सन्तूर
स्वरतत्वाचे तुषार अगणित
भवतालाला व्यापुनी उरले
रोमरोम पुलकित करणार्या
स्वरपुंजांनी गारूड केले
स्वरचित्रातील अवकाशाच्या
सुप्त मितीचे दर्शन झाले
स्वरलहरींचे जललहरींशी
निगूढ नाते पुनश्च कळले
स्वरशिल्पातील अमूर्ततेचा
चिरंतनाशी घालुनी मेळ
शब्दावाचून सहज रंगला
विलक्षणाचा अद्भुत खेळ