एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो. त्यातली काही उत्तरे म्हणजे " डिस्कवरीसाठी काम करतो, माझा जन्म गारुड्याच्या घरात झाला, गरीब परिस्थितीमुळे शिकलो (रस्त्यावरच्या दिव्याखाली साप पकडायचा आभ्यास करतो ;)) , व्हिटेकरबाबा आणि राजाबाबाची सिद्धी आहे मला....असे अनेक काही.(रोम्युलस विटेकर आणि राजन शिर्के हे जागतिक दर्जाचे सर्पतज्ञ आहेत.)
पण खरे उत्तर म्हणजे मला पण आधल्या दिवशी माहित नव्हते की उद्या पासून मी साप पकडणार आहे.
बारावीनंतर अभियांत्रिकी आणि नंतर नोकरी हाच विचार करून सिंहगड कॉलेज मध्ये रसायन अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. पहिले वर्ष ठीक चालू होते, अभ्यास, ट्रेकिंग आणि कट्टा. वार्षिक परीक्षेने एकदम धक्का दिला, पुणे युनिवर्सिटीच्या चुकीमुळे एक विषय परत-तपासणी मध्ये सुटला आणि त्यात माझे वर्ष वाया गेले.(परत त्याच वर्षी कॉलेजला बसू शकलो असतो पण परत तपासणी पुणे युनिवर्सिटीचा निकाल येवढा उशिरा लागतो की वर्ष वाया जाते, असो.) लहानपणापासून मी काही खूप हुशार वैगैरे नव्हतो पण कधी वर्ष वाया गेले नव्हते.
अभ्यास न करणे किंव्हा शाळेत न जाने याला "वर्ष वाया" का म्हणतात हे मला अजून समजले नाही, कारण त्या वर्षात मी जेवढे जगण्याविषयी काही शिकलो ते शाळा किंवा कॉलेज चालू असताना पण नाही.
"संगणक शिक (त्यात काय शिकायचे, 'टोर्रेंट डाउनलोड आले' म्हणजे झाले ;)), नवीन भाषा शिक, कामाचे काहीतरी शिक " असे अनेक फुकट सल्ले लोकांकडून मिळत होते, पण मी स्वतः गोंधळात होतो. अश्याच एका दिवशी काकाच्या फिरंग मित्राला घेऊन सर्पोद्यान आणि पुणे दर्शन ( फिरंग-पुणे दर्शनामध्ये पर्वती, शनिवारवाडा, सिंहगड आणि लक्ष्मी रस्ता एवढेच येते ;) ) करायला घेऊन गेलो होतो, तिथे विचार आला की आपण सर्पोद्यान मध्ये काम केले तर ?
दुसऱ्यादिवशी सर्पोद्यान ची पायरी चढलो, तिकडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊना जाऊन भेटलो आणि काम करण्याविषयी विचारले, त्यांनी सहजतेने माझे स्वागत केले , असे अनेक कार्यकर्ते सर्पोद्यान मध्ये जाऊन काम करता असल्यने त्यांना याची सवय होती. चांगल्या घरचा, अभियांत्रिकी करणारा पोरगा, फार तर काय २-४ दिवस येईल आणि नंतर गुल होईल, असा साधा हिशोब त्यांनी अनुभवाने केला. घरी येउन आई-बाबांना सांगितले, त्यांना वाटले की मी मजा करतो आहे. ( आमच्या ७ पिढ्या मध्ये कुत्रा पण कोणी पाळलेला त्यांना माहित नव्हता ;)) पण त्यांनी माझी अडवणूक केली नाही कारण बहुतेक त्यांना माझ्या कामाचा (जॉब प्रोफाईल !) अंदाज आला नव्हता.
नंतरचे सात महिने मी सर्पोद्यान मध्ये सकाळी ९ ते ६ अक्षरशः आयुष्य जगलो. सर्पोद्यान मध्ये काम करायला गेल्या-गेल्या कोणी साप पकडायला देत नाही, कारण ती एक मोठी जवाबदारी असते. सुरवातीला-सुरवातीला कासवांचा खड्डा साफ कर, झाडांना पाणी घाल, कधी कधी सुसरीला मासे खायला दे अशी कामे केली. तसेच नवीन पिंजऱ्याचे किंवा खड्याचे काम असेल तर खोदकाम पण केले. हे जेवढे लिहायला आत्ता सोपे वाटते आहे ते तेंव्हा बिलकुल नव्हते, पुण्याच्या मध्यमवर्गीय घरात वाढलेला मी, कुदळ-फावडे ५ मिनिटे मारले तरी हात भरून यायचे, सोलवटून निघायचे.(नंतर या खोद्कामांचा बिळात घुसलेली धामण किंवा नाग काढायला बेक्कार उपयोग झाला :)) 'कुठल्या पण कामाला नाही म्हणायचे नाही' हा मंत्र जपत मी काम करत राहिलो. प्रामणिक पणे सांगायचे तर 'मला कशाची भीती वाटली नाही किंव्हा कुठल्या कामाची किळस पण आली नाही.
हळू हळू सर्पोद्यान च्या इतर तज्ञ लोकांचा माझ्या वर विश्वास बसत गेला, आणि मग मी वेगळ्याच विश्वात प्रवेश केला.
आधी सांगितल्या प्रमाणे सर्पोद्यान मध्ये काम करायला खूप कार्यकर्ते येत असतात, पण फारच कमी टिकतात. त्याचे कारण म्हणजे कामाचे स्वरूप!.साध्या नोकरी मध्ये पण जवाबदारी चे काम देताना काही वेळ घेतला जातो, एकडे तर खूप कामांमध्ये जीवावरचा खेळ असतो. साप्ताहिक कार्यकते ( ये फक्त आठवडा भर टिकायचे ) हे डिस्कवरी आणि animal planet मुळे आधीच प्रेरित होऊन यायचे, त्यांना आल्या आल्या कै.स्टीव अर्विन सारखी 'मगर'(त्यांच्या भाषेत आलीगेटर !) नाही तर ऑस्टिन स्टीवन सारखा नाग पकडायला हवा असायचा. त्या नागाच्या जागी त्यांच्या हाती झाडांना पाणी घालायची हिरवी नळी यायची, आणि मग हे महाभाग गुल व्हायचे.
"चल, तो झाडू आणि सुफळी घे आणि धामणीचा (जो खड्डा ज्यात जवळपास ३० एक धामण जातीचे साप होते.) खड्डा साफ कर " अश्या रीतीने माझा पहिल्यांदा सापांशी सरळ-सरळ संबध आला. आजूबाजूला २०-३० धामणी फिरत असायच्या आणि मी आपले त्यांचे पाण्याचे कुंड आणि खड्डा साफ करत असायचो. मग धामण, इरुळा (पाण्यातला साप), घोरपड , सुसर आणि अजगर यांचे खड्डे साफ कर, त्यांना खायला घाल, समजा कोणी आजारी असेल तर त्यांना पकडून आतल्या खोली मध्ये हलव अशी कामे मी करायला लागलो. विषारी सापांचे खड्डे (स्नेक पिट्स) साफ करायचा संबध खूप उशिरा आला, कारण ते खूप जास्त जवाबदारीचे काम असते, जे साधारण करून कार्यकर्त्यांना दिले जात नाही.
आधी मी फक्त पुस्तकातच साप पहिले होते, आत्ता रोजच संबध यायला लागल्या मुळे मला पण ते आत्ता कुठल्या पण परिस्थितीमध्ये ओळखायला यायला लागले, त्यांचे स्वभाव समजायला लागले.( मनुष्य प्राण्यासारखेच काही साप मवाळ तर काही तापट असतात.)
साप पकडण्यासाठी ते ओळखणे हे खूप महत्वाचे असते, काही विषारी साप आणि बिनविषारी साप काही प्रमाणात सारखेच दिसतात. ('मण्यार' हा अतिविषारी साप रात्रीच्या कमी प्रकाशात 'कवड्या' या बिनविषारी सापासारखा दिसतो.) तसेच प्रत्यक्ष लोकांच्या घरी पकडताना आख्खा साप दिसण्याचे प्रमाण दुर्मिळ असते, खूप वेळा सापाची शेपटी किंवा डोके,आणि पोटाचा भाग दिसतो, त्या वरून तो साप विषारी- का बिनविषारी हे ठरवावे लागते. साप ओळखण्यातली साधी चूक जीवावर बेतू शकते.
मी काही साप सर्पोद्यांनच्या लोकांसोबत पकडले आणि हळू-हळू पद्धत समजत गेली. सर्पोद्यान मध्ये खड्यात (captivity) असलेला साप आणि लोकांच्या घरातला (कॉल वरचा) साप या मध्ये जमीन-आस्मानाचा फरक असतो.(ते पुढच्या लेखात येईलच.)
त्यामुळे मला व्यक्तिगत पहिला कॉल (कॉल: साप, घोरपड, घर, गरुड, घुबड ,उदमांजर , रानमांजर इ. पकडण्यासाठी साठी आलेला फोन ) पाच महिन्यांनी दिला, ती एक मोठी धामण होती. सहकारनगरच्या आबा बागुल उद्यानाच्या बाहेर एका पाण्याच्या पाईप मध्ये ती अडकली होती, मोठें तोंड फक्त बाहेर दिसत होते.तिला पकडण्यासाठी मला तो पाईप खोदून काढायला लागला,आणि मग तिला मी शांतपणे पोत्यात घातली. हे करायला मला जेवढा वेळ लागला त्या पेक्षा जास्त वेळ आणि मनस्ताप मला तिकडच्या हिरो लोकांना सांभाळताना झाला. तेंव्हा मला समजले की 'कॉल वरचा साप हा धोकादायक जरूर आहे पण त्यापेक्षा जास्त धोकादायक तिकडे जमा झालेला लोकांचा जमाव आहे' आणि त्या जमावाला काबूत ठेवून साप पकडणे हि एक जीवावेरची कला आहे.
त्यानंतर विषारी-बिनविषारी असे अनेक साप पकडले. चारही जातीचे विषारी साप (नाग, घोणस, मण्यार, फुरसे), पुण्यात सापडणारे बिनविषारी साप (धामण, गवत्या, इरुळा, कवड्या, तस्कर, कुकरी, डुरक्या-घोणस) आणि घोरपडी पकडल्या. माझे कार्यक्षेत्र बिबवेवाडी पासून स्वारगेट,लुल्लानगर-कोंढवा,निलायम पुलाखालचा सिंहगड रस्ता,सहकारनगर,पर्वतीपायथा असा माझ्या घरापासून पासून १० किलोमीटरच्या परिघातील भाग होता. कॉलेजचे वर्ष चालू झाल्या पासून सिंहगड कॉलेज च्या अवरातले पण साप पकडायला लागलो.(अभियांत्रिकीचा तास चालू असताना कॉलेज चा शिपाई सापाची खबर घेऊन यायचा, की मी जायचो मग साप पकडायला..बेक्कार मजा ! ;)) कुठेही साप पकडल्या पकडल्या मी सर्पोद्यान ला घेऊन जायचो, त्या नंतर ते निसर्गामध्ये सोडले जायचे. हे सगळे करताना मी फक्त लोकांकडून परिस्थिती बघून पेट्रोल साठी पैसे घ्यायचो. मोठ्या सोसायटी मध्ये साध्या ५०रुपये घेण्यासाठी पण वाईट अनुभव पण खूप आले, म्हणून तिथले पैसे कधी वसूल करणे कधी सोडले नाही. पण त्या उलट टेकडी वरच्या वस्त्यांचे (तळजाई,जनता, आंबेडकर वसाहत )आणि तेथील माणसांचे अनुभव खूप वेगळे होते, ती लोकं मला परिस्थिती नसताना जेवायला घेऊन जायची, चहा पाजायची, माझ्या बाजूला उभे राहून मदत करायची.
मी माझ्या मित्रांच्या भाषेत 'गारुडी'आणि लोकांच्या भाषेत 'सापवाला' कधी बनलो ते समजले नाही. मी करत असलेले काम 'लोकमान्य' नसल्यामुळे घरून पण आधी खूप विरोध झाला, पण आई पाठीशी उभी राहिली. नंतर काही दिवसांनी बाबांना पण पण आजूबाजूच्या भागातली (लक्ष्मीनगर, पार्वती ) लोकं 'सापवाल्याचे बाबा ' म्हणून ओळखायला लागले तेंव्हा त्यांचा पण विरोध मावळला.
या गारुड्याने छंद म्हणून सुरु केलेले काम कधी समाजाची गरज बनली हे त्या गारुड्याला पण समजले नाही. आता या क्षणी पण असे अनेक सर्पोद्यानचे गारुडी पडद्यामागे राहून निसर्गातले साप वाचवत आहेत. तुम्ही पण सर्पोद्यान ला फोन करून आपल्या आजूबाजूचे साप वाचवू शकतात. सर्पोद्यान: ०२०-२४३७०७४७.
Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आधीप्रमाणेच मस्त भाग.
एकदम सुरेख.
धन्यवाद !
सहज शैलीतलं; नव्या जगाची ओळख
वाचतोय
एक नंबर...
मस्त!
मी त्यांचे पुस्तक वाचले नाही,
Free from School by Rahul Alvares
धन्यवाद ! पुस्तक वाचण्यात
मस्त अनुभव आहेत.
अत्यंत उत्तम!
अमेरिकेमध्ये सध्या उन्हाळा
दोनिही गोष्टी वाचल्या.......
अतिशय उत्तम!!!! याला म्हणतात
+१००, लई भारी.
अर्र तसा साप बिचाराच असतो
हो, मांजर सापांना अगदी हाल
अगदी!
हो ना...
बेश्टे बे जेडी
मास्तर लोक जास्त काही
ती पाल खरच खूप लोभस होती
मग
फारच भारी लिवलयं
मला साप हा प्रकार किव्हा
धन्यवाद् !
घरात आलेला साप पकडण्या पेक्षा मारलेला बरा
साप म्हणू नये धाकला
हाही भाग आवडला.
वा! वाचायला आवडतंय.
"एका रानवेड्याची शोधयात्रा "
सुरेख लेखन !
घोरपड.
झकास फोटो आहे. मी दरवेळी
वा!
छान
मस्त!
मी जेवढे जगण्याविषयी काही शिकलो
आवडला
लेखनशैली आणि अनुभव दोन्ही
झक्कासच!
सुंदर आणि अनुभवसंपन्न.. तसंच स्फूर्तिदायकसुद्धा..
धन्यवाद् !
+१
साप !!!
मी ज्यांना आत्ता पर्यंत भेटलो
ही किळस किंवा भीती आपल्याला
नाग डूख धरण्याच्या तर कैक
आपल्या बॉलिवूडने आणि