एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
13 Oct 2013 - 11:38 pm

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !

निसर्गामध्ये लहान-मोठें कोणी नसते, तो नियम माणसाने बनवला आहे. म्हणजे बघा, गरवारे कॉलेजच्या चहा टपरी वरती जर (इतकुशी)मुंगी जर चावली तर समोरच्या सुंदर मुलीपण विसरल्या जातात. फुरसे हा घोणासाच्या कुटुंबातीलच (viperidae) लहान भाऊ, पण वासेपूरच्या छोट्या फैजल खान सारखा "केहेके लुंगा" म्हणत भल्याभल्यांच्या तोंडाला रक्त आणणारा.

फुरसे (विषारी):

याचा आढळ अगदी अमेरिकन शस्त्रात्र (वॉरलॉर्ड) व्यापाऱ्यांसारखा मिडल-इस्ट, आफ्रिका ते मध्य आशिया आणि शेवटी भारतीय उपखंडात.(भारत, पाकिस्तान, श्रीलंका इ.)
२००९ साली इराक मध्ये तेग्रीस आणि युफ्रेटिस च्या खोऱ्यात दुष्काळ पडला होता, त्या वेळी तिकडच्या हजारो फुरस्यांनी इराकी जनतेची वाट लावून टाकली होती. बहुतेक इराकचे "स" या शब्दाशी वाकडे आहे, आधी सद्दाम-मग अंकल सॅम-शेवटी सॉ-स्केल्ड व्हायपर (फुरसे)! आपल्या इकडे पुण्या-मुंबईच्या (घाटावरच्या) लोकांना फुरसे एवढे माहित नसेल, पण कोंकणात म्हणजे जेवणात चिंच-गुळाची ज्या आमटी चवीने चाखली जाते त्याच चवीने "फुरसे" हा विषय चघळला जातो.

"जास्तीत जास्त हातभर लांबी, मातेरी रंग, डोक्यावर बाण" असे सोपे वर्णन फुरस्याचे केले जाते(~लांबी ३८- ८० सेमी). डोक्यावरचा बाण म्हणजे याचे "ट्रेडमार्क शिक्रेट", ते म्हणजे "जर आपल्याला भिडला तर तिकडेच तोडला" हेच चित्रातून सांगायचा निसर्गाचा प्रयत्न. "मातेरी" रंग हा १० वी च्या "डी ग्रुप" च्या प्रश्नासारखा "अर्थ एक पण उत्तरे अनेक"..मातेरी मध्ये "राखाडी, चॉकलेटी, करडा, लालसर करडा, शेवाळी करडा असे अनेक प्रकार. जशी जमिनीवरची माती तसे फुरस्याची रंगसंगती, "आपली माती- आपले फुरसे" असा कार्यक्रम पण आपण त्यावरून काढू शकतो.

हा फोटो मिपाकर 'अभिजा'यांनी साताऱ्याला (चाळकेवाडीला ) काढला आहे. हे फुरसे करड्या मातेरी रंगाचे आहे.

सातारी फुरसे

या फोटो मध्ये फुरस्याच्या डोक्यावरचा "ट्रेडमार्क बाण" नीट दिसतो आहे.

बाण

हा फोटो आमोद झांबरे यांचा, त्यांनी पुण्याच्या जवळ काढला आहे, रंग संगती मधला फरक बघा.

पुणेरी फुरसे

लहान असल्यामुळे लपण्यासाठी जागा अनेक: दरवाज्याची कडी, बिजागर; उंबरठ्याच्या, मोरीच्या,पलंगाच्या फटीत, घरातल्या कुंडीच्या खालच्या प्लेट मध्ये, कुंपणाची दगडांची भिंत, अंगणात पसरलेल्या दगडाच्या खाली इ. तसेच या सापाला "हीच-हायकिंग" करायला खूप आवडते, म्हणजे एका भाजीच्या ट्रक मधून दुसऱ्या ट्रक मध्ये असे करून हे साप पुण्यात पोहचतात. मी जी काही फुरशी पुण्यात पकडली ती मार्केट यार्ड परिसरामध्ये भाजीच्या गोडाऊनमध्ये पकडली आहेत. तशी कोथरूडच्या किंवा कोंढवा टेकडी वर मजबूत फुरशी आहेत, पण मला कॉल ला कधी मिळाली नाहीत. असेच एक फुरसे इंग्लंडमध्ये एका आज्जीच्या घरी भाजीच्या कंटेनर मधून पोहचले, "असेल कुठला तरी साप म्हणून", त्यांनी त्याला स्वयंपाकाच्या चिमट्याने उचलून डब्यात टाकले, नंतर ते फुरसे आणि ती आज्जी इंग्लंड मध्ये शेलीब्रिटी झाल्या होत्या, कोणाचे काय...तर कोणाचे काय !

संकटाची जाणीव झाली की फुरसे अंगावरचे खवले घासून करवत घासल्यासारखा आवाज करते,तो आवाज घोणसाच्या शिट्टी एवढा मोठा नसला तरी कचकचीत तीव्र (high frequency) असतो. घोणासाच्याच कुटुंबातील फुरसे असल्यामुळे आधीच्या भागात लिहिलेले वर्णन याला पण लागू होते- "डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला फुरसे पण असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा बी.बी.सी. चा व्हिडिओ बघा: फुरस्याचा हल्ला. हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी फुरस्याचा हल्ला चित्रित केला आहे. )

वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १/१० घोणासाच्या विषाच्या मात्रेएवढे म्हणजे २० mg तो २५ mg एवढे विष फुरसे टोचते.
हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो.

फक्त हे विषाचे प्रमाण(घोणसाच्या तुलनेत) कमी असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी आहे, कारण आपल्याकडे हाफकिनचे प्रती-विष उपलब्ध आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्पदंशाचे रुग्ण हे फुरसे चावल्यामुळे आढळतात, १९९२ ते २००१ या दहा वर्षाच्या काळात २७४ फुरसे दंश तर ७२ नाग दंशाचे रुग्ण फक्त नांदेड भागात आढळले.(डॉ.डी.पी. पुंडे )म्हणजे साधरण पणे नागाच्या चौपट प्रमाणात फुरसे चावण्याचे प्रमाण महाराष्ट्रात आढळते.
निसर्गाला कमी लेखायची ही चूक अशी महागात पडते. हा व्हिटेकर साहेबांचा व्हिडिओ बघा- फुरस्याचे विष !

जास्तीत जास्त फुरसे चावण्याचे प्रमाण हे रात्री आढळते, "व्होल वावर इज अवर" हा मनुष्यप्राण्याचा गैरसमज फुरसे रात्री दूर करते, शेतात डबा टाकायला गेला, धार मारायला गेला आणि फुरसे चावले, हे प्रकरण...आज ३१ नंबर ची पी.एम.टी खूप उशिरा आली एवढे कॉमन आहे.
माणूस वाचला तरी, ज्या जागी फुरसे चावते तिकडचे टिशू जळून जातात, कधी-कधी बोटे कापायला लागतात.

एका सर्पतज्ञांच्या भाषेत "एकवेळ नाग परवडला पण फुरसे नको,इतका त्रास होतो की बाळंतपण परवडले !"

एका मंगळवारच्या संध्याकाळी (~२००२-२००५ )अनिकेत (माझा सर्पोद्यानचा मित्र)त्याच्या रूमवर (सर्पोद्यान मधली वरची खोली) गप्पा टाकत पडला होता. इतक्यात कोर्पोरेशनचा ड्रायवर, हातात एक साप घेऊन आला. संध्याकाळी कोर्पोरेशनची "दुटी" संपल्यावर त्याने कात्रजच्या गुत्त्यावर पहिल्या धारेची लावली होती. "अरे हा बघ मांजऱ्या धरून आणला बघ !"

खालचा फोटो बघा, मांजरऱ्या म्हणजे कॅट स्नेक, बिनविषारी साप, याच्यात पिल्लात आणि फुरस्यामध्ये लोकं, सर्पमित्र नेहमीच गोंधळ घालतात.

मांजऱ्या

अनिकेत मुरलेला सर्पतज्ञ असल्यामुळे संधीप्रकाशात पण त्याने ते फुरसे आहे हे ओळखले, त्याने तो साप पहिल्यांदा डब्यात टाकला. ड्रायवरचे चालूच होते-" गुत्त्यावर हा मांजऱ्या दिसला, इतकुसा साप, असाच धरला..." अनिकेतने त्याची बोटं चेक केली तर बोटाला, ब्लेड मारावे तसा दात लावला होता.

अनिकेतला गंभीर परिस्थीची जाणीव झाली, पण हा आपला तळीराम "फुल ओन" होता, "आपल्याला काय पण होत नाय,लई मोठें मोठें नाग धरले आहेत आपण"..हे चालूच होते. पुढच्या काही क्षणात , अनिकेत ने त्याला स्प्लेंडर वर झाशीच्या राणीसारखा स्वतःला मागून बांधला आणि गाडी ससूनच्या दिशेला तडक सोडली.

आत्ता ज्यांना कात्रज ते पुणे स्टेशन रस्ता माहित असेल त्यांना माहित असेल की संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे कुष्णा नदीच्या प्रवाहात उडी टाकून उलट्या दिशेने (भोपळा न लावता) पोहोण्यासारखे आहे. कसेबसे करत हा ससूनला पोहचला तर ही मोठी रांग...आता दारूचा अंमल कमी होऊन विषाचा अंमल चालू झाला होता, त्यामुळे ड्रायवर पण बोंबलत होता. लायनी शिवाय फक्त व्हीयपीला एन्ट्री हा तिरुपती-बालाजीचा नियम इकडेपण लागू होता.

मोबाईलच्या आधीचा काळ, त्यामुळे अण्णाना फोन(ल्यांड लाईन) लागे पर्यंत त्या छोट्या-इवलुश्या फुरस्यानी ड्रायवरला सात जन्म दाखवले होते. फोन लागल्यानंतर वरून सूत्र हालली, ड्रायवरला प्रतिविष चालू झाले. ससूनच्या आणि अनिकेतच्या कृपेने, नंतर तो (हाल होत होत)वाचला, त्याचे बोट पण वाचले. पण निसर्गातल्या त्या इतकुश्या फुरस्याने, ड्रायवरला त्याची जागा दाखवून दिली होती.

(हा वरचा अनुभव माझा स्वतःचा नाही पण तो १००% खरा आहे, फक्त थोडे छोटे तपशील कानगोष्टीमुळे चुकू शकतात.)

आत्तापर्यंत मी ४ मुख्य विषारी सापांची (नाग, मण्यार, घोणस, फुरसे) माहिती दिली, हेच साप साधरण करून मानवीवस्ती मध्ये आढळतात. तसे अजून भारतात अजून खूप विषारी साप (साधा,मलबार-चापडा, किंग कोब्रा, पोवळा साप, समुद्र साप इ.) आहेत, पण त्यांचा माझा कॉल वर कधी संबध आला नाही म्हणून मी त्यांची माहिती देणे टाळले.ज्यांना कोणाला अजून त्यांच्या बद्दल माहिती हवी असेल त्यांनी अण्णांचे "साप" (इंग्लिश-स्नेक्स) हे पुस्तक वाचावे.(त्याच्या प्रती सर्पोद्यान मध्ये मिळतात.)

पुढच्या भागात बिनविषारी साप....

(अण्णा म्हणजे सर्पोद्यान चे संस्थापक-श्री.निलीमकुमार खैरे.)
(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

समाजजीवनमानराहणीशिक्षणलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

13 Oct 2013 - 11:50 pm | प्यारे१

मी पहिला मी पहिला. ;)
मस्तच!

बाकी >>> आज ३१ नंबर ची पी.एम.टी खूप उशिरा आली एवढे कॉमन आहे.
प्द्मावती - स्टेशन (व्हाया सारंग, सहकारनगर मार्गे ;) वाली) ही बस म्हणजे खरंच दिव्य आहे. :)

जबरा फोटो आहेत. निसर्गाच्या कलाकुसरीला तोड नाही..!!!!

लेख नेहमीप्रमाणी भारी.

आदूबाळ's picture

14 Oct 2013 - 1:17 am | आदूबाळ

ये बात, जेडी!

झाशीच्या राणीची स्टोरी आधीही ऐकली होती - आता शिव्यांशिवाय वाचताना कसंसंच झालं :)

उत्तम लेख. सुरेख प्रकाशचित्रे.

जेपी's picture

14 Oct 2013 - 7:20 am | जेपी

तुम्ही मंनोरंजन आणी प्रबोधन एकसाथ करता राव . बाकी लहानपणी शेताकड निघाल की मामा याची भिती घालायचा ,हा साप अंगावर त्याचा श्वास सोडतो ज्यामुळे अंगावर मोठी फोड येत ,म्हणुन फुर्रसे म्हणत असा समज होता

जॅक डनियल्स's picture

14 Oct 2013 - 8:39 am | जॅक डनियल्स

हो, फोड येणारा साप म्हणजे फुरसे, तो त्याच्या विषाचा एक परिणाम आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2013 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

@तुम्ही मंनोरंजन आणी प्रबोधन एकसाथ करता राव .>>> ++++++११११११११

मुक्त विहारि's picture

14 Oct 2013 - 7:50 am | मुक्त विहारि

काय मस्त माहीती दिलीत राव.

जमल्यास सापाच्या स्वभाव धर्माविषयी पण लिहिलेत तर जास्त आवडेल..

जॅक डनियल्स's picture

14 Oct 2013 - 8:42 am | जॅक डनियल्स

विषारी सापांचा स्वभाव धर्म म्हणजे "तो साप विषारी आहे " एवढाच धरून चालवा. उगाच कोणी सांगेल एखादा विषारी साप शांत आहे आणि मग अपघात झाला की "ती शांतता खड्यात जाईल."

ब़जरबट्टू's picture

14 Oct 2013 - 8:55 am | ब़जरबट्टू

आवडला हा पण लेख.. जबरा माहिती.. नशिबाने अजुन सापाशी सामना झालेला नाय बा.... :)

प्रचेतस's picture

14 Oct 2013 - 8:56 am | प्रचेतस

जबरदस्त.

पैसा's picture

14 Oct 2013 - 10:24 am | पैसा

कोकणात खरंच नागाला लोक भीत नाहीत पण फुरशाला भितात आणि ती मिळतातही खूप!

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Oct 2013 - 10:48 am | बिपिन कार्यकर्ते

एक साथ... नमस्ते!

झकासराव's picture

14 Oct 2013 - 11:00 am | झकासराव

बाबौ!!!
ह्ये बी ड्यान्जरच...

विटेकर's picture

14 Oct 2013 - 11:01 am | विटेकर

प्रबोधन + मनोरंजन !

वेरी वेरी गूड !

आतिवास's picture

14 Oct 2013 - 11:07 am | आतिवास

कालच एक साप दिसला. पक्षी निरीक्षणासाठी डोळ्यांवर दुर्बिण होती म्हणून दिसला. औषधाच्या बाटल्यांचा ढीग होता - त्यात तोंड घालून काय करत होता देव जाणे! एक बाटली झाली की दुसरी - असा त्याचा खेळ चालू होता. साधारण दहा फूट लांबी असावी त्याची. मधूनच डोके वर काढून जीभ बाहेर काढत होता. मागे थोडं जंगल आहे - माणसांचा वावर नसणारं.

नुसते जेडीचे लेख वाचून प्रत्यक्षात साप 'ओळखू' येत नाहीत हे लक्षात आलं :-)

दुर्बिणीचा अँगल बदलायला गेले तर तेवढ्यात कुठे गायब झाला कुणास ठाऊक! काही पत्ता लागला नाही :-(

अनिरुद्ध प's picture

14 Oct 2013 - 11:30 am | अनिरुद्ध प

उत्तम माहिती.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2013 - 11:34 am | llपुण्याचे पेशवेll

जॅडे,
हे कांडर काय असतं हो? फुरशाबरोबर याचीही किर्ती बरीच ऐकली आहे.

सौंदाळा's picture

14 Oct 2013 - 12:05 pm | सौंदाळा

आणि दिवड काय असतं ते पण सांगा जॅडे

पैसा's picture

15 Oct 2013 - 11:03 am | पैसा

म्हणजे आधेलं.

सुबोध खरे's picture

15 Oct 2013 - 6:41 pm | सुबोध खरे

दिवड म्हणजे विरोळा. हा हरणटोळ किंवा नानेटी या जातीतील एक बिनविषारी साप असून तो पाण्यात सहज पोहतो आणि अतिशय चपळ असतो.
पहा
http://www.indianetzone.com/4/keel_back.htm

सुमीत भातखंडे's picture

15 Oct 2013 - 10:49 am | सुमीत भातखंडे

म्हणजे मण्यारच असावं बहुतेक.
मण्यारीचच अजून एक नाव.

बाळ सप्रे's picture

14 Oct 2013 - 11:43 am | बाळ सप्रे

पुढच्या भागात बिनविषारी साप....

आता जरा कमी घाबरवतील हे लेख !!!

सुबोध खरे's picture

14 Oct 2013 - 11:57 am | सुबोध खरे

फुरसे हे त्यामानाने( नाग मण्यार किंवा घोणस यांपेक्षा) फारच लहान असते परंतु मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे सर्वात जास्त सर्पदंशाचे रुग्ण फुरसे चावल्याचे असतात. एकतर हे भारतात झाडून सर्वत्र दिसतात. आणि फारच लहान असल्याने पटकन नजरेस पडत नाहीत आणि आकार लहान असल्याने लोक पण जर जास्तच चावटपणा करतात.
मी २ ० ० ४ साली गोव्यात(वास्को च्या जीवन्ति या नौदलाच्या रुग्णालयात) काम करीत असतानाचे दोन किस्से.
पहिला एक किस्सा म्हणजे एक नौसैनिक एक जेमतेम पाच ते साडेपाच इंचाचा "किडा" घेऊन आला होता आणि हा किडा मला चावला आणि आता हाताची आग होते म्हणत होता. तो किडा चावल्याने त्याने त्याचे डोके ठेचले होते. तो हंस या नौदलाच्या विमानतळ येथे सफाई करत होता आणि पाने उचलताना हा "किडा" त्याला चावला होता. हा "किडा" पाहिल्यावर मला लक्षात आले कि हे फुरसे (किंवा पिल्लू) असणार. मी त्याला ताबडतोब भरती करून घेतले. त्यावर त्याची कुरकुर चालली होती, साहेब साधा किडाच आहे उगाच भरती कशाला करता. साहेब मला ओरडतील कि वार्षिक तपासणी आहे काम करायला नको म्हणून नाटके चालली आहेत इ. अर्थात मी आवाज चढवून त्याला गप्प केले आणि सांगितले याची जर एलर्जी आली तर तुला श्वास घ्याला त्रास होऊ शकतो. त्याच्या रक्ताचा नमुना घेऊन तपासणी साठी पाठवून दिला. थोड्या वेळाने त्याचा हात सुजायला लागला मग त्याला पटले कि हि काहीतरी गडबड आहे. तोवर त्याच्या रक्ताचा निकाल आला होता मी आमच्या फिजिशियन ला पाचारण केले त्याने येउन त्याला सर्प विष प्रतीबंधकाचा टेस्ट डोस दिला आणि त्या नौसैनिकाला ताबडतोब त्याची एलर्जी(anaphylaxis) आली. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याचा रक्तदाब एकदम कमी झाला आणि त्याला चक्कर येऊ लागली. त्याला ताबडतोब अदरेनालीन(adrenaline), स्टेरोईड(हायड्रो कोरटीसोन)ची इंजेक्शने दिली आणि त्याला अतिदक्षता विभागात हलवले. तसेच त्याला पुढे सर्पविष प्रतीबंधकाचे पुढचे डोसे दिले. या सगळ्या प्रकरणात फिजिशियन चे पाच सहा तास गेले म्हणून तो त्या नौसैनिकाला झाडत होता कि नको तिथे हात कशाला घालत होतास. आणि तो नौसैनिक मला धन्यवाद देत होता कि साहेब तुम्ही मला वाचवले. मी घरी गेलो असतो आणि घरी एलर्जी आली असती तर मेलोच असतो. आता हि एलर्जी खर तर सर्प विष प्रतीबंधकाची होती आणि सापाच्या विषाची नव्हती पण काकतालीय न्यायाने मला फुकटचे क्रेडीट मिळाले होते.
असाच एक दिवस एक नौसैनिक वरुणा पुरी(नौसैनिकांची कौटुंबिक वसाहत) येथून एक लहान मुलाला किडा चावला म्हणून घेऊन आला. हा सात आठ वर्षाचा मुलगा तेथे खेळत होता आणि बॉल घ्यायला कोरड्या गटारात गेला तर पानांच्या आडून त्याला एक "किडा" चावला मुलाने डास किंवा मुंगी असेल म्हणून दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने त्याचा पायाचा अंगठा सुजला आणि आग होऊ लागली म्हणून त्याने बापाला दाखवले तर तेथे एक छोटेसे छिद्र दिसले आणि बाजूचा अंगठा सुजला होता. तो घेऊन आला तेंव्हा मला ते एक छिद्र अंगठ्याच्या नखाच्या थोडेसे बाजूला दिसले आणि अंगठा सुजून आतमध्ये रक्तस्त्राव झाल्यासारखे दिसत होते. मला ते साप चावल्यासारखेच वाटत होते(अगोदरचे फुरसे चावलेले रुग्ण आठवले तर ती जखम तशीच वाटत होती ( माझा तर्क होता कि फुरसे चावले असणार पण एक दात नखावर गेल्याने एकच छिद्र पडले आणि त्यातून विषबाधा झाली असावी) मी त्या मुलाला भरती करून घेतले त्याच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला आणि आमच्या बाल रोग तज्ञाला फोन केला कि संध्याकाळी राउंडला येशील तेंव्हा या मुलाला बघून जा. पंधरा मिनिटात त्या मुलाला उलटी झाली. आता माझ्या लक्षात आले कि माझा तर्क बहुधा खरा होता. त्या मुलावर विषाचा अंमल होऊ लागला होता(systemic envenomation) आणि थोड्या वेळाने रक्ताचा अहवाल आला आणि त्यात त्याला सर्पविष बाधा झाली असल्याचे सिद्ध झाले. बाल रोग तज्ञाने येउन त्याला सर्प विष प्रतीबंधकाचे डोस दिले आणि तो मुलगा यथावकाश ठीक झाला.
तिसरी कथा- माझ्या वर्गातील एक डॉक्टर मुलगी रेणुका वायुसेनेत फ्लाईट लेफ्टनंट होती. ती राजस्थानात बाडमेर जवळ उत्तरलाई या ठिकाणी मिग २१ च्या स्क्वाड्रन ची मेडिकल ऑफिसर म्हणून तैनात होती. साडेचार वर्षे झाली तरी तिचे पोस्टिंग झालेले नव्हते.(आमचे मित्र म्हणत होते कि वायुसेना रेणुकाला विसरली आहे.) तेंव्हा एका संध्याकाळी ती खोलीच्या बाहेर आली तेंव्हा एका फुरश्यावर तिचा पाय पडला आणि तिला ते चावले. ती ताबडतोब आपली जीप घेऊन बाडमेरच्या लष्करी रुग्णालयात गेली. प्रथम तेथील फिजिशियन तिच्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हता. उगाच किडा चावला असेल असे तो म्हणत होता. अर्थात रेणुका आपल्या म्हणण्यावर ठाम होती त्यामुळे त्याने तिला तेथे अधिकारी वार्ड मध्ये भरती करून घेतले. थोड्यावेळाने तिचा पाय सुजू लागला तेंव्हा त्याचा विश्वास बसला आणि तो टरकला. कारण थोड्या वेळापूर्वी तो तिची टर उडवत होता. आता त्याने तिची रक्त तपासणी इ सुरु केले. तिला सर्प विष प्रतीबंधकाचा टेस्ट डोस दिला आणि तिला त्याची जोरदार एलर्जी आली आणि तिचा रक्तदाब एकदम खाली आला. त्याची अजूनच तंतरली. त्याने तातडीचे उपाय केले पण तिला सर्पविष प्रतिबंधक देणे आवश्यक होते. तेवढ्यात रेणुकाचा कमांडिंग ऑफिसर त्याला म्हणाला डॉक्टर आत्ता आमचे वायुसेनेचे एक विमान (ए एन १ २) पुण्याला जात आहे तुम्हाला तिला पुण्याला हलवायचे आहे काय? त्यावर तो तयार झाला. पुढच्या एक तासात तो स्वतः तिला घेऊन पुण्याच्या कमांड रुग्णालयात गेला तिथे तिचा इलाज झाला आणि तिथून तिला सुट्टीवर पाठवले गेले.तिचे आई वडील पुण्यातच स्थायिक आहेत. शेवटी तिचे तिथून पुण्यालाच(लोहगाव) पोस्टिंग आले. आम्ही तिला थट्टेने बोललो कि पोस्टिंग करण्यासाठी तु सापाला "सुपारी" दिली असशील.

तुमचे अनुभव नेहमी माहितीपुर्ण आणि रंजक असतात.
आमच्यासोबत शेयर केल्याबद्दल धन्यवाद

मुक्त विहारि's picture

14 Oct 2013 - 6:26 pm | मुक्त विहारि

+ १

जॅक डनियल्स's picture

14 Oct 2013 - 7:07 pm | जॅक डनियल्स

खूप माहितीपूर्ण आणि विलक्षण प्रतिसाद आहे.
तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या लेखांना वैदकीय पाठींबा मिळतो.मी स्वतः वैदकीय क्षेत्रातला नसल्यामुळे मला उपचाराची जास्त माहिती नाही, ती तुमच्या प्रतिसादामधून लोकांपर्यंत पोहचते. (खरा निसर्गातील ) किडा चावल्याला आता मिपाकर तरी थोडे गंभीर पणे घेतील, असे वाटते. ;)
धन्यवाद् !

नेहमी प्रमाणाचे झकास्स्स्स... :)

चिगो's picture

14 Oct 2013 - 12:40 pm | चिगो

पुलंच्या एका लेखात ' आमच्या कोकणात चुलीवर फुरसे बसलं हे वाक्यदेखील...' वाचलं होतं, तेव्हापासून ह्या सापाबद्दल कूतुहल होतं.. नेहमीप्रमाणेच भारी लेख.. ह्या लेखातले फोटोपण एकदम खतरनाक आहेत..

चाणक्य's picture

14 Oct 2013 - 2:40 pm | चाणक्य

मला पण त्यामुळेच जे.डी. फुरस्यावर लेख कधी टाकतोय अस झालं होतं

ब्रिज's picture

14 Oct 2013 - 2:26 pm | ब्रिज

ह्या हातभर सापात माणसाची हातभर टरकवण्याची ताकद, चपळाई असते.

लहानपणी आमच्या शेतात उसाच्या मुळाशी हे साहेब त्यांच्या तंद्रीत बसलेले असतील. हातात एका चिपाडावर गरमागरम गुळाचा पाक आणि शेंगदाणे असा "इंस्टंट" चिक्की घेऊन आम्ही भावंडं शेतातल्या गुर्‍हाळाजवळ बागडत होतो. पहाटे सहा-साडेसहाच्या सुमाराला घडलं होतं हे..अगदी सहज..अनावधानाने माझं पाऊल ह्या वेटोळ्या साहेबांच्या शेपटीवर पडला. अनवाणी होतो. अर्धवट ओल्या मातीत पण जाणवलं खरं.. पण तोवर हे साहेब जागचे उसळून हल्लाबोल करुन पुन्हा जणु काही घडलेच नाही, अशा थाटात गप आपल्या जागेवर वेटोळ्यात! निमिषार्धात जे पहायला मिळालं, ते त्या बी.बी.सी.च्या कॅमेर्‍याने बरोबर पकडलंय. केवळ नशीब थोर किंवा ह्या साहेबांचा अंदाज चुकला म्हणा..वाचलो. थिजलो होतो जागीच. बत्ती गूल झालेली आमची तर! त्यानंतर बर्‍याचवेळा भेट झाली, पण आम्ही आपले गपगुमान वाट वाकडी करुन "सरजी तुस्सी ग्रेट हो!" म्हणत कल्टी मारत गेलो. ह्यांना तंद्रीत राहू देणंच सुखाचं.

मुक्त विहारि's picture

14 Oct 2013 - 6:25 pm | मुक्त विहारि

मी जे.डी,ला फक्त विचारले.

तुम्ही तर सापाच्या स्वभावधर्माबद्दल उदाहरण पण देउन टाकलेत..

अग्निकोल्हा's picture

14 Oct 2013 - 2:39 pm | अग्निकोल्हा

या आधिही ट्रेक वगैरे करताना साप निवांत भ्रमण करताना पाहिले होते वा सळसळत वेगाने जाणार्‍या जनावराशी संबंध फक्त तेंव्हाच आला जेंव्हा ते माझ्यापासुन दुर जाण्याच्या प्रयत्नात असे. त्यामुळे निसर्गात आढळणार्‍या सापांबद्दल मत न्युट्रल होते.. यापुढे मात्र जास्त चौकसता अन सावधता बाळगली जाइल. धन्यवाद.

किसन शिंदे's picture

14 Oct 2013 - 4:45 pm | किसन शिंदे

अतिशय उत्तम माहीती रंजकपणे सांगण्याची तुझी हातोटी खासच! आता काय होतं की, तूझा एक भाग आल्यावर तो वाचून मी लगेच पुढच्या भागाची प्रतिक्षा माझ्याही नकळत करतो. आणि त्याचबरोबर अॅनिमल प्लॅनेटवर स्टिव्ह आॅस्टीन एडवेन्चर्स हा सापांच्या माहीतीचा कार्यक्रमही न चूकता पाहतो. :-)

अभिजा's picture

14 Oct 2013 - 8:29 pm | अभिजा

खास माहिती! पुढील लेखाची वाट पाहतो.

हुप्प्या's picture

14 Oct 2013 - 9:12 pm | हुप्प्या

जेडीचा लेख आणि डॉक्टरसाहेबांची भर म्हणजे एक पर्वणी असते. माहितीचा एक नवा खजिना प्रत्येक लेखातून खुला होतो.

प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकरांना फुरसे चावले होते असे ऐकून आहे.

आदूबाळ's picture

15 Oct 2013 - 12:52 am | आदूबाळ

जेडीचा लेख आणि डॉक्टरसाहेबांची भर म्हणजे एक पर्वणी

अगदी खरंय. जेडी आम्रिकेत आणि डॉ खरे मुंबईत, पण दोघं मिळून जगभरातल्या मिपाकरांना पर्वणी देतात. आंतरजालाच्या सामर्थ्याची ही प्रचीतीच आहे.

जेडी आणि डॉक्टरसाहेबांनी मिपा दिवाळी अंकासाठी एक लेख एकत्र लिहावा असं सुचवतो. (या प्रस्तावाला ज्यांचं अनुमोदन असेल त्यांनी या दोघांना खरडी, व्यनि आणि (शक्य असल्यास) प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्यावर मनोवैद्न्यानिक दबाव आणावा)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2013 - 12:38 am | अत्रुप्त आत्मा

ह्यो साप कोनचा म्हनायचा हो जेडी भाऊ? :)
https://m.ak.fbcdn.net/photos-b.ak/hphotos-ak-prn2/s200x200/960008_524426390976985_1136195149_n.jpg
आमास्नी बेडशे लेणी उतरताना, आल्ता भेटाया!

सुमीत भातखंडे's picture

15 Oct 2013 - 10:58 am | सुमीत भातखंडे

आई शप्पथ...मला दिसतच नाहिये साप.
नुसत्या दगडी पायर्‍याच दिसतायत

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2013 - 7:21 pm | अत्रुप्त आत्मा

https://m.ak.fbcdn.net/photos-f.ak/hphotos-ak-frc3/1376531_524662564286701_1698591760_a.jpg

जॅक डनियल्स's picture

15 Oct 2013 - 8:17 pm | जॅक डनियल्स

फोटो वरून ओळखणे अवघड जाते आहे , पण माझ्या अंदाजानुसार प्रमाणे विरोळा किंवा देंडू (पाण्यातला साप) आहे. पण बिनविषारी साप आहे.

सुमीत भातखंडे's picture

18 Oct 2013 - 10:42 am | सुमीत भातखंडे

फोटोच दिसत नाही. घरी जाऊन बघणे आले.

लेख आवडला हो जेडीभौ! फोटू मात्र दिसत नाहीत्......पण ते बरेच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Oct 2013 - 11:19 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त... नेहमीप्रमाणेच खुसखुशित आणि माहितीपूर्ण !

सुचना: जमल्यास चित्रे टाकताना फ्लिकर ऐवजी गुगलफोटोचा उपयोग करावा. फ्लिकरवरची चित्रे बर्‍याच जणांना दिसत नाहीत असे प्रतिसादांतून जाणवते आहे (मीही त्यातला एक :) ). गुगलबाबा सगळीकडे दर्शन देतो ;)

जॅक डनियल्स's picture

15 Oct 2013 - 8:21 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
पुढच्या वेळी नक्की तसे फोटो टाकीन, मला हे प्रकरण माहित नव्हते.

आनन्दा's picture

15 Oct 2013 - 12:10 pm | आनन्दा

आमच्याकडे कांडर नावाचा एक प्रकार असतो. तो ह्यातला कोणता म्हणयाचा हो? दिवसा चावला तर माणूस सूर्यास्त बघत नाही म्हणतात, आणि रात्री चावला तर सुर्योदय.

सुबोध खरे's picture

15 Oct 2013 - 6:34 pm | सुबोध खरे

कांडार, कांडर किंवा कान्डोर( हा शब्दप्रयोग श्री ना पेंडसेंच्या "तुंबाडचे खोत"या कादंबरीत आहे) म्हणजे मण्यार. हिचे सूर्य कांडार(माणूस सूर्योदयापूर्वी मरतो) किंवा चंद्र कांडार((माणूस चन्द्रोदयापूर्वी मरतो)अशी नवे रायगड जिल्ह्यात ऐकावयास मिळतात हिचे विष इतके घातक असते म्हणून या आख्यायिका आल्या असाव्यात. जे डी चा माण्यारीबद्दल लेख वाचावा म्हणजे त्याबद्दल अधिक माहिती मिळेल.

जॅक डनियल्स's picture

15 Oct 2013 - 8:23 pm | जॅक डनियल्स

डॉ. बरोबर आहेत.मण्यार म्हणजेच सूर्य किंवा चंद्र कांडर.

सुहास झेले's picture

15 Oct 2013 - 1:52 pm | सुहास झेले

सहीच.... :) :)

पुढच्या भागाची वाट बघतोय....

नेहमी प्रमाणेच रंजक आणि माहितीपुर्ण लेख.
त्यात डॉक्टरांच्या प्रतिसादाची जोड.
ही लेखमाला कधी संपूच नये.

मुक्त विहारि's picture

15 Oct 2013 - 2:21 pm | मुक्त विहारि

ही लेखमाला कधी संपूच नये.

थोडी भर घालून

आणि ज्या दिवशी समारोप होईल त्या नंतर मिपा तर्फे दोघांचाही सत्कार करू या...

मी-सौरभ's picture

15 Oct 2013 - 6:43 pm | मी-सौरभ

सरकारनामा मधे दिलिप प्रभावळकरांच्या तोंडी फुर्श्याचा उल्लेख आहे तो पण अंगावर काटा आण्तो आता तर अजुण जास्त.

पु. भा. प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Oct 2013 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

जे डी, "अत्यंत खळबळजनक लेखमाला" अशी बातमी टिव्हीवर आली तरी आश्चर्य वाटणार नाही !

खूप माहितीपूर्ण आणि तेवढेच खुसखुशीत लेख असतात तुमचे. पुभाप्र !

संतोषएकांडे's picture

15 Oct 2013 - 7:55 pm | संतोषएकांडे

फोटो काही दिसले नाहीत ब्वा....

शरभ's picture

16 Oct 2013 - 1:55 pm | शरभ

छान लेख नेहेमीप्रमाणे हे. वे. सां. न. ल.
आमचेही काही अनुभव...

Peth1

Peth2

एकदा पेठच्या ट्रेकला हे साहेब काहीबाही खाऊन आरामात पडले होते. आजूबाजूच्या जवळपास ५० लोकांची कसलीही चिंता न करता. आम्हाला बर्‍यापैकी पोझेस देखील दिल्या. अर्थात आम्ही हे सर्व फोटोसेशन लांबूनच केले. खाली उतरताना एका जागी विश्रांती घेत असताना एका दुसर्या ग्रूपने आम्हाला सांगितले की, कोणी एका महाभागाने त्याला हातात घेतले. झाल. सापाने त्याच्या मनगटाचा मुका घेतला. तो मुलगा लगेच खाली उतरून गेला, त्याचे नंतर काय झाले कळले नाही. पण न राहवून घरी जाऊन आधी साप शोधून काढला फोटोवरुन. बांबू पीट वाइपर होता अस वाटल. जे डी नक्की सांगू शकतील. एक माहीती अशी कळली होती की, साप चावल्यावर त्या मुलाच्या मनगटातुन रक्त उडाले. अशा वेळी, विष बाहेर पडून, त्याचा प्रभाव कमी होईल का? खरे काका सांगू शकतील.

Nane1

असाच एकदा नाणेघाटात अगदी गुहेच्या बाहेर हे पिल्लू दिसलं. एवढ्या छोट्याश्या त्या पिल्लाच्या नजरेत सुद्धा एक प्रकारची जरब होती ! त्याचा अतिशय आक्रमक पवित्रा बघण्यासारखा होता. जे डी हाही बांबू पीट वायपर आहे काय ?

जॅक डनियल्स's picture

16 Oct 2013 - 9:19 pm | जॅक डनियल्स

मस्त अनुभव आणि फोटो सुद्धा !
खालच्या फोटो मधला साप "मलबार पिट व्हायपर" (मलबार चापडा )आहे. तो साध्या पिट व्हायपरचाच भाऊ असतो पण अंगावर सुंदर नक्षी असते. सगळे पिट व्हायपर हे घोणस-फुरसे च्या कुटुंबातीलच असतात. त्यामुळे त्यांचे विष हिमो-टोक्सिकच असते. "रक्त उडाले" थोडी अतिशोयोक्ती वाटते, जास्त करून व्हायपर ब्लेड मारल्या सारखा दात घासतो. आणि ते दात घासणे पण महागात पडू शकते त्यात पण माणूस ढगात जाऊ शकतो. पण चापड्याच्या चावण्याच्या केसेस कमी ऐकल्या आहेत, कारण तो जंगलात राहतो.

मुक्त विहारि's picture

16 Oct 2013 - 9:43 pm | मुक्त विहारि

आपण कधी येताय भारतात?

जॅक डनियल्स's picture

19 Oct 2013 - 10:05 pm | जॅक डनियल्स

मी डिसेंबरमध्ये येतो आहे. पण अजून शिकत असल्यामुळे गुरुजींनी जास्त सुट्टी दिली नाही.

सुबोध खरे's picture

21 Oct 2013 - 11:03 am | सुबोध खरे

जे डी साहेब
भारतात आल्यावर आपल्याला भेटायला आवडेल केंव्हा आणि कधी येताय म्हणजे आपल्या सवडीनुसार कट्टा सुद्धा ठरविता येईल.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2013 - 11:06 pm | मुक्त विहारि

मिपा प्रेमी आणि कट्टा प्रेमी....

जॅक डनियल्स's picture

22 Oct 2013 - 11:21 pm | जॅक डनियल्स

नक्की ! मी ७ डिसेंबर ला पुण्यात येतो आहे. फक्त डिसेंबर चा शेवटचा आठवडा मित्राच्या लग्नाला जात आहे, बाकी वेळ पुणे(पर्वती)- ठाणे(तलावपाळी) मध्येच आहे.

सुबोध खरे's picture

23 Oct 2013 - 10:53 am | सुबोध खरे

वा आपण हि आमच्या मैफिलीतील दिसता (ठाणे(तलावपाळी) वर संध्याकाळी पडीक असणाऱ्या लोकांची मैफिल.) मग आपले जमलेच. येण्यापूर्वी जाहीर करा. व्यनि करतोच आहे

जॅक डनियल्स's picture

23 Oct 2013 - 11:13 pm | जॅक डनियल्स

नक्की, माझे घरच तलावपाळी वर साई-कृपा च्या बाजूला आहे. त्यामुळे सगळ्या शाळेच्या आणि कॉलेज च्या सुट्ट्या तिकडेच पडीक असायचो. मी साधरण पणे १ एक आठवडा तरी ठाण्यात येईन, तेंव्हा नक्की भेटू.

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Oct 2013 - 1:03 pm | डॉ.प्रसाद दाढे

अरे वा..आम्हीही पर्वतीलाच राहतो, जरूर येऊ कट्ट्याला (फक्त खिशात तेव्हढा सापबिप आणू नका)

जॅक डनियल्स's picture

23 Oct 2013 - 11:15 pm | जॅक डनियल्स

कॉलवर शेवटचा साप पकडून मला आत्ता ५ वर्ष झाली आणि कॉल सोडून मी जंगलात साप पकडत नाही. त्यांमुळे काळजी नसावी.

मस्त.. नेहमी प्रमाणेच

पुभाप्र

सुहासदवन's picture

17 Oct 2013 - 11:57 am | सुहासदवन

दर वर्षी किती प्रेमाने आणि ओढीने आम्ही आमच्या कोकणात जायचो - अगदी बिनधास्त.
आणि हे लेख टाकून तुम्ही आम्हाला जाम टरकवलेत…….
आता ह्या सुट्टीत जायचे कुठे……मोठ्ठा आ!

जोक्स अपार्ट… लेखमाला खरंच अप्रतिम झाली आहे. इतकी सचित्र आणि योग्य माहिती कोणीही कधीही दिली नव्हती.

एक भाबडा प्रश्न - समजा मी रानात उभा आहे आणि अचानक माझ्या लक्षात आले की पायाला काहीतरी घासत आहे. समजा तो एक साप आहे. तर मी स्वस्थ उभं राहावं की ताडदिशी उडी मारून त्यापासून लांब जावं?

शिल्पा ब's picture

17 Oct 2013 - 9:54 pm | शिल्पा ब

जेडी प्रश्नाचं उत्तर द्याच. माहिती असलेली बरी.
बाकी लेखमाला उत्तम आहेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2013 - 11:12 am | डॉ सुहास म्हात्रे

समजा मी रानात उभा आहे आणि अचानक माझ्या लक्षात आले की पायाला काहीतरी घासत आहे. समजा तो एक साप आहे. तर मी स्वस्थ उभं राहावं की ताडदिशी उडी मारून त्यापासून लांब जावं?
अशा परिथितित होणारी क्रिया प्रतिक्षिप्त (reflex action) असते... विचार करून काही करण्याएवढा वेळ नसतो. तुम्ही गोठून जावून स्तब्ध उभे राहणार की घाबरून ताडदिशी उडी मारून लांब जाणार हे तुमच्या मूळ मानसिक ताकदीप्रमाणे "होईल", तुम्ही "करणार नाही".

जॅक डनियल्स's picture

18 Oct 2013 - 9:02 pm | जॅक डनियल्स

इस्पीकचा एक्का बरोबर आहेत, रिफ्लेक्स वरती सगळे अवलंबून आहे. साप हा जिवंत प्राणी असल्यामुळे तो शेवटच्या क्षणी कसे वागेल हे सांगता येत नाही. तसेच घोणस सारखा साप असेल तर उडी मारून पण उपयोग नाही. त्यामुळे "परिस्थितीत जे योग्य वाटेल ते करा" हेच माझे उत्तर आहे.

सुमीत भातखंडे's picture

18 Oct 2013 - 10:52 am | सुमीत भातखंडे

सापांच्या (खासकरून भारतातले बिग फोर) दातांची भेदन क्षमता किती असते? म्हणजे पायात फॉर्मल पँट घातली असेल किंवा जीन्स घातली असेल तर ते कापड भेदून साप चावू शकतो का?

पायात जाड पायमोजे आणि शूज घातले असतील तर एवढा सरंजाम पावलांचं सर्पदंशापासून रक्षण करायला पुरेसा आहे का?

जॅक डनियल्स's picture

18 Oct 2013 - 9:05 pm | जॅक डनियल्स

माझा भाग ८ मधला प्रतिसाद वाचा त्यात मी याचे उत्तर दिले आहे.
साप आणि बूट !

निशदे's picture

18 Oct 2013 - 10:27 pm | निशदे

ओजस..
आज बर्‍याच दिवसांनी वाचायला जरा वेळ मिळाला आणि हा लेख वाचून काढला....
मस्तच लिहित आहेस. आता लेखमाला सुद्धा वाचून काढतो वेळ मिळाला की. :)

जॅक डनियल्स's picture

18 Oct 2013 - 10:43 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् ! तुमची कृपा राहूदे अशीच !

पियुशा's picture

20 Oct 2013 - 3:21 pm | पियुशा

सहिच्च !
जॅक डनियल्स तुमची लेखनशैली जबरदस्त आहे , "साप" म्हटला तरी माझ्या अंगावर काटा येतो तुमचे लिखाण खुप विनोदी अन माहीतीपुर्ण आहे ,त्यावरुन एक किस्सा आठवला मागच्या दिवाळीतला

मी अन माझा भाउ बाइकवरुन जात होतो तर एका ठीकाणी बरीच गर्दी जमा झालेली होती कुतुहलापोटी गाडी थांबवली समोर एक टपरिवजा दुकान होते लाकडी फळ्यांचे , काय आहे बघु तरा जरी म्हणुन भाउ गर्दित शिरला मी थोडी बाजुलाच उभी होते नंतर गर्दीतुन आवाज आला पळा पळा चावेल चावेल तशी मी जरा गर्दीत घुसुन पाहिले तर आम्चे बंधु दोन फळ्यामध्ये अडकलेल्या किमान ४-५ फुट लांबी अन चांगला जाडजुड नागाला त्या फटीतुन बाहेर काढ्ण्याचा प्रयत्न करत होते ते बघुन मला घेरी यायचीच बाकि राहीली होती बाकिच्या लोकंचा आरडाओरडा चालुच होता " अस करा न तस करा / डोक ठेचा नाहीतर चावेल असे एक एक सल्ले लोकांचे , मी जीव खाउन माझ्या भावाला ओराडत होते कि तु सोड त्याला चावेल तो ,त्याला आइ बाबांना नाव सांगेन अशा धम्क्याही चालु होत्या शेवटी मह्त्प्रयासाने त्याने तो नाग शेपटीला पकडुन बाहेर काढला त्याचे ते अव्याढ्व्य रुप अन त्याचे फुत्कार पाहुन बर्याच जणांची माझ्यासर्खी बोलती बंद झाली होत्ती , तो पर्यन्त एकाने एक गोणी आणुन दीली त्यात त्याने तो व्यवस्थित घालुन गोणीचे तोंड बांधुन एका कॉलवर आलेल्या सर्प्मित्राच्या स्वाधीन केला ,इतर लोकांनी माझ्या भावचे अभिनंदन केले त्या सर्प्मित्राने सुद्धा, पण माझी जी भीतीने गाळन उडाली होती ती मलाच माहीती त्या रात्री मला झोप आली नाही आपल्या बिछण्यात नाग तर नसेल ना म्हणुन मी १० वेळा अंथरुन झटकुन घेतले असेल ;)

एस's picture

22 Oct 2013 - 12:02 am | एस

बाकीच्या विषारी सापांना वाकुली दाखवून ही लेखमाला आता बिनविषारी भाऊबंदांकडे वळते आहे ह्यामुळे किंचित भ्रमनिरास झालाय पण जेडी म्हणतायत तसं अनुभव नसताना माहिती देणं हेही चुकीचेच. याचे कारण असे, की केवळ माहिती तशी गुगल करूनही मिळते. पण तुमच्या लेखांसारखे लेख विरळाच. नव्हे, इतर कुठेही पाहिले नाहीत. (थोडे आशाळभूतपणे - लिहा हो. तुमचे नसतील तर इतरांचे अनुभव सांगा. पण तुम्ही आवर्जून लिहा. :| )

'साप' हे खरंच छोटेखानी पण आवर्जून संग्रही असावे असे पुस्तक आहे. डोंगरयात्रेला जाताना जसे मॅक्रो छायाचित्रणासाठी 'फ्लॉवर्स ऑफ् सह्याद्री' घेऊन जावे तसेच खैरेसाहेबांचे 'साप' सुद्धा न्यावेच न्यावे.

अभिजांची प्रतिमा खल्लास करणारी - कलेजा हो... त्याबद्दल छाचिंना अगोदरच (प्रेमाने) खडसावण्यात आले आहेच... ;)

आता फुरशांचा किस्सा. एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या गावी अण्णांनी शाळकरी मुलांसाठी (तसे सर्वांसाठीच) सापांची माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरवले होते. तो काळ तुमच्या त्या दूध का कर्ज, नागिन सारख्या शिनेमांच्या दुधावर पोसलेल्या पब्लिकचा. प्रथमच असे प्रदर्शन लोक पहात होते, त्यामुळे झुंबडच झुंबड. मैदानात टेबल, टेबलावर सापांच्या काचपेट्या, अण्णा एकेका सापाची माहिती देताहेत. सोबतच कळकळीने विविध अंधश्रद्धांचीही चिरफाड करताहेत. असे दृश्य. अण्णांनी फुरशाची काचपेटी समोर ठेवली आणि माहिती द्यायला सुरुवात केली. लोकांचा बेशिस्तपणा, गलका, याने नीट काही ऐकू येतच नव्हते. अण्णा सांगू लागले, "हा फुरसे. महाराष्ट्रातल्या प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे. लहान आहे, पण धोक्याच्या इशारा देण्यासाठी हा साप जो आवाज काढतो तो चांगलाच घाबरगुंडी उडवणारा असतो." समोरच्यांच्यापैकी कुणीतरी शंका काढली - "मग आत्ता का आवाज काढत नाही? आम्हांला दाखवा ना कसा आवाज असतो ते." "आत्ता शांत पडून आहे, पण चांगलाच मोठा आवाज असतो." - अण्णांचे शांत उत्तर. तेवढ्यात मागून कुणीतरी एक आवाज टाकला, "एक फटका द्या त्याला म्हणजे काढेल आवाज." खीः खीः खीः खीः. पब्लिकच ते. लागलं खिदळायला. अण्णांनी जमेल तेवढं डोकं शांत ठेवत मोठ्याने विचारले, "कोण बोललं रे? जरा पुढे येता का. बक्षीस देतो." आमचा हा शूरवीर टग्या निर्लज्जपणे बसलेल्या गर्दीतून वाट काढत खिदळत आणि आजूबाजूच्यांना आपण कसे लय भारी असे जणू दाखवत पुढे आला. अण्णा - "हं, काय म्हणता?" शूरवीर - "त्याला एक फटका द्या."

एकवेळ फुरश्याने उसळून घेतलेला चावा त्याला कळला असता, पण अण्णांचा हात कधी त्याच्या गालावर सण्णकन् पडला हे त्यालाही कळलं नाही. त्याच गर्दीतून आता शरमेने मान खाली घालून आणि गाल चोळत तो परत गेला.

नंतरचा सर्व कार्यक्रम अगदी पिनड्रॉप सायलेन्समध्ये पार पडला. पण हे सर्व पाहिलेल्या मला पर्यावरणाबद्दलच्या लोकांच्या अनास्थेवर खूप अंतर्मुख करून गेला. :(

लेखमाला. लिहिण्याची पद्धतसुद्धा अगदी गोष्ट सांगितल्यासारखी.

मला स्वतःला सापाची भीती वाटली नाही तरी आवर्जून जाऊन पकडणार नाही. लहानपणी गारुड्याने एकदा त्याच्याजवळचा नाग हातात दिलेला त्यावेळचा थंड, बुळबुळीत स्पर्श मेंदूत कुठेतरी कोरला गेलाय त्यामुळे असेल कदाचित पण या प्राण्याबद्दल तितकी जवळीक नाही होऊ शकली (अर्थातच कुठेतरी वाईट वाटतं). पण सळसळत जाणारे हे जनावर दिसते मात्र अशक्य सुंदर यात वाद नाही.

-रंगा

दिपक.कुवेत's picture

22 Oct 2013 - 12:04 pm | दिपक.कुवेत

माझाहि एक प्रश्न: वर पियुशा जो अनुभव आहे त्या प्रमाणे साप/नाग माग काढत येतात का?

जॅक डनियल्स's picture

22 Oct 2013 - 9:14 pm | जॅक डनियल्स

भाग ७ मध्ये मी नागाबद्दल लिहिले आहे ते वाचा. ती एक अंधश्रद्धा आहे.

डूख धरणे ही भावना आहे, नागाचा मेंदू डूख धरण्यासाठी विकसित झाला नसून खाणे कसे शोधायचे यासाठी विकसत झाला आहे. आपल्या घरी बायको- आई ने स्वयंपाक नाही बनवला तर नाक्यावर जाऊन आपण भाजी-पाव खाऊ शकतो पण नागाला मात्र उंदीर (२ आठवड्यातून एकदा का होईना ) स्वतः शोधायचा असतो. जो काही नंतर वेळ उरतो त्यामध्ये स्वतः चे इतर भक्षकापासून (गरुड, घार, माणूस इ.) रक्षण करायचे असते. त्यांची वधूवर सूचक मंडळे नसल्याने दरवर्षी नवीन नागीण (:)) स्वतः शोधून आपली प्रजा वाढवायची असते. त्यामुळे त्याला डूख धरणे वगैरे अश्या फालतू कामांसाठी वेळच नसतो

आदूबाळ's picture

26 Oct 2013 - 11:41 pm | आदूबाळ

पीएचडीतला अर्धा वेळ क्रॉस रेफरन्सेस देण्यात जातो असं ऐकून आहे ते काही खोटं नाही तर :))

जॅक डनियल्स's picture

26 Oct 2013 - 11:45 pm | जॅक डनियल्स

सही जवाब ! पीएचडीच्या शेवटच्या डिफेन्स मध्ये मिपा चा उल्लेख मी जरूर करणार आहे. इकडच्या दक्षिण-गोऱ्याना पण कळू दे मिसळपाव काय आहे ते...;)

बॅटमॅन's picture

26 Oct 2013 - 11:48 pm | बॅटमॅन

तुम्ही पीयेच्चडी करताहात? _/\_

जॅक डनियल्स's picture

26 Oct 2013 - 11:52 pm | जॅक डनियल्स

डिग्रीला आले की डिग्री मिळते, या नियमाने ती होते आहे.;)

स्टिल येक कडक सॅल्यूट. पीएचडी म्हञ्जे दुसरे लग्नच असते. ते निभावायला जबरी स्टॅमिना लागतो.

सुबोध खरे's picture

27 Oct 2013 - 12:00 am | सुबोध खरे

अरे वा,
मी पण एम डी (पी एच डी )आहे. एम डी (पास्ड विथ हेवी डिफिकल्टी)

जॅक डनियल्स's picture

27 Oct 2013 - 12:04 am | जॅक डनियल्स

पास्ड विथ हेवी डिफिकल्टी...तेच आहे सगळे !
शिक्षण फुकट मिळत असेल तर घ्यावे, त्यामुळेच मी पीएचडी करतो आहे.

एस's picture

29 Oct 2013 - 12:16 am | एस

इकडे शक्यतो परत या नंतर. राहेजमाने पे कदम रख तो कोई भी मंजिल पा लेता है। राही तो वो है जो मंजिल भी खुद चुनता है और राह भी खुद बनाता है।

शरभ's picture

27 Oct 2013 - 3:25 pm | शरभ

तरीही जे डी साहेब, वास घेण्याच्या तीव्र शक्तीमुळे सापाना हे माग ठेवणे शक्य होत असेल ? खर खोट माहीत नाही पण बर्‍याच कथा ऐकल्या आहेत.

एस's picture

29 Oct 2013 - 12:19 am | एस

डूख धरणारा एकमेव प्राणी माणूस. आणि माणसांचे घ्राणेंद्रिय सुबोध खरेसाहेबांनी आधीच सांगितल्याप्रमाणे खूपसे बधीर झाले आहेच उत्क्रांतीच्या ओघात. तरीही सापांवरचा संशय अजूनही गेला नसल्यास त्याला इलाज नाही..!

किलमाऊस्की's picture

22 Oct 2013 - 11:34 pm | किलमाऊस्की

पुभाप्र.