गेले पाचेक महिने घरा मागच्या हिरवाईत पोपट वगळता सामसूम होती. उरली ती कावळ्यांची कावकाव. नतदृष्ट कावळ्यांनी आसपासच्या झाडात तीन चार घरटी बांधली आणि त्यांच्या उपद्रवाला कंटाळुन खंड्या, हळ्द्या, दयाळ, बुलबुल, कोतवाल, तांबट, नर्तक, सनबर्डस वगैरे मंडळी दूर गेली. पोपट मात्र कावळ्यांना पुरून उरत होते आणि धिटाईनं वावरत होते.
हळुहळु कावळ्यांची पिल्लं बहुधा मोठी होउन उडू लागली असावीत कारण वावर जरा कमी झालेला दिसला. साधारण महिन्या दिड महिन्यापूर्वी अचानक या जुन्या पाहुण्यांची चाहुल लागली आणि आनंद झाला.