एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
26 Jun 2013 - 10:14 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !

....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो. एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा. आत्ता सांगा पत्ता ?"( भाग पहिला)

पत्ता घेऊन मी तडक सुटायचो आणि सापापर्यंत तडक पोहोचायचो.( वाचा: भाग पहिला म्हणजे हे "तडक" प्रकरण समजेल ;)) साप पकडायचा म्हणजे तो पहिल्यांदा दिसला पाहिजे, पण तेच अवघड असायचे. आपल्या एकडे सापा विषयी जेवढी भीती आहे तेवढीच उत्सुकता पण आहे. त्यामुळे एखाद्या घरात साप निघाला तर, त्या घरचे लोक, त्यांचे नातेवाईक, रस्त्यावरून जाणारे लोक, बाजूच्या सोसायटीमधले लोक, मुलांच्या मित्र-मैत्रिणी असे सगळे त्या ठिकाणी पिच्चर चे शुटींग असल्या सारखे जमतात. या गर्दीत मी माझी गाडी घालायचो ( घोडा युद्धात घालतात तसा, कारण पुण्यात लोकं नुसत्या होर्नने बाजूला होत नाहीत !)

माझ्या कडे बघून लोकांचे हजार प्रश्न:काका(वय ४०) तुम्ही नक्की साप पकडता का ? म्हणजे तुम्ही तसे दाढी-मिशीवाले दिसत नाही म्हणून विचारले है ..है; काकू (वय:?): तुमचा चेहरा ओळखीचा वाटतो, बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचे खाते आहे का ?; पोरगा (एस.पी ते पुणे विद्यार्थी गृह इ.): तो ऑस्टिन स्टीवन डिस्कवरी मध्ये वापरतो तसा 'स्नेक टोंग' (tong) आहे का तुमच्या कडे ?; सुबक ठेंगणी (बृहन्महाराष्ट्र ते सिंहगड इ.):तुमची डिस्कवरी ची कॅमेरा टीम कुठे आहे,; अश्या प्रश्नांतूर लोकांमधून मी 'ज्याच्या घरात साप निघाला आहे किंवा ज्याने साप पहिला आहे' असा योग्य तो माणूस शोधून काढायचो. जेंव्हा कॉल करणे सुरु केले तेंव्हा ही पहिली पायरी पण खूप अवघड होती. हरचन पालवाच्या कपाटाची दुरुस्ती करून येताना साप 'प्रतेक्ष' पहिले लोक खूप असायचे.(पुलं:म्हैस !)आणि ही लोकं वाट्टेल ते वर्णन करायचे: फुल फणावाला नाग आहे,दहाचा आकडा पण दिसला, काळा केसवाला भुजंग आहे इ. शास्त्रोक्त किंवा मुद्देसूद वर्णन फार कमी लोक करतात आणि हीच लोकं माझ्या कामाची असायची.

बागेमध्ये, विटांच्या ढिगाऱ्यात, बाथरूममध्ये , अडगळीच्या खोलीत, पंप हाउस मध्ये, छपरामध्ये, घुशीच्या बिळात, मोरीत, फ्रीज, टी.व्ही. खाली ( आतमध्ये सुद्धां ! : आतला भाग उबदार असतो म्हणून तिकडे साप जाऊन बसतात :)), वेलीच्या जाळीत, कुत्र्याच्या घरात, ट्यूबलाईटच्या मागे,माठाच्या खाली, भाजीच्या पेटाऱ्यात,उशीच्या अभ्र्या मध्ये...अश्या अनेक ठिकाणी निघालेले साप मी पकडले आहेत. योग्य त्या व्यक्ती कडून माहिती घेऊन मी साप शोधायला लागायचो. मी गेलो- साप समोर दिसला-मी पकडला हे फार कमी वेळा व्हायचे. लोकांच्या त्रासामुळे खूपवेळा बाहेर निघालेला साप लपून बसायचा. दुसऱ्यांच्या घरात साप शोधणे ही एक कला आहे.
'होम-मिनिस्टर' मध्ये लोकांना त्यांच्या स्वतः च्या घरातला कुंकवाचा करंडा शोधणे जमत नाही,इकडे मला अनोळखी घरात साप शोधायचा असायचा.

अश्या वेळो मी पहिला विचार करायचो की 'हा साप इकडे कुठून आला असेल? ज्या भागात शेवटी साप पहिला असेल असेल त्या जागेचा अंदाज घ्यायचो, म्हणजे त्यातला पसारा, जमिनीचा प्रकार (फरशी, माती इ.),साप बाहेर पडू शकेल अश्या जागा इ. आणि मग इन्कमटॅक्सवाले घर खाली करतात, तसच पण थोडे सभ्यपणे ती जागा खाली करायला लागायचो. खरं नाही वाटणार पण मी २-३ वेळा तळजाई वस्ती मधील काही घरे पूर्णपणे खाली केली होती. पसारा साफ करताना लोकं का एवढी अडगळ जमवतात असा प्रश्न पडायचा:फुटलेल्या कप-बश्या,मोठी फुटलेली पिंप, मोडक्या खुर्च्या,कपाटे, वाळ्याचे तुटके पडदे, फुलदाण्या, महागडे खेळण्यांची खोकी( जी खेळणी कधी तुटतील म्हणून मुलांच्या हाती पोहोचलीच नाहीत !)आणि असंख्य कपड्यांची गाठोडी. हा अवाढव्य पसारा हलवायला पण खूप वेळा मला कोणी मदत करायला यायचे नाही. आधी डिस्कवरी-डिस्कवरी म्हणणारे आणि मला ऑस्टिन स्टीवनचे सल्ले देणारी लोकं कामाच्यावेळी गुल व्हायचे. बागेत किंवा मैदानात, घुशीच्या बिळात साप असेल तर उन्हातानात अंगमेहनत करून कुदळ-फावडे घेऊन ती बिळे खोदायला लागायची. घुशीची बिळे ही एकमेकाना जोडलेली असतात,त्यामुळे एक बीळ खोदून उपयोग नसतो. कधी कधी साप (धामण) अर्धा बाहेर असेल तर तिची शेपटी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बीळ खोदायला लागायचे. पटांगणात असलेला साप लोकांनी उचकवला म्हणून खूप वेळा बिळात जाऊन बसायचा आणि मग ते १० मिनिटाचे काम लोकांच्या चुकीमुळे ३-४ तासाचे होऊन बसायचे.

मिपाकर आदुबाळ आणि अजून एक माझा मित्र (चिन्मय) यांना घेऊन मी अशीच एक अर्धी बिळात असलेली धामण पकडली होती,साधारण पणे मी कोणाला कॉल ला घेऊन जात नसे पण त्यावेळी पर्याय नव्हता. ५०-६० लोकं जनता वसाहती मध्ये (पार्वती पायथा)त्या धामणीच्या आजूबाजूला कोंडाळ करून उभे होते, मी एका हाताने धामण पकडून दुसऱ्या हाताने खोदत होतो,हे साधारण १५-२० मिनिटे चालू होते..... इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. असो.

बिळातला साप ओढून काढता येत नाही, स्क्रू जसा बोल्ट मध्ये घट्ट बसतो त्याप्रमाणे साप बिळात स्वतःला घट्ट (शरीराची जाडी कमी जास्त करून )अडकवून घेतो. त्यामुळे बाहेर येत नसेल तर परिस्थितीचा अंदाज घेऊन (मैदान, टेकडी) बिळातला साप सोडून द्यावा लागायचा.

एकदा साप दिसला की दुसरी पायरी म्हणजे तो ओळखणे. साप ओळखल्या शिवाय मी त्याला हात लावत नसे. बिनविषारी समजून विषारी साप चुकीच्या पद्धतीने पकडल्याने खूप अपघात होतात. पुण्यात चारही मुख्य (नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार) विषारी साप सापडतात. पूर्ण साप दिसत असेल तर 'दुधात साखर' पण ती वेळ फार कमी वेळा यायची. शेपटी, डोके, डोक्याच्या भाग, पोट, पाठीवरची नक्षी किंवा त्यांचा आवाज या वरून मी हे आधी विषारी साप आहेत का बघायचो. घोणस साप प्रेशर कुकरच्या शिट्टी सारखा दीर्घ आवाज काढतो. बिनविषारी साप साधारण करून जास्त आवाज करत नाहीत.

माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. बेक्कार धुराळा उठला,त्यातच मी टारझन सारखे दोन्ही हाताने छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकर चा आवाज येत होता पण मला काहीच दिसत नव्हते. तेंव्हा भीती वाटून पण उपयोग नव्हता, त्यांमुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिकपातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला, मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणस बरोबरचे)एकांतातील क्षण फार कमी आले. ;) असो.

विषारी सापासाठी आम्ही सर्पोद्यान ची माणसे फक्त प्रश्न चिन्ह (?) सारखा आकडा तर बिनविषारीसाठी हात वापरायचो. 'डोळ्याचे पाते लवते न लवते तो पर्यंत साप (नाग, घोरपड, उदमांजर, घार, घुबड, गरुड इ.) पिशवीत गेला पाहिजे' अशी सर्पोद्यान ची शिकवण होती. ३०-४० लोकं आजूबाजूला असताना ही शिकवण खूप महत्वाची होती, त्यामुळे अपघात व्हायचे प्रमाण खूप कमी होते आणि सापाला पण त्रास कमी व्हायचा.

डिस्कवरी प्रेरित सर्पतज्ञ जागोजागी सापडायचे, त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करायचो कारण यांची फक्त तोंडाने बडबड असते, खरी भीती असायची ती तळीरामांची ! रात्री तळजाई वस्ती, जनता वसाहतीत गेलो तर खूप वेळा हे तळीराम सर्पतज्ञ भेटायचे, २-४ क्वार्टर लावल्यामुळे त्यांची किंग कोब्रा पण पकडायची तयारी असायची, अशा वेळी खूप शांतपणे परिस्थिती सांभाळायला लागायची. विषारी साप रात्री वस्तीच्या ठिकाणी नाग पकडताना खूप मोठी जवाबदारी असायची: तो नाग आधीच या तळीराम लोकांनी दिवचलेला असायचा त्यामुळे बेक्कार फुत्कार टाकत असायचा, खूप वेळा लाईट नसायची, सगळे फुल औट असायचे, बायका- पोर धिंगाणा घालत असायची, अश्या वेळी या लोकांना सांभाळून, आपल्या पण जीवाची काळजी घेउन तो नाग पकडायला लागायचा.

सर्पोद्यान चा अजून एक नियम म्हणजे: 'एकदा पिशवी मध्ये घातलेला साप स्वतः चा बाप आला तरी त्याला दाखवायला बाहेर काढायचा नाही.' खूपवेळा नाग पकडला तर त्याच्या आध्यात्मिक महत्वामुळे (फुकटची अंधश्रद्धा !) लोकं पूजा करायला पुढे यायचे, नागपंचमीला नागाचा कॉल केला तर अजूनच मजा. अशा वेळी मी पिशवीत टाकलेला साप-नाग कधीच बाहेर काढायचो नाही. माझ्या एका मित्राचा, असाच पूजेसाठी बाहेर काढलेला नाग परत पिशवीमध्ये घालताना अपघात झाला होता. कॉल केल्यावर खूपवेळा लोकं अंगाला हात लावून बघायचे, माझ्या अंगावर कुठले आवरण आहे आहे का बघत असायचे, 'तुम्ही काय खाता ? सापासाठी औषध कुठले घेता ? तुम्हाला कुठली सिद्धी प्राप्त आहे का ?' असे अनेक प्रश्न यायचे. ही उत्तरे देताना खूप काळजी घ्यावी लागायची, समाजात अंधश्रद्धा या वणव्या सारख्या पसरतात. सगळ्या लोकांना माझे एकच उत्तर असायचे "मला साप ओळखता येतात आणि त्यांच्या विषयी माझा सखोल अभ्यास आहे म्हणून मी त्यांना पकडू शकतो, जर अपघात झाला तर मी सुद्धा ससूनलाच जाणार आहे."

हे पकडलेले साप मी तडक सर्पोद्यान ला घेऊन जायचो आणि नंतर ते निसर्गात- अभयारण्यात सोडले जायचे. कॉल येण्यापासून- ते साप पकडे पर्यंत दर वेळी नवी आव्हाने असायची, ती पेलण्याची ताकत मला फक्त सर्पोद्यान ने दिली. सर्पोद्यानने दिलेली जवाबदारी मी ४-५ वर्ष एक पण अपघात न होऊ देता पार पाडली आणि थोडेसे का होईना पुण्यातले साप वाचवले.

साप पकडणे हे काम सोपे नाही,जिवावरचा खेळ आहे.. त्यामुळे असे लेख वाचून, डिस्कवरी वर बघून चुकून पण त्याच्या वाटेला जाऊ नका, त्यांच्या बरोबर फोटो काढून घेऊ नका. हे लक्षात ठेवा " जो सापांबरोबर फोटो काढतो तो लवकरच फोटो मध्ये जातो !"

धोरणमांडणीवावरसमाजतंत्रशिक्षणप्रकटनविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

जैक साहेब
घोणस चावलेल्या माणसांचे दोन चार फोटो लोकांना दाखवायला पाहिजेत तरच हे अति उत्साही लोक गायब होतील. पुल नि म्हटल्याप्रमाणे कुत्र्यापेक्षा त्यांचे मालकाच जास्त उच्छाद आणतात तसेच सापापेक्षा हे इतर लोकच जास्त उच्छाद आणतात. आपले लेखन रंजकच नाही तर ज्ञान वर्धक सुद्धा आहे असेच चालू ठेवा
धन्यवाद

जॅक डनियल्स's picture

26 Jun 2013 - 8:08 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
पुढचा एक सापांच्या माहिती बद्दल लेख द्यायचा विचार आहे तेंव्हा ते फोटो टाकीन. मी पण घोणस चावलेला माणूस पहिला आहे, खरच बेक्कार भयानक असते.

हरचन पालवाच्या कपाटाची दुरुस्ती करून येताना साप 'प्रतेक्ष' पहिले लोक खूप असायचे.
ह्या एका वाक्यानेच पूर्ण परिस्थिती डोळ्यासमोर आली :) परफेक्ट वाक्य वापरलेत.
पूर्ण लेख एकदम सही! आधीचे भाग हि मस्त आहेत.

अनुप ढेरे's picture

26 Jun 2013 - 11:04 am | अनुप ढेरे

तुम्हाला कुठली सिद्धी प्राप्त आहे का ?

आवरा...

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Jun 2013 - 11:06 am | लॉरी टांगटूंगकर

लै आवल्डा!!!

आता दर वेळेस उशीच्या अभ्रा चाचपून घेतला जाईल.

मोदक's picture

26 Jun 2013 - 11:39 am | मोदक

खल्लास भाग!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2013 - 11:45 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त जमलाय हा भाग. माहिती आणि रोचकता दोन्हिही आहेत. लिहीत रहा...

विक्रान्त कुलकर्णी's picture

26 Jun 2013 - 12:47 pm | विक्रान्त कुलकर्णी

छ्आन माहिती...पण कुठलीही कवच कुन्डले न वापरता तुम्ही साप बिप कसे हो पकडता?? फारच ग्रेट आहात..

विटेकर's picture

26 Jun 2013 - 2:03 pm | विटेकर

अवघे प्रचितीचे बोलणे असल्यामुळे फार भावले.
मला एकूणच सापांबद्द्ल खूप भिती वाटते.. ही अर्थात अज्ञानापोटी आहे.
आणि ती पुस्त्के वाचून जाईल असे वाटत नाही,
ही भिती जावी म्हणून अन्य काही प्रयत्न करता येईल का?
सापांची ओळख अथवा माहीती असा एखादा छोटेखानी कोर्स सर्पोद्यानातर्फे घेतला जातो का ?

संजय क्षीरसागर's picture

26 Jun 2013 - 7:40 pm | संजय क्षीरसागर

आणि ती पुस्त्के वाचून जाईल असे वाटत नाही,
ही भिती जावी म्हणून अन्य काही प्रयत्न करता येईल का?

मुंगुस पाळणं हा बेस्ट उपाय आहे.

जॅक डनियल्स's picture

26 Jun 2013 - 8:14 pm | जॅक डनियल्स

असा कुठला कोर्से वगैरे घेतला जात नाही. पण तुम्ही तिकडे दर वेळ काढून गेलात तर तुम्हाला ते माहिती देतील आणि तुमचे नशीब असेल तर बिनविषारी साप हाताळू पण देतील.
भीती ही तुमची स्वतः ची असल्यामुळे तिच्या वर कोणाचा हक्क नाही ;)

त्यांना उगीच भरीला घालू नका, त्यांचा स्लोगन पाहा:
आपणांस आहे मरण! म्हणोन राखावें बरवेपण!!
याचा अर्थ, सांभाळून असावे, नको तिथे हात लावू नये.

विटेकर's picture

27 Jun 2013 - 9:31 am | विटेकर

कात्रजला जौन येतोच !
धन्यवाद !

रोचक अन ज्ञानवर्धक दोन्हीही!!! अन मुख्य म्हंजे खत्तर्नाक!!!!!! मानलं तुम्हाला _/\_

संजय क्षीरसागर's picture

26 Jun 2013 - 2:23 pm | संजय क्षीरसागर

किंग कोब्रा पण पकडायची तयारी असायची!

मायला, काय निरिक्षण आणि लेखनाचा अंदाज आहे. वाट्टेल त्या गंभीर परिस्थितीत विनोद करू शकणारा मी फक्त एकच माणूस पाहिला होता तो म्हणजे पुलं आणि आता तू. मान गये उस्ताद!

ऋषिकेश's picture

26 Jun 2013 - 2:51 pm | ऋषिकेश

अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण लेखन आहे. आभार!

बाकी, हा शेवटचा भाग नसेल अशी आशा आहे (नै शेवटी क्रमशः नै दिसलं म्हणून विचारलं)

जॅक डनियल्स's picture

26 Jun 2013 - 8:15 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् ! नाही हा शेवटचा भाग नाही. मी क्रमशः टाकले नाही.

छान लेख. आवडला. पुढचा भागही लवकर येउद्या.

आतिवास's picture

26 Jun 2013 - 4:34 pm | आतिवास

माहितीपूर्ण लेखन.
तुमच्या दृष्टिकोनामुळे आणि अफलातून विनोदबुद्धीमुळे ते अजूनच मस्त झाले आहे :-)

शरभ's picture

26 Jun 2013 - 4:34 pm | शरभ

आमच्या घरात २ वेळा साप घुसले होते. त्या पैकी एक नाग होता (हो, हो नक्की). दुर्दैवाने त्यावेळी साप पकडणे वगैरे माहितच नव्हते. दोन्ही वेळा साप मारले. आता वाईट वाटतं.

जॅक डनियल्स's picture

26 Jun 2013 - 8:19 pm | जॅक डनियल्स

वाईट वाटून घेऊ नका. लेखात लिहिल्या प्रमाणे सापाबद्दल फक्त माहिती अजून भागत नाही, अजून पण गोष्टी तो पकडताना विचारात घ्यायला लागतात. चुकून जरी नागाचा दात घासून गेला तरी जीवावर बेतू शकते, किंवा हात-पाय तरी गमवावा लागतो. त्यामुळे अर्धी माहिती असेल तर पकडायचा प्रयत्न करू नका.

शरभ's picture

27 Jun 2013 - 12:35 pm | शरभ

नाही नाही, मी स्वत: असं काही धाडस कधी करीन असं मला वाटत नाही. पण साप पकडून सोडुन देता येईल असं कोणीही माहिती नव्हतं. अजून एक असं की, घरात जनावर आलं (मला अजुन कळलेलं नाहीये की सापाना जनावर का म्हणतात ते) म्हणजे घरातल्या कुणाचतरी धक्का लागून डुग ठेऊन आलं असलं पाहिजे, मग ते मारलचं पाहिजे अशी एक भावना असायची.

एक विनंती, जर किंग कोब्राचा काही अनुभव असेल तर जरुर कथन करावा. मध्ये व्हिटेकर साहेबांचे काम पाहिले. एका भागात एक male किंग कोब्रा एका female किंग कोब्राला मारतो. त्या आधी तो तिच्यासोबत असलेल्या दुसर्‍या male ला hood battle मध्ये रीतसर हरवतो आणि पळवून लावतो. ती female जवळ जवळ २७ अंडी बाळगलेली pregnant असते. असं का व्हावं कळायला कठीण आहे, पण ह्या जमाती बद्दल अजून बरच काही उजेडात यायचं बाकी आहे एवढं नक्की.

जॅक डनियल्स's picture

27 Jun 2013 - 8:28 pm | जॅक डनियल्स

प्रामाणिक पणे मला किंग चा स्वतः काही अनुभव नाही. मी फक्त पुण्यात साप पकडत असल्याने किंग शी आमना सामना झाला नाही. सर्पोद्यान मध्ये किंग होता, त्याचा केज साफ करणे आणि त्याला खायला पाणी देणे एवढेच मी केले आहे. किंग ही खूप मोठी जवाबदारी असते, जर तो चावला (निट हाताळला तर चावत नाही)तर आपल्या कडे प्रती-औषध उपलब्ध नाही आणि असले तरी तो चमचा भर विष ओतत असल्यामुळे वाचायची शक्यता खूप कमी असते. पण चेन्नई सर्पोद्यान मध्ये किंग चे खूप उपक्रम चालतात. व्हिटेकर साहेब बेक्कार भारी आहेत त्या विषयात.त्यांच्या प्रमाणे, कलकत्यात दीपक मित्रा साहेब पण या विषयावर खूप जास्त काम करतात पण ते टी.व्ही. वर येत नाहीत.

सुबोध खरे's picture

1 Jul 2013 - 12:04 pm | सुबोध खरे

नागराज (KING COBRA) याच्या विषावर सर्पविष प्रतिबंधक लस केंद्रीय संशोधन शाला कसौली येथे तयार केली जाते. परंतु या औषधाचे आयुष्य २ वर्षे असते आणी त्याची मात्र फार मोठ्या प्रमाणात द्यावी लागते म्हणून बर्याच ठिकाणी हि लस उपलब्ध नसते. दुसरे कारण सर्व सामान्य साप चावला तर एका वेळी ८० ते १२० मि ग्राम विष शरीरात भिनते हेच नागराज एकावेळी पाचशे ते सातशे मि ग्राम विष भिनवतो त्यामुळे एकावेळी फार मोठ्या प्रमाणात प्रतिविष द्यावे लागते. आणी एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली तर रुग्ण अर्ध्या ते एक तासात सुद्धा दगावू शकतो. म्हणून नागराजाबद्दल एवढी भीती आणी आदर आहे. हे विष तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते त्यामुळे रुग्णाचे श्वसन केंद्र बंद होते. अशा रुग्णाला प्रतिविष मिळे पर्यंत कृत्रिम श्वासोचछवासावर ठेवावे लागते म्हणून त्याला ताबडतोब मोठ्या रुग्णालयात हलवणे जरुरीचे असते. बाकी सहा इंचाचे फुरसे चावून विषबाधा झालेली मी पहिली आहे त्यामुळे कोणताही साप असेल तर त्याच्याशी खेळ हा जीवाशी खेळ ठरू शकतो. त्याला चार हात दूरच ठेवावे.

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2013 - 5:01 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर लेखन !! एकदम थ्रीलिंग आहे सगंळं !!

(
नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार ह्या चौघांची इन्ग्रजी नावे कुठली ? नाग म्हणजे कोब्रा ...पण किंग कोब्रा म्हणतात तो काही वेगळाच असतो ...आपला मराठी नाग वेगळा असेही ऐकुन आहे !

बाकी जॅक डॅनियल ने पिल्लकड लोकांची अशी खेचावी ...छे छे छे ...आमच्या भावना दुखावल्या =))
)

सुबोध खरे's picture

26 Jun 2013 - 7:06 pm | सुबोध खरे

नाग (COBRA),नागराज (KING COBRA), मण्यार (COMMON CRAIT) फुरसे (SAW SCALED VIPER) आणी घोणस( RUSSELS VIPER) हे चार साप भारतात प्रकर्षाने सापडणारे विषारी साप आहेत म्हणून आपल्याकडे मिळणारे (POLYVALENT) विविधआयामी सर्पविष प्रतिबंधक औषध हे वरील चारही सर्पांच्या दन्शासाठी उपयुक्त आहे. परंतु जर चावलेला साप नक्की माहित असेल तर( म्हणजे मारून आणला असेल तर (MONOVALENT) म्हणजे त्याच प्रकारच्या सापाचे सर्पविष प्रतिबंधक औषध पण देता येते. (याचे साईड इफेक्ट्स बरेच कमी असतात)
नागराज हा इतर साप( विशेषतः धामण) खाणारा साप आहे आणी आपल्याला नेहेमी म्हणजे नागपंचमीला दिसणाऱ्या नागाच्या तिप्पट मोठा (१८ ते २० फूट) असतो. त्याच्या विषाची मात्रा सुद्धा बरीच जास्त असते (त्य़ाच्या चाव्याने हत्तीसुद्धा मरेल) .
हा पश्चिम आणी पूर्व घाट म्हणजे कर्नाटकात (उडुपी आगुम्बे ई भागात) आणी ओडीसात सापडतो. महाराष्ट्रात फारसा ऐकलेला नाही(सुदैवाने).
बाकी साप म्हणू नये धाकला

जॅक डनियल्स's picture

26 Jun 2013 - 8:29 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् खरे साहेब !
मस्त माहिती दिली आहे पण काही बदल सुचवू इच्छितो,
आपल्या कडे "चष्मा नाग " (spectacled cobra) सापडतो. त्याच्या फण्यावर चष्मा सारखा आकार असतो जो काही लोकांना १० चा आकडा पण वाटतो.
राज नाग याचे खाद्य मुख्य करून साप आहे, धामण, मण्यार असे तो मिळेल ते साप खातो. तो दाट जंगलातच आढळतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या जवळ, दांडेली किंवा गोव्या मध्ये पण तो सापडतो. गोव्यामधल्या माझ्या काही सर्पमित्रांना तो कॉल ला पण मिळाला आहे.

स्पंदना's picture

27 Jun 2013 - 7:03 am | स्पंदना

नाग राज (king cobra) महाराष्ट्रात सापडतो. विशेषतः वेळुच्या बनात त्याची मादी अंडी घालते. आमच्या शेतात जो पर्यंत बांबुच बेट होत तोवर हा जंगी साप दिसायचा. जवळ जवळ गुडघ्याच्यावर अर्ध्या मांडीपर्यंत सहज उभा राहुन फुत्कार टाकत असलेला हा साप पाहुन गावात बर्‍याच अफवा असायच्या. अर्थात आम्हालाही तो किंग कोब्रा आहे हे खुप नंतर समजल. तोवर असला मोठा साप हा पूर्वज वगैरे चालायच. पण किंग कोब्रा महाराष्ट्रात असतो हे नक्की.
पुढे पुरात एकदा आख्ख बेट वाहुन गेलं. अन त्यानंतर काय माहिती नाही. निदान "दर्शन" झाल्याच्या बातम्या तरी नाहीत.

जॅक डनियल्स's picture

27 Jun 2013 - 7:18 am | जॅक डनियल्स

किंग कोब्रा ला थोडे दमट हवामान आणि गच्च झाडी लागते. तसेच त्याचे मुख्य भक्ष दुसरे साप असल्यामुळे त्याची पण त्याला खूप गरज असते. तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या गावात किंग दिसायचा. तुमचे गाव अमरावतीच्या बाजूला होते का ? नवेगावबांध परिसरामध्ये किंग अजूनही आहेत, पण आत्ता तो भाग नक्षलवादी झाल्यामुळे तिकडे जास्त संशोधन करता येत नाही.(किंगचे नशीब चांगले आहे ..वाचले बिचारे ) आपल्या पुराणामधली भुजंगाची प्रतिमा ही किंगमुळेच आली असे माझे मत आहे.

जॅक डनियल्स's picture

26 Jun 2013 - 11:29 pm | जॅक डनियल्स

समस्त जगातल्या तळीरामांची काळजी आहे म्हणून खेचली. दारू प्यायलेली असताना जर चुकून साप चावला तर त्याचे विष शरीरात लवकर पसरते. माझ्या एका मित्राने टल्ली असताना, मांजऱ्या साप (Cat snake बिनविषारी) समजून फुरसे (विषारी, saw scaled viper)पकडले आणि ते त्याला चावले. इतकी वाईट अवस्था मी कुठल्या पण सर्पदंश झालेल्या माणसाची पहिली नव्हती. ससून च्या कृपेने खूप हाल होत हा होईना तो मित्र जगला.

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Jun 2013 - 12:21 am | लॉरी टांगटूंगकर

=) :) :)
जॅक डॅनिअल्स नाव ना रे तुझं??

सन्जोप राव's picture

26 Jun 2013 - 5:41 pm | सन्जोप राव

आधीच्या सर्व भागांप्रमाणेच हा भागही खूप आवडला.

खुसखुशीत शैलीत खूप महत्वपूर्ण माहिती नि अनुभव दिलेले आहेत.

संजय क्षीरसागर सरांचा प्रतिसाद तंतोतंत लागू.
- 'दिस जातील दिस येतील, भोग सरंल सुख येईल' अशा आशेत नेहमीच आशावादी प्यारे. ;)

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2013 - 9:34 pm | टवाळ कार्टा

भारी

अर्धवटराव's picture

26 Jun 2013 - 10:26 pm | अर्धवटराव

प्रथम सापापर्यंत पोहचणे, नेमका प्रॉब्लेम ओळखणे (सापाची जात, ठिकाण), कौशल्याने साप पकडणे, ते करत असताना स्वतःला व इतरांना अपघात होऊ न देण्याची काळजी घेणे (प्रेसेन्स ऑफ माईण्ड), परिस्थितीचा समतोल ढासळु न देणे (तळीराम वगैरे मंडळी व "श्रद्धाळू" भगतांचा सासेमीरा), जीवावर बेतणार्‍या संकटाव देखील दया, प्रेम, आदर ठेवणे (सापाबद्दल), मिपा सारख्या संस्थळावर अत्यंत रंजक पद्धतीने लोक शिक्षण देणे... आणि हे सर्व करताना आपले पाय जमिनीवर ठेवणे... बापरे... जे.डी. मित्रा... तु फार वेगळं रसायन आहेस यार (तुला खरच काहि सिद्धी वगैरे प्राप्त आहे कि काय ;) )

अर्धवटराव

निराकार गवसला असेल त्यांना ;)

जेडी, सुरेख लिहिताय. सुरु राहुदेत हे किस्से. वाचायला आवडताहेत.

अर्धवटराव's picture

27 Jun 2013 - 12:51 am | अर्धवटराव

माऊली...

अर्धवटराव

+११११११११११११११११११११११११११११.

स्टार वॉर्स मधल्या जेडीप्रमाणेच या जेडीला सुद्धा सिद्धी प्राप्त असणारे... स्ट्राँग इज द फोर्स विथ धिस वन!!!

(योडाभक्त) बॅटमॅन.

संदीप चित्रे's picture

26 Jun 2013 - 11:34 pm | संदीप चित्रे

प्रत्येक भाग वाचल्यावर नवीन भाव वाचण्याची उत्सुकता असते :)

किसन शिंदे's picture

27 Jun 2013 - 1:22 am | किसन शिंदे

माहितीपुर्ण लेखमाला झाली.

मला सापांची खुपच भिती वाटते..त्यामुळे तुमचं भारीच कौतुक वाटतंय !

बहुगुणी's picture

27 Jun 2013 - 5:39 am | बहुगुणी

जॅक:

या लेखमालेतच आता क्रमशः एक-एका विषारी आणि बिनविषारी सर्पांची सचित्र ओळख येऊ द्यात, जनप्रबोधनाची उत्तम संधी आहे, एक संग्रहणीय लेख-मालिका लिहू शकाल.

जॅक डनियल्स's picture

27 Jun 2013 - 7:09 am | जॅक डनियल्स

हो एका भागात विचार आहे सगळ्या सापांची ओळख करून द्यायचा. सुरुवातीलाच शिकवायला लागलो तर पोरं लक्ष देत नाही म्हणून त्यांना आधी गोष्ट सांगायला लागते....;)

धमाल मुलगा's picture

27 Jun 2013 - 5:44 am | धमाल मुलगा

दरवेळी प्रतिसाद लिहीन म्हणतो अन राहून जातंय.

एकुणच हे जे काही काम आहे ते महाजिकिरीचं आणि भयंकर जोखमीचं आहे हे आज उमगतंय मित्रा. तू फक्त लिहित रहा! (तुझ्या जेडीच्या अखंड ओघाची आम्ही काळजी घेऊ हवंतर ;) )

अधिक काय लिहू? :)

स्पंदना's picture

27 Jun 2013 - 7:13 am | स्पंदना

खरच कौतुक वाटत तुमच.
खरतर साप आहे म्हणुन तिकडे पळत सुटण्याऐवजी उलट बाजुला का पळत नाहीत लोक असा प्रश्न मला पडतो. अर्थात मी स्वतः उलट दिशेलाच पळते अजुनही.
वरुन धप्क्कन पुढ्यात पडणारे साप पाहिलेत, अन सगळ्यात महत्वाच, लहाणपणी याची देही याची डोळा मुंगुस अन साध्या नागाची लढाई पाहिली आहे. नदिच्या वाळुत, बिचारा नाग फार वेळ तग नाही धरु शकला. पहिल्यांदा सापा बद्दल वाईट वाटल ते तेंव्हा.
माझे पप्पा हाताने साप पकडायचे. खुपदा नाग पकडलेला पाहिलाय. पण गावात शिरलेला नाग जास्त करुन मारुनच टाकतात. त्यामुळे मारलेलेच नाग पाहिलेत. कसल तळपदार जनावर असत साप म्हणजे, किती चपळ! धामिण तर अशी जणु तरंगत जाते जमिनीवरुन. अतिशय सुंदर अन तेव्हढच घातक जनावर म्हणजे साप.
इतक्या गंभीर विषयाला अशी विनोदाची धार देत केलेल लिखाण अतिशय आवडल जॅक डी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2013 - 7:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचित्र माहिती येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

जॅक डनियल्स's picture

27 Jun 2013 - 7:29 am | जॅक डनियल्स

बिरुटे सर,

हे लक्षात ठेवा " जो सापांबरोबर फोटो काढतो तो लवकरच फोटो मध्ये जातो !"

हेच माझे ध्येय वाक्य असल्यामुळे माझ्या कडे साप पकडायचे फोटो नाही. पण जेंव्हा सापांची ओळख करून देईन तेंव्हा नक्की छायाचित्र टाकीन.

अहो, सचित्र म्हणजे पट्ट्या पट्ट्या चा जर साप असेल तोंडाजवळ जरा काळा डाग असेल.
अमुक अमुक दिसत असेल, धमुक धमुक दिसत असेल तर त्याला हा साप म्हणावा.
उदाहरणार्थ मी जे खाली चित्र डकवले आहे ते नागाचे आहे. आता बघा, क्रमांक दोनचे जे चित्र आपण पाहात आहात तो गवत्या साप आहे. त्याला इंग्रजीत अमुक अमुक म्हणतात. हा प्रामुख्याने पावसाळ्यात दिसतो. संपूर्ण हिरवा असलेला हा बिनविषारी साप आहे. पण, बिनविषारी आहे म्हणून त्याला पकडायचा प्रयत्न करु नका. अशाच रंगाचा हा एक विषारी साप आहे तेव्हा सापाची संपूर्ण ओळख झाल्याशिवाय साप पकडू नये. अशा अर्थाने सचित्र. (हुश्श)

-दिलीप बिरुटे

जॅक डनियल्स's picture

27 Jun 2013 - 8:09 am | जॅक डनियल्स

बिरुटे सर,
माझ्या या लेखामुळे वाचकात जरी भीती निर्माण होऊन ते सापापासून दूर राहिले तरी माझे लिखाण सार्थक होइल. आधी लिहिल्या प्रमाणे मी जेंव्हा सापांची ओळख हा लेख लिहीन तेंव्हा चित्र टाकीन. तसेच माझ्या अनुभवाप्रमाणे छायाचित्र बघून साप ओळखणे फार कमी वेळा शक्य होते. कारण तो साप प्रत्येक वेळा तीच पोज देइल हे सांगता येत नाही ;) फणा बंद केलेला नाग समोर आला तर त्याला सापाला ओळखणारे (फोटो बघून ) लोकं धामण समजून पकडताना मी पहिले आहेत. त्यामुळे गैरसमज कमी करण्यासाठी मी छायाचित्र टाकली नाहीत.

शिल्पा ब's picture

27 Jun 2013 - 9:02 am | शिल्पा ब

आत्ता केक्युइडीवर अफ्रीकेतल्या ब्लॅक मांबा पकडण्यासंबंधी डॉक्युमेंटरी चालु आहे. या पकडणार्‍यांकडे चिमटे आहेत.
तसंच त्यांच्या म्हणण्यानुसार पहील्यांदाच अशा मांबाच्या शरीरात चीप बसवलीये..कसलासा माणसांना देणाराच गॅस देउन सापाला बेशुद्ध करुन मग ऑपरेशन केलं.

जॅक डनियल्स's picture

30 Jun 2013 - 8:48 pm | जॅक डनियल्स

हो ती खूप जुनी डॉक्युमेंटरी आहे. मंबा आहे खूप जहाल विषारी असून तो खूप चपळ असतो. तसेच त्याची लमी ८-९ फुट असते. त्यामुळे त्याला नुसत्या हुक ने पकडणे खूप अवघड असते म्हणून संशोधक चिमटे वापरतात. त्याचे विष खूप औषधात वापरले जाते त्यामुळे त्या वरती खूप संशोधन चालू आहे.भारतामध्ये पण चेन्नई सर्पोद्यान मध्ये किंग कोब्रा वर उपचार करभर्त, त्याला भूल येणारा ग्यास देऊन उपचार केले जातात. पण याचा खर्च खूप असल्यामुळे साध्या सापांसाठी तो संशोधकांना परवडत नाही.

रोचक लेखमाला अन खुसखुशीत शैली. आवडले.

इच्चक's picture

27 Jun 2013 - 10:58 am | इच्चक

पण कोण्या एका राज्यात म्हणे खुप साप आहेत. तिकडे बर्क्ले युसी, टेक्सास असं काहिसं ऐकलं आहे. तुम्ही तिकडे असाल तर अजुनही जमेल की .... अमेरिकन साप वेगळे असतात का हो ?

lakhu risbud's picture

27 Jul 2013 - 2:49 pm | lakhu risbud

हा हा
म्हयशीनां चालती काय वो तुमची होमोपदी ? (साभार म्हैस-पुलं )

या चालीवर अमेरिकन साप वेगळे असतात का हो?
वाचावे

जॅक डनियल्स's picture

27 Jul 2013 - 11:25 pm | जॅक डनियल्स

अमेरिकेमध्ये सापांचे प्रकार भारतापेक्षा खूप कमी आढळतात. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असल्यामुळे सापांना पूरक वातावरण आहे. एकडे ज्या कोरड्या जागा आहेत, अरिझोना, उत्तर टेक्सास इ. तिकडे वायपर प्रजाती मधले साप- रेटल स्नेक,कॉपरहेड हे विषारी साप आढळतात. या रेटल स्नेक च्या खूप उपजाती आहेत, जसा भारतात घोणस सगळी कडे आढळतो तसा रेटल स्नेक हा अमेरिकेमध्ये सगळीकडे आढळतो. कॉटनमाउथ नावाचा विषारी साप पाणथळ प्रदेशात आढळतो. उत्तर अमेरिकेमध्ये अनाकोंडा सापडत नाही, फक्त तो त्यांच्या सिनेमा मध्ये सापडतो.
नाग, मण्यार या प्रजाती आपली दक्षिण आशियाई प्रदेशाची पेशालीटी आहे ती एकडे बघायला मिळत नाही. अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी आणि झाडे जास्त असल्याने भारतात जसा माणसांचा सापांशी संबध येतो तसा एकडे येत नाही. खूप लोकांनी एकडे साप फक्त झू मध्ये पहिला असतो.
एक माझा एकडचां मित्र रेटल स्नेक चा अभिमान दाखवायला लागला, मी त्याला -घोणस, फुरसे, मलबार चापडा , हिरवा चापडा,नाग, मण्यार आणि किंग कोब्रा च्या गोष्टी सांगून गप्पा केला. त्याला म्हणलो, "अजून आहेत, हे तर मी पुण्यात पकडलेले साप आहेत, अजून जंगलात घुसलो नाही मी."

बॅटमॅन's picture

28 Jul 2013 - 12:01 am | बॅटमॅन

एक माझा एकडचां मित्र रेटल स्नेक चा अभिमान दाखवायला लागला, मी त्याला -घोणस, फुरसे, मलबार चापडा , हिरवा चापडा,नाग, मण्यार आणि किंग कोब्रा च्या गोष्टी सांगून गप्पा केला. त्याला म्हणलो, "अजून आहेत, हे तर मी पुण्यात पकडलेले साप आहेत, अजून जंगलात घुसलो नाही मी."

है शाबास!!! कळायचं बंद झालं असेल त्याला एकदम.

दक्षिण अमेरिका उष्णकटिबंधीय असल्यामुळे त्यात बरेच प्रकार सापडत असावेत. हॅरी पॉटरमधला boa constricter ब्राझीलियन असतो बहुतेक.

जॅक डनियल्स's picture

28 Jul 2013 - 12:18 am | जॅक डनियल्स

तो boa constricter आपल्या अजगराचा इकडचा लहान भाऊ आहे. साप पाळणाऱ्यांमध्ये तो खूप फेमस आहे, बंगले वाले लोकं अल्शेशिअन पळतात तसे सापवाले त्याला पाळतात. शांत असतो, गिळायचे आणि पडायचे हे तो करतो.;)

सहज's picture

27 Jun 2013 - 11:11 am | सहज

कोण म्हणतं सिद्धी नाही?

लेखनसिद्धी चांगलीच अवगत आहे :-)

लेखमाला आवडली.

वात्रट's picture

27 Jun 2013 - 11:18 am | वात्रट

अत्यन्त रोचक लिखाण..

पैसा's picture

27 Jun 2013 - 8:06 pm | पैसा

झकास लेखमालिका चालू आहे. आता यापुढे अभ्यास सुरू ना!

चिगो's picture

1 Jul 2013 - 5:32 pm | चिगो

एकदम जबरदस्त विषयावर अत्यंत मार्मिक, खुमासदार विनोदी शैलीत लेखमालिका लिहीतोयस, त्याबद्दल अभिनंदन आणि आभार, मित्रा.. लेखनसिद्धी अवगत आहेच की तुला. इकडे मेघालयात पण बरेच साप आढळतात. एक सहाएक फुटांचा हिरवाकंच साप रोडवर इथेच बघितला..
मागच्या दोनेक वर्षांपासून इथल्या कुठल्यातरी यात्रेत निघालेल्या नागाच्या (काळा साप, आणि फण्याच्या आतल्या भागावर गर्द पिवळा रंग... नागच ना?) फोटोला फोटोशॉप करुन तीन किंवा पाच फणे असलेल्या सापाचे फोटोजपण पाहीलेत.. ;-) एका शहाण्याने तर १५-१५ रुपयात एक कॉपी विकून कमाईपण केली..

अभ्या..'s picture

2 Jul 2013 - 1:40 am | अभ्या..

फोटोला फोटोशॉप करुन तीन किंवा पाच फणे असलेल्या सापाचे फोटोजपण पाहीलेत.

म्याच तो फोटोशॉपवाला :)

एका शहाण्याने तर १५-१५ रुपयात एक कॉपी विकून कमाईपण केली..

हा मात्र म्या न्हाय/ :(

चिगो's picture

26 Jul 2013 - 8:29 am | चिगो

आधी तुझ्याकडचा फोटु पाठव मला.. मग सांगतो तोच का दुसरा ते.. :-)

जॅक डनियल्स's picture

26 Jul 2013 - 8:38 am | जॅक डनियल्स

मी पण तो किंग चा रस्त्याच्या कडेचा फोटो पहिला होता. नंतर त्या त्याच्या फण्याचा गोल फणा पण कोणी तरी केला होता. ;) चक्रधारी नाग होता तो बहुतेक. कमळाची पाकळी मिटते तसा तो फणा मिटत असेल बहुतेक ;)

मोदक's picture

26 Jul 2013 - 1:19 pm | मोदक

हाच काय..?

.

जॅक डनियल्स's picture

26 Jul 2013 - 8:28 pm | जॅक डनियल्स

सात फणे वाला शेष नाग !
सात फणे वाला शेष नाग !
शेषनागाने रूप बदलले !
मोहक कमळ !

यामुळे किती अंधश्रद्धा पसरली असेल याची कल्पनाच करवत नाही. मला खात्री आहे की आत्ता मी जर कॉल करत असतो, तर लोकांनी हा नाग तुम्ही पहिला आहे का असे विचारले असते.

जॅक डनियल्स's picture

27 Jul 2013 - 12:56 am | जॅक डनियल्स

सात फणे वाला नाग

कमळ !

धमाल मुलगा's picture

27 Jul 2013 - 1:00 am | धमाल मुलगा

काय नाग है का मोर? फण्याचा डायरेक्ट पिसाराच फुलवलान की. कोण है रे ते इतकं अतिशाणं फोटोशॉपकर बेनं?

जॅक डनियल्स's picture

27 Jul 2013 - 4:52 am | जॅक डनियल्स

तो ७ फणे वाला नाग फोतोशोप आहे हे दाखवण्यासाठी कोणी तरी हा फणा फुलवला.
कली युगातला शेष नाग आहे हा ! ;)

चिगो's picture

18 Aug 2013 - 11:50 pm | चिगो

जेडी, ह्यातला पहीला फोटो.. मी तीन आणि पाच फण्याच्या सापाचा फोटो पाहीला होता.. आता सात आणि चक्राकार फणा काढून तू आणखी पुण्य पदरात टाकलंस.. ;-) च्यामारी, येडभोक्यांनी फोटोशॉप करतांना साप सोडून बाकीचा फोटोपण फोशॉ करावा की.. बरं, "आम्ही स्वतः पाहीला हो, अमुक तमुक ठीकाणी !" म्हणून सांगतात लोकं च्यामारी..

आरररर लोकांना खरच वाटत नाय :-(
जौदे ते नागाचे लै शिम्पल होते. तुम्ही तुमचा फोटो पाठवा. तुम्हाला बेमालूम रामलीलातला धातोण्डि रावण करून पाठीवतो. मग इश्वास करा:)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jul 2013 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते

बेष्टेष्ट!

कवितानागेश's picture

8 Jul 2013 - 3:30 pm | कवितानागेश

मस्तच लिहिताय.
अवांतरः सापाला सगळेच घाबरतात. पण साप कशाकशाला घाबर्तो?

हर्षद खुस्पे's picture

24 Jul 2013 - 11:27 pm | हर्षद खुस्पे

जॅक डनियल्स's picture

25 Jul 2013 - 12:15 am | जॅक डनियल्स

मी आधी अश्या प्रकारचे विडीयो आणि काही documentary पण पहिल्या होत्या. त्या वरून आणि सर्पोद्यानातील लोकांच्या अनुभवावरून असे अनुमान काढले की थाईलंड मध्ये काही जमाती आहेत (आपल्या गारुडी-मदारी ) जमाती सारख्या, त्यांच्या कडे सापांबद्दल वडिलोपार्जित ज्ञान आहे. आपल्या कडे कसे गुराख्याला गाईची पूर्ण माहिती असते तसे त्यांना सापांबद्दल ज्ञान असते. तसेच त्यांच्या कडे नैसर्गिक उपचार पण असतात. त्यामुळे खूप वेळा कसे पण खेळ करू शकतात. सगळ्या वेळी हि लोक नागाबरोबरच खेळ करतात, मण्यार, घोणस वापरात नाहीत कारण नाग फक्त समोरच्या बाजूला हल्ला करू शकतो म्हणून त्यांना खेळ करणे सोपे जाते.
सर्पोद्यान मध्ये हे विडीयो मध्ये दाखवलेले आम्ही सगळं करू शकतो, भारतात परवानगी नाही. तसेच मला ते आवडत नाही कारण मी सापांचा आदर करतो.
हे विडीयो बघून खूप अपघात पण झाले आहेत, आणि खूप लोकांनी प्राण पण गमावले आहेत.

शिल्पा ब's picture

27 Jul 2013 - 6:56 am | शिल्पा ब

नाग फक्त समोरच्या बाजुने हल्ला करु शकतो म्हणता तर मग बाकीचे विषारी साप कुठुन हल्ला करतात? समोरअसल्यावर समोरुनच हल्ला करनार ना?

जॅक डनियल्स's picture

27 Jul 2013 - 7:48 am | जॅक डनियल्स

घोणस, फुरसे (कुठला पण व्हैपर प्रजातीतला)किंवा मण्यार हे ३६० अंशात डोके फिरवून चावू शकतात. थोडक्यात म्हणजे तुम्ही तूनळी पहिले असेल की नागाच्या फण्यावर लोकं चुंबन देतात तेंव्हा तो नाग डोके उलटे करून चावू शकत नाही. पण याउलट कोणी घोणसाचे चुंबन घ्यायचे प्रयत्न केले तर डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत घोणसच त्याचे चुंबन घेईल. नागाच्या डोक्यामागे असलेल्या (छत्री सारख्या) फण्यामुळे त्याला ते शक्य नाही.

हे वाचून नागाचे चुंबन घ्यायला कोणी जाऊ नका, जगात चुंबन घ्यायला अनेक गोष्टी आहेत की ज्यांचे चुंबन घेतल्यावर कमीतकमी जीवावर बेतणार नाही. ;)

शिल्पा ब's picture

27 Jul 2013 - 10:15 am | शिल्पा ब

असं होय ! हे माहीतीच नव्हतं. धन्यवाद.

हर्षद खुस्पे's picture

24 Jul 2013 - 11:27 pm | हर्षद खुस्पे

सुबोध खरे's picture

24 Jul 2013 - 11:52 pm | सुबोध खरे

चुकून सर्प सुखी व्हावे हि तो साईंची इच्छा असे वाचले

आदूबाळ's picture

25 Jul 2013 - 12:15 pm | आदूबाळ

वत्सा जेडी, पुढचा भाग कधी?

जॅक डनियल्स's picture

25 Jul 2013 - 9:32 pm | जॅक डनियल्स

अरे पुढच्या भागात फोटो टाकायचे आहेत म्हणून एका मित्राकडून फोटो यायची वाट बघतो आहे. तो सध्या अंदमान च्या जंगलात आहे म्हणून या वीकांत पर्यंत टाकीन नवीन भाग.

सुधीर's picture

25 Jul 2013 - 6:00 pm | सुधीर

खुमासदार शैली, वेगळ्या जगाची सफर आवडली.

अरुण मनोहर's picture

26 Jul 2013 - 2:30 pm | अरुण मनोहर

मस्तच लिहीले आहे. अनुभवी आणि लेखन कला अवगत असणारा जॅक डी! मग काय विचारता!

काही प्रश्न आहेत-
-नाग खरेच दूध पितो कां?
-नाग जर स्वत:ला चावला तर त्याला विष बाधते कां?
-नाग जर दुसर्‍या विषारी सापाला चावला तर विष बाधते कां?
-नाग नागीणीचे मिलन जे हिंदी सिनेमात दाखवतात, ते खरेच तसे असते कां?

जॅक डनियल्स's picture

26 Jul 2013 - 8:37 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद !
पुढचा जो लेख लिहिणार आहे त्यात हे सगळे प्रश्न सोडवण्यात येतील. :) आत्ता फक्त एवढेच सांगतो की 'हिंदी सिनेमाच्या ..@##@#@#.

यशोधरा's picture

27 Jul 2013 - 10:36 am | यशोधरा

जेडी, पुढचा भाग लिहा लवकर. वाट बघत आहे.

प्रीत-मोहर's picture

3 Aug 2013 - 4:16 pm | प्रीत-मोहर

कही वर्षांपुर्वी आम्च्या गोव्यात सर्पमित्रांनी सापांची ओळख करुन द्यायचा एक प्रोजेक्ट केला होता त्याची आठवण झाली.
आमच्या शाळेत त्याचा एक "शो" झाला होता. बरेच बिनविषारी साप कसे ओळखायचे हे शिकवले होते.

बाकी पु.भा. प्र.

"सर्पमित्र कसले हे तर सर्पवैरी!" ही बातमी वाचली आणि या लेखातील अखेरच्या वाक्यांची आठवण झाली:

साप पकडणे हे काम सोपे नाही,जिवावरचा खेळ आहे.. त्यामुळे असे लेख वाचून, डिस्कवरी वर बघून चुकून पण त्याच्या वाटेला जाऊ नका, त्यांच्या बरोबर फोटो काढून घेऊ नका. हे लक्षात ठेवा " जो सापांबरोबर फोटो काढतो तो लवकरच फोटो मध्ये जातो !"