सर एक श्रावणाची बरसून काय गेली!
सर एक श्रावणाची बरसून काय गेली
गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली!
आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते
आई मला म्हणाली,करपून साय गेली!
सर एक श्रावणाची बरसून काय गेली
गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली!
आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते
आई मला म्हणाली,करपून साय गेली!
कसे या मनाला कसे जोजवावे?
जरा दुःखही शांत व्हावे,निजावे!
कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!
किनारा कधी सांगतो का कुणाला?
किती सागराने दिले हेलकावे!
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?
—सत्यजित
नवे रोज धागे नवा पेच आहे
जगायास कारण ईतकेच आहे!
कुणी एकटा जात नाही प्रवासा
कुणी चालताना कुणा ठेच आहे!
कुणी आरसा काल देवून गेले
मला भेटतो मी नव्यानेच आहे!
कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे
उभे विश्व सारे फुकाचेच आहे!
नको फार त्रागा करु तू उन्हाचा
सखी सावली या उन्हानेच आहे!
—सत्यजित
पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा...
या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा!
सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची...
तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा!
तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना...
एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा!
चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते?
तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा!
मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी...
वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा!
प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा...
कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा!
—सत्यजित
कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो
तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो!
कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो
कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो!
तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे
तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो!
कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा
तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो!
अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे
अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो!
तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले
हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो!
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा...
का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा!
मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा
अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा!
आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते
केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा!
ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा!
काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती?
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!
—सत्यजित
अता ही भेट टळणे शक्य आहे
(तुझे मजला वगळणे शक्य आहे)
जरासा जोर लावावास अजुनी
पहा माझे निखळणे शक्य आहे
नको इतकी मुजोरी आरशावर
तुझेही रुप ढळणे शक्य आहे
असे येऊ नये वेळीअवेळी
(कुणी काही बरळणे शक्य आहे)
जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या
तुझी काया वितळणे शक्य आहे
तुला पाहून येथे एकटीला
फुलांचे बावचळणे शक्य आहे
डॉ. सुनील अहिरराव
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला
दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला!
होती कथा विराणी,झाली गझल रुमानी
बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला!
शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन्
एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!
केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो
कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला!
टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी
बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला!
ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे
प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला!
केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी
हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला!
—सत्यजित
चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!
जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर हा कमजोर आहे!
तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!
ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!
जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!
वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!
—सत्यजित