ओमर खय्याम.... भाग-११

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
24 Jun 2011 - 9:55 am

ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
ओमर खय्याम भाग - ७
ओमर खय्याम भाग - ८
ओमर खय्याम भाग - ९
ओमर खय्याम भाग - १०

मडके !

माणसाला परमेश्वराची आठवण अडचणींच्या वेळीच होते. अनेकजण माणसाच्या या वृत्तीला नावे ठेवतात. पण मलातरी त्यात वावगे वाटत नाही. आपण ज्याला जन्म दिला आहे त्याचा वापर आपण आपल्या अडीअडचणीच्या वेळी करायचा नाही तर केव्हा ? असो. पण आयुष्याच्या शेवटी सगळ्यातून गेला की तो उद्वेगाने म्हणतोच”कुठे आहे तो परमेश्वर ? ज्याने मला या जगात धाडले!”
माणसाला एका क्षुल्लक मडक्याची उपमा देत, खय्याम म्हणतो,

काल रात्री कुंभाराकडे वस्तीला होतो.
हजारो मडकी, काही बोलत होती, काही होती शांत.
तेवढ्यात एक किंचाळले
“कुठे आहे तो कुंभार, विकत घेणारा आणि विकणारा ?”

आत्तापर्यंत आपण बर्‍याच रुबाया वाचल्या. त्यात एक प्रकारचा प्रवाह दिसून येतो. म्हणजे कुठेही कुठलीही रुबाया असे दिसत नाही. याचे कारण त्याने त्या वयाच्या ५४व्या वर्षी लिहल्या आहेत. त्या वयात माणूस जवळ जवळ सगळे करुन बसलेला असतो त्यामुळे हे सुचत असावे.

वैतागून या मडक्याने परमेश्वराला सद घातलेली दिसते आहे.

संसार एक शुध्द मद्य !
माणसाचे ह्रदय कशा कशामुळे तुटू शकते ? सगळ्यात प्रसिध्द कारण म्हणजे प्रेमभंग. ते दु:ख ज्याचा प्रेमभंग झाला आहे त्यालाच ठाऊक ! देव करो आणि आपल्यापैकी ते कोणाच्या वाट्याला आलेले नसावे. ज्याकाळी माणूस भावनाप्रधान होत त्या काळचे हे सत्य आहे. आजकालच्या ह्या भावनशून्य जगात मला वाटते ह्रदय तुटण्याची इतर कारणेच जास्त असतात. सगळ्यात मोठे कारण मला वाटते पैसा हेच आहे. हल्ली प्रेम वगैरे अशा क्षुल्लक गोष्टीनी ह्रदये तुटत नाहीत. असो ज्यावेळी तुटायची त्यावेळेची ही रुबाया आहे. खय्याम म्हणतो,

चैतन्याला म्हणजे ह्या शुध्द मद्याला ते
तुटलेल्या ह्रदयावरचे उत्तम औषध समजतात.
पटकन माझ्यासमोर भरलेले प्याले लावा,
समजत नाही, याला का वाईट म्हणतात ते !

या चैतन्याला, शुध्द मद्याला, म्हणजे या चांगल्या संसाराला हे लोक वाईट का म्हणतात तेच कळत नाही. या सगळ्याच्या पलिकडे का जायचे हे कळत नाही. आपल्या सर्व दु:खावरचे औषध या संसारातच मिळणार आहे. बाकी कशाच्याही नादी न लागता यात मन लावून भाग घ्या, आपली कर्तव्ये आनंदाने निभावा, आनंदात रहा त्याची मजा घ्या !

माफी !
खय्याम म्हणतो -

माझे गुण मोज, नको मोजूस चुका !
भूतकाळातले गुन्हे फार, त्यांचे हिशेब ठेवेलच तो.
सूडाच्या भावनेला फुंकर नको घालूस,
त्याची शपथ ! मला माफ कर !

या रुबायामधील गुन्हे म्हणजे चोर्‍यामार्‍या असे नसून, लोकांना कळत नकळत दु:ख पोहोचवल्याचा गुन्हा आहे. खय्याम म्हणतो हे माझे गुन्हे तू नको लक्षात ठेऊस. त्याचा हिशेब देव ठेवेल. पण माझ्या गुन्ह्यांनी तू सूडाने पेटू नकोस. त्याने आपल्या दोघंचेही भले होणार नाही. त्यापेक्षा तू मला माफ कर.
आपल्या आयुष्यात आपण दुखावले जातो आणि आपणही अनेकांना दुखावतो. पण या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवत बसलो तर आपलेच जगणे मुष्कील होईल. म्हणून या सगळ्या कटू आठवणींना मनात थारा न देता, या आपल्या आणि दुसर्‍यांच्या गुन्ह्यांचे ओझे मनावरुन उतरवून आंनंदाने जगा.

कंदील !
खय्याम म्हणतो -

आकाशाखाली आपण गोंधळलेले,
हा एक कंदील जादूचा.
ज्योत एक सूर्य आणि विश्व ती काच.
उरलेले आपण या मधल्या आकृत्या.

सूर्याभोवती आपण फिरतोय हे सांगण्याचा प्रयत्न येथे केलेला दिसतोय. त्याचवेळी या विश्वाला काचेची उपमा देऊन हे आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे सांगण्याचाही प्रयत्न केलेला दिसतोय. मित्रहो कुठल्याकाळी हे लक्षात घ्या. मला वाटते याच काळात पृथ्वीचा आकार आणि विश्वाची रचना यावर शास्त्रज्ञ आणि धर्मगुरू यांच्यात बराच मतभेद होता.
या उपमा किती समर्पक आहेत हे आपण विचार केलात तर आपल्याला उमजेल.
सूर्य – प्रकाश देणारी कंदिलाची वात
काच- सुर्याच्या भोवतालचे विश्व.
याच्यामधे लटकलेले आपण – सावल्या.
कदाचित हे ज्ञान त्याला हिंदू खगोलशास्त्रज्ञांकडून मिळालेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जयंत कुलकर्णी.

संस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजविचारआस्वादसमीक्षालेखमाहितीसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

प्रास's picture

24 Jun 2011 - 12:24 pm | प्रास

तुमचे ओमर खय्यामच्या रुबायांवरचे प्रत्येक भाग वाचतोय आणि जिथे शक्य होइल तिथे प्रतिसादही देतोय.

तुमचं लेखन हे पहिल्या पासूनच ओघवतं होतंय. कदाचित तुम्ही तुमच्या सुहृदांसाठी जो दोन तासांचा रुबायांच्या रसग्रहणाचा कार्यक्रम केलेलात, त्याचा हा परिणाम असावा.

पुन्हा कधी तसा कार्यक्रम करायचं योजलंत तर जरूर कळवावं हे विनंती.

या भागामधलं

चैतन्याला म्हणजे ह्या शुध्द मद्याला ते
तुटलेल्या ह्रदयावरचे उत्तम औषध समजतात.
पटकन माझ्यासमोर भरलेले प्याले लावा,
समजत नाही, याला का वाईट म्हणतात ते !

आकाशाखाली आपण गोंधळलेले,
हा एक कंदील जादूचा.
ज्योत एक सूर्य आणि विश्व ती काच.
उरलेले आपण या मधल्या आकृत्या.

बेजोड, सुंदर, मस्त!

एक आणखी विनंती - पहिल्या भाषांतरातला (चैतन्य = शुद्ध मद्य) तो 'ते' नीट अरेंज केला तर तिथे चांगलं यमक जुळेल असं वाटतंय. बघा जमलं तर....

आपण तुमचे फ्यान :-)