दोन महिन्यापूर्वी चिरंजिवांचा शाळेतला चेसक्लब बंद झाला आणि टाऊनच्या लायब्ररीत दर दोन अठवड्यांनी होणार्या बुद्धीबळ स्पर्धेला जायला सुरुवात झाली. अर्थातच बाबा त्याला घेऊन जात असतात. गेल्या दोन अठवड्यांपासून मात्र मलाही तयारीत ओढण्यात आले......... म्हणजे त्यांच्या गटातून बाहेर काढले गेले. डाव चालू असताना मध्येच येऊन जेवणासारख्या कमी महत्वाच्या गोष्टींसाठी न बोलावणे, दिनक्रमाची सक्ती न करणे, हत्ती, घोड्यांच्या भाषेत बोलल्यासच म्हणणे ऐकणे, असे प्रकार सुरु झाले. भारतीय क्लबतर्फे दरवर्षी होणारी बुद्धीबळ स्पर्धा जवळ आल्याची सगळी लक्षणे होती.