gajhal

पेटुनी आरक्त संध्या...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 5:00 am

पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!

मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!

काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!

एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalकविता माझीमराठी गझल

नकळत

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
21 Mar 2017 - 4:14 pm

प्रीतीत तुझ्या मज, तू बरेच शिकवून गेलीस
निरक्षर होतो मी, मला पुस्तक करून गेलीस

लावले होते वृक्ष मी आपल्या अंगणी
बहरले ते अन सावली तू घेऊन गेलीस

विश्वास करत गेलो, तू जे सांगत गेलीस
फसत राहिलो मी, अन तू फसवत गेलीस

निजलो मी, वचन पहाटेचे तू देत गेलीस
नकळत मला, पहाट तू माझी घेऊन गेलीस

-निनाव
२१.०३.२०१७

कवितागझलgajhal

तू नभीचा चंद्रमा हो...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
18 Mar 2017 - 1:58 pm

लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा...
तू मला भेटायला ये..एकदा येवून जा!

शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे...
तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा!

तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा...
पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा!

वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे...
या नदीला सागराची वा दिशा देवून जा!

सूर्य विझता रातही चालून येते नेमकी...
तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा!

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalकविता माझीमराठी गझल

घे भरारी..मन म्हणाले...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
12 Mar 2017 - 7:38 am

घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो...
सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो!

जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती...
वाटले की..वाट चुकले कोकरु झालो!

राजरस्त्याची तमा ना आडवाटेची...
मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो!

गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले...
धन्य झाला जन्म की मी वासरु झालो!

बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!

हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!

घेतली हाती कलम बहुधा बरे झाले...
मी मुक्या संवेदनांची आबरु झालो!

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalकविता माझीमराठी गझल

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Mar 2017 - 6:23 pm

सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो
मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो

वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर
नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो

वाटते आता भिती या चांदताऱ्यांची
मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो

शांततेवरची जरा रेषा हलत नाही
मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो

चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो
आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो

डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणकवितागझलgajhalgazal

शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Feb 2017 - 9:53 am

रंक कधीही राजा होणे नाही
(त्याचा गाजावाजा होणे नाही)

तू राणी आहेस चार भिंतीतच
खुला अता दरवाजा होणे नाही

तू तेथे मीही येथे आहे पण
मला तुझा अंदाजा होणे नाही

मी सारे विसरुन चाललो आहे
घाव नव्याने ताजा होणे नाही

मी नेकी दर्यात टाकली आहे
(शांत अता या गाजा होणे नाही)

डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणगझलgajhalgazalमराठी गझल

दु:ख अवघा धृवतारा मागते

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
6 Feb 2017 - 11:56 am

मागचा सारा चुकारा मागते
दु: ख अवघा धृवतारा मागते

थेंबही नाही उभ्या रानात अन
जिंदगानी शेतसारा मागते

केवढे जहरुन हे गेले शहर
वीषही आता उतारा मागते

वेदना ओथंबुनी येतात अन
सूख मोराचा पिसारा मागते

जो कधी उधळून ती जाते स्वत:
प्रीत तो सारा पसारा मागते

डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणकवितागझलgajhalgazal

कळले नाही

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
29 Nov 2016 - 12:08 am

कळले नाही कोठे चाललो मी..
तुझ्याच दारी जणु भुललो मी..

प्रेमात तुझ्या जरी पडलो परि..
अंतरी तुझ्या पार हरलो मी..

संपले दुवे सारे संपली आशा..
आभाळी कोठे धुंद विरलो मी..

आकांक्षा सार्या गेल्या उडूनी माझ्या..
स्वप्नात फक्त आता उरलो मी..

होतीस तेंव्हा तूच मनाची आस..
अजूनी का तुझ्यात अडलो मी?...

कविताप्रेमकाव्यगझलgajhalअभय-गझल

चांदण्याला चांदणे समजू नये

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 6:57 pm

एकमेकांना उणे समजू नये
(नी स्वतःला शाहणे समजू नये)

चांदणे परसामधे पडते म्हणुन
आपली तारांगणे समजू नये

माणसेही राहती रानीवनी
नेहमी बुजगावणे समजू नये

हे असे परक्यापरी येऊ नये
नी स्वत: ला पाहुणे समजू नये

ही कशाची भूल या रातीवरी
चांदण्याला चांदणे समजू नये

पाहते ती नेहमी माझ्याकडे
पण असे की, पाहणे समजू नये

डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणकवितागझलgajhalgazalमराठी गझल

कोणते माझे वतन होते

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
11 Aug 2016 - 7:21 pm

रोज थोडे उत्खनन होते
ऱोज नात्याचे पतन होते

आळ हा गंभीरही नाही
पण चरित्राचे हनन होते

दोष वणव्याला कसा द्यावा
जर इथे गाफील वन होते

कोणत्या दुनियेत मी आलो
कोणते माझे वतन होते

कोठल्या मातीतुनी येते
जिंदगी कोठे दफन होते

डॉ.सुनील अहिरराव

हे ठिकाणकवितागझलgajhalgazalमराठी गझल