वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - फायनल - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज
२५ जून १९८३
लॉर्ड्स, लंडन
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानातच पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणे तिसर्या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना फायनलमध्ये येऊन धडकलेल्या भारतीय संघाचा सामना होता तो क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजशी. पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणेच तिसरा वर्ल्डकप जिंकून हॅटट्रीक करण्याचा लॉईडचा निर्धार होता. त्यातच भारत फायनलला आल्यावर तर फायनलची मॅच ही केवळ एक औपचारिकता आहे आणि वेस्ट इंडीजने वर्ल्डकप जिंकल्यातच जमा आहे असं जवळपास प्रत्येकाचं मत होतं!