एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
4 Oct 2013 - 9:57 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !

आपल्या मध्ये जसे (जाती-)जमाती प्रकार असतो,तसाच सापांमध्ये पण असतो. (अजून साप आपल्या एवढे प्रगत नाही म्हणून त्यांच्या मध्ये जाती नसतात.) नेपाळी गुरखा म्हणले की कसे "शलाम साब" डोळ्यासमोर उभे राहते, अंबानी म्हणले की "बिजिनेस" ऐकू येते आणि "गांधी" ऐकले की "राजकारण" दिसते, तसेच सापांचे पण असते.

नाग हा "येलापिडे (Elapidae)" या ("सौथ इंडियन अण्णा") कुटुंबातील असतो, यामध्ये चष्मा नाग, राज नाग (किंग कोब्रा) ते आफ्रिकन मंबा आणि शेवटी मण्यार पर्यंत अनेक विषारी साप येतात. या सर्व बंधू भावांची वर्तणूक, त्यांचे विषाचे परिणाम साधारण पणे सारखेच असतात. पुण्यात जसे "घराच्या पत्त्यावरून" त्या कुटुंबाच्या स्वभावाचा किंवा वर्तनाचा अंदाज लावता येतो तसेच एकदा का 'येलापिडे' सापडला की पुढचे अंदाज बांधता येतात. म्हणूनच आधीच्या दोन्ही लेखात मी नाग आणि मण्यारची ओळख करून दिली आहे.

त्याच प्रमाणे घोणस आणि फुरसे हे एकाच कुटुंबातील जत्रेत हरवलेले करन- अर्जुन आहेत (जमात: व्हायपरीडे-Viperidae) त्यामुळे त्यांचे दोघांचे स्वभाव,(हो सापांना पण स्वभाव असतात.) त्यांच्या दंश करण्याच्या पद्धती, लुक्स जवळपास सारखेच असते.

त्यातला घोणस म्हणजे सैन्यातील "स्नायपर" !(enemy at the gates मधला व्हासिली आठवा.)

घोणस (विषारी):

सोनेरी-बदामी रंगावर काळपट ठिपक्यांची वेलबुट्टी, जसा काही पैठणीचा पदर काठ. तळपता बाण डोक्यावर रेखलेला आणि कॉलेज मधल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारे हार्ट-शेप डोके.

घोणस

घोणसाला, एका स्कॉटिश फिरंग संशोधकाने शोधून काढले म्हणून त्याला त्याचे नाव 'रसेल व्हायपर' (Patrick रसेल) दिले गेले.

हा साप म्हणजे "अमेरिकन अपाची" हेलिकॉप्टर सारखा..सगळ्या अस्त्रांनी सज्ज आणि लपून राहण्यात पटाईत.
खात्या पित्या घरचा साप, ग्राईप वाटर च्या जाहिरातीमधल्या बाळासारखा गुटगुटीत असतो. उगाचच झाडावर चढ,छपरात घूस असे उरफाटे प्रकार हा करत नाही. आपला गप गवतात लपून राहतो आणि डब्बा उडवायला कोणी आला की 'इस्टोप' करून टाकतो. अंगावरील नक्षी ही त्याला निसर्गाने दिलेले बर्थडे गिफ्ट आहे, त्यामुळे पिवळ्या पडलेल्या गवतामध्ये असला तर कधी कधी पाय पडे पर्यंत दिसत नाही.
हा साप नागासारखा जंटलमन असल्याने, आधी वार्निंग द्यायला प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा खर्जातला सूर लावतो. त्या सुरात इतकी बेक्कार वार्निग असते की, जो तो सूर ऐकतो त्याला डायरेक्ट ए.मे.सी.बी च्या ट्रान्सफोर्मार वरची कवटी दिसते.

"माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. धुराळा उठला, त्याच अंधारात मी टारझन सारखे दोन्ही हाताने छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकर चा आवाज येत होता पण मला काहीच दिसत नव्हते. तेंव्हा भीती वाटून पण उपयोग नव्हता, त्यांमुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिकपातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला, मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणस बरोबरचे)एकांतातील क्षण फार कमी आले.(भाग ४) "

इंजेक्शनच्या सुई सारखे पोकळ, १६ एम.एम. चे दोन विषाचे दात हे घोणसाचे मुख्य अस्त्र ! हे दात हायपो-डर्मिक सुई सारखे पोकळ असून विष ग्रंथिना जोडलेले असतात. (मोसादच्या) बेरेत्ता पिस्तुलातील म्यागझीन सारख्या याच्या जबड्यात ५-६ दाताच्या जोड्या असतात, एक फायर झाली की दुसरा तयार. त्यातून ते दात फोल्डिंग चे असतात, म्हणजे छत्रीत गुप्ती ठेवतो ना तसे...काम तमाम झाले की गुप्ती छत्रीच्या दांड्यात !

पहिला फोटो घोणसाचे विष काढतानाचा आणि दुसरा त्याच्या डोक्याची रचना दाखवणारा.
 दात !

दाताची रचना.

नाग हा फण्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे साधारण पणे १८० अंशात हल्ला करू शकतो तर घोणस ३६० अंशात कुठे पण हल्ला करू शकतो....म्हणजे दिवाळी मध्ये भुईनाळा फेल गेला ही कसा फिरतो, तसाच हल्ला करताना घोणस फिरतो.
त्यामुळे तुम्ही पहिले असेल तर, नागांचे चुंबन घेणारे खूप लोकं असतात पण घोणसाच्या वाटेला जात नाही.(जगात चुंबन घ्यायला एवढ्या सुंदर गोष्टी असताना, लोकं इंटर-स्पेसियल रिलेशन मध्ये का पडतात कोण जाणे?) गारुडी, थाईलंडवाले सापवाले पण घोणसाच्या खेळापासून जास्त करून दूरच राहतात.

डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला घोणस असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा व्हिटेकर सर्पतज्ञांचा व्हिडिओ बघा: घोणसाचा हल्ला. .हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी घोणसाचा हल्ला चित्रित केला आहे. )

वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १३० ml तो २५० ml म्हणजे पाउण ते आख्या (कुकिंग) कप एवढे विष टोचू शकतात, त्यातले माणसाला पाव कप विष ढगात पोचवायला पुरेसे असते.
हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो. अमेरिकन झोंबी हा (हिडीस) प्रकार पहिल्या वर मला घोणस चावलेला आणि अगदी शेवटच्या स्टेज मध्ये असलेला माणूस आठवला होता.

ज्यांना हा साप चावला आहे त्यांच्या भाषेत,"उकळते तेल शरीराच्या आत मध्ये इंजेक्शन ने टोचायचे- म्हणजे घोणसाचा चावा !"

माणूस वाचला तरी, ज्या जागी घोणस चावतो तिकडचे टिशू जळून जातात. अशी घोणसाची कृपा झाली की त्याची परिणीती हाता-पायाची बोटं किंवा हात-पाय गमावण्यात होते. लान्सेत या मेडिकल जर्नलच्या मते जी कोणी माणसे घोणस चावून वाचतात, त्यातील २६% लोकांची पिटूटरी ग्यांडची वाट लागते आणि मग त्यांचा हार्मोनल-लोचा होतो.

घोणस चावून वाचलेला माणूस जर कधी पहिला पहिला तर हे डिस्कवरी प्रेरित सर्पमित्र कधी सापाशी खेळ करायची हिम्मत करणार नाहीत. हा व्हिडिओ बघा: विषाचे रक्तावर परिणाम

"कूच डाग भी अच्छे होते है!" याच चालीवर हे घोणसाचे विष मेडिकल क्षेत्रात खूप ठिकाणी वापरले जाते. "Dilute Russell's viper venom time (dRVVT)" ही पद्धत हॉस्पिटल मध्ये वापरून रक्ताची गुठळ्या करण्याची क्षमता तपासली जाते.

२००५ सालची एक सकाळ...मी सर्पोद्यान मध्ये एक स्नेक-पिट साफ करत होतो, इतक्यात एक माणूस पळत आला, त्याने डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !)..."अहो अजगराचे पिल्लू पकडून आणले आहे, कुठे सोडू ?" मी दृश्य बघताच, हादरलो...३ फुटी चकचकीत घोणस त्याने हातात डोक्याजवळ पकडला होता, चावला असता तर औषध द्यायला पण वेळ मिळाला नसता. मी आधी त्याच्या पासून लांब झालो आणि त्याला, जमिनीवर त्या अजगराला (घोणसाला!) टाकायला सांगितले. (नंतर स्नेक स्टिक ने नीट उचलून त्याला घोणसाच्या पिट मध्ये टाकले.)..."काय हो, तुम्ही एवढे सर्पोद्यान चे असून अजगराला घाबरता , बारामती ला एसटी मध्ये चढलो या बेन्याला (अजगराला) घेऊन, मध्ये मध्ये पोत्यांमधून डोके काढायचा ...की द्यायचो एक टप्पू ठेवून, असाच आणला याला इकडे स्वारगेट वरून ....

मी काहीच बोललो नाही,मला फक्त राजाभाऊंचे (मूळ वाक्य:जिम कार्बेट) वाक्य आठवले "अज्ञानात नेहमीच सुख असते ! "

पुढच्या लेखात फुरसे ...

(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

जीवनमानतंत्रशिक्षणलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Oct 2013 - 10:10 am | ज्ञानोबाचे पैजार

शेवटचा प्रसंग आणि त्या वरची कॉमेंट "अज्ञानात नेहमीच सुख असते ! " बेहद्द आवडली.

संपुर्ण लेख नेहमी प्रमाणे चटपटीत खुसखुशीत आणि तरीही पौष्टीक झाला आहे.

सौंदाळा's picture

4 Oct 2013 - 10:13 am | सौंदाळा

नेहमीप्रमाणेच मस्त लेख

बापरे... लेख वाचताना अंगावर अगदी काटा आला. खरच मानले तुम्हाला. मी साधी पाल बघुन पन तिच्या पासुन ४ हात लांब पळते तर साप तर ह्या जन्मात शक्यच नाही. :D

खटपट्या's picture

4 Oct 2013 - 10:30 am | खटपट्या

जबरा, अन्गावर काटा आला.....

गवि's picture

4 Oct 2013 - 10:32 am | गवि

तुमची लेखनाची पद्धत एकदम भारी आहे.

आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छांसहित :

JD

जॅक डनियल्स's picture

4 Oct 2013 - 8:52 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद ! चोकोलेट खाऊन टल्ली झालो आहे...;)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2013 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा

दे दणादण लेख छान!
आम्ही झालो ज्याक डि फ्यान!!! :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Oct 2013 - 10:49 am | विश्वनाथ मेहेंदळे

लहानपणी गावात (बेळगाव-कारवार भाग) गवतात भरपूर खेळत असू (म्हणजे सुकलेल्या गवताच्या गंजीत). परवाच गेलो असताना सगळीकडे (रानात वगैरे) बिनधास्त फिरलो होतो.

पण आता हे वाचून तंतरल्या गेली आहे (दातखीळ बसल्याची स्मायली)

nishant's picture

4 Oct 2013 - 11:27 am | nishant

मस्त!!

मुक्त विहारि's picture

4 Oct 2013 - 11:32 am | मुक्त विहारि

वाचत आहे..

अनिरुद्ध प's picture

4 Oct 2013 - 11:39 am | अनिरुद्ध प

अप्रतीम!!!!!!!!!!!!!!!

प्रसाद गोडबोले's picture

4 Oct 2013 - 11:40 am | प्रसाद गोडबोले

शेवटच्या प्रसंगाने तर काटा आला अंगावर !!

नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात काम करीत असताना आमच्याकडे एक कारंजा(उरण च्या बाजूला) नौदलाच्या तळावरून एका कमांडोला साप चावला म्हणून आणले होते. त्याच्या लक्षणांवरून त्याला घोणस चावल्याचे जाणवत होते. जखमेतून रक्तस्त्राव होत होत. पाय सुजला होता आणि भयंकर आग होत होती असे तो म्हणत होता( ज्याअर्थी कमांडो म्हणत होता त्याअर्थी ती खरच भयंकर असणार) त्याचे रक्त काढून त्याचा गोठण्याचा वेळ तपासण्यासाठी( सर्व साधारण माणसाचे रक्त ४-५ मिनिटात गोठते) प्रयोगशाळेत पाठवले आणि त्याचा रिपोर्ट येईपर्यंत थांबलो होतो पाऊण तास झाला तरी निकाल येत का नाही म्हणून फोन केला तर लैब मधून त्याचे रक्त गोठतच नाही असा रिपोर्ट आला. त्याला ताबडतोब सर्प विष प्रतीबंधकाचे इंजेक्शन चालू केले. एकशे चाळीस बाटल्या देऊनही त्याचे रक्त गोठेच ना. आमच्या एका सहकार्याला फक्त बाटलीचे धातूचे बुच तोडून त्यात १० मिली सलाईन घालायला उभा केला होता. त्याने विचारले कि सर किती बाटल्या हव्या आहेत. तर सर म्हणाले कि तुला कंटाळा येईपर्यंत बाटल्यांची बुचे तोडून त्यात सलाईन भरत राहा. दुसर्याला त्यात विरघळलेले विषप्रतिबंधक ५० मिली च्या सिरींज मध्ये काढून सलाईन च्या बाटलीत भरण्याचे काम दिले होते. थोड्या वेळाने त्याच्या रक्ताचा गोठण्याचा वेळ चाळीस मिनिटे आला).अजून साठ सत्तर बाटल्या दिल्या. अश्विनीतील औषध संपले. ताबडतोब हाफकिनला फोन करून अजून बाटल्या मागवल्या आणि पुण्याच्या कमांड रुग्णालयाल फोन करून आणखी साठा तयार ठेवायला सांगितला.नौदलाच्या कुंजाली या हेलिकोप्टर तळाला एक हेलिकोप्टर पुण्याला जाण्यासाठी तयार ठेवायला सांगितले होते. शेवटी त्या कमांडोला जवळ जवळ तीनशे बाटल्या सर्पविष प्रतिबंधक औषध द्यायला लागले होते. हा कमांडो केवळ मुंबईच्या जवळ होता म्हणून वाचला. बहुधा सापाने विष त्याच्या शिरेतच इन्जेक्ट केले असावे.त्याच्या पायाला लाल रक्ताने भरलेले फोड आले होते आणि पाय दुप्पट सुजला होता.त्या कमांडो ला पुढे सहा महिने ते श्राद्ध पुरवले त्याच्या दोन प्लास्टिक सर्जरी झाल्या आणि दुसर्या मांडीची त्वचा काढून इकडे लावावी लागली.
तेंव्हा पासून मी घोणस या सापाला फार घाबरतो.
जे डी साहेब आपली सर्प मला फारच रोचक आणि माहितीपूर्ण आहे आणि मला माझ्या जुन्या दिवसांना उजाळा दिल्याबद्दल आपले शतशः आभार

यशोधरा's picture

4 Oct 2013 - 1:14 pm | यशोधरा

बापरे! वाचूनच भीती वाटली!

जॅक डनियल्स's picture

4 Oct 2013 - 9:00 pm | जॅक डनियल्स

माझे अनुभव काहीच नाही, असा हा अनुभव आहे...त्या कमांडो ला पहिल्यांदा सलाम ! आणि नंतर त्याला वाचवणाऱ्या तुम्हाला सलाम !!
साधरण पणे ६० बाटल्या मी ससून ला दिलेल्या मी पहिल्या आहेत, त्या देऊन पण किती वाट लागते याची कल्पना आहे...३०० बाटल्या म्हणजे तो कमांडो खरच सुपर -कमांडो होता !!

सुबोध खरे's picture

5 Oct 2013 - 11:43 am | सुबोध खरे

जे डी साहेब,
सर्प विष प्रतिबंधक औषध दिल्यावर प्रथम त्याच्या रक्ताच्या गोठण्याची क्रिया सामान्य होते पण काही काळाने परत शरीरात उती मध्ये आलेले पण रक्तात न उतरलेले विष परत रक्तात शोषले जाते आणि सुरुवातीला गोठ्णारे रक्त पातळ होऊ लागते. हे जर लक्षात घेतले नाही तर तो रुग्ण सुरुवातीला ठीक झाला असे वाटते आणि नंतर परत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने एक आठवड्यापर्यंत रुग्ण दगावू शकतो. त्या कमांडोला जवळजवळ तीन दिवस पर्यंत असे प्रतिविष द्यायला लागले होते(म्हणून हा आकडा एवढा जास्त झाला होता अन्यथा सर्वसामान्यपणे चाळीस ते पन्नास बाटल्या द्यायला लागतात) आणि त्यानंतर त्याच्या शरीरातील स्नायू सडल्याने त्याची शल्यक्रिया करावी लागली होती. आता शल्यक्रिया करताना परत त्याचे रक्त पातळ होऊन चालत नाही शिवाय जितका जास्त चाकू चालवाल तितकि जास्त इजा आणि सूज येते. हे म्हणजे एकाच वेळी ब्रेक आणि अक्सिलरेटर वर पाय ठेवून मोटार चालवण्यासारखे आहे.
आम्हाला एक शंका होती कि कमांडो जास्त शूरपणा दाखवायला गेला असावा आणि साप त्याला दोनतीनदा किंवा कडकडून चावला असावा आणि भरपूर विष आत सोडले असावे. अर्थात याची खात्री करणे शक्य नव्हते. दुसरी शक्यता अशी पण आहे कि त्याची रक्त किंवा शरीर जास्त संवेदनशील असावे त्यामुळे विषाच्या कमी मात्रेने सुद्धा त्याच्यावर इतका प्रभाव झाला होता.
या सर्व गोष्टी म्हणजे केवळ तर्क आहे
वैद्यकीय शास्त्रात तुम्हाला जितका जास्त अनुभव येतो तितके तुम्हाला आपल्याला किती कमी ज्ञान आहे आणि आपण किती तोकडे आहोत याची जाणीव होत राहते.
असो सापाशी खेळ करू नये हे तो कमांडो (तोच काय आम्ही सर्व जण) फार छान पणे शिकला असावा

उगा काहितरीच's picture

5 Oct 2013 - 2:26 pm | उगा काहितरीच

खरच थरारक अनुभव ! एक शंका आहे सर , जर त्या कमांडो च्या जागी दुसरी कुनी व्यक्ती असली असती तर उपचाराचा किती खर्च आला असता ?

सुबोध खरे's picture

5 Oct 2013 - 8:04 pm | सुबोध खरे

साहेब,
सर्प विष प्रतिबंधक औषध सरकारी रुग्णालयात फुकट मिळते पण जर आपल्या पायाला गैन्गरीन झाला तर त्याच्या प्लास्टिक सर्जरीचा खर्च काही लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो.
म्हणूनच म्हणतात कि साप म्हणू नये धाकला

उगा काहितरीच's picture

6 Oct 2013 - 5:20 pm | उगा काहितरीच

धन्यवाद, उपयुक्त माहिती. :)

जॅक डनियल्स's picture

7 Oct 2013 - 9:44 pm | जॅक डनियल्स

खूप मस्त माहिती दिली आहे,

वैद्यकीय शास्त्रात तुम्हाला जितका जास्त अनुभव येतो तितके तुम्हाला आपल्याला किती कमी ज्ञान आहे आणि आपण किती तोकडे आहोत याची जाणीव होत राहते

हे तर वाक्य तर लाखमोलाचे आहे आणि ते सगळ्या क्षेत्रांना लागू आहे.

आतिवास's picture

4 Oct 2013 - 12:59 pm | आतिवास

मस्त लेख - नेहमीप्रमाणेच!

कपिलमुनी's picture

4 Oct 2013 - 1:01 pm | कपिलमुनी

तुमच्या लेखमाले मुळे ज्ञानात भरपूर भर पडली !!

आणि आजवर चप्पल घालून बिन्दास्त केलेले ट्रेक आठवले की अजून जिवंत आहे याबद्दल आश्चर्य वाटते ..आमच्या मावळामध्ये सर्व डोंगरावर गुडघ्याइतके गवत वाढते ..त्यातून आम्ही निवांत चालायचो ,

"अज्ञानात नेहमीच सुख असते ! " हेच खरे

अफलातून आहे ही पूर्ण लेखमाला. खूप छान वाटत आहे वाचतांना पण वाचून झाल्यावर भितीपण वाटते :)
ह्या लेखामधे शेवटी नमूद केलेला प्रसंग आणि सुबोधजींनी सांगितलेला प्रसंग वाचून तर अंगावर सरकन काटा आला *shok*

नन्दादीप's picture

4 Oct 2013 - 1:08 pm | नन्दादीप

मस्त लेख आणी माहिती.......

मस्त लेखनशैली आणि उदंड माहिती. धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

4 Oct 2013 - 1:18 pm | संजय क्षीरसागर

लगे रहो.

गणपा's picture

4 Oct 2013 - 2:08 pm | गणपा

जॅक डी तुझी ही लेखमाला संपुच नये असं वाटतय.

अर्धवटराव's picture

4 Oct 2013 - 2:25 pm | अर्धवटराव

एक्सलण्ट !!!

नागाचा फुत्कारही ऐकलाय आणि घोणसची शिट्टी पण.
ड्यान्जर म्हणजे काय ते तेव्हा चांगलच कळालं होतं.
:)

पोत्यांमधून डोके काढायचा ...की द्यायचो एक टप्पू ठेवून>>> बाबौ!!!!!!!!!!!!!!
खरच अज्ञानात सुख असतं.

लैच चपळ प्रकरण आहे हे.
बारामती ते हिकडं येताना शांत कसं काय बसलेलं काय माहिती.

त्या स्नेक पिट मध्ये थांबून जर त्या माणसाला त्याच्या हातातला "तो" नसून "ती" आहे सांगितलं असतं . त्याची कुठून कुठून कसला कसला स्त्राव झाला असता याचाच विचार करतोय .

लई जबराट लेख जेडी

अभ्या..'s picture

4 Oct 2013 - 2:45 pm | अभ्या..

लैच भारी लिखाण.

इष्टुर फाकडा's picture

4 Oct 2013 - 2:52 pm | इष्टुर फाकडा

अगायो बाबव वाचताना पण खुर्चीत पाय वर घेऊन ढुंगण आखडून बसलो होतो. लेख संपल्यावर जाणीव झाली आणि रगात पातळ होईपर्यंत हसलो :)

स्पंदना's picture

8 Oct 2013 - 4:59 am | स्पंदना

:)) :)) :)) :))

भडकमकर मास्तर's picture

4 Oct 2013 - 2:57 pm | भडकमकर मास्तर

डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !).... .>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> अरे काय या उपमा... ;)
भयंकर प्रसंग... हा माणूस एष्टीत बसून घोणसाला वरचेवर टप्पू देत होता... अग्गागागा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2013 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !)....
आणि
भयंकर प्रसंग... हा माणूस एष्टीत बसून घोणसाला वरचेवर टप्पू देत होता... अग्गागागा

डोळ्यासमोर चित्र उभं राहीलं. :)

-दिलीप बिरुटे

अनिता's picture

5 Oct 2013 - 1:51 am | अनिता

बाकी बारामतीहुन एष्टी आली मह्न्जे साहेबा॑नीच हुकुम दिला असावा सापाला ...सर्पोद्यन पर्यन्त गडबड नको अशी :)

ह्या ह्या ह्या !! प्रतिक्रिया आवडेश.

प्रचेतस's picture

4 Oct 2013 - 3:01 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच सुरेख लेख.

हा घोणसच काय? सांदण दरीत वाटेतल्या एका खडकावर निवांतपणे पहुडला होता.
a

जॅक डनियल्स's picture

4 Oct 2013 - 8:44 pm | जॅक डनियल्स

हा घोणस नाही, माझ्या मते, व्हेरीगेतेड कुकरी (variegated kukri) साप आहे. हा बिनविषारी साप असून, महाराष्ट्रात सगळी कडे सापडतो. खूप वेगवेगळ्या रंगामध्ये हा सापडतो.

प्रचेतस's picture

4 Oct 2013 - 8:48 pm | प्रचेतस

धन्स जेडी.

डुरक्या घोणस नावाचा एक प्रकार ऐकलाय.. तो कसा वेगळा असतो ??

जॅक डनियल्स's picture

4 Oct 2013 - 8:47 pm | जॅक डनियल्स

तो बिनविषारी साप असून, खूप शांत असतो. खडकाळ आणि भुसभुशीत जमिनीत राहणारा तो साप आहे. शांत असल्याने खूप वेळा गारुड्याकडे आढळतो. त्याच्या शेपटीला खवले असतात, ते तो जमीन उकरायला वापरतो.

(जगात चुंबन घ्यायला एवढ्या सुंदर गोष्टी असताना, लोकं इंटर-स्पेसियल रिलेशन मध्ये का पडतात कोण जाणे?)
हेच म्हणतो की वो मी ! जिकडे इंटरेस्ट दाखवायचा तिकडे जाणार नाहीत,नको तिकडे चुंबा-चुंबी करायला जातात आणि मग डंख बसतो ! ;)

बाकी लिखाण मस्तच ! :)

अद्द्या's picture

4 Oct 2013 - 5:14 pm | अद्द्या

जेडी लेख तर भारीच आहे . (परत एकदा वाचून परत एकदा सांगतोय)

पण . ज्या काही उपमा दिल्या आहेत .
आहाहाहा . . सक्काळी सक्काळी टिळक रोड वरल्या तिलक चा उपमा खाल्ल्यासारखं वाटत .
मधेच मिरची . मधेच गोड . . मस्त मस्त .

जॅक डनियल्स's picture

4 Oct 2013 - 9:04 pm | जॅक डनियल्स

अर्रर्र...तिलक ची आठवण करून दिली...ब्रेड प्याटीस...डिसेंबर मध्ये ते माझ्या हिट-लिस्ट वर आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2013 - 7:27 pm | बिपिन कार्यकर्ते

लै भारी लेका! कं लिवलंय कं लिवलंय!

रेवती's picture

4 Oct 2013 - 8:36 pm | रेवती

बाप्रे! हा प्रकार त्या मनुष्याने बारामतीपासून आणला म्हणजे कमाल झाली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Oct 2013 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि खूसखुशित अलंकारीक शैलीतला लेख ! मजा येतेय वाचायला !

पिशी अबोली's picture

4 Oct 2013 - 9:05 pm | पिशी अबोली

वाचून हस हस हसतेय... =))

याची शिट्टी ऐकलिये. आमच्या कॉलेजजवळ हाच आला होता. आणि आमचे महान मुलांच्या हॉस्टेलवरचे लोक त्याला छोट्याशा काठीने मारायला निघाले होते, तेही रात्री. आम्ही मैत्रिणींनी या लोकांसोबतचं वैर वगैरे विसरुन जायचं ठरवलं होतं तेव्हा कारण उद्या दिसतील की नाही काय माहीत!

कुरुप दिसतो हा पण. खूपच ओबड-धोबड प्रकार वाटतो. अर्थात खरोखर कसा ते बघायला त्याच्याजवळ जायची जन्मात टाप नाही लागणार म्हणा...

तुम्ही धन्य आहात जेडी.. ___/\___

तो यष्टीतून साप आणण्याचा आणि त्याला घेऊन लावणी करायचा प्रकार वाचुन.. भलीमोठी किंकाळी फोडुन पळतच सुटले... लैच डेंजर लिवलंय ब

पुतळाचैतन्याचा's picture

4 Oct 2013 - 9:41 pm | पुतळाचैतन्याचा

माझे साप/नाग या विषयी काही (गैर) समज/प्रश्न आहेत. कृपया प्रकाश टाकावा.
१) सापाला तीव्र प्रकाश सहन होत नाही. कधी साप निघाल्यास तीव्र प्रकाश टाकून त्याला पळवून लावता येईल का?
२) साप शक्यतो ओल्या आणि थंड जागेत जात नाहीत. साप निघाल्यास पाणी टाकून बचाव करता येईल का?
३) सर्प दंश वरचे injection काही ठराविक ठिकाणीच का मिळते? आणि ती emergency मध्ये ती ठिकाणे कशी शोधायची? प्रार्थमिक उपचारांची माहिती द्या.
४) बचावाच्या काही पद्धती सांगा.

एस's picture

6 Oct 2013 - 1:15 am | एस

१ आणि २ - माझ्या माहितीनुसार बरेचसे चुकीचे. जेडी सांगतीलच.
३. ग्रामीण भागात दुर्दैवाने तालुक्याच्या ठिकाणीच आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रावर प्रतिविष उपलब्ध असते - तेही नेहमी असेलच असे नाही. शहरी भागात सरकारी रुग्णालयांमध्ये असते. प्रथमोपचारांबद्दल सांगायचे झाले तर जखम स्वच्छ धुणे आणि रुग्णाला धीर देत, शांत ठेवत सर्वात आधी डॉक्टरांकडे न्यावे हेच योग्य आहे. जखमेच्या ठिकाणी काप वगैरे घेऊ नयेत किंवा विष जखमेतून तोंडाने शोषून घेऊन थुंकणे असे काही प्रकार करू नयेत. रुग्णाची हालचाल कमीत कमी व्हावी अशी काळजी घ्यावी. बरेचदा चावलेला साप बिनविषारी असतो किंवा झालेला दंश हा ड्राय-बाईट प्रकारचा असतो. तरीही वैद्यकीय उपचार त्वरित मिळतील हे पहावे हेच उत्तम.
४. बचाव म्हणजे लांब राहणे. साप काही तुमच्याविरुद्ध युद्धाचा बिगुल वाजवून तुमच्याशी लढायला येत नाहीत. तसेच ते विनाकारण तुमचा चावाही घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. आपण जेवढे सापांना घाबरतो त्यापेक्षा जास्त ते आपल्याला टरकून असतात. फक्त त्यांच्या वाटेला (कळत वा नकळत) जाऊ नये.

जॅक डनियल्स's picture

6 Oct 2013 - 8:18 pm | जॅक डनियल्स

१)हा गैरसमज आहे, उलट तीव्र प्रकाश टाकला तर तो थोडा वेळ बावचळून जाऊ शकतो पण त्या नंतर तो चवताळून हल्ला करेल.
२)साप हा पृथ्वीवर करोडो वर्ष आहेत, त्यामुळे जवळपास सगळ्या परिस्थिती त्यांना जगायला जमते. पाणी टाकून नाही पण घराच्या बाजूला फिनेल (किंवा उग्र वासाचे केमिकल) टाकल्यास जास्त करून साप फिरकत नाहीत.
३)आणि ४) उत्तरे स्वॅप्स मस्त दिली आहेत, अजून माहिती पाहिजे असल्यास, या लेखाच्या प्रतिसादात पहावी.

चिगो's picture

4 Oct 2013 - 10:29 pm | चिगो

धन्य आहे तुझी, जेडी.. काय लिहीतोस जबरा.. घोणसला खरोखर अजगराशी कनफ्यूज करायला भरपूर वाव आहे असं दिसतंय..

अभिजा's picture

4 Oct 2013 - 10:57 pm | अभिजा

अप्रतिम लेख मालिका आहे.

अग्निकोल्हा's picture

4 Oct 2013 - 11:11 pm | अग्निकोल्हा

अन घोणस वागवणार्‍या माणसाची!

आमच्याकडे एक परड जातीचा साप सापडतो म्हणे(मी पाहिलेला नाहि). लोकांचा असा गैरसमज आहे कि तो साप जोरात माणसावर फूंकतो व तो माणूस म्हणे जाम म्हशी सारखा फूगतो. मला वाटते तो कदाचित घोणस असेल. कारण घोणस दूरुनच एव्हड्या वेगाने एखाद्यावर वार करत असेल कि पाहणार्याला वाटत असेल कि त्याने नूसते फुंकले आहे . त्यामूळे अशी धारणा तयार झाली असेल.
का खरच असा एखादा साप सापडतो का महाराष्ट्रात?

जॅक डनियल्स's picture

5 Oct 2013 - 9:40 pm | जॅक डनियल्स

"परड" हे घोणसाचे लोकल नाव आहे.
"म्हशी सारखा फुगणे" किंवा "माणसावर फुंकणे " हे अतिशोयोक्तीचे वर्णन आहे. पण तुमचे घोणसबद्दल चे निदान बरोबर आहे.

एस's picture

6 Oct 2013 - 12:58 am | एस

परड, सोन्या परड, बहिर्‍या परड, फरड अशीही काही स्थानिक नावे या सापाला आहेत. घोणस अतिशय चपळाईने हल्ला करते.

तुमचे लेख वाचवत नाहीत आणि सोडवत पण नाहीत. माहितीपूर्ण असतात पण वाचल्यावर बराच वेळ भीती वाटत राहते :( फोटो तर बघत सुद्द्धा नाही :( .

एस's picture

5 Oct 2013 - 1:16 am | एस

ह्याच्याशी दोनदा जवळून गाठ पडली. एकदा आहुप्याच्या वाटेवर आणि एकदा आमच्या घराच्या मागच्याच घरात. आहुप्यावरून परत येताना हा गाडीच्या उजेडात दिसला. स्वारी आरामात फुल्ल टाइट झाल्यासारखी हळूहळू रस्ता ओलांडत होती. एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे झोकांड्या खात जाणार्‍या दारुड्यागत हीपण कधी थोडी इकडे तर कधी थोडी तिकडे जाई. मग जरा वेळ गल्लीतलं आपलं घर किती नंबरचं हे विसरल्यागत वाईच दम खाई. पुन्हा किक बसल्यागत हिची गाडी चार पावलं पुढे सरके. बहुधा रात्रीचे भोजन जरा जास्तच झालं असावं.

इकडे आमचा जीव टांगणीला. आम्ही गाडी थांबवली असली तरी दुसरी गाडीपण थांबेनच हे कशावरून. खाचक्कन एखाद्या जोरात असलेल्या डायवरने घातली अंगावरून की ही देखणी त्वचा एका मृतप्रायः शरीरावर पहावी लागली असती... त्यात गाडीतले काही अतिउत्साही गडी खाली उतरून जवळून बघायला धावले. त्यांना आवरायला जीव खाऊन शिव्या देत आणि मागे ओढत शेवटी ह्या तरूण रक्तांना हिमोटॉक्सिनपासून कसंबसं वाचवलं. तिकडे ती शांतपणे गवतात अदृश्य झाली आणि हायसे वाटून आम्ही आमचा मार्ग धरला. पण जाताजाता तिने माझ्या कॅमेर्‍यासाठी एक मस्त पोज दिली. :)

दुसरी भेटली तीपण अशीच शांत आणि निवांत. नाग आणि घोणस हे निदान मलातरी जेव्हा जेव्हा भेटलेत तेव्हा तेव्हा ते अतिशय शांतपणे वागले आहेत. दोन्हीही आधी तिथून निघून जाण्याचा म्हणजेच संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न करतात हे मात्र नक्की. दुसरीने मस्तपैकी इंग्रजी S चा आपला टिपिकल पवित्रापण घेऊन दाखवला. पण तो थोडावेळच. तिलाही सुरक्षित नेऊन सोडले जवळच्या शेतात. मात्र लोकांना तिला मारलं का नाही हे समजावता समजावता जाम दमछाक झाली नंतर - विशेषतः जेव्हा ती घोणस होती आणि तिच्यापासून लांब का रहायचं हे सांगितल्यावर जसा इथे प्रतिक्रियांना घाम फुटला आहे तसेच तिथे प्रेक्षकांना झालं होतं.

तर असोत. ही ती लावण्यवती -

Russell's Viper

कशी आहे? :) हेमांगी-मस्तकबाणधारिणी-कृष्णपुष्पदलत्रिपट्टवस्त्रांकित-सर्पकन्या...

चिगो's picture

5 Oct 2013 - 3:14 pm | चिगो

जबरा..

जॅक डनियल्स's picture

5 Oct 2013 - 9:35 pm | जॅक डनियल्स

फारच सुंदर आहे !
जो पर्यंत शांत आहे तो पर्यंत ठीक आहे...पण समजा उसळला तर ...

काही नाही खरेसाहेबांना व्यनि करायचा ताबडतोब. =))

जोक्स अपार्ट, सापांबद्दल जर माहिती नसेल (दुरुस्ती - पूर्ण माहिती नसेल) तर त्यांच्या वाटेला मुळीच जाऊ नये. तेही आपल्या वाटेला जात नाहीत. आणि माहितीही असली तरी विनाकारण - सापाच्या किंवा त्यापासून इतरांच्या जीवाला जर धोका नसेल तर - निसर्गात ढवळाढवळ करू नये हे तत्त्व मी कसोशीने पाळतो. एका भटकंतीला अरण्यात कोरड पडलेल्या नदीपात्राच्या किनार्‍यावर असाच आम्हांला धामणींचा एक जोडा सकाळच्या उन्हात कातळावर सळसळताना दिसला. आमचा एक सर्पमित्र लगेच ओरडतबिरडत त्यांच्यापाठी त्यांना पकडण्यासाठी धावला. त्याला थोपवून फक्त हे विचारलं - तू त्यांच्या घरात आला आहेस ना, मग?... त्यालाही नशीबाने हे पटले आणि त्या मीलनातूर जोड्याला छानपैकी त्यांच्या मधुर एकांतात सोडून 'ऑल द बेस्ट' करून आम्ही पुढे निघालो. :)

थोडेसे अवांतर - सापांना जास्त त्रास स्वयंघोषित आणि स्वयंप्रेरित सर्पमित्रच जास्त देतात असे माझे मत होऊ लागले आहे. माणसांचे हे दोनच प्रकार अलिकडे जास्त दिसून येतात. एक म्हणजे साप दिसला रे दिसला की काठी घेऊन (मारायला) धावणारे अज्ञानी सामान्यजन आणि काठी घेऊन (पकडायला) धावणारे अर्धज्ञानी सर्पमित्र. त्यातही दुसरे त्यांच्या अतिउत्साहीपणामुळे सापाला पोत्यात घालण्याऐवजी गोत्यातच जास्त घालताना दिसतात. असोत.

पहिल्या सर्पकन्येच्या बाबतीत आम्ही तिच्या घरी आलो होतो आणि स्वतःहून हायहॅलो करत तिचा पाहुणचार घ्यायचे त्यामुळेच टाळले. दुसरी मात्र लोकांच्या इतकी जवळ होती की एकतर चुकून कोणाचा पायबिय पडून तो सरळ ढगात गेलातरी असता किंवा पहारीचा वा दगडाचा एक घाव हिच्या माथी दाणकन् बसलातरी असता. म्हणून दुसर्‍या परिस्थितीत मात्र हस्तक्षेप केला.

जॅक डनियल्स's picture

6 Oct 2013 - 7:56 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् ! खूप सही प्रतिसाद.

सापाच्या किंवा त्यापासून इतरांच्या जीवाला जर धोका नसेल तर - निसर्गात ढवळाढवळ करू नये हे तत्त्व मी कसोशीने पाळतो

हेच सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
पुढे कधी हस्तक्षेप करायची वेळ आली तर, थोडे काळजी पूर्वक करा एवढेच.

उपास's picture

5 Oct 2013 - 2:25 am | उपास

साप पाहून लटपटायलाच होतं पण.. तो ओळखेपर्यंत डोळे मिटायचे.. :)
विषारी साप, भक्ष्याला विषाने मारुन मग आरामात खात बसतात मग बिनविषारी साप कशी करत असतिल शिकार. विशेषतः उंदीर वगैरे चपळ प्राण्याची?

जॅक डनियल्स's picture

6 Oct 2013 - 7:54 pm | जॅक डनियल्स

साप हा खूप चपळ असतो, त्यातून जे बिनविषारी साप असतात ते जास्तच चपळ असतात-धामण, तस्कर इ. त्यामुळे भुकेले कोणी राहत नाही. मी या बद्दल पुढे लिहीनीच.

किलमाऊस्की's picture

5 Oct 2013 - 6:36 am | किलमाऊस्की

पुभाप्र...बाकी घोणस आणणार्‍या माणसाची कमाल आहे.

सन्जोप राव's picture

5 Oct 2013 - 6:40 am | सन्जोप राव

फारच माहितीपूर्ण लिखाण आणि जबरदस्त लेखनशैली. या लेखांचे एक पुस्तक होईल अशी आशा बाळगून आहे.

पाषाणभेद's picture

5 Oct 2013 - 7:05 am | पाषाणभेद

फारच माहितीपुर्ण लेखमालिका.

ऊपेन्द्र's picture

5 Oct 2013 - 9:56 am | ऊपेन्द्र

Dear Mr. Daniel,
Myself is Upendra Nirgudkar from Pune. I am a volunteer of Katraj Snake Park, Pune.
Kindly let me know your full name.
Upendra Nirgudkar.
Upendra1970@rediffmail.com

जॅक डनियल्स's picture

5 Oct 2013 - 10:03 am | जॅक डनियल्स

तुमचा वक्तिगत संदेश तपासा.

जेडी.

फारच सुंदर लेखमाला! प्रत्येक वेळी प्रतिसाद दिले नाही आहेत, पण आवर्जून वाचतो आहे.

इतक्या डेंजर विषयावरचा मस्त खुसखुशीत लेख !

पैसा's picture

5 Oct 2013 - 6:37 pm | पैसा

निवांतपणे वाचला. भयंकर प्रसंगांना तुम्ही ज्या विनोदी पद्धतीने रंगवलंय त्याला तोड नाही!

खेडूत's picture

5 Oct 2013 - 11:58 pm | खेडूत

मस्त रे दादा!
नेहमी वाचत असतो. नेहमीच आवडते!

हा भाग तर भारीच .. :)

'वन ऑफ द बेस्ट' सीरिज ऑन मिपा!

पिशी अबोली's picture

7 Oct 2013 - 2:02 pm | पिशी अबोली

+१

दिपक.कुवेत's picture

6 Oct 2013 - 2:19 pm | दिपक.कुवेत

पाहुनच टाईट झाली आहे. संपुर्ण लेखमाला अतिशय माहितिपुर्ण आहे. पण उपास म्हणलेत त्या प्रमाणे...."साप पाहून लटपटायलाच होतं पण.. तो ओळखेपर्यंत डोळे मिटायचे.."

सोत्रि's picture

6 Oct 2013 - 5:40 pm | सोत्रि

मस्त माहितीवर्धक आणि मनोरंजक!
संजोपराव पुस्तकाबद्दल जे म्हणाले त्याच्याशी सहमत!!

- (सापाला भयंकर घाबरणारा) सोकाजी

हुप्प्या's picture

7 Oct 2013 - 3:07 am | हुप्प्या

नाग, मण्यार, घोणस ह्यांची स्वभाववैशिष्ट्ये अगदी वाचनीय आहेत. निव्वळ साप कसे दिसतात त्याबरोबर हेही सांगणे उपयुक्त आहे. पर्यटक, गिर्यारोहक, भटके, सामान्य लोक अशांची ह्या सर्पश्रेष्टांशी कधीही गाठ पडू शकते. त्यावेळी त्यांचे स्वभाव आठवले तर कुणाला इजा न होऊ देता (सापालाही) सुटायला मदत होईल असे वाटते.
त्यातही आपली आलंकारिक भाषा, सर्वांच्या ओळखीची रुपके वापरुन विषय सोपा करुन सांगणे अगदी मस्त वाटते.

पण मला असा प्रश्न आहे की सगळे घोणस एकसारखे असतात का? त्यांच्यात अजून वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये नसतात का? माणसात कुणी शांत असतो तर कुणी तापट तसे ह्या (व अन्य) सापांच्या एकाच जातीत वैविध्य नसते का?

ह्या सर्पांच्या पिल्लांचे वागणे कसे असते? पिल्ले छोटी असली तरी त्यांचे वीष जालीमच असते असे ऐकून आहे. पिल्लांच्या चावण्यामुळे वीष जास्त भिनते का कमी? आईबाप सापांच्या पिल्लांचे रक्षण करतात का?

जॅक डनियल्स's picture

7 Oct 2013 - 5:37 am | जॅक डनियल्स

मी नागाच्या पिल्लाबद्दल लिहिले होते ते सगळ्या विषारी सापाच्या पिल्लांना लागू होते.

नागच्या (कोणत्याही विषारी सापाच्या) पिल्लामध्ये पण पूर्ण विकसित झालेल्या विष-ग्रंथी असतात, आणि विष पण मोठ्या नागापेक्षा जहाल असते. कारण विष-ग्रंथीचा आकार छोटा असल्यानेमुळे त्यांना कमी विषात जास्त मोठें भक्ष मारून पचवायचे असते.(त्यांना त्यांच्या आया ग्राईप वाटर पाजत नाहीत ;)). म्हणून लहान पिल्लू बघून त्याला हलगर्जी पणे हाताळायला जाऊ नका, ते पण मोठ्या नागासारखेच तुम्हाला पोचवू शकते.

आई- बाप पिल्लांचे रक्षण करतात का ते मला माहित नाही, पण किंग कोब्राचा मेंदू सापांमधील सगळ्यात विकसित मेंदू असल्याने त्याची मादी अंड्यांचे रक्षण जीव तोडून करते.

मला साप पकडताना जाणवायचे की काही साप (एकाच जातीचे) शांत आहेत, पण ते परिस्थितीवर (आधीची इतिहास, तापमान इ.)पण अवलंबून असेल. ढोबळ स्वभाव धरूनच काम करायला लागते नाही तर अपघात व्हायची शक्यता असते. आता जी लोक या क्षेत्रात ३०-४० वर्षे आहेत ते अंदाज लावू शकतात पण १०० % खात्री कोणीच देऊ शकत नाही.

किंग कोब्राची मादी वेळुच्या पानांचा ढिगारा करुन त्यात अंडी घालते. आमच्या शेतात जोवर वेळुचे बन होते तोवर तेथे हा लांबच्या लांब साप दिसायचा.(पूर्वज)
पण किंग कोब्रा हा कॅनिबल असल्याने ज्या क्षणी अंड्यातले जीव वळवळु लागतात त्या क्षणी मादी घरट सोडते. कारण तिचा स्वतःचा स्वभाव साप खाणे हा असतो. तरीही....आईपणाला जागुन ज्या पद्धतीने ती घरट्यापासून दुर जाते ते पहाता, खरेच त्यांचा मेंदू विकसित असावा.
हे नुकते जन्मलेले नाग एकदा गंजीत सापडले होते, लांबवरुन काठेने ढोसलुन एका बुट्टीत भरुन मग बुट्टी पेटवली होती. :( यु माईट फील सॉरी पण आवारात बैल, म्हशी कुत्री,, कोंबड्या आणी काम करणारी माणसे एव्हढ्या सगळ्यांच्याकडे पहाता तेच उचित होते.

ही जन्मलेली पिल्ले झाडावर चढुन बसतात अन त्यातल्या काठ्यांमध्ये अगदी बेमालुन मिसळुन जातात. जोवर त्यांचा आकार अन पळ्णे डेव्हलप होत नाही तोवर अशी झाडावरच रहातात.

ट्रेक ला जाताना एक काठी बरोबर घेऊन जावे आणि गवताळ भागातून चालताना काठी जमिनीवर आपटत चालावे म्हणजे काठीने जमिनीत निर्माण होणार्या कंपनानी साप सावध होऊन दूर जातो शिवाय आयत्या वेळी हे शस्त्र केंव्हाही उपयोगी येते. (या गोष्टी आर्मीत शिकवल्या जातात)(ज्ञान) परंतु कोकणात लोक काठी चा ( रात्रीच्या वेळेस काठी आणि कंदील) शतकानुशतके वापर करीत आले आहेत.( शहाणपण)
रात्री ट्रेकला झोपताना आजूबाजूला डांबर गोळ्यांचा चुरा पसरवावा त्यामुळे उंदीर घुशी आणि सापसुद्धा दूर राहतात. डांबर गोळ्यांचा वास हा सापाची जीभ संतृप्त(saturate) करून टाकतात त्यामुळे सापाची वासाने भक्ष्याचा माग घेण्याची क्षमता कमी होते. मुळात इतका उग्र वास असेल तर उंदीर खारी किंवा तत्सम जमिनिलगत राहणारे प्राणी आपणहून दूर राहतात त्यामुळे त्यांच्या मागे येणारे साप येत नाहीत. माणूस चार पायावर चालणे सोडून दोन पायावर चालू लागला त्याचे नाक जमिनीपासून दूर गेल्यामुळे जमिनीवर असलेल्या धोक्याची शक्यता कमी झालीतेंव्हा पासून त्याची वासाची क्षमता कमी झाली त्यामुळे आपल्याला डांबर गोळीच्या वासाचा तेवढा त्रास होत नाही)
मुळात कोणताही साप दिसला तर दुरूनच रामराम करावा. मग तो विषारी का बिनविषारी याच्याशी काय घेणे आहे? आपण बिबळ्या दिसला तर असे शौर्य दाखवलं काय? केवळ सापाचा आकार लहान असल्याने लोक शौर्य दाखवण्यास जातात. बिबळ्या शी झुंज म्हणजे जीवाशी खेळ हे नक्की माहित असल्याने तो लांबून दिसताच लोक धूम ठोकतात मग सापाशी खेळ कशासाठी?
सर्व सामान्य माणसांनी( म्हणजे तुम्ही आणि मी) साप पकडण्याच्याच काय त्याच्या जवळ जाण्याच्या सुद्धा फंदात पडूच नये असे माझे प्रामाणिक मत आहे. ते असामान्य ( जे डी सारख्या) माणसांवर सोडून द्यावे
मला असे वाटते कि या जे डी साहेबांच्या उत्कृष्ट लेख मालिकेतून आपण सर्व सापाच्या(विषारी व बिनविषारी) चार हात लांब राहायला शिकलो तर तर मालिकेचे सार्थक झाले असे वाटेल.

रेटल स्नेक म्हणजे हाच का?

लेखमाला सुंदर सुरु आहे

चिगो's picture

7 Oct 2013 - 10:25 pm | चिगो

फुकाचा शहाणपणा करतोय, पण हा रॅटल स्नेक नसावा .. तो हामेरीकेतल्या वाळवंटात असतो, असं टिव्हीवर पाहीलंय.. त्याच्या शेपटीला एक खुळखुळ्यासारखा अवयव असतो. शेपटी हलवत ह्या खुळखुळ्याचा आवाज करुन तो 'अपुन इधर बैठेला है, संभालके बाप..' असा इशारा देतो.. :-) बाकी, जेडीसाहेब सांगतीलच..

जॅक डनियल्स's picture

7 Oct 2013 - 10:38 pm | जॅक डनियल्स

रेटल स्नेक हा याच्याच कुटुंबातील अमेरिकेत स्थायिक झालेला सदस्य आहे. त्याचे मूळ स्वभाव, हल्ला करायची पद्धत, विषाचा प्रकार सारखाच असतो, फक्त चीगो ने लिहिले आहे तसे त्याच्या शेपटीला खुळखुळा असतो, त्यामुळे त्याला कुकर ची शिट्टी वाजवायला लागत नाही.
आधी एका प्रतिसादामध्ये मी लिहिले होते, इकडे माझा एक अमेरिकन मित्र रेटल स्नेक चा माज करत होता, मी त्याला आपल्या नाग, मण्यार, घोणस, फुरसे, साधा चापडा, मलबार चापडा (चापडा -पिट व्हायपर)या बद्दल सांगून झीट आणली होती, वरती म्हणालो होतो की "हे तर पुण्यात सापडतात, अजून दाट जंगलात घुसलो पण नाही, घुसलो तर अजून लिस्ट देईन."

झुणका भाकर's picture

7 Oct 2013 - 10:09 pm | झुणका भाकर

छान लेखमाला.

ही बघा घोणसने मारलेली कुकरच्या आवाजासारखी शिट्टी

http://www.youtube.com/watch?v=zLjKAOyjJHA

स्पंदना's picture

8 Oct 2013 - 5:11 am | स्पंदना

लावणीतला पदर....देवा!
फरोड म्हणजे घोण्स हे आज समजल. पण गावी नक्की असच वर्णन आहे की फरोड चावला की माणुस शिजल्यासारखा फुटतो. नशिबाने पाहीला नाही आहे अस वाटत होतं, पण एकदा पुराच्या पाण्याबरोबर येउन काठावर पडला होता. बरोबरच्या मुलांनी (आम्ही शाळेत होतो) मारला होता.