 1:47 pm | मृत्युन्जय

जाहीर खुलासा की ही कथा आधी अश्याच प्रकारे लिहिल्याचे मला खरेच माहिती नव्हते. कदाचित आठवणीत कुठेतरी असेल त्यामुळे कथा कागदावर तशी उतरली असेल. २-३ जण म्हणतात म्हणजे तसेच असणार. हा धागा उडवला गेल्यास माझा आक्षेप नाही.

धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला मला वाटले ह्यानी परिक्षण टाकले काय काय? (उगा आमच्या पोटावर पाय)

कथा मस्तच रे. एकदम झ्याटम्यॅटिक !

प्रमोद्_पुणे's picture

13 Apr 2011 - 2:12 pm | प्रमोद्_पुणे

मला सुद्धा आधी तसेच वाटले. त्यात त्या जेनी ला बहुदा मेघना एरंडेचा आवाज आहे. लय भारी हाय पिक्चर....त्यात जी सासू आणि तीचा मुलगा (हिरोचा भाउ) आहे; ते दोघे दुसर्‍या एका पिक्चरमधे (साधारण त्याच दरम्यानच्या) हिरो हिरोइन आहेत..

भडकमकर मास्तर's picture

13 Apr 2011 - 2:26 pm | भडकमकर मास्तर

हेच मन्तो...

गोष्ट माहितीची असली तरी लिहिले आहे मस्त हेही म्हन्तो

प्रमोद्_पुणे's picture

13 Apr 2011 - 1:55 pm | प्रमोद्_पुणे

मस्त..मस्त..मस्त..

मस्त!
सो.कु. च्या "मुक्ता " मध्ये याच्या उलट होत.

विजुभाऊ's picture

13 Apr 2011 - 2:15 pm | विजुभाऊ

मला अगोदर एका याच नावाच्या मराठी चित्रपटाचे परेक्षण आहे असे वाटले. अनुत्सुकतेनेच वाचायला सुरुवात केली . ( "इतक्या रद्दड सिनेमाचे देखील परीक्षण यावे....हेच का परीस्थिती मराठी चित्रपटांचे " अशा आशयाचा प्रतिसाद सुद्धा वाचायच्या अगोदरच मनात तयार ठेवला होता. पण फुलटोस समजून पुढे आलो आणि तो चक्क यॉर्कर निघाला )
शेवट झक्कास केला आहे

स्मिता.'s picture

13 Apr 2011 - 2:26 pm | स्मिता.

आधी वाटलं की चित्रपटाचं रसग्रहण आहे की काय... पण 'शेपरेट' कथाच निघाली. कथेचा शेवट अपेक्षित असला तरी वाचताना मजा आली. शंकररावांचं आणि गावाचं वर्णन परफेक्ट!

याच कथानकावर एक मालिका टीव्ही वर पाहिल्याचं आठवतंय. त्यात येणार्‍या सूनेचं नाव 'जेनिफर' असतं, गावाकडे कुणाला ते नेमकं कळत नाही म्हणून सरळ 'जनाबाई' लिहून मोकळे होतात असं काहिसं दाखवलं होतं.
--------------------------------------------

लेख उडवायची काही गरज नाही असं वाटतं.

स्पा's picture

13 Apr 2011 - 2:21 pm | स्पा

भावड्या
झकास रे.....

फुल फोर्म मध्ये सुटला आहेस
और आने दो :)

sneharani's picture

13 Apr 2011 - 2:25 pm | sneharani

मस्त कथा! शेवट अपेक्षित असुनही मजा आली वाचताना!

चिगो's picture

13 Apr 2011 - 8:09 pm | चिगो

गावाचं, पाटलाचं झक्कास वर्णन... आणि मस्त पलटी..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Apr 2011 - 9:37 pm | निनाद मुक्काम प...

कथेत गावचा बाज मस्त उभा केला आहे .
कथा आवडली .खरे म्हणजे शेवट अपेक्षित किंवा अनपेक्षित असेल ह्याचा विचार न करता कथा वाचली .शेवटचा झटका मस्त आहे .
अवांतर -
फोरिनची पाटलीण ह्या सिनेमाचे नाव सुद्धा वाचयला आवडत नाही .
हा सिनेमा पाहून आमच्या घरातून व नातेवाईक ,मित्रमंडळी अश्या सर्वांकडून विविध प्रकारचे सल्ले ............
आपले हे शिकव ते शिकव ......................................................
माझी आई एकदा म्हणाली '' जर्मन मुलगी आहे म्हणून त्यातल्या त्यात निभावल .
इटालियन असती तर ...( आमच्या कारसेवक मामाच्या समोर जाणे .
नुसत्या विचाराने थरकाप उडतो )
अर्थात आफ्रिकन असती तर तिला कदाचित सून म्हणून ..........
आपल्या देशात काळे, गोरे ह्या कल्पना सर्वांच्या डोक्यात पक्क्या भिनल्या आहेत .
गोर्या लोकांचा प्रगत युरोप किंवा अमेरिका तर आपल्याहून गरीब काळ्या लोकांचा आफ्रिका हे समीकरण सर्वच्या डोक्यात फिट असते .( जर आफ्रिकन देशातील लोकांनी युरोपात येऊन वसाहती बसवल्या असत्या तर वर्णभेद उलटा झाला असता .

अतुल पाटील's picture

13 Apr 2011 - 9:40 pm | अतुल पाटील

प्रतिक्रिया वाचुन सकाळ मध्ये आलेल्या एका मुलाखतीचे वाक्य आठवले.
एका अर्थाने आपण नवीन काहीच करत नसतोय मार्क ट्‌वेन ने म्हटलंय -
"Only Adam, when he said a good thing, knew that nobody had said it before him !'

धमाल मुलगा's picture

13 Apr 2011 - 9:49 pm | धमाल मुलगा

काय झ्याक चित्र उभं केलंयस गड्या!
आक्षी गाव, सरपंच, गावगन्ना सगळं डोळ्यापुढं उभं राहिलं की. :)

तू लिव्ह रं...लिव्ह तू!
मायला..कुनाला चोरीचं वाटत आसंल तर त्ये त्याज्यापाशी! तू सोत्ता लिवलंय न्हवं? मंग झालं तं. आपला इश्वास है तुझ्यावर!

मराठीत एक सिनेमा याच नावाने आला होता असे आठवते आहे.
१० मिनिटात अख्खा सिनेमा पाहिल्याने साधारण कथा अश्याच पद्धतीची होती पण त्यातली सून गोरी होती.
तुम्ही लिहिलेली कथा आवडली. शेवटी सगळ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे वाचून बरे वाटले कारण पाटीलबुवा येताजाता सगळ्यांना शिव्या घालत होते, त्यांना चांगला धडा मिळाला.;)

मृत्युन्जय's picture

13 Apr 2011 - 11:44 pm | मृत्युन्जय

शिव्या थोड्या जास्त झाल्यात मला मान्य आहे. पण पात्र रंगवताना माझ्या डोळ्यासमोर कोल्हापूरकडचा गब्बर बागायतदार राजकारणी शेतकरी होता. त्या व्यक्तिरेखेला अनुसरुन काही शिव्या आल्या :)

प्राजु's picture

14 Apr 2011 - 1:57 am | प्राजु

मस्तच!!
आधी वाटले फॉरिनची पाटलीण चे समिक्षण आहे.
पण कथा वाचल्यावर मजा आली.

शिल्पा ब's picture

14 Apr 2011 - 7:07 am | शिल्पा ब

मलाही आधी पिच्चरचं परीक्षण आहे असंच वाटलं. पण कथा मस्तच.

विजुभाऊ's picture

14 Apr 2011 - 12:35 pm | विजुभाऊ

अगदी कथासूत्र अशी असलेली एखादी कथा असेल तरी हा धागा उडवण्याची संपादक मंडळाला विनंती करतो.
कथा अजीबात उडवू नये ही विनन्ती.
एकाच कथासूत्रावर आधारीत अनेक कथा असू शकतात. पण प्रत्येक निर्मीती स्वतन्त्र असते
पिग्म्यालीयन या कथेवर कितीतरी चित्रपट नाटके निघालेली आहेत.
ती फुलराणी , सं स्वरसाम्राज्ञी , ही नाटके ; हमाल दे धमाल , हे चित्रपट याच कथेवरचे
अवांतर : शब्दकोषात सर्व शब्द छापलेले असतात. म्हणून ते शब्द इतरत्र कोणी वापरु नये काय?

क्राईममास्तर गोगो's picture

14 Apr 2011 - 2:20 pm | क्राईममास्तर गोगो

एकदम बेस्स!

मुलूखावेगळी's picture

14 Apr 2011 - 3:26 pm | मुलूखावेगळी

मस्त एवढेच बोल्ते :)

लै लै लै लै लै जब्बरदस्त कळा खाल्ले!!!!!!

बालगंधर्व's picture

17 May 2012 - 2:51 pm | बालगंधर्व

कथा छान आहे. मला खुप वावड्ली.

मृत्युन्जय's picture

17 May 2012 - 6:53 pm | मृत्युन्जय

अर्रे वा अजुन हा धागा धुगधुगता आहे म्हणायचा.

धागा आपणहुन वरती आलाच आहे तर मागच्यावेळेस राहुन गेलेली गोष्ट करतो आता.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार आणि धागा वर आणल्याबद्दल बॅटमॅनचे डब्बल आभार :)