gajhal

'इमॅजिन' (कल्पना कर...)

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
1 Feb 2020 - 6:14 pm

(जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद)

सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर..
नरकही नसेल अन् होईल आकाश घर!
(कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर)

न देश, न देशभक्ती मारण्या-मरण्यासाठी
न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर
(कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर)

भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल...
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर!
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर)

लोभ, मोह ना अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची
निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर!
(कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर)

gajhalकविता

ओठात दाटलेले...

निलेश दे's picture
निलेश दे in जे न देखे रवी...
28 Aug 2019 - 9:55 pm

ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे
सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे

हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही
घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे

सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी
दावू नकोस आता ते घाव ओळखीचे

गावात बांधलेला वाडा उजाड आहे
पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे

सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही
खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे

निलेश देऊळकार
अडगाव बुll
9767888855

gajhalकविता

गझल : पुन्हा एकदा...

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
18 Jun 2019 - 3:15 pm

मा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग
संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा

शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत
निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा

स्वप्नांची लचके तोडली मी स्वत:
पराभवाने दिली मात पुन्हा एकदा

कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण
अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा

प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च
नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा

सुखांना जिंकण्याचा भास मला झाला
दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा

काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ
संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा

gajhalगझल

देव्हारा

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
19 Jan 2019 - 8:58 am

तिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा
पहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा

वाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी
नाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा

उभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती
पण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा

पटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या
आजकालच्या मुली मागती आधीच सातबारा

इतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते
सुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा

पूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे
घरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा

gajhalgazalकवितागझल

तुझे नाव

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
12 Sep 2018 - 11:37 am

इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने
एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे

काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती
मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे

अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे
रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने

पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी
ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे

नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या
विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने

हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा
नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे

-- विशाल

gajhalgazalकविता माझीमराठी गझलमाझी कविताकवितागझल

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
2 Sep 2018 - 11:20 am

वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं!
पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं!

स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं
स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं!

माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं
कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं!

तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...
अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं!

वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार!
नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं!

- कुमार जावडेकर

gajhalकविताप्रेमकाव्यगझल

खरी वाटते, पूरी वाटते

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
14 Jun 2018 - 9:12 am

खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते

भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये
क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते

हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण
हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते

सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा
तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते

तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही
काय करू मी? हाय! तुझ्याहून याद तुझी कस्तुरी वाटते

सखे आज तू मला तुझे नि गगनाचे या नाते सांग
कशी तुझ्यासोबत असताना , सांज अजून सिंदूरी वाटते

gajhalgazalमराठी गझलमाझी कविताअद्भुतरसकवितागझल

फलीत

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
9 Jun 2018 - 8:41 pm

पाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का
जी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का

काय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले
अर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का

भंगले याच्यात काही खंगले याच्यात काही
दंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का

नाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती
नाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का

घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन
अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का

खोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा
तीच कविता भासते आहे अशी विपरीत का

बंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा
जे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

पदर

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
5 Jun 2018 - 1:43 pm

युष्या मला तुझी खबर मिळू दे
केलेल्या सर्व नोंदीची बखर मिळू दे

प्रेमरोगी कधी होत नाही बरा
औषधाच्या नावावर जहर मिळू दे

जन्म जावो उभा वाळवंटी फिरून
अंत समयी परी तुझे शहर मिळू दे

काट मारल्या स्वप्नांची खाडाखोड सारी
कागद कोरा कराया रबर मिळू दे

नको ती ठाम काळ्या धोंड्यावरली रेष
मिळणारा हर क्षण जर-तर मिळू दे

वाट पंढरीची सरता सरे ना झाली
विठुनामी अमृताचा गजर मिळू दे

मंजूर आहे मरण अगदी या क्षणीही
एक तुझी हळहळती नजर मिळू दे

किनाऱ्यावर आता नाही राहिली मजा
खोल आत ओढून नेणारी लहर मिळू दे

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

पिंपळपान

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
29 May 2018 - 9:56 am

आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू
मग फुलांनी केलेला अपमान शोधू

दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची
अन्यथा रामायणात अज्ञान शोधू

सोसेना गलका सभोवती शांततेचा
दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू

बोलण्या आधीच सुरू होती लढाया
ऐकूनी घेतील असले कान शोधू

प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन
भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू

आदेश हा कारागृहे खुली करण्याचा
पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू

शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा
थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू

gajhalgazalमराठी गझलकवितागझल