gajhal
नको वाटतो ना? असा पावसाळा!
भिजा चिंब आधी,पुन्हा जीव जाळा
नको वाटतो ना? असा पावसाळा!
नभी दाटल्या आसवांचा उमाळा
सुन्या जीवनाचाच हा ठोकताळा!
असे वाटते पावसाचे बरसणे
जुन्या आठवांना नव्याने उगाळा!
कितीही दुरुस्त्या करा लाख वेळा
झिरपतो मनाच्या तळाचाच गाळा!
कधीही कुठेही कसाही बरसतो
रुजावा कसा अन् कुठे मग जिव्हाळा?
—सत्यजित
घाव.....गजलेमधून
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही.
खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....
भिंतीवरती उगा टांगशी घाव कशाला?
दुःखांचे मोजसी सदा तू भाव कशाला?
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!
पावसाची सर जशी बरसून गेली
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!
गुणगुणत होतीस का तू गझल माझी?
एक कोकीळा इथे गावून गेली!
नभ-नभाला देत होते आज टाळी
वीज अवकाशातुनी चमकून गेली!
आज पदरावर तुझ्या सजवू म्हणालो,
रात सारे चांदणे उचलून गेली!
गारव्याने भाव रोमांचीत झाले,
आठवांची गोधडी उसवून गेली!
—सत्यजित
गाण्यास पावसाच्या...
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!
होतील बघ सुरंगी लाजून गाल हे
भेटीत पावसाच्या हाती मशाल दे!
भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी
स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे!
शिणतीलही जराश्या गजर्यातल्या कळ्या
तेंव्हा उश्यास माझ्या दुमडून शाल दे!
—सत्यजित
तू ठरव...
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
हात घे हातात आधी,आरसा नाही!
टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा
फायदा नात्यात आता फारसा नाही!
एवढा केला खुबीने खूनही माझा
वारही केला असा जो वारसा नाही!
सांगतो आहे जगाला कोण हा वेडा!
मी असा नाही असा नाही असा नाही!
कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना
एवढीही या मनाला लालसा नाही!
तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही...
—सत्यजित
पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला,
वाराच काळजाच्या, ओघात साठलेला.
पाळीव हस्तकांनी, मागून वार केले,
त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला.
माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले,
त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला.
प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी,
रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला.
आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली,
झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला.
-कौस्तुभ
वृत्त -आनंदकंद
आत्मनिर्भर
मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले
आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले
शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले...
अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले
सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी...
दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले
बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे
माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले
चालणे नशिबात होते का म्हणू मी...
राहण्यासाठी कुठे घर होत गेले?
प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे
मौनही माझे निरुत्तर होत गेले
- कुमार जावडेकर
'इमॅजिन' (कल्पना कर...)
(जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद)
सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर..
नरकही नसेल अन् होईल आकाश घर!
(कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर)
न देश, न देशभक्ती मारण्या-मरण्यासाठी
न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर
(कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर)
भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल...
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर!
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर)
लोभ, मोह ना अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची
निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर!
(कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर)
ओठात दाटलेले...
ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे
सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे
हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही
घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे
सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी
दावू नकोस आता ते घाव ओळखीचे
गावात बांधलेला वाडा उजाड आहे
पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे
सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही
खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे
निलेश देऊळकार
अडगाव बुll
9767888855